News Flash

गाजर

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे.

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे.
गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो. देशी गाजरे ही चवीने खूप गोड व पौष्टिक असतात. विलायती गाजरे ही चवीने फिकट व पाणीदार असतात.
औषधी गुणधर्म
गाजरामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अ, ब, क जीवनसत्त्व त्यात असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात. गाजरामध्ये कॅरोटिन हा घटक विपुल प्रमाणात असतो. आयुर्वेदानुसार गाजर हे मधुर, अग्नीप्रदीपक, कृमीनाशक, दीपक, पाचक आहे. गाजरामध्ये असणाऱ्या या सर्व गुणधर्मामुळे शरीर स्वच्छ व शुद्ध राहते. गाजर चावून खाल्यामुळे दात व तोंड स्वच्छ होते. त्याचबरोबर ते अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला रसरक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोटातील आतडय़ांमधील मळ पुढे ढकलण्यास उत्तेजना मिळते व त्यामुळे शौचास साफ होऊन शरीर स्वच्छ राहते. आतडय़ांच्या आतमध्ये असणारा श्लेष्मल भाग गाजरामुळे निरोगी राहून पोटातील कृमी शौचावाटे बाहेर पडतात. यामुळे गाजर नियमितपणे खावे.
उपयोग
० गाजर चावून खाल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते म्हणून जेवण करण्यापूर्वी सॅलेडमध्ये गाजर अवश्य खावे.
० अपचन, भूक मंदावणे, गॅसेस होणे, आंत्रव्रण (अल्सर), आतडय़ांना सूज येणे (कोलायटीस) आदी तक्रारींवर गाजराचा रस १ कप दोन वेळा प्यावा. सहा ते सात दिवस अशा प्रकारे रस पिल्याने आतडय़ांच्या आतील श्लेष्मल त्वचेला बळकटी येऊन वरील आजार दूर होतात.
० बालकांना कृमी होऊन पोटदुखीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी १ कप गाजराचा रस द्यावा. यामुळे पोटातील जंत अगदी सहजपणे पडून जातात.
० गाजरामध्ये विपुल प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शक्ती निर्माण होते. म्हणून लहान बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी नियमितपणे रोज एक गाजर सेवन करावे.
० लहान बालकांना दात निघताना अनेक वेळा पचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्या होऊ नयेत म्हणून सकाळ-संध्याकाळ ३ ते ४ चमचे गाजराचा रस पाजावा. तसेच बालकांना चघळण्यासाठी गाजर द्यावे. यामुळे हिरडय़ांची सळसळ कमी होऊन दात येतानाचा त्रास कमी होतो व अन्नाचेही सहज पचन होते.
० बऱ्याचशा स्त्रियांची पाळी अनियमित असते, पाळी नियमितपणे येण्यासाठी व पुढे गेलेली पाळी वेळेत येण्यासाठी गाजराचे बी पाण्यात वाटून सलग पाच दिवस सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
० गाजराचे बी हे आकाराने लहान, भुरकट रंगाचे सुवासिक, शक्तीवर्धक, मूत्राशयाचे विकार दूर करणारे व गर्भाशयाच्या वेदनांवर व विकारांवर उपयोगी आहे. गाजर वाफवून त्याचे पोटीस करून शरीरावरील बेंडावर लावल्यास बेंड फुटून जखम लवकर बरी होते.
० डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गाजराचा नियमितपणे आहारात वापर करावा.
० शरीरावरील कुठलीही खराब जुनी जखम बरी होण्यासाठी किसलेले गाजर वाफवून त्याचे पोटीस करून लावावे.
० अर्धशिशीचा(मायग्रेनचा) त्रास होत असेल तर गाजराच्या पानांचा रस काढून तो रस तीळ तेलामध्ये उकळून नाकात किंवा कानात २-२ थेंब टाकल्यास व त्याच तेलाने डोके व कपाळ चोळल्यास अर्धशिशी थांबते.
० जुलाबाचा त्रास होत असेल तर तो थांबण्यासाठी व शरीरातील पाण्याची कमतरता भरून येण्यासाठी गाजर वाफवून त्याचे सूप करून प्यावे.
० मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर गाजराची भाजी करून खावी. यामुळे रक्त पडणे थांबते. तसेच आहारामध्ये गाजराची कोिशबीर करून त्यात दही व डािळबाचे दाणे घालून खाल्याने मूळव्याधीचा त्रास दूर होतो.
० सौंदर्य टिकविण्यासाठी गाजर नियमितपणे सेवन करावे गाजरामुळे शरीर कांतीयुक्त, कोमल मुलायम व सुंदर बनते.
० चेहऱ्याचा टवटवीतपणा वाढविण्यासाठी व कांतीयुक्त करण्यासाठी गाजराचा किस चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळावा.
० आहारामध्ये गाजर अनेक प्रकारे वापरता येते. गाजर हलवा, खीर, वडय़ा, भाजी, सूप, कोिशबीर, सॅलेड, केक, भात अशा अनेक प्रकारांमधून गाजराचा वापर नियमित करावा. त्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे शरीराला शक्ती व ऊर्जा मिळते व त्यातूनच शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते.
सावधानता
गाजर हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे सहसा गर्भावस्थेत पहिल्या ५ महिन्यांत त्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असल्यामुळे गर्भावस्थेच्या ५ महिन्यांनंतर गाजराचा वापर योग्य प्रमाणात करण्यास हरकत नाही.

ल्ल डॉ. शारदा महांडुळे  sharda.mahandule@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:05 am

Web Title: carrot vitamin a
Next Stories
1 साठीनंतरचं सहजीवन
2 का रे  दुरावा
3 ऋतूनुसार पाण्याचे व्यवस्थापन
Just Now!
X