समाजमाध्यमांमधून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीस्चा वापर आपण सर्रास करतो, परंतु त्या असमानतेवर आणि लिंगभेदावर आधारित आहे याची फारच कमी जणांना कल्पना आहे, पण हे सत्य सप्रमाण सिद्ध केलं ते कॅरोलिना मिलानेसी यांनी. त्याचंच फळ म्हणून फक्त ‘गोऱ्या’ रंगाच्या इमोजीस्ची जागा इतर पाच रंगांनी घेतलीय आणि स्त्री प्रतिमा तर अधिक ‘कर्तृत्ववान’ झाल्यात. कोणतेही शास्त्र असो वा माध्यम त्याचा पाया सर्व ‘मानव समान’ आहेत या तत्त्वावरच उभा राहिला पाहिजे, हे मान्य केल्यास बदलत्या स्त्रीप्रतिमा या त्या बदलाची नांदी म्हणायला हवी.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया वा समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या असंख्य जणांना अलीकडे बदललेल्या इमोजीस् लक्षात आल्या असतीलच. नेहमीच्या स्माइली, थम्स अप, फुलं, गिफ्ट्स आदी चिन्हं तर नव्या रंगरूपात आली आहेतच, परंतु खऱ्या अर्थाने कात टाकलीय ती स्त्रीप्रतिमांनी. पूर्वी आपल्या स्मार्टफोन वा टॅब-आयपॅडमध्ये इमोजीस्मधल्या स्त्रीप्रतिमा म्हणजे फक्त गोरीगोमटी, राजकुमारीसारखी दिसणारी तरुणी असायची, नाचणारी, किंवा कुटुंबाबरोबरची, पण आता मात्र त्याबरोबरच  डॉक्टर, नर्स, शेतकरी स्त्री, शिक्षक, रॉकस्टार, रनर, शेफ, प्लम्बर, मॅकॅनिक, इंजिनीअर, कामगार, वकील, पदवीधर ,बिझनेस वुमन अशा विविध स्त्रीप्रतिमा दिसू लागल्या आहेत आणि त्याही वेगवेगळ्या वर्णछटांमध्ये. गोरा, सावळा, पिवळा,  काळा आदी सहा रंगांमध्ये. ज्यांना जो रंग निवडायचाय त्यांना तो पर्याय उपलब्ध आहे. जगात फक्त ‘गोरी’ लोकं नाहीत तर सगळ्या वर्णछटांची आहेत, हे सांगणाऱ्या. हे करण्यात पुढाकार घेतलाय गुगल, अ‍ॅपल आणि अन्ड्रॉइड या कंपन्यांनी. ११ पेक्षा जास्त स्त्री इमोजीस् वा प्रतिमा आता वापरात आल्या असून  विविध व्यवसायांतील या स्त्रीप्रतिमा म्हणजे तंत्रज्ञान युगातील महत्त्वपूर्ण बदलाची नांदी म्हणायला हवी. आणि हे सगळं घडवण्यामागे, गुगल, अ‍ॅपल, अन्ड्रॉइडसारख्या मोठय़ा कंपन्यांनाही विचार करायला लावण्यामागे आहे संशोधिका कॅरोलिना मिलानेसी!

