प्लास्टर ऑफ पॅरिसने पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तीची मागणी वाढते आहे, पण त्याला आणखी एक पर्याय उपलब्ध आहे तो कागदाच्या लगद्याचा. या लगद्यातून दहा मिनिटांत पाण्यात विरघळणारी, दिसायला सुंदर, रेखीव मूर्ती तयार करणाऱ्या जयश्री यांनी शाळाशाळांतून त्याचं मोफत प्रशिक्षण देणंही सुरू केलं आहे. यंदा तर त्यांच्याकडे १२ फुटांची मूर्ती तयार होते आहे. बचत गटातील अनेकींना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या, महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, गुजरात आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे मागणी असणाऱ्या या मूर्ती करणाऱ्या जयश्री गजाकोष यांच्याविषयी.

गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीला साधारणत: ५० हजारांहून अधिक सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन झाल्याचं मुंबई महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलं होतं. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांचे गणपती मिळून हाच आकडा लाखांच्यावर नक्कीच गेला असणार. समजा त्यातील निम्म्या गणेशमूर्ती जरी आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असाव्यात असा अंदाज केला तरी लाखो टन प्लॅस्टर ऑफ पॅरिस समुद्राला अर्पण करून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करण्याचं काम आपणच केलं आहे. हे टाळणं खरं तर आपल्याच हाती आहे. ते कसं? तर मातीच्या किंवा कागदाच्या मूर्ती स्थापन करून.. कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं काम ‘प्रथमेश इको फ्रेंडली गणेश संस्थे’च्या जयश्री गजाकोष गेल्या सात वर्षांपासून करीत आहेत. यंदा त्यांच्या कारखान्यात १२ फुटांची गणेशमूर्ती तयार करण्यात आली असून अशा पद्धतीचे कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार झाल्या तर पर्यावरण वाचण्यास नक्कीच मदत होईल, असं त्याचं म्हणणं आहे.

साधारण वर्षांला हजारांच्यावर मूर्ती तयार करून एकप्रकारे पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न त्या करत असतात. आपल्या या पर्यावरणपूरक प्रयत्नांविषयी सांगताना जयश्री म्हणाल्या, ‘‘माझे पती, संदीप मुंबई महापालिकेत कार्यरत आहेत.

त्यांना चित्रकलेची लहानपणापासूनच आवड होती. कलेच्या प्रातांत काही करायचा त्यांचा विचार होता. त्यातूनच आम्ही दोघांनीही ८ वर्षांपूर्वी परळ येथील अविनाश पाटकर यांच्या डिझाइन सेंटरमध्ये कागदी लगद्यापासून वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर आम्हीच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला काही शाळांमध्ये कागदाच्या लगद्यापासून लहान लहान वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. मात्र ते हौसेच्या पातळीवरच होतं. म्हणजे त्यात आमचा वेळ, पैसा खर्च होत होता, शिकवण्याचं समाधान होतं, मात्र आमच्याकडून काही ठोस निर्मिती होत नव्हती.’’

आजही त्यांच्याकडे मुलांना शिकवण्यासाठीचा प्रकल्प तयार आहे आणि शाळांमधून बोलावणं आलंच तर प्रशिक्षण देण्यासाठी गजाकोष पती-पत्नी आनंदाने तयार आहेत. कागदापासून गृहसजावटीच्या वस्तू बनवतानाच त्यांनी गणपतीही बनवून पाहिला आणि मग पर्यावरणपूरक असणाऱ्या गणपतीचीच निर्मिती का करू नये, असा विचार बळावला. जयश्री म्हणाल्या, ‘‘पहिल्या वर्षी आम्ही ३० गणेशमूर्ती बनवल्या. मात्र त्यांना रंगवलं नव्हतं. साच्यातून काढलेल्या पॉलिश, फिनिशिंग नसलेल्या त्या मूर्तीचं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रदर्शन मांडलं. पाहणाऱ्यांनी केवळ कौतुकच केलं नाही तर मोठय़ा प्रमाणात मूर्ती घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यातून पुढचा मार्गक्रम ठरला. मोठय़ा प्रमाणात गणपतीच्या मूर्ती बनवता याव्यात यासाठी कुल्र्याच्या कामगार नगरजवळील भाग्यलक्ष्मी बचत गटातील चाळीस जणींना प्रशिक्षण दिलं गेलं.’’ जयश्री सांगतात, ‘‘त्यांना काहीच अनुभव नसल्याने शिकवताना कागदाच्या लगद्याचं खूप नुकसान झालं. मात्र सगळ्याजणी शिकल्या. त्याच्या पुढील वर्षांपासून प्रत्यक्ष काम सुरू झालं. त्यावर्षी आम्ही  ७०० गणपती केले. ही गोष्ट साधारणत: २०११ ची. मौखिक प्रसिद्धीमुळे खुद्द अभिनेत्री राणी मुखर्जीसह अन्य काही कलाकारांनी गणेशमूर्तीची मागणी केली.’’ राणी मुखर्जीच्या घरातील अनुभव सांगताना जयश्रींचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. त्या म्हणाल्या, ‘‘राणी मुखर्जी यांच्या घरी गणेशमूर्ती घेऊन गेलो, संपूर्ण कुटुंबालाच मूर्ती खूप आवडली. त्यांनी आमचा सत्कार केला. मी केलेली दागिन्यांची कलाकुसर त्यांना खूपच आवडली; इतकी की घरी आलेल्या त्यांच्या पाहुण्यांकडे कौतुक केलं आणि आमची ओळखही करून दिली. शिवाय पूजा आणि आरतीसाठीही आम्हाला आवर्जून थांबवून घेतलं. तो आनंद, समाधान काही औरच होतं.’’ आजही मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील, मालिका जगतातील अनेक कलाकारांच्या घरी जयश्री यांच्या कारखान्यात तयार झालेल्या मूर्तीची स्थापना होते. हे सांगताना त्यांना कोण अभिमान वाटत होता.

