एखाद्या चांगल्या कथा-कादंबरीवर किंवा नाटकावर आधारलेला चित्रपट येतोय म्हटलं, की एक सभय उत्सुकता दाटून येते. वाचक म्हणून आपल्या मनोमंचावर त्या कथा-कादंबरीतील पात्रे आपण लेखकाच्या शब्दांच्या आधारे पाहिलेली असतात. ती पडद्यावर कशी उभी राहतात याची उत्सुकता असते आणि बहुधा आपल्या आणि पडद्यावरच्या प्रतिमांमध्ये इतकी काही तफावत अनुभवाला येते की, कोणत्याही अशा माध्यमांतरांविषयी भय वाटतं. शिवाय काही बरे अपवाद वगळले तर अलीकडे हिंदी-मराठी चित्रपटांनी कादंबऱ्या आणि नाटकांची जी काही ‘वाट’ लावली ती पाहता खरं म्हणजे ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट गौरी देशपांडे यांच्या कथेवरचा आहे, हे कळल्यावर जरा काळजीच वाटली होती. एरवी कथा-कादंबरीतली पात्रं चित्रपटच्या बेगडी चकचकाटात गुदमरून जातात, म्हणून ही भीती.

‘पाऊस आला मोठा..’ या गौरीच्या कथेवर ‘आम्ही दोघी’ बनवला आहे. मुळात ही कथा लहानशीच.. म्हणजे पूर्ण लांबीचा चित्रपट बनवायला लहान. वाढवून वाढवून किती वाढवणार ही कथा? आणि कशी? गौरीच्या कथेत  काही बदलाबदल करणं म्हणजे धाडसच. शिवाय असा बदल विश्वासार्ह तर वाटायला हवा. त्यामुळे धाकधूक वाटणं स्वाभाविक म्हणावं लागेल.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

वास्तविक गाजलेल्या साहित्यकृतींवर चित्रपट करावासा वाटणं ही काही नवलाची बाब नव्हे. अशा चित्रपटांना त्या त्या काळातल्या प्रेक्षकांचा कमीअधिक प्रतिसादही लाभत असतो. धंद्याची रूढ समीकरणे निग्रहाने बाजूला ठेवून साहित्यकृतीच्या गाभ्याला संवेदनशीलतेने भिडणाऱ्या दिग्दर्शकांनी अनेक चित्रपट अजरामर करून ठेवल्याचाही अनुभव आहेच. चार्ल्स डिकन्स, अगाथा ख्रिस्ती, जेन ऑस्टीन, सॉमरसेट मॉम, शेक्सपिअर अशांच्या अनेक कृतींवरचे चित्रपट याची साक्ष देतात. आपल्याकडेही अगदी मूकपटांनादेखील पौराणिक कथांचे सज्जड आधार होते. शरदचंद्र चटोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, आर. के. लक्ष्मण इत्यादींच्या कितीतरी कथा-कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. देवदास तर अगदी असंख्य ‘लीला’ दाखवत पुन:पुन्हा रुपेरी पडद्यावर येत राहिला.

मराठीपुरते बोलायचे तर शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर डॉ. जब्बार पटेल यांनी ‘उंबरठा’ हा चित्रपट बनवला. कादंबरीमधल्या असंख्य घटनांमधून आणि असंख्य प्रसंगांमधून दिग्दर्शकानं निवड केली. चित्रपटसाठी कादंबरीचे जे संपादन केले ते नेटके आणि सूचक होते. चित्रपटातली सुलभा महाजनची विभागीय चौकशी, तिच्या सासूचे दिखाऊ समाजकारण आणि वकील नवऱ्याचे तिच्या अनुपस्थितीत दुसरा संबंध ठेवणे आदी घटकांनी कथानक उठावदार करणे ही दिग्दर्शकाची दृष्टी प्रभावी ठरून स्त्रीच्या आत्मसन्मानाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले. ‘उंबरठा’चा परिणाम म्हणून की काय ‘बेघर’ची दुसरी आवृत्ती ‘उंबरठा’ या नावाने प्रकाशित झाली!

