04 June 2020

News Flash

बदलू या होळीचा ‘रंग’

अनेकांनी आत्तापासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच.

होळी-रंगपंचमीचे वेध लागले आहेत. अनेकांनी आत्तापासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच. ‘रेन डान्स’, हौदातली नाहीतर पाण्याचा पाइप लावून रंगांची उधळण मनात नक्की असेल. पण यंदा जर पाण्याचा गैरवापर आपण टाळू शकलो तर? रंगपंचमीसाठीच नाही तर अगदी पुढचा पाऊस पडेपर्यंत पाणी जपून वापरलं तर? सणाचा आनंद एकत्र येऊन साजरं करण्यात आहे, कोरडे आणि अकृत्रिम रंग वापरू न पाहू या का यंदा?

दृश्य क्रमांक १: पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे.. माझ्या आठवणीतल्या प्रिय दिवसांपैकी दोन दिवस म्हणजे धुळवड आणि रंगपंचमी. दोन्ही दिवस मजेमजेचे. रात्रभर धगधगून मग शांत झालेल्या होळीच्या राखेत पाणी घातलं जायचं आणि मग तो सगळा चिखलच एकमेकांना यथेच्छ फासून धुळवड साजरी होत असे. हा राखेचा चिखल अंगाला का लावायचा तर पुढे येऊ  घातलेला उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून.. चेहऱ्यावरचा तो चिखल धुऊन काढला की माणसं कशी आतून उजळलेली, आनंदी दिसत. मग सात-आठ दिवसांच्या अंतराने यायची ती रंगपंचमी. आम्ही राहायचो त्या भागातले सगळेच लोक मोठय़ा उत्साहात रंगपंचमी खेळत. त्या दिवसाची सुरुवात मात्र मनावर कायमची कोरली गेली आहे. पहाटे लवकर उठून, सगळी आन्हिकं आटोपून आजी देवांची पूजा करत असे. बाळकृष्णासहित सगळ्या देवांना पंचामृतानं स्नान घालून मग कापसाची शुभ्र वस्त्रं आणि माळा चढवल्या जात. मग चांदीच्या वाटीत कालवलेल्या केशरपाण्याचं बोट देवाला लावून आजी रंगोत्सवाला सुरुवात करायची. वाडय़ातल्या चौकात मधोमध पाण्याने भरलेला एक छोटा ड्रम असायचा. त्या पाण्यात गुलाल मिसळला की रंग तयार. पाच-सहा मित्रमैत्रिणींमध्ये मिळून एकच पिचकारी असायची..पण आनंद कधी उणावला नाही. माझ्या बालपणाचा एवढा हाच एक रंग आता लक्षात आहे. पुढे एकदा काही दंगेखोर मुलांनी रंगाऐवजी अंगावर ग्रीस फेकलं आणि सगळा बेरंगच झाला. रंग खेळणं थांबलं ते थांबलंच.

दृश्य क्रमांक २ : प्रसंग मागच्याच वर्षीचा, २०१५ मधला. पुण्यातल्या एका उपनगरातली मोठी प्रसिद्ध सोसायटी. २ बेडरूम हॉल-किचन आणि त्यापुढचेच फ्लॅट्स असलेली. उच्च मध्यमवर्गीय म्हणता येईल असा तिथला रहिवासीवर्ग. होळीच्या दिवशी स्विमिंग टँकमधे मोटार लावून पाणी उपसून होळी साजरी केली गेली. लहान मुलांसाठी छोटे-छोटे प्लास्टिकचे टब ठेवून त्यात रंग मिसळला गेला आणि सेलिब्रेशन झालं..
हे काही एकमेव उदाहरण नाही. थोडय़ाफार फरकानं शहरात याच प्रकारे होळी साजरी केली जाते अलीकडे.. पाण्याचा नाहक उपसा.. गैरवापर. आपल्याकडे सगळेच सण-उत्सव लहानमोठय़ा प्रमाणावर साजरे करण्याची परंपरा आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ वेगळा काढून, ताण-तणाव विसरून आनंद उपभोगता यावा, हा खरंतर या सणांचा साधा अर्थ. होळीपुढे उभं राहून खच्चून वाईटसाईट बोलत मनातली भडास होळीत जाळून टाकत मन स्वच्छ करणं असो नाहीतर वय-जात-धर्म-लिंग-आर्थिक स्तर वगैरे सगळे भेद विसरून    मुक्त मनानं एकमेकांना रंगवणं असो, निखळ आनंद देण्याची क्षमता असलेल्या कित्येक प्रथा आपल्यापाशी आहेत. पण आजचं चित्र खूप वेगळं असल्याचं जाणवतंय. मुळात सगळे सण-उत्सव साजरे करण्याला एक प्रकारचं बाजारी स्वरूप आलंय. प्रत्येक सण जसा काही ‘इव्हेंट’ होत चालला आहे. जोरदार खरेदी..गरजेची-बिनगरजेची..पण ‘सेलिब्रेट’ करायचं म्हटलं की बाजार गाठणं कर्तव्यप्राप्त ठरलंय. सणांसाठी सततचं उसनं अवसान आणताना साधेपणा कुठे हरवलाय? कायमच का सगळं झगझगीत-झकपक हवंहवंसं वाटू लागलंय?

