News Flash

नवमाध्यमातलं आभासी स्त्री-स्वातंत्र्य

स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब या तीन धाडसी पत्रकार स्त्रियांच्या कहाण्या मांडल्या आहेत

नवमाध्यमातलं आभासी स्त्री-स्वातंत्र्य
प्रतिनिधिक छायाचित्र

नवमाध्यमांच्या क्षेत्रात विरोध सोसून; पाय रोवून काम करणाऱ्या पत्रकार समोर येऊ लागल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रात ठामपणे वावरू पाहणाऱ्या, या क्षेत्रावर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या, त्या क्षेत्रात आपल्या सदसद्विवेक बुद्धीने हस्तक्षेप करून त्यात बदल घडवू पाहणाऱ्या सर्व स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात बोचरे बाण सहन करावे लागले आहेत वा अजूनही लागताहेत. समाजमाध्यमांमधील ‘जल्पकांच्या टोळ्यां’च्या अश्लाघ्य टीकेला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण तो आहे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आभासी अवकाश. तरीही स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग, राणा अय्युब यांसारख्या पत्रकार स्त्रिया धाडसाने आपल्यावरचे बोचरे बाण सहन करत ठामपणे उभ्या आहेत..

पुण्यातल्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराजवळच्या चौकात झाशीच्या राणीचा एक दिमाखदार पुतळा आहे. आपल्या पिल्लाला पाठीशी बांधून तळपत्या तलवारीनिशी युद्धावर निघालेली ही इतिहासातली राणी आणि तितक्याच आवेशाने स्कूटर्सवरून दैनंदिन युद्धावर निघालेल्या, खालच्या चौकातल्या आजच्या स्त्रिया, रोजच्या रोज एकमेकींना भेटतात तेव्हा स्त्रियांच्या इतिहास- वर्तमानाची सरमिसळ घडते आणि काळ बदलला तरी स्त्रियांचे स्वाभाविक कर्तेपण साकारण्याची आणि स्वीकारण्याची लढाई आपल्या समाजात नेहमीच किती अवघड बनते याची साक्ष मिळते. झाशीच्या राणीच्या काळातल्या; मध्ययुगीन रणक्षेत्रावरच्या वास्तविक लढाया अस्तंगत होऊन त्याची जागा आता नवतंत्रज्ञानाने तोललेल्या ड्रोन युद्धाने घेतली आहे. तसाच सामान्य स्त्रियांच्या घरगुती आणि सार्वजनिक वावराच्या क्षेत्राचा परीघ विस्तारून या दोन्ही परिघातल्या त्यांच्या रोजच्या लढाया मात्र आणखी गुंतागुंतीच्या; आणखी जीवघेण्या झाल्या आहेत.

या लेखाबरोबरच नवमाध्यमांच्या क्षेत्रात विरोध सोसून; पाय रोवून काम करणाऱ्या स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब या तीन धाडसी पत्रकार स्त्रियांच्या कहाण्या मांडल्या आहेत. पण खरे पाहता त्या कहाण्या निव्वळ या तिघींच्या नाहीत; त्या कहाण्या नुसत्याच स्त्री पत्रकारांपुरत्याही मर्यादित नाहीत. सार्वजनिक क्षेत्रात ठामपणे वावरू पाहणाऱ्या, या क्षेत्रावर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या, त्या क्षेत्रात आपल्या सदसद्विवेक बुद्धीने हस्तक्षेप करून त्यात बदल घडवू पाहणाऱ्या सर्व स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात या प्रकारचे बोचरे बाण सहन करावे लागले आहेत वा अजूनही लागताहेत.