chatu1-chart

कॅरोलिना ‘स्मार्ट फोनचे मार्केट आणि ग्राहक’ या विषयाच्या संबंधित तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विश्लेषण करणाऱ्या संशोधक म्हणून गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. जगभरातील ग्राहक समाजमाध्यमांचा वापर कसा करतात? आजच्या तंत्रज्ञानाचे भविष्य उद्या कसे आकार घेईल? याविषयीची मुख्य मांडणी कॅरोलिना त्यांच्या संशोधनातून जगासमोर आणत असतात. कॅरोलिना सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील ‘क्रिएटिव्ह स्ट्रेटॅजी कन्झ्युमर टेक रिसर्च’ या कंपनीत प्रमुख विश्लेषक वा प्रिन्सिपल अ‍ॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ‘कंटार वर्ल्ड पॅनल गार्टनर एन.टी.सी. रिसर्च’ या कंपनीत डिव्हाइस रिसर्च आणि अजेंडा मॅनेजर या पदावर त्या काम करत होत्या. ‘कंटार वर्ल्ड पॅनल गार्टनर’मध्ये असताना समाजमाध्यमांच्या वापरात ‘जेंडर रिप्रेझेंटेशन’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले. जगातील ९२ टक्के ग्राहक हे ऑनलाइन ‘इमोजीस्’चा वापर करतात. त्यांनी स्मार्ट फोनमध्ये असलेल्या तत्कालीन एकूण ३३ इमोजीस् आणि त्याचा वापर याविषयी संशोधन सुरु केले. या अहवालानुसार इमोजीस्चा सर्वात जास्त वापर जगातील युवापिढी करते. या अहवालातील उत्तरदात्यांचे लिंगानुसार वर्गीकरण पाहिले तर ७८ टक्के स्त्रिया आणि ६० टक्के पुरुष हे या इमोजीस्चा वापर करतात असे आढळून आले. हे प्रमाण २५ वर्षे वयोगटात सर्वात जास्त म्हणजे ७७ टक्के इतके होते.

समाजमाध्यमांमध्ये इमोजीस्चा वापर आणि स्त्रीप्रतिमा या विषयाची मांडणी करताना कॅरोलिना म्हणतात, ‘मी एक आई आहे. माझी मुलगी आठ वर्षांची आहे. ती मोठी होत असताना तिच्या समोर मला कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती ठेवता आली पाहिजे. स्त्रियांचे अस्तित्व फक्त राजकुमारी किंवा सुंदर स्त्री इतकेच मर्यादित नाहीये. माझी मुलगी आणि तिच्यासारख्या जगातील सगळ्या मुलींसमोर त्या जिथे जातील, जे क्षेत्र निवडतील तिथे समभाव असला पाहिजे. हा समभाव दृश्य स्वरूपात जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो तंत्रज्ञानाच्या माध्यमातही महत्त्वाचा आहे. तरुण पिढी तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणात करत आहे यामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच मुलींसमोर फक्त सुंदर आणि गोऱ्या स्त्रीप्रतिमाचे चित्रण असू नये. सुंदर आणि गोऱ्या स्त्रियांपेक्षाही वेगळे सुंदर विश्व आणि सुंदर स्त्रिया जगात आहेत त्यांच्याही प्रतिमा त्यांच्यासमोर ठेवल्या पाहिजे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून, त्यांच्या कामांतून, त्यांच्या शिक्षणातून जगासमोर आले पाहिजे. स्त्रीत्वाची व्याख्या फक्त सुंदर आणि गोरं असणं इतकी संकुचित आणि भ्रामक नसल्याने स्त्रियांनी विविध कामांतून तयार केलेली ओळख समाजमाध्यामांतून यायला हवी. कारण तरुणाई तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणात करत आहे. यापुढे भविष्यात हे प्रमाण अधिकच वाढणार आहे. स्त्रिया रोज नवनवीन क्षेत्रांत अग्रेसर होत आहेत. त्या सगळ्या क्षेत्रांचा समावेश या स्त्रीप्रतिमांमध्ये केल्यास आणि तेही सगळ्या वर्णामध्ये केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला भविष्यात दिसेल,’ या संशोधनामागचा त्यांचा हा विचार किती खोलवर होता ते लक्षात येते.