आजकाल होळीच्या निमित्ताने कित्येक ठिकाणी ‘रेन डान्स’सारखे चैनीचे प्रकार सुरू असतात. होळी-रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर तर रिसॉर्टला जाऊन ‘होली सेलिब्रेट’ करण्याची नवीच पद्धत रूढ होत आहे. थेंबभर पाण्याला महाग झालेल्यांची ही केवढी क्रूर चेष्टा! आमच्याकडे आहे ना मुबलक पाणी, मग आम्ही ते वाट्टेल तसं वापरणार. गाडय़ा धुणार..टेरेस-बाल्कनी धुऊन काढणार, फिल्मस्टार्स करतात म्हणून त्यांच्यासारखीच ‘होली’ खेळून हजारो लिटर पाणी वाया घालवणार..आम्हाला काय त्याचं?..ही बेपर्वा वृत्ती घातक आहे.

प्रथा-परंपरांचा अन्वयार्थ नव्यानं समजून घेण्याची वेळ नक्कीच आली आहे. रोजच्या एकसुरी कंटाळवाण्या रूटीनला सुट्टी देऊन स्वत:सोबत घरच्यांना-नातलगांना आणि मित्रपरिवाराला ज्याला ‘क्वालिटी टाइम’ असं छानसं नाव आहे..असा वेळ देणं, भेटत राहणं, आस्थेनं क्षेमकुशल विचारणं..हे समजून घ्यायला हवं. सणांचं ओझं वाटून न घेता फक्त रोजच्या दिवसापेक्षा एक वेगळा आनंदाचा-मजेचा दिवस, इतपत तर आपण करू शकतोच. शिवाय होळी रंगपंचमी म्हटलं की पाण्याचा यथेच्छ वापर केलाच पाहिजे का.. कोरडी रंगपंचमीसुद्धा तेवढाच आनंद देऊ शकत नसेल? पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आपल्या सणांच्या आनंदावरच गदा आणली पाहिजे असे नाही तर रोजच्या वापरातही आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची निकड निर्माण झाली आहे. विविध उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्याचा वापर कसोशीने सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राज्यातल्या वेगवेगळ्या गावांत पाण्याची गंभीर अवस्था निर्माण होते आहे.
मराठवाडय़ाच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातलं एक छोटंसं गाव. गावातल्या तलावाला भरपूर पाणी असल्यामुळे ऊसशेतीचं प्रमाण भरपूर. पण गेल्या ३-४ वर्षांत पावसाचं प्रमाण कमी कमी होत गेल्यामुळे तलाव कोरडेठाक पडलेत. मग लोकांनी बोअरवेल खणायला सुरुवात केली. गावाची लोकसंख्या आहे सुमारे १६०० तर या बोअरवेलची संख्या ८००. म्हणजेच दर दोन माणसांमागे एक बोअर खणली गेली आहे. राज्य सरकारच्या भूजल कायद्यानुसार २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खणता येत नाही. तसं केल्यास बोअरवेल मशीनचा मालक आणि शेतकरी या दोघांनाही आर्थिक दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र शेतीला तरी पाणी हवंच या ध्यासानं सहाशे ते हजार फुटांपर्यंत बोअरवेल खणल्या जात आहेत आणि इतकं करूनही पाणी लागेल याची शाश्वती नाहीच. हीच परिस्थिती थोडय़ाफार फरकाने

