23 January 2018

News Flash

कुणी आहे का, माझ्यासाठी?

अर्जुनचं उदाहरण आपण धोक्याची घंटा म्हणून बघितलं पाहिजे.

सायली परांजपे | Updated: April 20, 2017 11:07 AM

अर्जुनचं उदाहरण आपण धोक्याची घंटा म्हणून बघितलं पाहिजे.

आत्महत्येसारखं पाऊल उचलताना कॅमेरा वापरणं हेच मुळात ती व्यक्ती प्रचंड निराश, हतबल आणि हरवलेली होती हे स्पष्ट करतं. कॅमेऱ्यासमोर ती व्यक्ती, ‘कुणी आहे का? ’ ‘मी कशासाठीही लायक नाही’ असं म्हणत नाही, पण त्यातून ती भावना अधोरेखित होतेच. इतरांचं लक्ष वेधून घेण्याचा तो प्रयत्नच असतो. अर्जुनने केलेल्या आत्महत्येकडे म्हणूनच आपण धोक्याची घंटा म्हणून बघितलं पाहिजे. तरुणाईचं सगळं काही ठीक चाललेलं नाही आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीच्या लक्षणांकडे आपण दक्षतेने बघितलं पाहिजे. जागतिकीकरण आणि देशात झपाटय़ाने चाललेलं स्थित्यंतर यामुळे तुटलेपण वाढीस लागतंय आणि हा ‘डिसकनेक्शन सिण्ड्रोम’ एचआयव्हीपेक्षा अधिक घातक आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण लोककेंद्री दृष्टिकोन विकसित करायला हवा.

अर्जुन भारद्वाज नावाच्या २३ वर्षांच्या तरुणाने मुंबईत वांद्रे उपनगरातल्या एका मोठय़ा हॉटेलमध्ये आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या सगळ्या घटनेचा व्हिडीओ पोस्ट का केला, असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय. अर्थात असे व्हिडीओ यापूर्वीही अनेकांनी पोस्ट केलेत. आणि मी प्रत्येकाला विचारतो, ‘‘आपल्या ‘आनंदी क्षणां’चे किंवा व्यावसायिक-व्यक्तिगत यशाचे फोटो आपण फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम किंवा अन्य साइट्सवर का टाकतो?’’ बहुतेक जण पुटपुटल्या स्वरात सांगतात की, त्यांना ते सगळ्यांना दाखवावेसे वाटतात. काही जण असंही म्हणतात की, त्यांना सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं आणि वेगवेगळ्या साइट्सवर लोकांनी त्या फोटोंवरून केलेलं कौतुक त्यांना सुखावून जातं. अशी कितीतरी कारणं असतील, प्रेरणा असतील.

त्यापैकी एक महत्त्वाची इच्छा, मग ती जाणतेपणी असो किंवा अजाणतेपणी असो, म्हणजे बहुतांशी प्रत्येकाला आपलं आत्मचरित्र लिहायचं असतं. काही जण औपचारिकपणे आत्मचरित्र लिहितात आणि बरेचसे काळाच्या वाळूवर इंटरनेटच्या मदतीने अशा पाऊलखुणा उमटवत राहतात. फेसबुकसारख्या साइट्स तर आपल्या जुन्या आठवणीही आपल्यासमोर आणत राहतात. आपण त्या पुन्हा बघाव्यात, इतरांनाही दाखवाव्यात आणि आपलं हे आत्मचरित्र अधिक सुंदर व्हावं म्हणून. आपल्याला छान वाटावं, स्वत:चंच स्वत:शी आणि मित्रांशी नव्यानं नातं जोडलं जावं म्हणून मध्येच वळून गतआयुष्याकडे बघण्याची ही संधी असते त्यांच्यासाठी. त्यामुळे मग आनंद, भीती, दु:ख, परिचय दाखवणारे हाय-हॅलो आणि अगदी ‘शेवट’चा निरोपही इंटरनेटवर आल्याखेरीज राहात नाही.

हे जग म्हणजे अगम्याचा, अज्ञाताचा सागर आहे. या सागरात आपल्या ‘स्व’चं अस्तित्व दाखवून देणं ही अनेकांची गरज आहे. स्वत:चा मुद्दा ठळकपणे मांडणं, इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपली ओळख तयार करणं हे त्यातल्या प्रत्येकाला अगदी आतून हवं असतं. मग आपला प्रवास आपण इंटरनेटच्या माध्यमातून लिहून काढतो. कारण ते अगदी सोपं आहे. इंटरनेट हे माध्यम समानतावादी आहे. कारण हे माध्यम समाजातल्या उच्च वर्गाच्या, शक्तिशाली वर्गाच्या हक्कांचा जेवढा आदर ठेवतं, तेवढाच आदर सामान्य माणसाच्या हक्कांचाही ठेवतं. हे माध्यम सर्वाना समान संधी देतं. आपल्याला ज्यांच्याबद्दल प्रेम वाटतं, विश्वास वाटतो, त्यांच्यासोबत आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टी शेअर करतोच ना? तोंडी सांगितलेले अनुभव काळाच्या ओघात पुसलेही जातात. मात्र, टाइप केलेले शब्द आणि फोटो अखिल विश्वातल्या कोटय़वधी लोकांच्या नजरेस पडत राहतात.