untitled-2

समाजमाध्यमांची विश्वव्यापकता दिवसेंदिवस वाढत असून ‘लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल’ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रभावी माध्यम बनत आहे. या समाजमाध्यमांचा वापर सुरू झाला तो संगणकाद्वारे, मात्र तो सर्वाधिक वाढला तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून. मागील काही वर्षांत व्हॉट्सअ‍ॅप, वुईचॅट, हाइक, फेसबुक, फेसबुक मेसेंजर, ब्लॉगर, ट्विटर अशा अनेक अ‍ॅपची, समाज माध्यमांची सुरुवात झाली. त्यात मेसेज पाठवणे, फोटो काढणे-पाठवणे, व्हिडीओ काढणे-पाठवणे, चॅट वा गप्पा मारणे, व्हिडीओ कॉल करणे असा वापर सुरू झाला. यामुळे प्रत्येकाला प्रत्यक्ष न भेटताही संबंध अर्थात नेटवर्क प्रस्थापित होत गेले. आता कोणतेही काम, त्या कामाची माहिती, कामाचा प्रचार करण्यासाठी, एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत तेही कमी खर्चात आपले म्हणणे मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे वापर केला जातो आहे. अगदी आताचे उदाहरण द्यायचे झाले तर नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या प्रचारात उमेदवार फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपापला प्रचार करत एका क्षणात हजारोंच्या जनसमुदायासमोर आपले म्हणणे, आपल्या कामाचा लेखाजोखा, सभांची माहिती देत होते. सर्वच क्षेत्रांत असा त्याचा वापर होतो आहे.

साहजिकच इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद असणाऱ्या या समाजमाध्यमांतून होणारे स्त्रीचे चित्रण हे या तंत्रज्ञानाच्या विश्वात संकुचित मानसिकतेतून केले जाऊ नये, ही अपेक्षा रास्तच आहे. आणि ते तसे होत आहे हे कॅरोलिना यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. साचेबंद स्त्रीप्रतिमेला छेद देण्याचे कार्य कॅरोलिना मिलानेसी यांनी त्यांच्या संशोधनातून जगासमोर आणले.

समाजमाध्यमाची स्वत:ची एक भाषा आहे. या भाषेत व्यक्त होण्यासाठी विशिष्ट चित्रे, चिन्हे, भाषेचे शॉर्टफॉर्म, शॉर्टकट् वापरणे, विषयाशी संबधित स्टिकर टाकणे, कमेंट करणे किंवा इमोजीस्च वापरलेले जातात. या इमोजीस्चा शोध आणि वापर पहिल्यांदा जपानमध्ये १९९५च्या आसपास सुरू झाला. आज जगभरातील ९० टक्के मोबाइल ग्राहक समाजमाध्यमांतून आपली भावना वा मत व्यक्त करण्यासाठी इमोजीस्, आयकॉन या दृक्माध्यमांचा वापर करतात. पण वर म्हटल्याप्रमाणे ते पूर्वग्रहदूषित होतं. अगदी स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीतही. एकच गोरा रंग आणि स्त्रीच्या बाबतीत तर सुंदर देखणी स्त्रीच फक्त. तसंही अनेकदा समाजमाध्यमांतून स्त्रियांचे चित्रण मागास मानसिकतेतून मांडले जातेच. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण पाहायचे झाले तर ‘ती सध्या काय करते’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या नावावरूनच व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर स्त्रीची ज्या प्रकारे  टिंगलटवाळी करण्यात आली ती हीन मनोवृत्तीच. चित्रपटसृष्टीत नव्याने नावारूपाला आलेली सक्षम अभिनेत्री आलिया भट हिच्या बाबतीत सोशल मीडियातून होणारे विनोद काय किंवा नवरात्रीत स्त्रियांनी दर दिवशी परिधान केलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या साडय़ांवरून स्त्रियांना सरडय़ाप्रमाणे रंग बदलणाऱ्या म्हणून खिल्ली उडवणे काय असे नाना प्रकारचे पोस्ट समाजमाध्यमांतून फिरत असतात. आणि लक्षणीय बाब म्हणजे अनेकदा स्त्रियाच स्त्रीला मूर्ख ठरवणाऱ्या पोस्ट एकमेकींनाच नव्हे तर ग्रुपमध्येही पोस्ट करत असतात किंवा लाइक करत असतात. (विनोदानेच घ्या म्हणून) आणि म्हणूनच आत्तापर्यंत इमोजीस् वा स्त्रीप्रतिमांमध्ये भेदभाव आहे हेही असंख्यांच्या लक्षात आलं नव्हतं. किंवा आलं असलं तरी त्याविरुद्ध आवाज उठवायचा असतो किंवा उठवावा हेही अनेकींच्या लक्षात आलं नाही, पण तो उठवला कॅरोलिना यांनी. त्यांनी तो आपल्या संशोधनातून इतका प्रभावीपणे मांडला की त्यांच्या या अभ्यासाची दखल घेत या इमोजीस्च्या प्रकटीकरणामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातला एक महत्त्वपूर्ण निर्णय १४ जुलै २०१६ रोजी गुगल, अ‍ॅपल आणि युनिकोड या कंपन्यांनी घेतला.

