समुपदेशन हा हौस म्हणून करायचा व्यवसाय नसून एक जबाबदार व्यवसाय आहे. हा केवळ बोलण्याचा व्यवसाय नसून समोर आलेल्या व्यक्तीस अजाणता दाखवलेल्या चुकीच्या दिशेमुळे त्याचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. एका ‘भरकटलेल्या’ व्यक्तीला योग्य दिशा देण्याचे काम जबाबदार समुपदेशकच करू शकतो. ती जबाबदारी त्यांनी उचलायलाच हवी.

काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात वाईच्या एका तोतया डॉक्टरची बातमी होती. हा तोतया डॉक्टर गावातील लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून अनेक वष्रे वैद्यकीय व्यवसाय करत होता व उपचारासाठी आलेल्या ६ जणांचा पशाच्या लोभाने त्याने खून केला होता. त्यानंतर मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टर म्हणून नोकरी करणाऱ्या एकाच्या खोटय़ा पदवीचे बिंग फोडल्याची बातमीही वाचली व रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या या समाजकंटकांबद्दल तीव्र निषेध करणे किती गरजेचे आहे हे पटले व ‘ग्राहकराजा, सावध राहा’ ही धोक्याची सूचना देणेही तितकेच महत्त्वाचे!

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

मागे वळून बघताना असे जाणवते की, असा भ्रष्टाचार नाही कुठे? सर्वच व्यवसायांत तो बोकाळला आहे व आमच्या मानसोपचाराच्या क्षेत्रातही तो वेगवेगळ्या कारणांपायी, अति उत्साहापायी, अपुऱ्या ज्ञानाच्या शिदोरीने पुढे जाण्याच्या हव्यासापायी जागोजागी दिसतो. समुपदेशनाचे क्षेत्र आपल्या देशामध्ये साधारण ४० वर्षांपूर्वी समाजात ज्ञात झाले व त्याचा उच्च शिक्षणामध्ये अंतर्भाव झाला; पण गेल्या १५/२० वर्षांमध्ये त्याची उपयुक्तता समजल्यानंतर समुपदेशक होण्याची इच्छा बाळगणारे अनेक लोक पुढे येऊ लागले व जनसामान्यांप्रमाणे त्यांनाही हे काय फक्त बोलायचे तर असते, ही त्याबद्दलची कल्पना असल्याने या क्षेत्रात उडी घेऊ लागले. मी या क्षेत्रात १९६९ पासून काम करत असल्याने कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे जागोजागी उगवणाऱ्या अनेक स्वनिर्वाचित समुपदेशक व संस्था ही खरोखर एक चिंतेची बाब वाटू लागली व त्याबद्दल सावधगिरीचा इशारा म्हणून हा लेखप्रपंच!

समुपदेशनाची इच्छा बाळगणारी अनेक मंडळी पुढे आल्यामुळे झटपट समुपदेशन शिकवणाऱ्या अनेक (‘झटपट’ हा या युगाचा परवलीचा शब्द!) संस्था सुरू झाल्या व त्यातील अनेक शिक्षक हे पुस्तकात वाचून समुपदेशन शिकवणारे होते म्हणजे हे ‘शल्यशास्त्राचे पुस्तक वाचून शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे!’ अशा क्लासेसमध्ये ३ महिने, ६ महिने अशा कालावधीचे कोस्रेस करून ही मंडळी दुकाने उघडू लागली व त्या अपुऱ्या ज्ञानाचा परिणाम मदतीसाठी येणाऱ्या क्लाएंटवर (या ठिकाणी अशील हा शब्द योग्य नाही म्हणून क्लाएंट वा रुग्ण म्हणू) काय होईल याकडे वळून न बघता ‘स्वखू’ (स्वत:तच खूश)च्या भूमिकेत आहेत. हीच बाब महाविद्यालयातून द्विपदवीधर होऊन बाहेर पडणाऱ्यांची! पदवी तुम्हाला या विषयाचे ज्ञान आहे हे पदवीपत्र देते, पण आपले ज्ञान वापरण्यासाठी आपल्याला याचे उपयोजन कसे करायचे हे तारतम्य नसल्याने असे विद्यार्थीही लगेच व्यवसाय सुरू करतात. सबंध महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई विद्यापीठ व नाथीबाई ठाकरसी महाविद्यालय, फोर्ट शाखा या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी सज्ज करण्याजोगे उपयोजित शिक्षण दिले जाते. गेली चार वष्रे टाटा समाजविज्ञान संस्थेमध्ये समुपदेशनाचे शिक्षण सुरू केले आहे, पण तेथेही प्रत्यक्ष ‘क्लाएंट’बरोबर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या शिक्षकांची वानवाच आहे.