अगदी टोकाला जाऊन या मुद्दय़ाचा विचार करायचा झाला तर तो समकालीन भांडवली (म्हणजे आपल्या भवतालचे अमेरिकेपासून तर आफ्रिकेपर्यंतचे सर्व समाज) समाजातल्या पुरुषसत्ता आणि त्यातल्या सत्तासंबंधांशी जाऊन पोचतो. हे सत्तासंबंध घरीदारी, कुटुंब-समाज- धर्मव्यवस्थेत; लोकशाही राजकारणात आणि वलयांकित नेतृत्वाभोवतीच्या हुकूमशाहीत, युद्धात- शांततेत सर्वत्र खोलवर आणि दूरवर पसरलेले दिसतील. त्यांच्या जाळ्यामध्ये स्त्रियांसाठी एक ठाशीव सामाजिक आणि सांस्कृतिक चौकट निश्चित केली जाते आणि या चौकटीबाहेर पडू इच्छिणाऱ्या; इकडे-तिकडे वावरू इच्छिणाऱ्या स्त्रिया समाजाच्या टीकेचे लक्ष्य बनतात. स्त्री-पुरुष समानतेचे तोंड देखले मूल्य स्वीकारलेल्या ‘प्रगत’ समाजामध्येदेखील या चौकटीची थोडी फार वरवरची मोडतोड झाली आहे इतकेच. हिलरी क्लिंटनपासून तर सेरेना विल्यम्सपर्यंत निरनिराळ्या अमेरिकी स्त्रियांची समाजमाध्यमांवरून केली गेलेली हेटाळणी उदाहरणादाखल पाहावी. आताच्या समाजात; उलट स्त्रिया आपला निव्वळ घरगुती क्षेत्रातला वावर सोडून सार्वजनिक क्षेत्रातही हिरिरीने वावरू लागल्याने त्याच्यासाठी अदृश्य काचेच्या किती तरी भिंती/ छते आता नव्याने तयार झाली आहेत. लेखात उल्लेखलेल्या तिघींवर झालेले जल्पकांचे शरसंधान हे त्याचे निव्वळ एक उदाहरण.

समाजमाध्यमांनी तोललेली आणि निरनिराळ्या किती तरी सामाजिक, आर्थिक विषमतांना पोटात बाळगणारी आपल्या समाजातली वेडीवाकडी आधुनिकता अंगीकारत असताना; स्त्रियांना सदोदित तिचा सामनाही करावा लागतो आहे. या जगात त्यांच्यासाठी नव्या संधी खुल्या होताहेत; त्यांचा अवकाश विस्तारतो आहे आणि स्त्रियांचे एक नवे सामूहिक आत्मभान साकारते आहे.

दुसरीकडे त्यांना ‘जल्पकांच्या टोळ्या’(ट्रोलिंग) सारख्या नवनव्या संकटांचा सामनाही करावा लागतो आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’सारख्या चित्रपटाचेच उदाहरण घ्या. घुसमटवणाऱ्या; बंदिस्त समाजव्यवस्थेत वावरणाऱ्या एका लहानशा, अनाम मुलीला ‘यूटय़ूबने’ स्टार बनवले आणि तो चित्रपट असल्याने एका आश्वासक क्षणावर त्याची कहाणी संपली. परंतु, चित्रपटात दाखवलेली घुसमटवणारी समाजव्यवस्था आणि घरगुती नातेसंबंधांची ताठर चौकट आजही अबाधित असल्याचेही तिथे दिसले. या ताठर चौकटीत; अभिव्यक्तीचे; कर्तेपण गाजवण्याचे माफक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळाले तरीदेखील त्यांना ‘स्त्रीपणा’च्या साच्यात बसवण्याची धडपड मात्र निरनिराळ्या मार्गानी सुरूच राहते आणि या धडपडीला दाद न देणाऱ्या स्त्रियांवर हलक्या दर्जाच्या, शेलक्या शिव्यांचा भडिमार होतो. ही विपरीतता आणखी पुढे जाऊन स्त्रियांवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कधी त्यांच्यावर शारीरिक हिंसाचार केला जातो तर कधी खुनी हल्ले केले जातात.