untitled-1

कॅरोलिनाच्या अभ्यासातील निष्कर्षांनुसार या इमोजीस् वा स्त्रीप्रतिमांमध्ये ‘जेंडर रिप्रेझेंटेशन’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याबाबतीत त्यांनी त्या एका कंपनीत काम करत असतानाचा त्यांना लिंगभेदाचा आलेला अनुभव सांगितला. त्या ज्या ठिकाणी काम करत होत्या तिथे सगळे सहकारी हे पुरुष होते. एक दिवस या सगळ्या सहकाऱ्यांबरोबरच्या बैठकीमध्ये त्यांनी एका अधिकाऱ्याला स्त्रियांशी संबधित एका यंत्राच्या जाहिरातीच्या सादरीकरणाविषयी, त्यात वापरण्याच्या रंगाविषयी विचारले. त्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘स्त्रियांशी संबंधित ते यंत्र आहे ना मग त्याला गुलाबी रंग देऊन टाका.’’ स्त्रियांसाठी ‘गुलाबी’ रंग असला पाहिजे, असा अलिखित नियम किंवा स्त्रीशी संबंधित वस्तू म्हणजे गुलाबी असावी, असे मापदंड लावले जातात. असाच काहीसा अनुभव आपल्यालाही अनेक वेळा येतो. स्त्रिया/मुली जेव्हा मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा दुकानातील सेल्समनचा पहिला प्रश्न असतो की, फोन कोण वापरणार आहे? जेव्हा त्याला आपण स्त्री/मुलगी वापरणार आहे असे सांगतो तेव्हा सेल्समन मुलींना/स्त्रियांना लाल, गुलाबी, हिरवा किंवा ज्या मोबाइलवर विविध रंगांचे पॅनल उपलब्ध असेल असे फोन सुचवतात. या रंगाची स्त्रियांमध्ये किती क्रेझ आहे हे पटवून देतात. मुलींनी/स्त्रियांनी नव्याने आलेल्या मोबाइलमधील आधुनिक फीचर्सबद्दल चौकशी केली असता प्रतिप्रश्न येतो, आपला वापर काय असणार आहे? त्यानुसार सेल्समन मोबाइल घेण्यास सुचवत असतो. या ठिकाणी मुलीला/स्त्रियांना आधुनिक फीचर्सची गरज असेल, त्या कोठे काम करत असतील त्यांना अन्य रंग आवडू शकतो याचा फारसा विचार केला जात नाही. स्त्रियांसाठीची वस्तू साधी, कामचालऊ, फॅशनेबल आणि गुलाबी रंगाची असावी हे निकष ते स्वत:च लावून मोकळे होतात.

स्त्री-पुरुषांसाठी असलेल्या सगळ्या बाबीचे मापदंड समाजात पूर्वीपासून ठरलेले आहेत. तिने कसं राहावं, काय घालावं हे अनेकदा पुरुषी मानसिकताच ठरवते. पण त्याविरुद्ध आवाज उठवणं घडू लागलं आहे. ही घटना घडली लंडनमध्ये.