चिकित्सा मानसशास्त्र व समुपदेशन मानसशास्त्र (क्लिनिकल सायकॉलॉजी आणि काऊन्सिलिंग सायकॉलॉजी) या दोन्ही शाखांमध्ये उपयोजितेशिवाय हे शास्त्र अपुरेच राहाते; पण पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर व इतर अनेक ठिकाणी (एकूण ३१ ठिकाणी) पदव्युत्तर शिक्षणासाठी भरमसाट विद्यार्थी घेतले जातात, त्यांना या विषयांचे पुस्तकी शिक्षण दिले जाते; पण त्यांना मानसशास्त्रीय चाचण्या घेणे, त्याचे उपयोग कधी, कसे व त्यांचा अर्थ कसा लावणे, प्रत्यक्ष क्लाएंट/रुग्णाबरोबर त्या कशा वापरणे यापकी काहीही शिकवले जात नाही. असा पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले अनेक गुणी विद्यार्थी मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली २७ वष्रे काम करणाऱ्या आमच्या आय.पी.एच. या ठाण्यातील संस्थेत नोकरी मागण्यासाठी येतात, पण खेदाने सांगावेसे वाटते की, आम्ही त्यांना नोकरी देऊ शकत नाही. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना नोकरीची संधी मिळत नाही. या महाविद्यालयातील बरेचसे शिक्षक असे उपयोजित शिक्षण घेतले नसल्याने व प्रत्यक्ष क्लाएंट/रुग्ण पाहिले नसल्याने उपयोजन शिकवू शकत नाहीत व तेथेच उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी नंतर शिक्षक म्हणून येत असल्याने ते चक्र वर्षांनुवष्रे तसेच चालते व चालत राहील.

या उपयोजित ज्ञानाची गरज लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे. गेल्या आठवडय़ात एक बाई माझ्याकडे पश्चिम उपनगरातून समुपदेशनासाठी आल्या. त्या अतिशय त्रस्त दिसत होत्या, सुशिक्षित व उच्चपदस्थ होत्या. त्यांच्या दोनही मुलांच्या वागण्यामध्ये (२१ वर्षांची मुलगी व १५ वर्षांचा मुलगा) त्यांना बराच विक्षिप्तपणा दिसत होता. मुलांनी शिक्षण बंद केले होते. त्यांना भावनांचा तोल संभाळणे अवघड जात होते. सासूमध्येही संशयाचा आजार असल्याने या बाई फारच अस्वस्थ झाल्या होत्या; पण मुलांसाठी मनोविकार तज्ज्ञांकडे जाण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. त्यांच्याशी बोलून, त्यांना थोडा दिलासा देऊन त्या पश्चिम उपनगरात राहत असल्याने मी त्यांना एका माझ्या माहितीतील त्या भागातील प्रशिक्षित समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला. कारण तो एका मनोविकारतज्ज्ञाबरोबर काम करत होता. तो या कुटुंबाशी बोलून उपचारासाठी त्यांना तयार करेल हा माझा हेतू होता; पण त्यांच्या दुर्दैवाने हे न ऐकता त्यांनी त्यांच्या माहितीतील एका स्वनिर्वाचित समुपदेशकाकडे मुलाला नेले आणि तिथे तो इतका बिथरला की, आता तो कुठेही जाण्यास तयार नाही.