बचत गटातील स्त्रियांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी घरी ‘पीठ’ (कागदी लगदा) मळण्याचं मशीन घेतलं आणि कामाच्या विस्तारासाठी ‘प्रथमेश इको फ्रेंडली गणेश संस्था’ या बचत गटाची स्थापना केली. गेली पाच वर्षे या माध्यमातून त्यांचं पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं काम सुरू आहे. आपल्या कामाच्या पद्धतीविषयी जयश्री म्हणाल्या, ‘‘माझ्या वडिलांची रिक्षा आहे. त्यातूनच आम्ही बचत गटाच्या स्त्रियांना घरीच ‘पीठ’ नेऊन देतो.’’ या कामांत त्यांची मुलंही मदत करतात. प्रत्येकीकडे वेगवेगळ्या आकाराचे तीन साचे दिले आहेत. त्यातून त्या मूर्ती तयार करतात. साधारणत: ८ ते १० दिवसांत एक गणेशमूर्ती तयार होते. गेली दोन र्वष अशाच पद्धतीनं काम सुरू आहे. पहिल्या वर्षी कारखान्यासाठी जागा घेऊन तिथेच काम चाले, मात्र आता जागाच उपलब्ध होत नसल्याने याच पद्धतीने काम चालतं.’’

‘पीठ’ तयार करण्याचं काम जयश्री स्वत:च करतात. ‘पीठ’ म्हणजे कागदापासून लगदा तयार करणं. त्यासाठी कागद फाडणं, ते भिजवणं, ते भिजल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करणं. त्यानंतर इतरांच्या मदतीनं कागदातलं पाणी पिळून काढायचं काम केल्यावर कागदाच्या लगद्यात डिंक आणि इतर पदार्थ मिसळून पुन्हा तो लगदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा त्यानंतर अगदी कापसासारखा हलका झालेला कागदाचा लगदा पिठासारखा मळायचा. साधारणपणे दीड ते दोन किलो कागदापासून एक-दीड किलोची म्हणजे एक फुटाची गणेशमूर्ती तयार होते. एक गणपती आठ दिवस साच्यात ठेवायला लागतो. त्यामुळे त्याच्या भारंभार निर्मितीवर मर्यादा येतात. सध्या जयश्रींचं सगळं कुटुंब म्हणजे त्यांचे पती संदीप, मुलगी संजना आणि दोन्ही मुलगे गणेशनिर्मितीचं काम करतात. घरातल्या सगळ्यांनी आयटीआयमध्ये पेपर मॅशपासून गणपती बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. शिवाय सध्या २० स्त्रिया कामाला आहेत. साच्यातून काढलेल्या मूर्तीना पॉलिश करणं, रंग देणं, दागिने तयार करणं आणि मार्केटिंग अशा सगळ्या कामांची त्यातून विभागणी होते. मोल्ड(साचे) तयार करण्याचं काम संदीप करतात. मार्केटिंगबद्दल जयश्री सांगतात, ‘‘सुरुवातीला मला मार्केटिंग कसं करायचं अजिबातच माहीत नव्हतं. त्यासाठी एक अभ्यासक्रम केला. त्या अभ्यासक्रमात दिलेल्या प्रकल्पामध्ये दहा सेलिब्रिटींपर्यंत गणपती पोहोचवण्याचं आव्हान होतं. पण प्रत्यक्षात त्याहून अधिक जणांच्या भेटी झाल्या आणि मला त्यातूनच बोलण्याचा आत्मविश्वास आला.’’