एका कार्यालयातील स्वागत कक्षात काम करणारी निकोला थोर्प.  एके दिवशी अचानक तिच्या कंपनी मालकाने तिला नोकरीवरून काढून टाकलं, कारण काय तर निकोलाने उंच टाचेची सँडल घातली नव्हती. उंच टाचेच्या सँडलमुळे मला चालताना त्रास होतो, पाय दुखतात त्यामुळे मी अशी सँडल घालू शकत नाही, असे तिने सांगितले. तरीही तिचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यावर, कार्यालयात उंच टाचेची सँडल घालणे हा कामाचा निकष असू शकत नाही. त्यामुळे झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा निर्णय निकोलाने पक्का केला आणि त्यासाठी मदत घेतली ती समाजमाध्यमाची. ‘डियर सर वेअर हिल्स’ या मोहिमेद्वारे तिने पुरुषांनी एक दिवस तरी हाय हिल्स वापराव्यात, असे म्हणत त्याचा जोरदार प्रचार केला. त्यातल्या गांभीर्यामुळे म्हणा किंवा निकोलाचं म्हणणं पटलं म्हणून असेल या मोहिमेची माहिती सर्वदूर पसरू लागली व तिच्या समर्थनात दीड लाख लोक एकत्र आले. या मोहिमेची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली. त्यामुळे लंडन सरकारला चौकशी समिती स्थापन करावी लागली.

समितीने निर्णय दिला की कोणताही मालक, अधिकारी त्याच्या कर्मचाऱ्याला विशिष्ट प्रकारच्या चप्पल घालण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. असे करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होय. या सर्वात उत्तम परिणाम म्हणजे निकोलाला पुन्हा त्याच कंपनीत सन्मानपूर्वक  सामावून घेण्यात आले.

याचदरम्यान, लिंगभेदाविषयी असलेल्या पूर्वग्रहदूषित विचारांना फाटा देत लंडनमध्ये एका लीगल फर्मने एक महत्त्वपूर्ण निर्णय अमलात आणला. निकोलाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या लीगल फर्मने फर्ममार्फत केला जाणारा सगळा पत्रव्यवहार करताना फक्त ‘डियर सर’ न लिहिता ‘डियर सर किंवा मॅडम’ असा उल्लेख करण्याचा नियम केला. जपानमधील कंपन्या आणि शासकीय कार्यालयातील एकूण ३०० कमर्चारी येथून पुढे त्यांच्या कामाचे सादरीकरण  या जेंडर इंडिकेटर निकषानुसार करतील असा निर्णय घेण्यात आला.

हे सगळं होत असताना एका मासिकाने एक मजेदार मोहीम चालवली, त्यांनी सर्वाना प्रश्न टाकला, पुरुष एक दिवस उंच टाचेच्या चप्पल/शूज/सँडल घालून वावरतील का? या प्रश्नावर त्या मासिकाला खूप मजेदार उत्तरं मिळाली. उत्तरं मजेशीर होती-नव्हती यापेक्षा असंख्य लोकांना उंच टाचेच्या सँडलच्या वेदना जाणवल्या असतील हेही नसे थोडके. त्यातच भर म्हणून उंच टाचेची पादत्राणे न घालण्याच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवत कान्स महोत्सवात

ज्युलिया रॉबर्ट अनवाणी रेड कार्पेटवर चालली. तर आइसलँड आणि फ्रान्समध्ये स्त्रियांनी स्त्री-पुरुषांना मिळणाऱ्या कमी-अधिक वेतन तफावतीबद्दलचा निषेध एकत्र येऊन केला.

‘लिंगभाव’ या संकल्पनेचे इतिहासातील दाखले पाहिले असता लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम वापरणाऱ्या स्त्रीवादी ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅन ओकले म्हणतात, लिंगभाव ही एक सांस्कृतिक बाब आहे. त्यातून स्त्री व पुरुषांची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूचित होते. एखादी व्यक्ती स्त्री की पुरुष हे जैविक पुराव्याने ठरते. परंतु व्यक्तीचे बाईपण-पुरुषपण मात्र स्थलकाळानुरूप बदलणाऱ्या सांस्कृतिक निकषांनी ठरते. म्हणजेच लिंग हे वैशिष्टय़ स्थिर असते. लिंगभाव मात्र बदलत असतो हे स्वीकारायला हवे. अ‍ॅन ओकले म्हणतात की लिंगभावाला जैविक मूळ नसते. म्हणजेच लिंग व लिंगभावातील संबंध नैसर्गिक अजिबात नाहीत. त्याच मुद्दय़ातून बोलायचं तर समाजमाध्यमांमध्येही स्त्री इमोजीस् वा प्रतिमा आत्तापर्यंत स्त्रीची समाजातील दुय्यम स्थानाचीच मांडणी करत होते.