गेल्या आठवडय़ात माझ्याकडे एक २६ वर्षांची तरुणी आली, उच्चशिक्षित व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करणारी. अति ताणामुळे ती गेले २ महिने कामावर जाऊ शकत नव्हती व गेले ६ महिने ती एका समुपदेशकाकडे समुपदेशनासाठी जात होती. तिची लक्षणे, त्यांची तीव्रता या सर्वाविषयी अधिक माहिती घेतल्यावर (क्लिनिकल हिस्ट्री) तिला औषधोपचाराची गरज असल्याचे लक्षात आले व मी तिला त्यानुसार सल्ला दिला. आता हेच जर त्या समुपदेशकाच्या लक्षात आले असते तर तिच्या लक्षणांची तीव्रता वाढली नसती. ‘आपण आता कशानेच बरे होणार नाही’ ही तिची झालेली भावना व त्यामुळे येणारे वैफल्य, हतबलता हे सर्व टाळता आले असते. असे अनेक अनुभव आम्हा सर्वाना येतात. मुंबईतील एका सुप्रसिद्ध शिक्षण संस्थेमध्ये, जिथे आय.आय.टी. व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाची हमी दिली जाते अशा संस्थेतील किती तरी विद्यार्थी १५-१६ वर्षांचे, आता कुठे जग बघायला लागणारी कोवळ्या वयाची मुले, आमच्याकडे पूर्ण आत्मविश्वास गमावून बसलेल्या स्थितीत येतात, कारण आपल्या शाळांमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेली ही मुले तिथे गेल्यावर दररोज ‘तुम्ही इथे येण्यास कसे लायक नाहीत, आता मिळवत असलेल्या गुणांनी तुम्ही आयुष्यात काही मिळवू शकणार नाही, तुम्ही कसे नालायक आहात’ हेच ऐकतात. मी स्वत: संस्थाप्रमुखांशी बोलल्यावर त्यांचे उत्तर असे होते की, आमच्या शिक्षकांना आम्ही समुपदेशन करून विद्यार्थ्यांना असेच प्रोत्साहन द्या, मोटिवेट करा, असे शिकवतो. तुम्ही त्यांचे जितके खच्चीकरण कराल तितकी ती अधिक प्रयत्न करतात. अशा बडग्यामुळे किती विद्यार्थी जायबंदी होतात, आत्मविश्वास गमावून बसतात हे त्यांना कसे कळणार? कारण ते विद्यार्थी उत्तम क्षमता असूनही ‘ये अपने बस की बात नही’ म्हणून संस्था सोडून जातात. त्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा घेतला तर त्यांना हे कळेल, पण लक्षात कोण घेतो?