समाजमाध्यमांमधील ‘जल्पकांच्या टोळ्या’ निरनिराळ्या पातळ्यांवर आपल्या आणि जगभरातील आजच्या राजकीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. ही संस्कृती नानाविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संघर्षांच्या विळख्यात सापडलेली संस्कृती आहे. त्यामुळे ती एक असुरक्षित, भयग्रस्त संस्कृती बनली आहे. या असुरक्षिततांमधून समाजमाध्यमांवर एकीकडे स्वत:तच बटबटीतपणे मश्गूल राहणाऱ्या आणि एकमेकांची सतत स्तुती करत राहणाऱ्या गटांचा उदय होतो, तर दुसरीकडे याच असुरक्षिततेमधून विरोधाचा ‘ब्र’देखील उच्चारणाऱ्याचा/ रीचा खातमा करण्याची तयारी केली जाते.

या असुरक्षित आणि भयग्रस्त राजकीय संस्कृतीत स्त्रियांचा (आणि बरोबरीने अल्पसंख्याकांचा, स्थलांतरितांचा, जास्त मुले जन्माला घालणाऱ्या गरिबांचा; शहरातील जागा अडवणाऱ्या फेरीवाल्यांचा इत्यादी) बळी दिला जातो. याचे कारण म्हणजे लोकांच्या असुरक्षिततेमधून नेहमी प्रस्थापित वर्चस्व संबंधांना पाठबळ मिळते आणि दुसरीकडे या संस्कृतीला ग्राहकवादाचा विळखा असल्याने सर्वानाच वर्चस्वशाली, प्रस्थापित गटात सामील होण्याची ओढ लागते. या दोन घटकांच्या सरमिसळीतून सध्या सर्वत्र झुंडशाहीची वाढ झालेली दिसेल. झुंडशाहीचा रोख नेहमी कमकुवत गटांना नेस्तनाबूत करण्याकडे असतो तर दुसरीकडे तिला; आपल्या विचारांना विरोध करणाऱ्या कुणालाही पुरते नामोहरम करायचे असते. अशा परिस्थितीत; समाजमाध्यमांवर मतमतांतरांचा गलबला घडवण्याची संधी तत्त्वत: सर्वाना आणि म्हणून काही धाडसी स्त्री पत्रकारांनाही मिळत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचे या ना त्या प्रकारे खच्चीकरण घडवण्याचे प्रयत्न जल्पक आणि त्यांचे या ना त्या स्वरूपातले इतर पाठीराखे करतात.

आपल्या भवतालच्या समकालीन राजकीय संस्कृतीने स्त्रियांवर आणखी एक मोठे ओझे टाकले आहे. ते म्हणजे आजवर आपण जे काही शिकलो; जशा काही वावरलो ते सर्व विसरून जाण्याचे (अनलर्निगचे) ओझे स्वातंत्र्य चळवळीपासून मिळालेला उदारमतवादाचा वारसा, घटनादत्त स्त्री-पुरुष समानता आणि नव्वदीपासून पिटला गेलेला स्त्री सक्षमीकरणाचा डांगोरा अशा सगळ्या प्रवासात; तोवर परंपरेत पुरत्या जखडलेल्या भारतीय स्त्रियांनी स्वत:चे एक नवे वेडेवाकडे का होईना आत्मभान विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. सानिया मिर्झा, सायना नेहवाल ते सरकारने दिलेल्या सायकलींवर बसून ‘स्कूल चले हम’ म्हणणाऱ्या मुलींपर्यंत त्या आत्मभानाची उदाहरणे पसरलेली दिसतील. या आत्मभानाचा परिणाम म्हणूनच आपली मते ठामपणे मांडणाऱ्या;  निरनिराळ्या पक्षांमधील राजकारण्यांचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीला आणणाऱ्या; स्वत:चे वर्तमानपत्रे; टी.व्ही. चॅनेल/ यूटय़ूब चॅनेल चालवणाऱ्या स्त्री पत्रकार/ प्रवक्त्या सावकाशपणे का होईना भारतात आणि जगात सर्वत्र तयार होऊ लागल्या. मात्र आता आपण; आपली राजकीय संस्कृती हे चक्र उलटे फिरवू पाहते आहे. (पुरुषांनी ठरवून दिलेल्या) मर्यादित स्त्री सक्षमीकरणाची मुभा देणाऱ्या या संस्कृतीत स्त्रियांचे व्यक्ती म्हणून स्वाभाविक कर्तेपण मान्य होत नाही. त्याऐवजी त्यांनी स्त्री प्रतिमांच्या या किंवा त्या साच्यात चपखल बसावे अशी अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या; इतकेच नव्हे तर स्वत:चे स्वायत्त कर्तेपण लहानशा देखील वृत्तीतून व्यक्त करू पाहणाऱ्या सर्वच स्त्रियांना समाजमाध्यमांवर अश्लाघ्य टीकेला तोंड द्यावे लागते.

