नवऱ्यानं डोक्यात दगड घातला म्हणून तान्हय़ा बाळासह घर सोडून आलेल्या भारतबाई. आज तुळजापूर शहराच्या स्वच्छतेचं स्वप्न पाहताहेत. त्याच्या पूर्ततेसाठी गेली सात र्वष त्या अनवाणी फिरत आहेत. शाळेचं तोंडही न पाहिलेल्या या बाईंना सगळा हिशेब, व्यवहार तोंडपाठ असतो. पाचशे बचत गट सुरू करून अनेकींना रोजगारातून स्वत:च्या पायावर उभ्या राहायला शिकवणाऱ्या, शहर स्वच्छतेसाठी पण करत तुळजापुरात घंटागाडय़ा सुरू करणाऱ्या भारतबाई देवकर यांना आमचा मानाचा मुजरा!

तुळजापूरच्या देवळाजवळचे पार्किंग म्हणजे कचऱ्याचा ढिगारा! गाडीतून खाऊन भिरकावलेले कागद, प्लास्टिक पिशव्या, खरकटं, घाण, त्यातच विधी उरकणारी पोरं, सगळाच गलिच्छ कारभार. तिथे गाडी लावून बाहेर पडताना जवळपास प्रत्येकाला त्या घाणीची किळस वाटत असेल. पण कधी कुणाला त्याबद्दल काही करावसं वाटलं नाही. मात्र तिथल्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या एका अशिक्षित स्त्रीला ही घाण आणि अस्वच्छता खुपत होती. मग तिनं आपल्या आजूबाजूच्या बायांना गोळा केलं आणि ही घाण काढायचा निर्धार केला. त्या सगळ्यांनी मिळून तीन महिने ढोर मेहनत केली. कंबरभर उंचीचे ढीगच्या ढीग कचरा जमा झाला होता. टेम्पो भरभरून तो कचरा गोळा करून नेला आणि हे पार्किंग बऱ्यापैकी साफ झालं. पण तिला लक्षात आलं की नुसतं पार्किंग एकदा साफ करून चालणार नाही तर ते स्वच्छ ठेवायलाही तेवढीच मेहनत करावी लागणार. तिनं तुळजापूरच्या भवानीदेवीलाच साकडं घातलं.

‘‘हे देवी गं एवढी मोठी तुझी कीर्ती. मंग तुझं गाव का असं घाणेरडं? तूच आता तुज्या लेकरांना शिकीव. त्यांच्या मनात स्वच्चतेबद्दल भरव आणि तुजं हे गाव स्वच्छ करून घे.’’ या साकडय़ाबरोबरच एक पणही केला. ‘‘जवापतुर हे देवीचं गाव स्वच्च होत नाही तवापत्तुर मीबी पायात चप्पल घालणार नाही.’’
आणि खरोखरच गेली सात वर्षे तुळजापूरच्या भारतबाई देवकर अनवाणी फिरत आपलं समाजकार्य करत असतात. तुम्ही कधी तुळजापूरला गेला तर लक्षात येईल की, देवीचे स्थान म्हणून अनेक बायका इथं बांगडय़ा भरतात. आणि त्या काचांचा खच सर्वत्र पडलेला दिसतो. अशा रस्त्यावरून अनवाणी फिरणाऱ्या भारतबाई देवकर म्हणजे खरोखरच एक आगळीवेगळी कहाणी आहे.

तुळजापूरपासून १५ किमी अंतरावरच्या एक छोटय़ाशा खेडय़ात जन्मलेल्या भारतबाईंच्या वडिलांची सुमारे ऐंशी एकर जमीन होती. त्यामुळे शेतीत राबण्याचं, कष्टाचं बाळकडू अगदी लहानपणापासूनच मिळालं. एकूणच ग्रामीण भागात असलेल्या शिक्षणाच्या नावडीमुळे, मुलींना शिकवून काय करायचं अशा वृत्तीमुळे त्यांनीही कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही. वडील घरी नसताना, शेतीची कामं आटपून, रात्री मळ्यावर शेतमाल राखणं, शेतावर आलेल्या चोरांना फसवून हुसकून लावणं अशा गोष्टीतून लहानपणापासूनच त्यांचा कणखरपणा दिसून आला.