या सर्वामध्ये समुपदेशकाची भूमिका नेमकी काय हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मनोविकारांमध्ये आजार (डिसऑर्डर), ताणतणाव व त्यासंबंधी समस्या (डिस्ट्रेस) व व्यक्तिमत्त्वदोष (पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स) हे विकार सर्वसाधारणपणे मोडतात. त्यातील आजार व ताणतणावविषयक समस्या यातील अंतर अतिशय सूक्ष्म असते व हे  समजणे समुपदेशकाला आवश्यक असते, कारण आजारासाठी औषधोपचाराची गरज असते. समुपदेशनाने तो बरा होणार नाही हे तारतम्य समुपदेशकाला हवे. सहा महिने, वर्ष अशा अर्धपक्व समुपदेशकाकडे जाऊन काही फरक न झाल्याने अधिक बिघडलेल्या अनेक केसेस आमच्या संस्थेत व इतर मनोविकारतज्ज्ञांकडे येत असतात. याला एक कारण आपल्या समाजातील मानसिक रोगांबद्दल असलेला स्टिग्मा (कलंक) हेही आहे. कारण समुपदेशकाकडे जाणे त्या मानाने अधिक समाजसंमत आहे. वरील ३ निदानांमध्ये आजारासाठी औषधोपचार, व्यक्तिमत्त्वदोषांसाठी मानसोपचाराचे खास शिक्षण व ताणतणावविषयक समस्यांमध्ये १ किंवा २ सत्रांमध्ये या व्यक्तीला फक्त समुपदेशनाचा कितपत फायदा होईल किंवा जोडीला काही औषधोपचार केल्यास त्याला अधिक उपयोग होईल याचा अंदाज घेणे (व त्यासाठी त्याचे ज्ञान असणे) हे अतिआवश्यक ठरते. याचा अर्थ हा की, समुपदेशक म्हणून आपली जबाबदारी लक्षात घेणे व त्या अनुरूप असे शिक्षण घेणे. येणारी त्रस्त मंडळी जर त्या विश्वासाने आपल्याकडे येत असतील तर आपण करत असलेला व्यवसाय व त्याच्या मर्यादाही जाणून घ्यायला हव्यात व त्याचे कसोशीने पालन करायला हवे!   गेल्या काही वर्षांत दर आठवडय़ाला आम्हाला अशा प्रकारचे अनेक फोन येतात की, ‘मी माझ्या व्यवसायात अनेक वष्रे यशस्वीरीत्या काम केले, पण आता मला समुपदेशक म्हणून काम करायचे आहे.’ यासाठी अनेक कारणे असतात, ‘मला समाजाला उपयुक्त असे काही करायचे आहे’, ‘आता मला पशासाठी काही करायचे नाही, पण आवड म्हणून’, ‘लोक माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलतात व मी त्यांना सल्ला देतो व आता ते शास्त्रोक्तपणे करायचे आहे म्हणून.’ या सर्वामध्ये या मंडळींचा हेतू कितीही शुद्ध असला तरीही समुपदेशन म्हणजे केवळ बोलणे नव्हे. हे एक शास्त्र आहे. ती एक कलाही आहे! मला या क्लाएंट-रुग्णाला या सत्रात नेमके काय काय सांगायचे आहे हे शास्त्र आहे व ते त्याच्यापर्यंत खुबीने कसे पोहोचवायचे आहे ही एक कला आहे.  समुपदेशकाने सहृदय असणे, त्याची ऐकण्याची कौशल्ये चांगली असण्याची गरज आहे त्यापेक्षा अधिक त्याला या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण असणे, आजार व ताणतणाव यातील सूक्ष्म फरक जाणण्याचे कसब असणे, आपले ज्ञान व समोरच्याची गरज यात तफावत असल्यास योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीकडे त्यास पाठविणे यासाठी लागणारा स्वीकार व तारतम्य हे आवश्यक आहे. हौस, आवड, समाजास मदत (समाजाच्या ऋणाची परतफेड) या कारणासाठी या मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यास त्यासाठी अनेक सेवाभावी संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करता येईल. एक समाजोपयोगी उद्दिष्ट धरून समविचारी लोकांनी एकत्र येऊन करावयाच्या अनेक सेवांची आज समाजाला गरज आहे. आमच्या संस्थेत असे अनेक स्वयंसेवक काम करतात, पण त्यांच्यावर सोपविलेल्या कामाच्या मर्यादा ओळखून व कायम विद्यार्थ्यांच्या भूमिकेत!

त्यामुळे समुपदेशन हा हौस म्हणून करायचा व्यवसाय नसून एक जबाबदार व्यवसाय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हा केवळ बोलण्याचा व्यवसाय नसून समोर आलेल्या व्यक्तीस अजाणता दाखवलेल्या चुकीच्या दिशेमुळे त्याचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते हे ध्यानात घ्यायला हवे. या लेखामुळे या व्यवसायात हौशीने शिरलेल्या अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जातील याची पूर्ण कल्पना असूनही या व्यवसायाची शुचिता व पावित्र्य राखण्यासाठी परखडपणे हे लिहिणे आवश्यक होते, नाही तर भावना दुखावण्याच्या कारणापायी आपण अनेक गोष्टी चालवून घेण्यास शिकलो आहोत, पण रुग्णांच्या हितापेक्षा काहीही मोठे नाही!

डॉ. शुभा थत्ते thatteshubha@gmail.com