जगात एकीकडे स्त्रियांना समान अधिकार मिळावेत यासाठी चळवळ उभी केली जात आहे. जगाने शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याचे पाचवे उद्दिष्ट ‘लिंग समभाव’ स्वीकारण्यात आले आहे.  रंगभेदामुळे होणाऱ्या भेदभावाला विरोध करणारी ‘डार्क इज ब्युटिफुल’ ही मोहीम आपल्याकडेही सुरू झाली. स्त्रियांवरील होणारे अत्याचार संपावेत यासाठी एकजूट केली जात असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारा भेदभाव हा नष्ट झाला पाहिजे, ही भूमिका कॅरोलिना यांच्या संशोधनामुळे मान्य केली गेली आणि त्याचे फळ दिसू लागले आहे. निकोलानेही स्वत:ची लढाई यशस्वीपणे पार पाडून जगासमोर स्त्रियांचे मानवी हक्क आणि समाजात मानवी मूल्यांची रुजवात करण्यात भर टाकली आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय ‘बी बोल्ड फॉर चेंज’ असा जाहीर केला होता, तर संयुक्त राष्ट्रसंघाने २०३० पर्यंत ‘वुमन इन द चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क – प्लॅनेट ५०-५० बाय २०३०’ असा जाहीर केला.  निकोलाची मोहीम ‘वुमन इन दि चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क’ची नांदीच म्हणायला हवी.  कोणतेही शास्त्र असो वा माध्यम असो त्याचा पाया हा सर्व ‘मानव समान’ आहेत या तत्त्वावरच उभा राहिला पाहिजे.  तेव्हाच समाजामध्ये समानतेचे रोपटे पोषक वातावरणात मोकळा श्वास घेऊ  शकेल.

अर्थात हे सर्व मुख्यत: घडलं परदेशात. आपल्या देशात, त्याही आधी राज्यात काय मानसिकता आहे हे तपासण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, नाशिक आणि मुंबई या शहरांतील निवडक युवक-युवतींचा ‘युवापिढीचा समाजमाध्यमातील इमोजीस् आणि लिंगसमभावविषयक दृष्टिकोन’ जाणून घेतला. या अभ्यासात औरंगाबाद येथील ७०, अहमदनगर येथील ४५, अकोला येथील ३८, नाशिक येथील ४२ आणि मुंबई येथील ४० युवक-युवतींचा सहभाग होता. (त्यातील सहभागी एकूण २३५ (११४ युवक आणि १२१ युवती) (युवकांचे वर्गीकरण तक्ता याच अंकात देण्यात आला आहे.)

या अभ्यासातील सहभागी युवकांचे वर्गीकरण केले असता एकूण २३५ पैकी औरंगाबादमधील एकूण ७० सहभागींपैकी २८ (११.९१ टक्के) युवक, ४२ (१७.८७ टक्के) युवतींचा सहभाग होता. अहमदनगरमधील एकूण ४५ सहभागींपैकी १८ (७.६५ टक्के) युवक, २७ (११.४८ टक्के) युवतींचा सहभाग होता. अकोलामधील एकूण ४५ सहभागींपैकी २८ (११.९१ टक्के) युवक, १० (४.२५ टक्के) युवतींचा सहभाग होता. नाशिकमधील एकूण ४२ पैकी सहभागींपैकी २० (८.५१ टक्के) युवक, २२ (९.३६ टक्के) युवतींचा सहभाग होता. तर मुंबईमधील एकूण ४० सहभागींपैकी २० (८.५१टक्के) युवक, २०(८.५१ टक्के) युवतींचा सहभाग होता.