मराठवाडय़ातल्या मोठय़ा शहरांची. शेती तसंच औद्य्ोगिक कारणांसाठी जमिनीतून पाण्याचा उपसा करण्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्याच वेळी वाटय़ाला येईल तेवढय़ा पावसाचं पाणी अडवून पुन्हा जमिनीत मुरवण्याचं प्रमाण अगदीच नगण्य. लातूर, शहराला महिन्यातून एकदाच तर बीड, नांदेडमध्ये साधारणत आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. औरंगाबादमध्येही थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती आहे.
मग प्रश्न हा पडतो की ही माणसं जगतात कशी? उत्तर अर्थातच टँकर. बोअरवेलमधून पाणी उपसून ते टँकरद्वारे घरोघर पोचतं. साधारणपणे १ रुपया प्रति लिटर याप्रमाणे पाणी विकलं जातंय. हे झालं धुणी-भांडी-स्वच्छता इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची कथा. मग पिण्याच्या पाण्याचं काय करत असतील लोक? उत्तर फार गंभीर आहे. ज्या सधन-सुखवस्तू लोकांना बाटलीबंद पाणी विकत घेणं परवडतं ते दररोज दुधाच्या रतिबासारखं पाणी विकत घेतात. अगदी छोटय़ा छोटय़ा दुकानांतूनही लहान-मोठय़ा पाण्याचे पाऊच विकत मिळतात. ‘पाणी’ ही मोठी इंडस्ट्री झाली आहे. ज्याच्या हाती पैसा त्याला पाणी. यामुळे पुन्हा एकदा श्रीमंत-गरीब असे भेद निर्माण होऊन चोरी आदी गुन्ह्य़ांचं प्रमाण वाढत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्रसिंह यांचं एक विधान या ठिकाणी आठवतं, ‘आकाशातून पडणारं पाणी तुम्ही जर जमिनीत मुरवलं नाही आणि आता सुरू असलेल्या पद्धतीनं पाण्याचा उपसा सुरूच राहिला, तर भविष्यकाळात मराठवाडय़ाचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.’
गेल्या काही वर्षांत कमी-कमी होत गेलेलं सरासरी पावसाचं प्रमाण आणि इतरही अनेक कारणांमुळे मराठवाडय़ासह कित्येक ठिकाणी पिण्यासाठीसुद्धा पुरेसं पाणी उपलब्ध नाही. मैलोन्मैल पायपीट केल्यानंतर घागरभर पाणी त्यांना मिळतं. चित्र इतकं विदारक असताना पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये जिथे तुलनेनं ठीकठाक पाणी उपलब्ध आहे, तिथे तरी विचारपूर्वक कृती करणं आवश्यक आहे.
मागच्याच वर्षीची ही गोष्ट..महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट होतं..धान्यांचे, विशेषत: तूरडाळ वगैरे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. ही परिस्थिती उमजून एका सुखवस्तू मित्रानं घरी शोभेच्या माळा-फटाके आदी बऱ्याच खर्चाला पूर्ण फाटा देऊन चांगली घसघशीत रक्कम एका सेवाभावी संस्थेला पाठवली. प्रत्येकानं याच पद्धतीनं वागावं असं मुळीच नाही. वैयक्तिक जगण्यासोबतच समाजभानसुद्धा असणं गरजेचं आहे इतकंच. एका ठरावीक जाणत्या वर्गात हे बदल ठळकपणे जाणवतात. वटपौर्णिमेला वडाची कत्तल न करता वृक्षारोपण करणं, दसऱ्यालाही सोनं म्हणून पानं लुटण्याऐवजी शब्दांतून शुभेच्छा देणं असे काही आश्वासक बदल होताहेत. रंगपंचमीच कशाला होळीतही चांगल्या लाकडे जाळण्यापेक्षा कुडा कचरा, टाकाऊ सामान आधीपासूनच जमा करून ठेवलं तर तो कचराही नष्ट होईल आणि पर्यावरण रक्षण होईल. आज अशाप्रकारची होळी अनेक जण साजरा करायला लागले आहेतच, गरज आहे ती प्रोत्साहनाची.
या सगळ्याचा अर्थ असा आजिबात नाही की तन-मन रंगवून टाकणारा हा सुंदर सण साजरा करूच नये. कुठल्याही गोष्टीच्या टोकाला जाण्यापेक्षा सुवर्णमध्य काढणं केव्हाही श्रेयस्कर. आसपासच्या परिस्थितीचं भान राखून पर्यावरणस्नेही असे नैसर्गिक कोरडे रंग वापरता येतील. बाजारात जाऊन आग्रहपूर्वक ते आणायला हवेत. माझ्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार ‘ट्रू ब्ल्यू’ सोडला तर बाकी सगळ्या नैसर्गिक रंगछटा सहजपणे मिळून जातात. हळद, पळस, पालक, बीट असे वनस्पतीजन्य रंग बाजारात उपलब्ध असतात. हे रंग वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग खेळून झाल्यानंतर ते धुऊन काढायला कृत्रिम रंगांच्या तुलनेत पाणी कमी लागतं. आणि लहानमोठय़ा सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हे रंग अगदी सुरक्षित असतात.