कोणताही खर्च न करता होणारा हा विस्तार आहे. बरेच जण त्यांचं दु:ख, वेदना, प्रेमभंग, जवळच्या व्यक्तींचा विरह सर्व काही खुलेपणाने सर्वाना सांगतात. इंटरनेटचं माध्यम त्यांच्यासाठी अनेक मार्गानी सांत्वनपर ठरू शकतं. मला आठवतं, माझ्या एका सहकाऱ्याने- तो गुजरातमध्ये मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे- त्याला आलेल्या एपिलेप्टिक अ‍ॅटॅकबद्दल इंटरनेटवर सर्व काही सांगितलं होतं. त्याला वाटलेली भीती, वेदना आणि कशा धैर्याने त्याने या सगळ्याचा सामना केला ते सगळं त्याने शेअर केलं होतं. त्याला ओळखणाऱ्या लक्षावधी लोकांनी तर त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होतीच, शिवाय न ओळखणाऱ्यांनीही सहवेदना दर्शवली होती. हे सगळं शेअर करण्यात हतबलता मुळीच नव्हती. उलट आपण ज्या दिव्यातून गेलो त्याबद्दल सर्वाना सांगण्याची उत्कट इच्छा होती. बरेचजण आई किंवा वडिलांच्या मृत्यूची बातमी शेअर करतात. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे जे तुटलेपण येतंय, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी सांधलं जातंय. सोशल मीडियावर सगळं काही शेअर करण्यात कमालीचा उथळपणा आहे, अशी टीका होत असली, तरी हे माध्यम लोकांना जोडून घेण्याची संधी देतोय हे लक्षात घेतलंच पाहिजे. या समाजमाध्यमाकडे साशंकतेने बघणारे काही ‘जुन्या पिढीतले’ लोक त्यांच्या काळात कसं समोरासमोर प्रत्यक्ष शेअिरग होतं आणि तेच कसं आदर्श होतं अशी बढाई कायम मारत असतात, पण मला हे पटत नाही. सध्या लोकांमधली भौगोलिक अंतरं एवढी प्रचंड आहेत आणि वेळ एवढा कमी आहे की, आपल्याला फारसं न ओळखणाऱ्या शेकडो लोकांनी केलेलं सांत्वन कदाचित आपल्या अत्यंत जवळच्या पण भेटायला येऊ  न शकलेल्या मित्राच्या सांत्वनाइतकंच आश्वासक ठरतं. प्रेम आणि अनुकंपेच्या कधीच न येणाऱ्या किंवा येऊनही पटकन निसटून जाणाऱ्या मोठय़ा लाटेपेक्षा या छोटय़ा छोटय़ा लाटा आयुष्यात खूप महत्त्वाच्या ठरतात.

शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अर्जुन आणि आणखी बऱ्याच जणांनी कदाचित त्यांच्या आयुष्यातलं अखेरचं प्रकरण स्वत:च्या अशा उपरोधिक कथनशैलीत लिहून ठेवायचं असेल आणि ते कथन खूप लोकांनी वाचावं किंवा बघावं असं त्यांना वाटत असेल. अखेरच्या पत्राची जागा व्हिडीओने घेतली असेल. अर्जुनचं उदाहरण बघितलं तर, तो अगदी व्यवस्थित पद्धतीने जगाचा निरोप घेत होता, त्याची स्वत:ची अशी संदर्भचौकट वापरून जगासोबत अखेरचं हस्तांदोलन करत होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्यातली अनेक प्रकरणं वेबवर लिहून ठेवावीशी वाटतात, तसंच अर्जुनला त्याचे अखेरचे क्षणही कधीच पुसले जाणार नाहीत, असे नोंदवून ठेवावे असं वाटलं असेल.

