मध्यरात्रीचे दीड-दोन वाजलेले असतात, मंजिरींचा फोन वाजतो. थोडय़ाशा काळजीनेच त्या फोन उचलतात, नंबर परदेशातील असतो. ‘‘मॅडम, मी रितेश बोलतोय.. आठवलं का? तुमच्याकडे क्लासला आलो होतो.’’ मंजिरींना आठवतो उंच, दणदणीत तब्येतीचा इंजिनीअर झालेला. थोडा बुजराच असणारा मुलगा. ‘‘तुम्ही शिकवल्यासारखीच बिर्याणी केली मी, आता मित्र ताव मारताहेत.. मस्त झालीये म्हणत आहेत. थँक्यू मॅडम.’’ मंजिरींना हसू फुटतं. अमेरिकेत पोस्टग्रॅज्युएशन करायला निघालेला रितेश त्यांच्याकडे स्वयंपाक शिकायला आला होता. मन लावून शिकला सगळं आणि आताचा हा त्याचा फोन. आपलं शिकवणं सार्थकी लावल्याचा. मंजिरींना असे फोन येणं हे सवयीचं झालं आहे, गेली वीस वर्षे त्या कोल्हापुरात कुकिंग क्लासेस घेत आहेत. अगदी बेसिक स्वयंपाकापासून पेस्ट्री आइस्क्रीमपर्यंत शिकायला मुलं-मुली, स्त्रिया, पुरुष येत असतात. वीस वर्षांपूर्वी क्लासेस सुरू झाले तेव्हा त्यांच्याकडे फक्त मुली, स्त्रियाच स्वयंपाक शिकायला येत. अलीकडे दहा वर्षांत मात्र मुलं, पुरुष आवडीने येतात.

सुरुवातीला मंजिरींकडे कोल्हापुरातील एका हॉटेलचे कुक काही पदार्थ शिकायला आले. त्यानंतर हळूहळू ज्या मुलांना हॉटेल सुरू करायचं आहे, गाडा सुरू करायचा आहे अशी मुले ठरावीक पदार्थ शिकायला येऊ लागली. कुणी चायनीज, कुणी बिर्याणी, कुणी पिझ्झा शिकलं. मुलीच्या घरी स्थळं पाहायला लागले की आई, मावशी मुलीला घेऊन येत. ‘स्वयंपाकात ट्रेन करा’ म्हणून सांगत. आज चित्र बदललं आहे. मुली आपणहूनच शिकायला येतात. कारण कोल्हापुरातील बहुतांशी मुली बारावीनंतर, पदवीनंतर पुण्या-मुंबईला शिकायला जातात. नोकरीसाठी बंगळुरू, हैदराबाद अनेकदा परदेशीही जातात. अशा वेळी रोज बाहेरचं खाणं परवडणारं नसतं. मेसचा डबाही नकोसा वाटू लागतो. हॉटेलमधली चवही फार काळ आवडत नाही. तेव्हा आपल्याला स्वत: काही स्वयंपाक यायला हवा हे आजच्या मुलींना उमजलं आहे. त्यातून आजची पिढी ‘डाएट कॉन्शअस’ आहे. घरच्या खाण्यामुळे होणारे फायदे या पिढीला माहिती झाले आहेत. त्यामुळे किमान एका वेळेला तरी घरचं खावं या भावनेपोटी मुलं-मुली स्वयंपाक शिकायला कुकिंग क्लासेस्ची वाट चालू लागले आहेत.

मंजिरी सांगतात, ‘‘केवळ कोल्हापूर शहरातीलच नाही तर आसपासच्या गावांमधील मुलं-मुलीसुद्धा अगदी प्राथमिक म्हणजे डाळ, भात, भाजी, चपाती करणं शिकायला येतात. पूर्वी मुली तरी किमान आईच्या हाताखाली स्वयंपाकघरात काम करायच्या. भाजी निवडणं, कणीक मळणं, शेवटची पोळी लाटून पाहणं अशी मदत करायच्या.

आजकालच्या करिअरिस्ट, नोकरदार आईलाच स्वयंपाकघरात जायला फार कमी वेळ मिळतो. मग मुलगी कधी शिकणार? शिवाय मुलींचं उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलंय. त्यातली स्पर्धा लक्षात घेता इतर गोष्टीसाठी वेळ काढणं अनेकदा कठीण होऊन जातं. कित्येकदा आईची मायाही तिला मागे खेचते. पुढे सासरी जाऊन तुला स्वयंपाक करायचाच आहे आता आराम कर. त्यातूनही अनेकींचं स्वयंपाकाचे धडे गिरवणं मागे

पडत जातं.