मसाबा गुप्ता, सोनम कपूर, गुरूमेहर कौर अशा कोणीच त्यातून सुटत नाहीत, तर स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब का सुटाव्यात? आम्ही जल्पकांना आणि टीकाकारांना घाबरत नाही. कारण ‘सत्य असत्याशी आम्ही मन ग्वाही’ केले आहे, असे त्या तिघी (आणि वरच्या तिघीदेखील) ठामपणे म्हणतात. परंतु वास्तविक हल्ल्यांपेक्षादेखील समाजमाध्यमांवरील जल्पकांचे हल्ले जास्त क्रूर असतात आणि त्यातून सापडलेल्यांच्या आत्मविश्वासाला गंभीर तडा जातो, असे याविषयीच्या मानसशास्त्रीय अभ्यासात मांडले आहे. नवमाध्यमांमध्ये वावरू पाहणाऱ्या आणि या माध्यमांचा वापर करून आपले मत ठामपणे पुढे मांडणाऱ्या स्त्रियांची लढाई म्हणूनच आणखी अवघड बनते. कारण तेथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आभासी अवकाश आहे. परंतु हा अवकाश वास्तवात जोपासणारी राजकीय संस्कृती मात्र अस्तित्वात नाही.

स्वाती चतुर्वेदी

इंटरनेटच्या दुनियेत माहितीची सत्यासत्यता पडताळण्याचा वेळ क्वचितच मिळतो. येथे खऱ्या-खोटय़ाचे मोल त्याला मिळणाऱ्या लाइक्स, कमेंट्स, हिट्स यांवर ठरते. त्यामुळे अनेकदा खरी माहिती दडपायची म्हटलं तर खोटय़ा माहितीचा इतक्या प्रचंड प्रमाणात भडिमार केला जातो की कालांतराने खऱ्याचे खोटे आणि खोटय़ाचे खरे होऊन बसते. ट्विटर, फेसबुक अशा प्रचलित समाजमाध्यमांवर हा प्रकार सर्रास सुरू असतो आणि तरीही ते पाहणाऱ्याला सत्य-असत्याची पडताळणी करणं शक्य होत नाही. समाजमाध्यमाची हीच उणी बाजू लक्षात घेऊन ट्रोल प्रसवले गेले. एखाद्या माहिती किंवा व्यक्तीला खोटे ठरवायचे असेल किंवा तिच्याबद्दल द्वेष पसरवून तिला नामोहरम करणारे म्हणजे ट्रोल वा जल्पक. सध्या आपल्या देशातही याचा सुळसुळाट झाला आहे.

निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन करण्यामध्ये या ट्रोलनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपच्या या ट्रोलतंत्राचा गौप्यस्फोट करण्याचा दावा करणारे ‘आय एम अ ट्रोल’ हे स्वाती चतुर्वेदी या स्त्री-पत्रकाराचे पुस्तक प्रचंड गाजले. भाजपने आपल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून ट्विटर आणि फेसबुकवर कसे व्हर्च्यूअल सैनिक तयार केले आहेत आणि ही सेना भाजपच्या टीकाकारांवर कशी तुटून पडते, याचा आढावा घेणारे हे पुस्तक लिहिणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांच्यावर ट्रोलमंडळी तुटून पडली नसतील तर नवलच. ट्विटरवरून अनोळखी मंडळींकडून चतुर्वेदी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापासून त्या काँग्रेसच्या दलाल आहेत, अशा जहरी टीकेचा मारा चतुर्वेदी यांच्यावर झाला आणि आजही होतो. दोन वर्षांपूर्वी तर हिंदी चित्रपटातील गायकीचा पेशा सोडून भाजपच्या कंपूत सामील झालेल्या अभिजीत भट्टाचार्य यांनी चतुर्वेदी यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केली. याप्रकरणी चतुर्वेदी यांनी भट्टाचार्य यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही केली; परंतु त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचे उद्योग आजही सुरू आहेत. चतुर्वेदी यांना आजही बलात्कार, हत्येच्या धमक्या उघडपणे ट्विटरवरून दिल्या जातात. पण त्या आजही रोखठोकपणे ट्विटर, फेसबुकवरून व्यक्त होतात. ‘मी कुणी चीअरलीडर किंवा मेगाफोन नाही.. मी पत्रकार आहे. तथ्य आणि सत्य समोर आणणे हेच माझे काम आहे.’ असं त्या आजही सांगतात.

 

रोहिणी सिंग

१४ मार्च २०११ रोजी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढरा यांच्या हरियाणातील जमीनखरेदीच्या उद्योगाबाबतचे एक वृत्त प्रसिद्ध केले. सुमारे ५० लाख रुपयांच्या भांडवलात सुरू झालेल्या अलंकार आणि हस्तकला वस्तूंच्या क्षेत्रातील वढरा यांच्या कंपनीने अवघ्या तीन-चार वर्षांत हरियाणाच्या बांधकाम क्षेत्रात कशी उडी मारली आणि जमीनखरेदीचा कसा सपाटा लावला आहे, याचे विस्तृत वर्णन करणारे ते वृत्त रोहिणी सिंग हिच्या शोधपत्रकारितेचे फलित होते. वढरा यांच्या कारभाराचे हे वृत्त उजेडात येताच भाजपने त्या वेळी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर हल्ला चढवला होता. रोहिणी सिंग यांच्या धाडसाचे कौतुक करताना भाजपचे नेते थकत नव्हते. पण सहा वर्षांनंतर हे चित्र एकदम पालटले. अवघ्या दहा दिवसांपूर्वी रोहिणी सिंग यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या कंपनीच्या संपत्तीने अचानक        उसळी कशी घेतली, हे सांगणारे वृत्त प्रसिद्ध केले. २०१४-१५ मध्ये अवघ्या ५० हजार रुपयांची उलाढाल असलेल्या जय शहा यांच्या ‘टेम्पल एंटरप्रायजेस’ या कंपनीचा पसारा अवघ्या वर्षभरात ८०.५ कोटी रुपयांवर कसा पोहोचला याचा लेखाजोखा रोहिणी यांनी मांडला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून जय शहा यांच्या कंपनीचा झालेला उत्कर्ष साहजिकच अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पण सहा वर्षांपूर्वी रोहिणी सिंग यांच्या धाडसाचे गुणगान करणाऱ्या भाजपला रोहिणी सिंग या ‘विकाऊ पत्रकार’ असल्याचा साक्षात्कार झाला. खोटय़ा बातम्या देऊन खंडणी उकळण्याचे काम करणारी पत्रकार अशा शब्दांत भाजप नेते रोहिणी यांच्यावर हल्लाबोल करू लागले. इकडे समाजमाध्यमांवर भाजपचे समर्थकही सिंग यांच्यावर तुटून पडले. ‘रोहिणी सिंग तू आज किती जणांसाठी करवा चौथ करणार आहेस?’ अशा नीच पातळीवर घसरलेली टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. पण रोहिणी सिंग यांनी ‘पत्रकार म्हणून बातमी सांगणे माझे कर्तव्य आहे. ते मी करत आहे. वर्तमानातील राज्यकर्त्यांच्या गैरकारभारावर प्रश्न उपस्थित करणे हेच पत्रकाराचे काम आहे,’ असे टीकाकारांना सुनावले. रोहिणी यांच्या धाडसाचे कौतुक होत असताना, त्या स्वत: मात्र याला धाडसीपणा मानण्यास तयार नाहीत. ‘हे मी धाडसी आहे म्हणून करत नाही तर पत्रकार आहे म्हणून करत आहे,’ हे त्यांचे यावरचे उत्तर.