जगभरात अनेकांनी आजारपणामुळे मृत्यू अटळ आहे हे कळल्यानंतर आपल्या प्रियजनांना लिहिलेली पत्रं किंवा त्यांना उद्देशून काही सांगणारे व्हिडीओ इंटरनेटचं माध्यम उपलब्ध झाल्यापासून त्यावर पोस्ट करून ठेवलेत. मग अर्जुनने पोस्ट केलेल्या व्हिडीओत आणि या व्हिडीओंमध्ये फरक काय आहे? आपल्या मृत्यूचा अंदाज आलेले लोकही पत्र लिहून ठेवतात किंवा व्हिडीओ पोस्ट करतात आणि स्वत:चा मृत्यू घडवून आणणारेही तेच करतात. मृत्यूनंतरही आपल्याला सर्वानी लक्षात ठेवावं अशी उत्कट इच्छा आपल्यापैकी बहुतेकांची असते, आपली स्मारकं किंवा तत्सम जगाच्या अंतापर्यंत अस्तित्वात राहील असं काहीतरी कोरून ठेवण्याची तीव्र मनीषा अनेकांमध्ये असते. त्यामुळे आयुष्य संपवण्याचा निर्णय केलेल्यांच्या मनातही आपला शेवट सर्वोत्तम झाला पाहिजे, असं काहीतरी असतं. त्यातच नैराश्याने ग्रासलेल्या मनांमध्ये विचित्र गोष्टी शिजत असतात, आपल्याला काळंकुट्ट, भीषण वाटतील असे प्रसंग म्हणजे त्यांच्या कल्पनेतला चपखल ‘शेवट’ असतो. शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्सर म्हणा किंवा अगदी हवा तसा पूर्णविराम.

जग सोडून जाताना एक धमाका करावा, या प्रेरणेमागे अशी अनेकविध कारणं असतात आणि वेब नावाच्या चक्रव्यूहासारख्या माध्यमाच्या उपलब्धतेमुळे यातली गुंतागुंत आणखी वाढते. भारतीय वंशाच्या एका ऑस्ट्रेलियन मनोविकारतज्ज्ञाने मध्यंतरी एक विधान केलं होतं- नैराश्य हे अत्यंत धूर्त असतं, वेगवेगळे फसवे वेश करून ते समोर येतं. चेतनासंवेदनांचा पार बोजवारा उडालेल्या मनांवरही धैर्य, हौतात्म्यासारख्या कल्पना भ्रमाच्या स्वरूपात स्वार झालेल्या असतात आणि थेट कृतीच्या स्वरूपात त्यांचं जगाला दर्शन घडवण्याची आसही असते. अर्जुन पराकोटीच्या नैराश्याने ग्रासलेला होता, हतबल होता हे नाकारता येणार नाही. माणसांच्या घोळक्यात रमणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो उथळ, अपरिपक्व आणि भावनेच्या भरात निर्णय घेणारा मुलगा होता असा गैरसमज अनेकांचा होईल. पण तेही चूक आहे. अत्यंत बहिर्मुख वर्तन असलेली तरुण मुलं-मुली नैराश्याच्या गर्तेत सापडतात तेव्हा बऱ्याच लोकांचा त्यावर विश्वासच बसत नाही. कारण हे लोक मधूनमधून अत्यंत आशावादी आणि आनंदी वागतात. अगदी त्रासाच्या मध्यावर असतानाही ही मुलं-मुली कधी कधी विनोद वगैरेही करतात. अर्जुनने त्याची भावंडं, आई-वडील आणि मित्रांना उद्देशून सविस्तर पत्रं लिहिली आहेत. त्याला सतावणाऱ्या नैराश्याची लक्षणं ओळखण्यात आपण सपशेल अपयशी ठरलो, तो कधीतरी असं पाऊल उचलेल याच्यावर आपण विश्वासच ठेवला नाही.

आत्महत्येसारखं पाऊल उचलताना कॅमेरा वापरणं हेच मुळात ती व्यक्ती प्रचंड निराश, हतबल आणि हरवलेली होती हे स्पष्ट करतं. कॅमेऱ्यासमोर ती व्यक्ती ‘मी हतबल आहे’, ‘मला निराश वाटतंय’ किंवा ‘मी कशासाठीही लायक नाही’ असं काही म्हणत नाही, पण या सगळ्या भावना अधोरेखित होतात. हा उद्विग्नतेचा आक्रोशच असतो. कॅमेरा वापरून ती व्यक्ती जगाची क्षमायाचना करते. ‘आय अ‍ॅम सॉरी’ हे वाक्य ती व्यक्ती भले म्हणत नसेल पण तिला जगाची माफीच मागायची असते. ‘कोणाला माझी काळजी आहे का?’ किंवा ‘मित्रांनो, तुम्ही मला खूप मदत केलीत पण माझा आजार बरा होणाऱ्यातला नाही आणि म्हणून मला जगण्याचं काही कारण दिसत नाही’ असंच काहीसं ती सांगत असते. ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका. मला असं करण्यासाठी कोणीही भाग पाडलेलं नाही. माझ्या मृत्यूनंतर कृपया कोणालाही त्रास देऊ नका’ असंही ती व्यक्ती सांगत असते. व्हिडीओ हे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचंच विस्तारित स्वरूप आहे. लोक या कृत्याकडे कसं बघतात हे यात खूप महत्त्वाचं आहे. कोणी म्हणेल की, अर्जुनकडे दुसरा पर्यायच नव्हता, निराशाग्रस्त किंवा उद्विग्न व्यक्तीच्या मनात स्वत:ला हानी करून घेण्याचे विचार असतातच. किंवा कोणी अर्जुनला दोष देतील, त्याची खिल्ली उडवतील. अशा प्रकारचे लोक नैराश्यावर स्वत:च्या इच्छाशक्तीने मात करता येते या विचाराचे असतात. हे मतही चुकीचंच आहे. कारण, नैराश्य हा एक आजार आहे याची या लोकांना कल्पनाच नाही. त्यांच्या प्रियजनांमध्ये निराशेची लक्षणं दिसली, तरी या लोकांना ती ओळखता येणार नाहीत. अतिथकवा, निश्चित सांगता येणार नाही अशा वेदना, मनएकाग्र न होणं, घरातून पळून जावंसं वाटणं ही नैराश्याची काहीशी वेगळी लक्षणं ओळखण्यात जग नेहमी कमी पडतं. मला आठवतंय, एका मित्राच्या ६८ वर्षांच्या आईला ‘समाधी’ घ्यायची होती.