३.  या अभ्यासातील सहभागींचे वयोगट दर्शविणारा तक्ता :

४. समाजमाध्यमांतील  कोणते अ‍ॅप वापरले जातात हे जाणून घेतले असता एकूण २५३ (१०० टक्के) सहभागी युवक-युवती व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचा वापर करतात असं आढळून आलं.

५. आपले म्हणणे व्यक्त करण्यासाठी कोणत्या इमोजीस्चा वापर करतात हे जाणून घेतले असता एकूण ११४ युवकांनी आतापर्यंत मुख्यत: स्माइली फेस, गुलाबाचे फूल, बुके, केक, हार्ट आणि लिप्स शेप, डान्सिंग गर्ल, थम्सअप आणि पोस्ट सुंदर आहे ही भावना व्यक्त करणारे चिन्ह वापरले होते. तर एकूण १२१ युवतींनी आतापर्यंत मुख्यत: स्माइली फेस, गुलाबाचे फूल, बुके, हार्ट आणि लिप्स शेप, डान्सिंग गर्ल, थम्सअप, पोस्ट सुंदर ही भावना व्यक्त करणारे चिन्ह, अंगठी, केक इत्यादी इमोजीस् वापरल्या आहेत.

६. अलीकडे आलेल्या नव्या इमोजीस् वा स्त्रीप्रतिमांबद्दल माहिती आहे का जाणून घेतले असता एकूण २३५ पैकी एकाही सहभागी युवक-युवतींना त्याबद्दल माहिती नव्हती. या इमोजीस् आपल्या फोनमध्ये अपडेट्स येतात त्यात आल्या असतील असे मत व्यक्त केले गेले. तसेच या इमोजीस् आतापर्यंत युवकांनी पहिल्याही नव्हत्या.

७. इमोजीस्चा रंग किंवा वर्ण बदल झाला आहे हे माहीत आहे का हे जाणून घेतले असता पहिली प्रतिमाच वापरतो. बदललेला रंग नजरेत आला होता. पण त्यात काय विशेष असे मत व्यक्त केले. रंग/वर्ण बदल झाला याची नेमकी माहिती नव्हती. कधी त्याचा वापरही केला नव्हता.

८. सोशल मीडियात किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात लिंगभेद होतो असे वाटते का? याविषयी युवकांचे मत :

समाजमाध्यमांत लिंगभेद जाणवतो का याविषयी युवक-युवतींचे मत जाणून घेतले असता ६०  जणांना वाटते की लिंगभेद होतो. १३४  जाणांना वाटते की होत नाही तर ४१ जणांना लिंगभेद होतो किंवा होत नाही असे नेमके सांगता आले नाही. याचा असा निष्कर्ष निघतो की, हे युवा लिंगभेद संज्ञेसंबंधी अनभिज्ञ आहेत.

एकूणच असं जाणवतं की अन्याय दूर होण्यासाठी मुळात आपल्यावर अन्याय होतोय हे जाणवायला पाहिजे तरच त्याविरुद्ध भूमिका घेता येते. इथे केवळ इमोजीस् किंवा स्त्रीप्रतिमांचा विचार केला तरी अशा प्रतिमा लिंगभेदाला पोषक आहेत हेच मुळात कुणाच्या लक्षात आलं नाही तर त्यातला विरोधाभास जाणवणार कसा. स्त्री असो वा पुरुष आपल्याला गोरेपणाविषयी असो की मिळणाऱ्या दुय्यम स्थानाची जाणीव प्रत्येकामध्ये आली तरच बदल घडू शकतो. पुढचा काळ ‘मानव समान’ या तत्त्वावरच चालायचा असेल तर प्रत्येकाने आपण आणि इतरही समान आहेत ही मानसिकता स्वत:त आणली तर यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं ‘बी बोल्ड फॉर चेंज’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरेल.

(हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी विकास अध्ययन केंद्राचे संचालक – सुरेश शेळके, सामाजिक कार्य महाविद्यालयाचे डॉ. युसूफ बेन्नूर, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अनिल काळे यांचे सहकार्य मिळाले.)

रेणुका कड rkpatil3@gmail.com