‘भेट’ या रोहिणी कुळकर्णी यांच्या दीर्घकथेवर चंद्रकांत कुलकर्णी यांनी याच शीर्षकाचा चित्रपट केला तेव्हाही त्यात काळानुसार काही बदल केले. मुख्य म्हणजे लहानगा आनंदा मोठा झालेला दाखवताना नात्याचा एक पूर्ण प्रवास रेखाटला- जो पटण्यासारखा होता. असे बदल किंवा काटछाट अपरिहार्य असते. कारण दिग्दर्शक हा त्या त्या कथा-कादंबरीचा ‘विशिष्ट’ वाचक म्हणून आणि तिची पुनíनर्मिती करणारा कलावंत या नात्याने त्याचे आकलन आणि त्याचे अर्थनिर्णयन (इंटरप्रिटेशन) पडद्यावर मांडत असतो.  ‘श्वास’, ‘नटरंग’, ‘शाळा’ आदी चित्रपटांविषयीदेखील हेच म्हणता येईल. मात्र वर म्हटलं तसं असे बदल विश्वासार्ह वाटायला हवेत. या कसोटीवर ‘आम्ही दोघी’ नक्की उतरतो आणि ‘चारुलता’, ‘गाइड’, ‘संस्कार’, ‘उंबरठा’, ‘पिंजर’, ‘शाळा’, ‘७२ मैल एक प्रवास’ अशा अनेक माध्यमांतरांच्या प्रामाणिक आणि उत्तम प्रयत्नांच्या यादीत जाऊन बसतो.

गौरी देशपांडे ही लेखिका रूढ अर्थाने प्रचंड लोकप्रिय नव्हे. त्यात तिच्या कथा आकाराने लहान. तरल. विलक्षण ताकदीच्या. तिच्या कथेतल्या दोन ओळींतला अवकाश गच्च आशयानं भलताच भरलेला. अशा लेखिकेच्या कथेवर चित्रपट करावासा वाटणं हे कौतुकास्पद आणि तितकंच आव्हानात्मक. मूळ कथेला मुळीच न दुखवता आणि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ च्या नावाखाली स्वत:चंच घोडं पुढे न दामटण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांचं मनापासून अभिनंदन.

त्यात ही कथा रूढ नायक-नायिकांची नाही. वडील, मुलगी आणि सावत्र आई यांच्या नातेसंबंधांची कथा हा विषयच प्रेक्षकाच्या सांकेतिक कल्पनांना धक्के देणारा. ज्या काळात (१९७३) ही कथा प्रकाशित झाली त्याही काळात बाप-लेकीच्या नात्याचे हे अपारंपरिकपण आणि अनोखेपण काळाच्या कितीतरी पुढचंच होतं. आज चाळीस वर्षांनीही ते तसंच आहे. अशा वेळी धंद्याची गणितं न मांडता चित्रपट बनवल्याबद्दल आणि तद्दन व्यावसायिक तडजोडी करून कथेचा विचका न केल्याबद्दल हायसं वाटलं.

‘आम्ही दोघी’च्या दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांचा हा स्वतंत्रपणे केलेला पहिलाच चित्रपट. तसं तर व्हाया चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, जिगीषा, औरंगाबाद.. हा सगळा धागा माहिती असल्याने कुठेतरी आतमध्ये एक विश्वासही होता आणि तो सार्थ ठरला. माध्यमांतरांच्या तात्त्विक चर्चेत न जाता इतकं जरूर वाटतंय, की गौरीच्या कथेतल्या अनेक जागा दिग्दर्शिकेने सुज्ञपणे आणि संवेदनशीलतेने आणि गौरीच्याच वाटाव्यात अशा एकतानतेने भरून काढल्या आहेत. लेखिकेचा दृष्टिकोन आपलासा केला आहे. त्यामुळे तिने केलेले मूळ कथेचे हे पुनर्वाचन आणि पुनर्निर्माण समाधान पदरात घालते. कादंबरीचा चित्रपट करताना काटछाट अटळ असते तर लहानशा कथेचा चित्रपट करताना त्यात काही प्रसंगांची भर गरजेची ठरते. मूळ कथा लहानशीच. त्यात मुख्य पात्रे तीनच. तर्कशुद्ध विचारसरणीचे, सतत कामात व्यग्र असणारे, कामानिमित्त दौऱ्यावर जाणारे, वुई आर प्रॅक्टिकल, वुई आर नॉट इमोशनल फूल्स.. या धोरणानं आयुष्याची काटेकोर आखणी केलेले आप्पा, त्यांची त्यांच्याच तालमीत तयार झालेली सावित्री-सावी ही लेक आणि सावी तेरा-चौदा वर्षांची असताना आप्पांनी अचानक दुसरे लग्न करून आणलेली अमला ऊर्फ अम्मी.. या तिघांचे नाते हे कथाबीज. या पात्रांना भावनांच्या प्रकटीकरणाची एक प्रकारची अ‍ॅलर्जीच. आपले चित्रपट तर भावुक-अतिभावुक-कृतक्  भावुक प्रसंगांशिवाय तयारच होत नाहीत. तेव्हा मुळीच परिचयाचा नसलेला हा नात्याचा त्रिकोण पडद्यावर साकारणं ही कसरत अवघड होती. आणि ती दिग्दर्शिकेनं कौशल्यानं साधली आहे.