जयश्री सांगतात, ‘‘कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या एक ते दीड फुटाच्या मूर्ती दोन किलोपेक्षा जास्त वजनाच्या नसतात. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तेवढय़ाच उंचीच्या मूर्ती १८ ते २० किलो वजनाच्या असतात. कागदी गणपतींच्या मूर्ती वापरातून जवळपास प्रत्येकी १८ किलो प्लॅस्टर ऑफ पॅरिस समुद्रात जाण्यापासूून वाचवलं जातं. तर मोठय़ा मूर्तीच्या वापरामधून २ टन प्लॅस्टर ऑफ पॅरिस समुद्रात जाण्यापासून वाचवलं जातं. म्हणून आम्ही या मूर्ती वापरल्या जाव्यात यासाठीही जागृती करत आहोत. याला  खुद्द अमेरिकेतील टेक्सास राज्यानेही प्रमाणपत्र दिलं आहे. २०११ मध्ये अमेरिकेतील एक मराठी नागरिक पर्यावरणपूरक गणपतीच्या शोधात आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही केलेल्या मूर्ती आवडल्या आणि त्या केवळ दहा मिनिटांतच विरघळतात हे पाहून खूपच आनंद झाला. त्यांनी आमच्याकडील काही मूर्ती अमेरिकेला नेल्या. तिथल्या पर्यावरणतज्ज्ञांनी त्या हानीकारक नसल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर त्यांना आमच्या गणेशमूर्ती आयात करण्याची परवानगी मिळाली. तेव्हापासून आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या गणेशमूर्तीना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे मागणी आहे. त्यांना ‘हिंदूू सोसायटी ऑफ ब्राझोज व्हॅली, टेक्सास’ यांच्याकडून गौरवपर प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियाला २५ गणपती, अमेरिकेला ८ फुटांची एक मोठी मूर्ती आणि लहान १५ गणेशमूर्ती पाठवल्या आहेत. भारतातही तामिळनाडू, गुजरातमध्ये आमच्या मूर्तीना मागणी आहे. (एका फुटाच्या मूर्तीची किंमत अंदाजे एक हजार. त्यात समजा कुणी दागिने तयार करायला सांगितले तर त्याचे पैसे थोडे जास्त असतात.) शिवाय वजनाला हलकी आणि दिसायला अगदी माती किंवा पीओपीच्या मूर्तीसारखीच आणि महत्त्वाचं म्हणजे दहा मिनिटांत पूर्ण मूर्ती पाण्यात विरघळून जाते, त्यामुळे विसर्जन करणंही सोपं असतं. अनेकांना असंही वाटतं की कागदाच्या लगद्यापासून मोठय़ा आकाराच्या मूर्ती बनत नाहीत, मात्र यंदा संदीप यांनी ती किमया करून दाखवली आहे, त्यांनी १२ फुटांची मूर्ती तयार केली आहे.’’ हे सांगताना पतीविषयी सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सध्या त्यांना मोठा प्रश्न सतावतोय तो जागेचा. मध्यंतरी जागेअभावीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूर्ती हलवताना ३०० मूर्ती पावसात भिजल्याने मोठं नुकसान झालं. यावर्षीही मुसळधार पावसाने त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

जयश्री त्यांच्या या प्रवासात मीनल मोहाडीकर यांचे विशेष आभार मानतात. त्या म्हणतात, ‘‘स्त्रियांनी उद्योग केलाच पाहिजे. स्त्रियाच उत्तम काम करू शकतात. स्त्रिया सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम करतात हे मलाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेकजणींना मीनल मोहाडीकर यांनी शिकवलं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.’’

सध्या जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं प्रशिक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं आहे. केवळ जुलै ते सप्टेंबर महिना सोडल्यास त्या आणि त्यांचे पती मोफत प्रशिक्षण देत असतात. शालेय विद्यार्थ्यांनाही गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांना साथ हवी आहे ती गणेशभक्तांची आणि सरकारच्या थोडय़ा मदतीची!

रेश्मा भुजबळ

 reshmavt@gmail.com