लग्न झाल्यावर त्या बार्शी तालुक्यातल्या मालेगाव इथं राहायला आल्या. एकदा दुसऱ्या एका बाईपायी नवऱ्यानं भारतबाईंना मारहाण केली. डोक्यात चक्क दगड घातला. महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये मरणासन्न अवस्थेत होत्या. त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाला तेव्हा त्यांची बहीण रुख्मिणीबाई देवकर यांनी सांभाळले. हॉस्पिटलातून परत आल्यावर त्या आपल्या बहिणीकडे राहायला गेल्या. तिथे टाकलेल्या, एकटय़ा स्त्रीचं कष्टदायक जिणं जगत भाऊ-भावजय यांच्या शेतात राबत होत्या. पण काही महिन्यांतच ही आता कायमची इथेच राहणार, बसून खाणार यावरून बोलणी ऐकल्यावर मात्र त्यांनी मुलाला उचलून तुळजापूर गाठलं.

तुळजापूरसारख्या शहरी भागात आल्यावर उपजीविकेसाठी त्या रस्त्याची खडी फोडायचं काम करायला लागल्या. खडी फोडायची, घरकामं करायची आणि दोन वर्षांच्या आपल्या मुलाला सांभाळायचं असं आयुष्य सुरू झालं. एका झोपडपट्टीत राहायला जागा मिळाली. पोटापुरतं भागायला लागलं तसा त्यांचा मूळ स्वभाव उफाळून आला. आपल्या आयुष्यात इतके कष्ट करावे लागले, इतके अन्याय सहन करावे लागले, पोटापाण्यासाठी परिस्थितीशी झगडावं लागलं तसं बाकीच्या बायकांना लागू नये असं त्यांना वाटत होतं. जमेल तसा आजूबाजूला मदतीचा हात देणं, बायकांना स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करणं सुरू होतंच.

देवळात मानकरी येतात तेव्हा इतर लोकांना प्रवेश देत नाहीत. एकदा भारतबाईंनाही प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्या तिथल्या मानकऱ्याला सुनावून आल्या. ‘‘आम्ही वरड, दगड फोडणारी माणसं. त्या दगडाच्या छाताडावर पाय ठिवूनशान घाव घालत त्यापासून देव बनिवतो! या मूर्तीला तुम्ही निसते अंगारे लावता पण तो देव आमीच बनवलेला असतुया. अशा देवाला कुटूनबी नमस्कार केला तरी त्ये पावतुया.’’
एकदा त्या आपल्या मावशीच्या गावी गेल्या होत्या, तिथं कसली तरी बैठक सुरू होती. तिथं त्यांना बचत गटाबद्दल कळलं. तिथल्या एका वार्ताहरानं त्यांना अशा बचत गटाची माहिती दिली. मावशीच्या गावाहून भारतबाई परत आल्या त्या एक वेगळं काही तरी करण्याच्या इराद्यानेच. गरीब कुटुंबांना शेती, आजारपण, सण अशा कारणानं सावकारांकडून कर्ज काढावं लागत असे. सावकाराचा सुमारे पंचवीस-तीस टक्के असा अति प्रचंड व्याज दर. घेतलेल्या मुदलावरचे व्याज फेडता फेडताच कुटुंब देशोधडीला लागायची. महिना-दोन महिने पैसे दिले नाही की सावकार सरळ घरादाराला कुलूप ठोकायचा. मुलं, बाळं रस्त्यावर यायची. हे माहीत होतं तरीही त्यावाचून अडत होतं. अडीनडीला अचानक पैसा देणारा तोच होता त्यामुळे ते थांबवताही येत नव्हतं. हे सगळं भारतबाई बघत होत्या. हे बदलायला पाहिजे, गरिबाला असा नाडायला नको असं त्यांनाही वाटत होतं. मावशीच्या गावात या सगळ्यांचं उत्तर मिळालं असं त्यांना जाणवलं.

आजूबाजूच्या काही बायांना त्यांनी गोळा केलं. अनेक प्रकारे समजावून त्यांचं मन वळवलं आणि बचत गट करण्यासाठी उद्युक्त केलं. ‘बँक ऑफ इंडिया’ने त्यांना अशा खात्याची नीट माहिती करून दिली आणि महिन्याचे पंचवीस रुपये खात्यात टाकत पाच बचत गट सुरू झाले. या बायका मसाले, पापड, कुरडया करून, परकर शिवून विकू लागल्या. चार पैसे हाताशी येऊ लागले. नुसतं काम करायचं नाही तर आपण केलेला माल स्वत:च बाजारात विकूनही यायचा, असं त्यांनी सांगितलं. या महिलांनी बनवलेला माल दुकानात विकायला ठेवला की जास्तीचा नफा दुकानदारालाच मिळतो. त्याऐवजी स्वत:च विकला तर तो नफा आपल्याला मिळेल असं तत्त्व त्यामागे होतं.