गौरीच्या कथेची निवेदक सावी आहे. इथे चित्रपटतही तिच्याच तोंडून कथा कथन केली जाते. त्यामुळे दोन्हीकडे सावीचे परिप्रेक्ष्य, तिचा दृष्टिकोन महत्त्वाचा. चित्रपटातला सुरुवातीचा फ्लॅशबॅक, आप्पांच्या मृत्यूनंतर बटलर जॉनने सावीकडे मुंबईला येणं, कोल्हापूरच्या घराच्या किल्ल्या देणं, शाळेतला नाच बसवण्याचा प्रसंग, आप्पांनी दुसरं लग्न केलं ही बातमी नेहा या मैत्रिणीला सांगणं, बर्फाचा गोळा खाणं आणि त्यानंतरचे अम्मीचे आजारपण, अम्मीला बक्षीस दाखवणं, मुंबईत रुळतानाची सावीची धडपड, तिचे ऑफिसमधले सहकारी.. हे आणि असे अनेक छोटे-छोटे प्रसंग नव्यानं निर्माण करताना ते मूळ कथेशी एकजीव होतील, सहज आणि बेमालूम वाटतील याची काळजी प्रतिमा जोशींनी घेतली आहे. राम हा सावीचा मित्र-प्रियकर, त्यांची गहिरी मैत्री, त्यांचं एकत्र राहणं आणि सावीने लग्नाला नकार दिल्यावर रामने दुसरं लग्न करणं, नेहा-सौरभ ही जोडी.. ही सारी जोड गौरीच्याच ‘ओहोटी’ या कथेची आहे. (मग श्रेयनामावलीत ‘ओहोटी’ या कथेचा उल्लेख का नाही?) ‘ओहोटी’ची नायिका आणि सावी या अगदी एकच असाव्यात हे त्या कथा वाचतानाही जाणवतं. (तशातर गौरीच्या अनेक कथांच्या नायिका गाभ्यातून एकच असतात) त्यामुळे राम-सावी, नेहा-सौरभ ही चौकडी, त्यांच्यातले प्रसंग आणि संवाद जमून आले आहेत.

गौरी फार गंभीर आशय फारच सहजपणे मांडते. जाता जाता सांगितल्यासारखा भर्रकन सांगते. लघुकादंबऱ्यांपेक्षा तिच्या कथांतून हे अधिक जाणवतं. गौरीची ती उत्कटता आणि सहजता चित्रपटातही राखली गेलीये. खोटं खोटं आणि मुंग्या येतील इतकं गोड गोड वागणाऱ्या चित्रपटातल्या मुलांपेक्षा ‘आम्ही दोघी’तली सावी चमत्कारिक वाटली तरी खरी वाटते. चित्रपटात लागतातच म्हणून उगाच ‘सेंटी सीन्स’चा मोह कटाक्षाने टाळला आहे, हे नोंदवण्याजोगे.