पण प्रत्येकीलाच काय आज प्रत्येकालाच प्राथमिक स्वयंपाक यायलाच हवा. आपलं आपण घरच्या घरी काही तरी खायचं करायला शिकलो तर पुढच्या आयुष्यात कुणावर अवलंबून राहायची वेळ येत नाही. कारण पूर्वीच्या काळी घरात कोणी ना कोणी बाई असायचीच. आजी, आई, काकू, मावशी आणि त्या पूर्णवेळ घरी असल्याने मुलांवर स्वयंपाकाची वेळ येत नसे. आता मात्र काळाबरोबर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि करिअर-नोकरीत स्त्रिया व्यग्र झाल्यामुळे घरी कुणी असेलच असं सांगता येत नाही. मग बाहेरचं काही तरी आयतं खायला मागवून वेळ भागवली जाते. पण प्रत्येक वेळी ती चविष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असेलच असं नाही. अशा वेळी पर्याय असतो तो स्वयंपाक स्वत: शिकून  घ्यायचा. पोट भरता येईल असं साधं जेवण, नाश्ता जरी प्रत्येकाला करता आला तरी अनेक प्रश्न मिटतात आणि म्हणूनच आजकाल स्वयंपाक शिकणं किंवा करता येणं हेसुद्धा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊ लागलं आहे. किंबहुना ते जायला हवं. नाही तरी घरोघरी स्वयंपाकघरातील चित्र गेल्या दहा वर्षांत बदलत चाललंच आहे. स्वयंपाकघरात आईसोबत बाबा लोकांचाही वावर वाढला आहे. स्वयंपाक शिकण्या, करण्यात काही कमीपणा आहे, ‘बायकीपणा’ आहे असं मुलग्यांनाही वाटेनासं झालं आहे. म्हणूनच मी सगळ्यांना सगळं शिकवते. अगदी पालेभाजी निवडण्यापासून कडधान्ये भिजत घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टी शिकवते.’’

अर्थात समाजाचं वेगळं रुपही आहेच. मुली उच्चशिक्षित झाल्या, करिअर करू लागल्या, मात्र एकदा का तिचं लग्न झालं की तिने आदर्श सून व्हावं हीच अनेक घरांची आजही अपेक्षा असते, अगदी सासू-सासरे आणि नवऱ्यांचीपण. तुझं पद घराबाहेर. घरात तू सगळं करायचं, अशीच भूमिका असते. समाजाला, अशा वृत्तीला आपण एका रात्रीत बदलू शकत नाही. अशा वेळी मुलीही सामंजस्याने स्वयंपाक शिकून घेतात. करायला लागतात. त्यांना मंजिरी यांचे क्लासेस खूप उपयोगी पडतात. आमच्या मुलीला तुम्ही छान तयार केलं, अशी कौतुकाची पावती त्यांना मिळते. ‘‘अनेक जणी लग्न ठरलं की स्वयंपाकाचे व्यवस्थित धडे घ्यायला माझ्याकडे येतात, मग त्यांच्या आईचे नाही तर अगदी बाबांचेही फोन येतात. मुलगी छान स्वयंपाक करायला लागली हो. आता आमचं टेन्शन गेलं. इतकंच कशाला अगदी सासूबाईपण त्यांच्या सुनांना माझ्या क्लासला घेऊन येतात. एकदा अशीच एक सूनबाई माझ्याकडे आली होती. छान शिकलीही. तिने एक पंजाबी डिश घरी केली. तिची चव काही तिच्या मनासारखी झाली नाही. ती नाराज झाली पण सासऱ्यांनी सांगितलं, ‘अगं, पंजाबमधल्या एका गावात अशाच चवीची डिश मिळते. छान झालीय.’ सासऱ्यांची ही पावती तिला खूप काही देऊन गेली. असेही अनुभव येतात.’’

‘‘तेजस्विनी लुगारे-पाटील ही मुलगी नेमबाज होती. स्वयंपाकाचा गंधही नव्हता. पण तिला स्वयंपाक शिकायचा होता, कारण बाहेरचं खाऊन ती कंटाळून गेली होती. नेमबाजीच्या परदेशी प्रशिक्षणात तर नूडल्स खाण्याशिवाय पर्याय नसतो. ती जिद्दीने स्वयंपाक शिकली. आज ती करिअर करत स्वयंपाकघरही उत्तम मॅनेज करते. घरच्यांचीही काळजी मिटली आहे.’’

ज्या पूर्णवेळ गृहिणी असतात त्यांनाही विविध पदार्थ करायला आवडतात. अशा अनेक जणींच्या पतींचे फोन मंजिरींना येतात. एकाचा फोन आला. ‘‘तुमच्या शिकवणीमुळे ही रोज वेगवेगळे आणि मांसाहारी पदार्थही करायला लागली आहे, त्यामुळे माझे आई-बाबा खूश आहेत आणि मुलंही.’’ दुसरं म्हणजे घरातल्यांच्या मदतीने अनेकजणी वेगवेगळे पदार्थ करून पाहातात, त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्याचं प्रमाणही कमी झालंय, असाही अनुभव आहे. त्यामुळे स्त्रियाच काय पुरुषही उत्साहाने क्लासला येतात आणि घरी जाऊन मुलीला, बायकोला खूश करतात. इतकंच कशाला, एका पन्नाशीच्या काकांनी तर आपल्या मित्रमंडळींना बोलावून स्वत: केलेल्या पदार्थाची पार्टी दिली. सुखी संसाराचा रस्ता हा पोटातून मनापर्यंत जातो. त्यामुळे असे पदार्थ शिकल्याने अनेकांच्या घरात खुशीचं वातावरण आहे.