त्यांच्या घरात कितीतरी लोक जमले होते आणि तिच्या पायाला हात लावून नमस्कार करत होते. ती म्हणजे जणू देवाचा अवतार. या बाईंनी खाणंपिणं सोडलं होतं आणि जगण्यातला त्यांचा रस नाहीसा झाला होता. मी त्यांना बघितलं तेव्हा मला नैराश्याची लक्षणं दिसली. काही दिवस ध्यानधारणा केल्यानंतर समाधीचा बेत त्यांनी रद्द झाला. त्या नैराश्यातून बाहेर आल्या.

अर्जुनचं उदाहरण आपण धोक्याची घंटा म्हणून बघितलं पाहिजे. तरुणाईचं सगळं काही ठीक चाललेलं नाही आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीच्या लक्षणांकडे आपण दक्षतेने बघितलं पाहिजे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ‘नैराश्याची साथ पसरली आहे आणि जितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू तितक्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे’ हा यातला अंत:प्रवाह आहे. हिवताप, डेंगी किंवा क्षयरोगाने दरवर्षी मरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त संख्या नैराश्यातून मृत्यूला जवळ करणाऱ्यांची आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. जागतिकीकरण आणि देशात झपाटय़ाने चाललेलं स्थित्यंतर यामुळे तुटलेपण वाढीस लागतंय आणि हा ‘डिसकनेक्शन सिण्ड्रोम’ एचआयव्हीपेक्षा अधिक घातक आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण लोककेंद्री दृष्टिकोन विकसित करायला हवा. तेव्हा आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात गुंफून समाजात भावनासमृद्ध समाजाच्या बांधणीसाठी एकत्र काम करू. या भावनासमृद्ध समाजात आपण नैराश्यासारखे आजार वेळीच ओळखू, त्यावर उपचार करू आणि मानसिक आरोग्याने परिपूर्ण आयुष्य जगू.

अर्जुन भारद्वाज

ch01आत्महत्येसारखं पाऊल उचलताना कॅमेरा वापरणं हेच मुळात ती व्यक्ती प्रचंड निराश, हतबल आणि हरवलेली होती हे स्पष्ट करतं. कॅमेऱ्यासमोर ती व्यक्ती ‘मी हतबल आहे’, ‘मला निराश वाटतंय’ किंवा ‘मी कशासाठीही लायक नाही’ असं काही म्हणत नाही, पण या सगळ्या भावना अधोरेखित होतात. हा उद्विग्नतेचा आक्रोशच असतो. कॅमेरा वापरून ती व्यक्ती जगाची क्षमायाचना करते. ‘आय अ‍ॅम सॉरी’ हे वाक्य ती व्यक्ती भले म्हणत नसेल पण तिला जगाची माफीच मागायची असते. ‘कोणाला माझी काळजी आहे का?’ किंवा ‘मित्रांनो, तुम्ही मला खूप मदत केलीत पण माझा आजार बरा होणाऱ्यातला नाही आणि म्हणून मला जगण्याचं काही कारण दिसत नाही’ असंच काहीसं ती सांगत असते. ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका. मला असं करण्यासाठी कोणीही भाग पाडलेलं नाही. माझ्या मृत्यूनंतर कृपया कोणालाही त्रास देऊ नका’ असंही ती व्यक्ती सांगत असते. व्हिडीओ हे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचंच विस्तारित स्वरूप आहे.

(लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

डॉ. हरीश शेट्टी harish139@yahoo.com

अनुवाद – सायली परांजपे

First Published on April 15, 2017 3:20 am

Web Title: depressed arjun bhardwaj commits suicide in front of camera
  1. No Comments.