गौरीच्या कथेतलं घर हे पारंपरिक घर नव्हेच. ‘आई नावाची बाई’ नसल्यामुळे हे घर मुळीच पोरकं झालेलं नाही. अबोल आणि शिस्तप्रिय नोकर-चाकर असल्यामुळे आणि आर्थिक सुबत्ता असल्यामुळे ते अभिरुचीसंपन्न आणि व्यवस्थित आहे. ‘आप्पांना पैसाअडका पुष्कळ मिळे’ या कथेमधल्या एका वाक्याचं दिग्दर्शिकेनं उभं केलेलं दृश्यरूप दाद देण्यासारखं. तर्कनिष्ठ, बुद्धिवादी आणि व्यक्तिवादी विचारांचा आधार जगायला बक्कळ झाला असा आप्पांचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या बळावर सावीही वाढते आहे. केवळ विचारांचं बोट धरून चालणारी माणसं वास्तवात विरळा. मग चित्रपटाची बातच नको. तरीही अशा कथेवर केलेला चित्रपट समाधान देऊन जातो, हे श्रेय दिग्दर्शिकेचं.

इथे ‘आम्ही दोघी’चं रसग्रहण करण्याचा हेतू नाही, पण तरीही हे म्हणावंसं वाटतं, की गौरीच्या कथेचा पोत चित्रपटातही सांभाळला गेला आहे. प्रतिमा जोशींनी आपल्या संवेदनेचे, जाणिवेचे आणि आकलनाचे रंग त्यात मिसळले आहेत. हा पोत राखण्यात बाजी मारली आहे, ती पात्रनिवडीतून. सावीच्या भूमिकेत प्रिया बापटने शाळकरी सावी ते अठ्ठावीस-तीस वर्षांची प्रगल्भ, स्वतंत्र व आत्मनिर्भर सावी ताकदीने उभी केली आहे. भूमिकेचा इतका विकसनशील आलेख क्वचितच वाटय़ाला येतो. त्याचे तिने चीज केले आहे. अम्मीच्या भूमिकेला फारसे संवाद आणि प्रसंग नसूनही मुक्ता बर्वेनं तिच्या देहबोलीतून आणि नजरेतून प्राण ओतले आहेत. मूळ प्रसंगांचा आणि संवादांचा अचूक वापर दिग्दर्शिकेनं करून घेतला आहे. दृश्यप्रतिमांमधून आणि रेखीव चित्रचौकटींमधून गौरीची कथा तिच्या आशयसंपन्नतेसह पडद्यावर येते.

एकदोन उदाहरणे देण्याचा मोह टाळता येत नाही. ‘वुई आर नॉट इमोशनल फूल्स, ओके?’ असं आप्पा छोटय़ा सावीला विचारतात. ती मान डोलवते आणि हातातली चित्रांची वही मिटवते. काय मिटवते ती नेमकं? आणि का? दुसऱ्या एका प्रसंगात आप्पा अचानक वीस-बाविशीच्या खेडवळ अमलाला लग्न करून घरी आणतात. ‘ही अमला.

माझी बायको.’ अशी आणि एवढीच ओळख करून देऊन कामाला लागतात. सावीच्या मनात अनेक अव्यक्त प्रश्न. ‘आप्पांची बायको. आपल्याला काय त्याचं.’ असं म्हणून ती पोहायला जाते. तिथे पहिली फेरी संपायला नेहमीपेक्षा उशीर लागला असं प्रशिक्षक सांगतो. बस्स. इतकंच. अगदी लहानसे प्रसंग,

पण सावीच्या मनातले भावकल्लोळ सूचित करणारे..

सावी आणि नेहा सावीच्या सावत्र आईविषयी थोडं बोलतात. ‘बघू कोण कोणाचा छळ करतं ते’ असं सावी नेहाला म्हणते आणि तिथून पुढे ती आपला खासगी अवकाश जपताना अधिक सावध झालेली दिसते. मूळ कथेत नसलेले हे प्रसंग चित्रपटात सुरेख मिसळून गेलेत. त्या घरात अम्मीचं येणं, अबोलपणे घराची चाकोरी न बदलता त्यात मिसळून जाणं, पाखरांना रोज दाणापाणी ठेवणं, सावीसाठी स्वेटर विणणं, सावी मुंबईला जाताना तिला निरोप देणं.. असे कितीतरी बारकावे गौरीनं रिकाम्या सोडलेल्या जागांमध्ये अर्थपूर्ण रीतीने भरले आहेत.