‘‘बदलत्या काळानुसार आजच्या तरुणांना गॅसबरोबरच मायक्रोवेव्हमधला स्वयंपाक शिकवावा लागतो.’’ मंजिरी सांगतात. ‘‘मुलं आता अगदी तांबडय़ा-पांढऱ्या रश्श्यापर्यंत स्वयंपाक मायक्रोवेव्हमध्ये करतात. एक विद्यार्थी सांगत होता की, त्याला स्वयंपाक येतो त्यामुळे बरोबर राहणारी मुलं सुट्टीच्या दिवशी फर्माईशी सोडतात. त्याबदल्यात माझी बाकीची कामं करायला तयार असतात. त्यामुळे हाही आनंदाने स्वयंपाक करतो.’’

परदेशात दोन-तीन दिवसांचा स्वयंपाक एकदम करून ठेवला तरी चालतो. तिकडे पदार्थ टिकतात. मुलांना जेवणात रोज भात हवा असतो, ती मुलं जिरा राइस, दाल तडका करून फ्रिजमध्ये ठेवून देतात. मंजिरी त्या – त्या व्यक्तीच्या गरजेनुसार स्वयंपाक शिकवतात. आलं-लसूण पेस्ट ताजी, पटकन कशी बनवायची, कडधान्यांना घरीच मोड कसे आणायचे, अन्न किती जणांना केवढं पुरेल हे कसं ठरवायचं असं सगळं शिकवतात. अन्न वाया घालवायचं नाही, हा त्यांचा पहिला मंत्र आहे. नोकरी करणाऱ्या मुली छोटय़ा छोटय़ा टिप्स लक्षात ठेवून स्वयंपाक करायला शिकतात.  स्वयंपाक शिकल्यानंतर आपल्याला घराशी जास्त ‘अ‍ॅटॅच्ड’ झाल्यासारखं वाटलं असंही तरुण मुलं-मुली सांगतात.

बऱ्याच जणांना ‘वन डिश मील’ शिकायचं असतं. वेळ वाचवून घरचं, पौष्टिक जेवण मिळावं असं करिअरच्या वाटांवरून आभाळाला कवेत घ्यायला निघालेल्या नव्या पिढीला प्रकर्षांने जाणवू लागलं आहे. हाताशी अत्याधुनिक उपकरणे घेऊन ही पिढी स्वयंपाकघरात रमू लागली आहे. आपल्या पारंपरिक पदार्थासोबतच त्यांना सॅलडस्, सूप्स  शिकायला आवडतं, तसा त्यांचा आग्रह असतो. कमी तेलातील मटण, चिकन शिकतात.

मंजिरींकडे एक निवृत्त बँक व्यवस्थापक आपल्या नातीला घेऊन कुकिंग क्लासला येत होते. स्वयंपाकाची आवड होती, ती त्यांना निवृत्ती झाल्यावर जोपासायची होती. बेसिक स्वयंपाकासोबत ते दिवाळीचे पदार्थही शिकले. पुरुष स्वयंपाक शिकले की मनापासून शिकतात आणि अगदी डिश सजवणं, छान मांडणं, हौसेने करतात. स्त्रिया रोजच्या जेवणाला एवढय़ा हौसेने सजवत नाहीत. मंजिरींकडे अभिप्रायाची वही आहे, त्यात त्यांचे विद्यार्थी अभिप्राय लिहितात. त्या वहीत पुरुषांचे अभिप्राय खूप नेमके असतात, गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यातला, पत्नीला-मुलांना सरप्राइज देण्यातला आनंद शब्दांमधून व्यक्त होत असतो तर मुलींना नवं गवसल्याची जाणीव होते.

आपली सगळी धवपळ सुरू असते त्यात दोनवेळचं व्यवस्थित जेवण हे आलंच. तेच मनासारखं नसेल तर एवढा पैसा मिळूनही काय उपयोग असं काहीसं आजच्या पिढीला जाणवलं आहे. त्यामुळे तरुण मुलं-मुली नीट प्रशिक्षण घेऊन स्वयंपाकघरात शिरली आहेत. प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित माहिती घेऊन ही मुलं स्वयंपाकघरात नवीन प्रयोग करून पाहात आहेत. मंजिरी कपडेकरांसाठीही स्वयंपाक शिकवणं म्हणूनच आव्हानात्मक आणि आनंददायी बनलं आहे.

dandagepriya@gmail.com