 

राणा अय्युब

राणा अय्युब.. पोर्किस्तानी, जिहादी जेन, राणा हाफिझ सईद अशा दूषणांपासून अतिशय अश्लाघ्य आणि लैंगिक टिप्पणीने सतत हिणवली जाणारी स्वतंत्र पत्रकार. स्वतंत्र हे विशेषण राणाने स्वत:च लावलंय. इशरत जहाँ चकमकीमागील सत्य उघड करणारी ध्वनिचित्रफितीची सीडी ‘तेहलका’ नियतकालिकातून प्रसिद्ध केल्यानंतर २०१२ मध्ये राणा प्रकाशझोतात आली आणि तेव्हापासूनच समाजमाध्यमांवरून राणाची हिणवणी सुरू झाली. सीबीआयच्या एका अधिकाऱ्यासोबत राणाची ‘चित्रफीत’ असल्याची आवईदेखील उठवण्यात आली. मात्र, राणा डगमगली नाही. उलट तिने गुजरात दंगलीच्या वेळच्या तत्कालीन राज्य सरकार आणि प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यांच्या वादग्रस्त भूमिकेमागील सत्य खणून काढण्याचा निर्धार केला.

गुजरातच्या विकास मॉडेलवर लघुपट बनवण्यासाठी अमेरिकेतील एका चित्रपट संस्थेतून आल्याचा देखावा निर्माण करत तिने मैथिली त्यागी अशी खोटी ओळख धारण केली आणि या ‘लघुपटा’साठी मुलाखत घेण्याच्या बहाण्याने २००१ ते २०१० या काळातील गुजरात सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारी, सचिव यांना दंगलींबाबत बोलते केले. भाजप आणि िहदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्याही तिने भेटी घेतल्या आणि त्यांच्या बोलण्यातील विखार आपल्याजवळील छुप्या कॅमेऱ्यांनी टिपला. त्या वेळी राणा अर्थातच ‘तेहलका’मध्ये होती; परंतु गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्याची संधी चालून आली असतानाच ‘तहलका’ने तिला ही मोहीमच गुंडाळण्याचे आदेश दिले. या मतभेदानंतर राणाने ‘तहलका’ला सोडचिठ्ठी दिली आणि आपल्या स्टिंग ऑपरेशनवर आधारित ‘गुजरात फाइल्स’ हे पुस्तक स्वत:च प्रकाशित केले. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘गुजरात फाइल्स’ने राणाचे धाडस

जगजाहीर झाले. आजही चर्चेत असलेल्या या पुस्तकाच्या विविध भाषांतील आवृत्त्याही आता प्रकाशित होऊ लागल्या आहेत. त्यामुळेच तिच्यावरील शाब्दिक हल्ल्यांनाही जोर चढला आहे. ट्विटर, फेसबुकवरील तिच्या कोणत्याही पोस्टखाली ट्रोलमंडळींच्या अश्लील

शब्दांतील टिप्पण्या नेहमीच पाहायला मिळतात. पण

राणाही तितक्याच चोखपणे अशा मंडळींना प्रत्युत्तर देत आहे. ‘तुम्ही कितीही आदळआपट करा, मी मागे हटणार नाही’ हा पवित्रा तिने आजही कायम ठेवला आहे.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. )

rajeshwari.deshpande@gmail.com

(स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब यांच्याविषयी – असिफ बागवान)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 1:11 am

Web Title: brave women journalist swati chaturvedi rohini singh rana ayyub
Next Stories
1 पॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था
2 रिकामटेकडा
3 कृतज्ञ
Just Now!
X