याचा परिणाम सावकाराच्या धंद्यावर झालाच आणि मग भारतबाई त्यांना नजरेत खुपायला लागल्या. अनेक परीनं त्यांना त्रास देणं, थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले. काम करून भारतबाई रात्री-बेरात्री परतायच्या तेव्हा वाट अडवून त्यांना धमकी द्यायलाही सावकारांनी कमी केलं नाही. सलग तिसऱ्या दिवशी अशी अडवणूक झाल्यावर मात्र त्यांनी आपला रुद्रावतार धारण करत, ‘आजपातूर आलात. आता उद्या येशाल तर तिखट टाकून लाकडानं बडवत पोलिसांकडे नेईन,’ अशी उलट धमकी त्यांना देऊन पळवून लावलं.

हे इतकं झालं तरी तुळजापूरची नगरपालिका ढिम्म होती. मग भारतबाईंनी मुंबई पालिकेत कुणाला तरी पत्र लिहून तिथून तुळजापूर नगरपरिषदेला बचत गटासंदर्भात पत्र पाठवलं आणि मग तुळजापूर नगरपरिषदेकडून भारतबाईंना बचत गटाबद्दल विचारणा झाली. त्या आधीच त्यांचे पाच गट कार्यरत होते. भारतबाईंच्या मदतीनं नगरपरिषदेनं अधिक बचत गट बनवण्यास उद्युक्त केलं. दिवसभर भारतबाई वणवण फिरतात, घरोदारी जाऊन बचत गटाचं महत्त्व समजावून देतात. तुळजापुरात सर्वेक्षण घेऊन ७७०० उंबरा मोजणी केली आहे, असं त्या अभिमानानं सांगतात. आज सुमारे पाचशे बचत गट तिथं सुरू झाले आहेत.
या बचत गटामार्फत कवडीमाळा बनवणं, कपडे शिवणं, ब्युटीपार्लर चालवणं, गृहोद्योग करणं, गांडूळ खत बनवणं, दुधाचे पदार्थ बनवणं, देवळाची सफाईची कामं, सणावारीची कामं, पोलियोचा कार्यक्रम राबवण्यासाठी मदतनीस अशा गोष्टी सुरू आहेत. शाळेत दुपारचा खाऊ बनवणं, रस्ता सफाई, कचरा उचलण्याचं पालिकेचं काम टेण्डर भरून घेतली जातात. सुमारे साडेतीनशे महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं गेलं. पाच महिलांना संगणकाचंही शिक्षण दिलं गेलं. या सगळ्या आता स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

भारतबाई म्हणतात, सरकार गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना आखते पण त्याचा फायदा गरिबांना मिळतच नाही. गरजवंत म्हणून त्यांची नावनोंदणीही सरकार दरबारी होत नाही. त्यांनी त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला. दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करून खरोखरच्या गरजूंची नावं नोंदवली जावी यासाठी मागे लागल्या. त्या म्हणतात, ‘‘सरकार मदत देतय, ती गोरगरिबांपत्तूर पोचू द्या की. त्ये काय तुमच्या बापाच्या घरचं द्यायचंय का? गरिबांच्या झोळीत दगड आणि इतरांच्या झोळीत गठुडं कशापायी? त्ये नाडलेले लोक हायती त्यांना थोडी मदत मिळायला नको? मी बी या गोरगरिबांमधूनच आलिया, म्हनूनशान जसा मला त्रास झाला तसा या बाकीच्या बायांना होऊ नये आसं वाटतं बगा.’’
इतकं सगळं काम करून त्यांनी आपल्या मुलाला वाढवलं, त्या मुलाचं लग्न करून देताना त्यांनी त्याच मांडवात आणखी तेरा एकटय़ा स्त्रियांच्या मुलींचीही लग्न लावून दिली. बालहत्या रोखण्यासाठीही त्यांनी काम केलं आहे. इतकी सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्ती दुर्मीळच!