वेळीच भानावर येऊन कृती केली नाही तर होळीचे रंगच काय, पण पुरणपोळीसुद्धा गोड वाटणार नाही. एकूणच आपल्या सगळ्यांचीच धडपड रोजचं जगणं अजून चांगलं, आनंदाचं करण्यासाठीच तर आहे ना! आपले सण तर जगण्याचा उत्सव करा अशी शिकवण देणारे..या होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने त्याकडे जरा अधिक सजगतेनं पाहूया का?

घरीच करू रंग
पिवळसर झेंडू, पारिजातकाची देठं, गोल्डन रॉड, खैर, बेलफळाची साल वेगवेगळ्या भांडय़ांत पाणी घालून उकळल्यास पिवळसर-लाल रंगाच्या छटा मिळवता येतात. शेवंती, सागाची पानं, पिवळ्या बोगनवेलीची फुलं, यातूनही पिवळ्या रंगाच्या विविध छटा मिळू शकतील. आंबेहळदीचं जमिनीतील खोड, हळद पावडर आणि हळकुंड याद्वारे गडद पिवळा रंग मिळेल. चेहऱ्याला लावण्यासाठी हा पिवळा गुलाल अगदी ‘हटके’ दिसेल. पिवळा रंग उत्साहाचा, बुद्धिमत्तेचा निदर्शक आहे. हळदीच्या पावडरमध्ये लिंबू पिळलं की गडद नारिंगी-लाल रंग मिळेल. कर्दळ, पालक, पुदिना, तुळस अशा अनेक हिरव्या पानांपासून सुंदर गडद हिरवा रंग मिळवता येतो. ही पानं बारीक वाटून पाण्यात मिसळता येईल किंवा ती वाळवून भुकटीसुद्धा करणं शक्य आहे. गुलाबी-किरमिजी रंगासाठी कांद्याची सालं पाण्यात उकळवून घ्यायची आणि मग ते पाण्यात सोनचाफ्याच्या पाकळ्या टाकून ते थोडा वेळ तसंच ठेवलं की त्याचा नकोसा वाससुद्धा निघून जातो आणि सुरेखसा रंग मिळतो. गडद किरमिजी रंगासाठी बीट बारीक वाटून पाण्यात मिसळलं की दाट रंग मिळतो.  जॅकरन्डा (नीलमोहोर), गडद रंगाचा मिलेशिया आणि निळी जास्वंद या फुलांच्या पाकळ्या वाळवून, चुरून त्यात कणीक किंवा मैदा घातला की सुंदर निळा रंग मिळेल. याचप्रमाणे कात आणि चुना एकत्र करून गडद तपकिरी रंग मिळवता येतो. हे सर्व ऑरगॅनिक रंग लहानथोर सर्वाच्याच आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.
– डॉ. कांचनगंगा गंधे

– प्राची कुलकर्णी-गरुड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 1:17 am

Web Title: eco friendly holi 2
Next Stories
1 आजचं मरण उद्यावर..
2 समानतेच्या नावाने चांगभलं!
3 स्वच्छतेची सप्तपदी
Just Now!
X