इथेच खटकलेली बाबही नोंदवायलाच हवी. सावीचं मुंबईतलं घर लावायला ती नेहाला बोलावते. नेहाचं घर लावून होतं तेव्हा सावी चक्क झोपलेली असते. कथेतली आणि उर्वरित चित्रपटातली सावी इतकी अप्पलपोटी नाही. नेहाने लावलेले घर तिला रुचत नाही. तिचे वेगळेपण तिथेही ठसवता यावे यासाठी हा प्रसंग घातला असला तरी सावीचे इतके स्वार्थी असणे न पटणारे..

आप्पा गेल्यावर अम्मी अचानक सावीच्या दारात येऊन उभी ठाकते. असे अचानक येणारे प्रसंग कथेतही आहेत. ते धक्कादायक आहेत पण ‘कुणीच कुणाची पंचाईत करायची नाही’ या तत्त्वाला धरून चालायचं तर अशा धक्क्यांची सवय करावी लागते. अम्मीचा मृत्यू हा अखेरचा धक्का सावीला प्रौढ, प्रगल्भ बनवून जातो. ‘चुकतात आडाखे माणसाचे, सावित्री’, या मूळ वाक्याला चित्रपटात जरा अधिकची जोड दिली आहे. पण ती मुळीच अनाठायी आणि शब्दबंबाळ वाटत नाही. शिवाय इथेच हेही नमूद करायला हवं, की हा मृत्यूचा प्रसंग हिंदी-मराठी चित्रपटांनी तयार केलेल्या अशा प्रसंगांच्या चाकोरीला धुडकावून लावणारा आहे.

‘पाऊस आला मोठा..’ हे गौरीचे शीर्षक अधिक आशयघन आहे. अचानक आणि अवेळी आलेल्या मोठ्ठय़ा पावसात जुनं सगळं मोडून वाहून जातं आणि नव्यानं काही उभारायची संधी मिळते. याबरोबरच सावीच्या आतला भावनेचा झरा नि:संकोचपणे मोकळा होतो. हे सारं

‘आम्ही दोघी’ या शीर्षकात कसं येणार? मान्य आहे, की मूळ शीर्षक अधिक ‘साहित्यिक’ आहे पण ‘आम्ही दोघी’ या शीर्षकापेक्षा निश्चितच उजवे आहे. प्रेक्षकांची चित्रपटविषयक जाण वाढवायची तर त्याची सुरुवात शीर्षकापासूनच व्हायला काय हरकत?

दोन सशक्त स्त्री व्यक्तिरेखांच्या नात्याची ही कथा. सावत्र आई आणि तिची लेक या दोघी वय सोडल्यास दोन टोकांवरच्या स्त्रिया. आप्पांनी अम्मीशी लग्न केलं नसतं तर चुकूनही त्या एकमेकींच्या वाटेत आल्या नसत्या. शिक्षण, आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थान, रंग-रूप आणि आत्मविश्वास-सावीकडे सारंच आहे. बुद्धी आहे, पण भावनेच्या ओलाव्याचे शिंपण नाही. हा ओलावा, हे आर्त नाही म्हणून तिच्या समजुतीमध्ये पोकळ्या राहिल्या आहेत. स्वत:च्या भावनांचं व्यवस्थापन करण्याचं प्रशिक्षण नाही, अनुभव नाही. किंबहुना ते हवं याची जाणीवच नाही. बुद्धी आणि भावना यांचा समतोलच माणसाला ‘माणूस’ बनवत असतो. अम्मीच्या मृत्यूनं हे सावीला समजतं आणि माणूसपणाच्या वाटेवरचा तिचा प्रवास अधिक जाणतेपणानं सुरू होतो, याचं सूचन करीत चित्रपट संपतो म्हणून अम्मीचा मृत्यू हा शेवट नव्हे.. ती तर नवी सुरुवात.

– डॉ. वंदना बोकील कुलकर्णी

vandanabk63@gmail.com