भारतबाई रूढार्थाने शाळेत गेल्या नसल्या तरी त्या जगाच्या शाळेत शिकलेल्या आहेत. सरकारी कागदपत्रं, कायदे, गरिबांसाठीच्या योजना, कुठल्या कामाचं टेंडर भरणं अशा सगळ्याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते. साधे आकडेसुद्धा वाचता येत नसताना इतकी माहिती त्या कुठून मिळवतात तर त्या आसपासच्याच नव्हते तर जमेल तिथल्या बैठकांना जातात. शिबिरात हजेरी लावतात. लोकांशी बोलून माहिती गोळा करतात आणि नुसतीच गोळा करत नाहीत तर या माहितीचं नेमकं प्रोसेसिंग त्यांच्या डोक्यातच करून योग्य ठिकाणी त्याचा वापरही करतात. सर्वेक्षण कसं करायचं, त्या माहितीचं काय करायचं हे त्यांना नीट माहिती आहेत. बचतगटाच्या वह्य़ा त्या स्वत: लिहू शकत नाहीत पण त्या कशा लिहायच्या हे त्या बरोब्बर सांगू शकतात.

देवळात हजारोंनी नारळ येतात त्या नारळाची किशी (काथ्या) अक्षरश: कचऱ्यात फेकला जातो, आणि ते बघून भारतबाईंमधला उद्योजक कळवळतो. त्या काथ्याचं, त्यातून पडणाऱ्या कोकोपिटचे किती उपयोग आहेत आणि त्यातून किती रोजगार निर्माण होईल हे बसल्या बसल्या त्या सांगतात. सध्या त्या कामाच्याही त्या मागे लागल्या होत्या. दुर्दैवाने त्या कामासाठी लागणारं मशीन त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे त्यामुळे त्या हे काम अजूनही करू शकत नाहीत.
तुळजापुरात घंटागाडय़ा सुरू करायचं टेण्डर भरून त्यांनी ते कामही मिळवलं आहे. पूर्वी सगळा कचरा असाच इथं तिथं टाकला जायचा. आता त्यांच्या बचत गटाच्या पाच गाडय़ा (तीन चाकी) ठरावीक भागातला कचरा गोळा करतात, त्याची विल्हेवाट लावतात.

भारतबाईंना ‘जिजाई पुरस्कार’, ‘गुणगौरव पुरस्कार’ अशा काही पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. त्या आपल्या बचत गटाची वही आपल्या मुलाकडून लिहून घ्यायच्या तेव्हा मुलगा कशाला ही दुनियादारी करत बसतेस, असं म्हणत असे. ‘भारतमाता अन् कुछ भी नही आता’ असं मजेत चिडवत असे. मात्र पुण्याला अण्णा भाऊ पुरस्कार घेतल्यावर खेडोपाडीची माणसं त्यांच्या पाया पडताना पाहिल्यावर मात्र त्यांच्या मुलाला आपल्या आईची थोरवी जाणवली.
देवळातला एक प्रसंग भारतबाई सांगतात. देवळात मानकरी येतात तेव्हा इतर लोकांना प्रवेश देत नाहीत. एकदा त्यांनाही प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्या तिथल्या मानकऱ्याला सुनावून आल्या. ‘‘आम्ही वरड, दगड फोडणारी माणसं. त्या दगडाच्या छाताडावर पाय ठिवूनशान घाव घालत त्यापासून देव बनिवतो! या मूर्तीला तुम्ही निसते अंगारे लावता पण तो देव आमीच बनवलेला असतुया. अशा देवाला कुटूनबी नमस्कार केला तरी त्ये पावतुया.’’ अशा देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या पण खरा देव कुठूनही पावतो असे मानणाऱ्या भारतबाई देवीकडे मनापासून एक मागणं मात्र मागतात. ‘‘देवी शक्ती, इक्ती (युक्ती), भक्ती आनी सदबुद्दी मला दे. माजी सपनं साकार कराया तूच मदत कर आनि हे तुजं गाव स्वच्च, सुंदर कराया तूच लोकांना सांग.’’ ल्ल
(संपर्क : ८६०५०७७७०४)
(विशेष आभार – फोटो सर्कल सोसायटी, ठाणे)
स्वप्नाली मठकर- swapnalim@gmail.com