News Flash

व्हा धाडसी, बदलासाठी!

योगायोगाने यंदाच्या ‘चतुरंग’च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेषांकाची संकल्पनाही तीच आहे.

‘बी बोल्ड  फॉर चेंज’ यंदाच्या, येत्या बुधवारी, ८ मार्चला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं हे घोषवाक्य.. जागतिक स्तरावर सर्वच स्त्रियांना प्रेरणा देणारं! काही वेगळं करायचं असेल, क्रांतिकारी, आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर धाडसी पावलं उचलावीच लागतात. रुळलेल्या, पारंपरिक रस्त्याने जाताना अन्याय घडतोय, अत्याचार होतोय हे दिसत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धैर्य अंगी आणावंच लागतं तरच जग उलथवण्याची ताकद तुमच्यात येऊ शकते. पण ही प्रवाहाविरुद्धची लढाई सोपी नसतेच. त्यासाठी मनाची आणि शरीराची प्रचंड ताकद, टीका, मनस्ताप, प्रसंगी मानहानी सहन करण्याची वृत्ती असावी लागते. हे धैर्य, ताकद, धाडस दाखवणारे अनेक जण समाजात असतात किंबहुना असावेच लागतात तरच बदल घडतो. समाज घडतो.

योगायोगाने यंदाच्या ‘चतुरंग’च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेषांकाची संकल्पनाही तीच आहे. देशातल्या, परदेशातल्या अशा काही स्त्रिया, ज्यांच्या मुख्य कामाचं क्षेत्र वेगळं आहे, त्यात त्यांचं कर्तृत्वही सिद्धही झालंय. पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, चुकीच्या परंपरांविरुद्ध ठोस भूमिका घेतली, प्रस्थापितांना आव्हान दिलं आणि बदल घडवून आणला. ‘व्हा धाडसी, बदलासाठी’ हे ब्रीदवाक्य त्यांनी फार पूर्वीपासून अंगी बाणवलं म्हणूनच त्याची फळं समाज चाखतो आहे.

समाजात असे खूप जण आहेत, त्यातील प्रातिनिधिक दहा जणींची ही कर्तृत्व गाथा.. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्याही, काही हयात नसणाऱ्या तर काही आजही अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या.. आणीबाणीविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या लेखिका दुर्गाबाई भागवत, स्वत: श्वेतवर्णीय असून कृष्णवर्णीयांसाठी लढणाऱ्या लेखिका नदिन गार्डिमर, वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या लेखिका महाश्वेतादेवी, व्हिएतनाम युद्धाविरोधात आवाज उठवणाऱ्या अभिनेत्री व्हेनेसा रेडग्रेव्ह, एड्सविरोधात भूमिका घेत स्वत:चा सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या शबाना आझमी, ‘स्टे अन्फेअर स्टे ब्युटिफुल’ म्हणत रंगभेदाविरुद्ध चळवळ उभारणाऱ्या नंदिता दास, गुजराथ दंगलीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नृत्यांगना मल्लिका साराभाई, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अशोभनीय वागण्याचा जाहीर समाचार घेणाऱ्या मेरील स्ट्रीप, ‘फेमिनिझम’ व ‘फिटनेस’ हेच ध्येय मानून जगणाऱ्या अभिनेत्री जेन फोंडा, हिंसा-दहशतवादाच्या विरोधात लेखणीच्या माध्यमातून लढणाऱ्या जेसिका स्टर्न या सगळ्याजणी स्त्रीवर्गाला आदर्शवत, प्रेरणादायी.. समाजातल्या अन्यायाविरोधात लढायला हवंच. पण त्या आधी स्वत:वर होणाऱ्या अन्यायाविरोधात, अत्याचाराविरुद्ध, स्वत:च्याच शारीरिक-मानसिक दुर्बलतेविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य आज प्रत्येकीमध्ये आलं तर या जगातून दु:ख, वेदना संपून जाईल आणि होईल उष:काल नि:स्वार्थी जगण्याचा, प्रेमाचा आणि समाधानाचाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:31 am

Web Title: be bold for change theme international womens day
Next Stories
1 कॅलिडोस्कोप
2 बुलंद आवाज
3 ‘आई’
Just Now!
X