29 October 2020

News Flash

पावसाने झोडले, नवऱ्याने मारले, तर..

श्रेष्ठतेचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्यावर मात्र कौटुंबिक हिंसेचा प्रश्न निर्माण होतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

श्रेष्ठतेचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्यावर कौटुंबिक हिंसेचा प्रश्न निर्माण होतो. मुळातच, सत्तेच्या वापरासाठी अनुकूलता निर्माण झालेली असतेच, फक्त फरक राहतो तो या अनुभवांना अर्थ काय लावला जातो हा. ४९ टक्के स्त्रियांना हिंसा होण्याचा अनुभव हा त्रासदायक, दु:ख देणारा आणि राग आणणारा असला तरी त्यामध्ये तो हक्क समोरच्याला (नवऱ्याला) आहेच – ही धारणा आहे. तसेच सत्ता मिळणं आणि टिकणं हा आपला हक्क आहे, अशी पुरुषांची धारणा आहे. या धारणांमुळे हिंसा करणाऱ्याला आणि सहन करणारीला ती समर्थनीय वाटली नाही तरच नवल. – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ४९ टक्के स्त्रियांना नवऱ्याने मारले तर फार वावगे वाटत नाही, अशी माहिती समोर आली आहे.  त्यानिमित्ताने..

दोन वर्षांचा मुलगा असलेल्या विधुर गृहस्थाशी शारदाचा बालविवाह झाला. घरात सासू, सासरे, दीर, नणंद आणि नातेवाईकांचा राबता. वागण्यात, कामात जरा कुठे चूक झाली की नवरा आणि सासरचे रागवायचे, मारायचे, नवरा जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवायचा. अजून पाळीसुद्धा न आलेली शारदा वेदनेने गुरासारखी ओरडायची, पण कोणाच्याही हृदयाला पाझर फुटत नव्हता. शारदा रडत-रडत गावातच असलेल्या माहेरी जायची. माहेरचे पुन्हा समजूत घालून सासरी आणून सोडायचे. यथावकाश तिला स्वत:ची मुले झाली आणि सगळं कुटुंब शहरात आलं.

मात्र मारणं थांबलं नाही. बेसुमार हिंसा चालूच होती, तिच्या नवऱ्याचं दारूचं व्यसनही वाढलेलं होतं. कधी संशय, कधी ‘बाहेर तक्रार करायची नाही’ अशी धमकी देत विवस्त्र करून पट्टय़ाने मारणं, अशा पद्धतीने अत्याचार सुरूच होता. शारदाही नवराच आहे, असं वागणारच, असं म्हणून सहन करत राहिली. नवऱ्याने एक दिवस दारू विकत आणायला मुलाला पाठवलं, ते मात्र तिला सहन झालं नाही आणि मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. संस्थेत गेली, संस्थेने तिची आणि मुलाची सोय लावली; पण नवरा तिथेही येऊन तमाशे करायचा, धमक्या द्यायचा. एकदा तर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कोर्ट-कचेऱ्या, घटस्फोट सगळ्या लढाया लढत होती. नवऱ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुलांना त्याच्या वाटय़ाची जमीन, मालमत्ता मिळावी म्हणून सर्व पातळ्यांवर पुन्हा झगडली. ‘‘आज मुलं मोठी झाली आहेत, मार्गाला लागली आहेत. या टप्प्यावर मागे वळून बघताना काय वाटतं? एवढय़ा लढाया लढलीस, जिंकलीस. तुझ्या आयुष्यात इथून पुढे काय घडलं तर तुला वाटेल की आपला लढा व्यर्थ होता?’’ – अपेक्षित उत्तर होतं – ‘‘माझ्या मुलांनी जर त्यांच्या बायकांवर हिंसा केली तर माझा पराभव होईल.’’ – पण उत्तर आलं – ‘‘ज्या दिवशी माझी मुलं दारूला स्पर्श करतील, त्या दिवशी मी पराभूत होईन.’’ एखाद्या चित्रपटात शोभावं असं संकटांनी, संघर्षांनी भरलेलं आयुष्य आणि घर सोडायला, पराभूत वाटायला कारण काय? तर ‘दारू’. सत्ता, माणूस म्हणून जगण्याचा हक्क, समानता – या गोष्टीचा हिंसेशी संबंधच नाही जणू.

शारदा एक प्रातिनिधिक उदाहरण. अशा असंख्य स्त्रिया आपल्या देशात, राज्यात आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ४९ टक्के स्त्रियांना नवऱ्याने मारले तर फार वावगे वाटत नाही, अशी माहिती समोर आली आहे. उरलेल्या ५१ टक्के स्त्रियांमध्ये फक्त ३ टक्के स्त्रिया त्याविरोधात मदत घेतात, ही बाब दु:खदायक असली तरी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना धक्कादायक  नाही. अनेक वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक जणींचे अनुभव ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. कौटुंबिक हिंसेची कारणं अनेकांना माहीत आहेत. मात्र स्त्रिया, त्यातही ४९ टक्के स्त्रिया जर आजही या मारहाणीचं समर्थन करत असतील तर त्यामागच्या मानसिकतेचा मुळात विचार होणं गरजेचं आहे. तोच मांडायचा हा प्रयत्न.

प्राणी, पक्षी, माणूस सगळ्यांना ‘अनुभव’ येत असतात, तरीही अनुभवाला अर्थ लावणं हे मात्र मानवी वैशिष्टय़ आहे. ही अर्थ लावण्याची/ लागण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. मी अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे, आनंदी राहण्याकडे माझा कल आहे की दु:खी होण्याकडे आहे – अशा शक्यता जैविक कारणामुळे माझ्यामध्ये निर्माण होतात. जन्माला आल्यानंतर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती काय घडलं असता काय म्हणतात, काय करतात – थोडसं नकारात्मक घडलं तर ‘अरे बाप रे’ म्हणतात, की ‘बघू या काय करता येत ते,’ असं म्हणतात. ‘जग सुरक्षित आहे’ असा त्यांचा दृष्टिकोन आहे का, की ‘असुरक्षित आहे’ असा आहे? माझा जन्मत: असलेला कल आणि माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा लावला गेलेला अर्थ, यामधून माझ्या मेंदूमध्ये एक गणित तयार होऊ लागतं. यानंतर माझे कुटुंबीय ज्या मोठय़ा समाजाचा भाग आहेत, तिथले नियम, समजुती, अपेक्षा अशा घटकांशी माझी ओळख होऊ लागते आणि मग अर्थ लावण्याच्या प्रक्रियेमध्ये तेही घटक सामील होतात. मी कोण आहे असं मला वाटतं, माझ्या आजूबाजूचा समाज कसा आहे, समाजाच्या नजरेत मी कशी आहे – असा माझा ‘स्व’च्या जाणिवेचा प्रवास सुरू होतो आणि त्याची व्याप्ती हळूहळू वाढत जाते.

कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात ही प्रक्रिया कशी होते हे थोडंसं अधिक समजून घेऊ या, कारण हा फक्त ‘स्व’चा प्रवास नसून तो त्या समाजातल्या ‘मुलीचा-स्त्रीचा’ तसाच एका ‘मुलाचा-पुरुषाचा’ प्रवास असतो. तारुण्यात पदार्पण करत असताना त्याला परिपक्वतेचे निकष लागू होतात. स्वतंत्र विचार करणारा, आपले विचार आणि निर्णय निर्भीडपणे मांडणारा तो ‘परिपक्व मुलगा’ आणि सर्वाशी जोडून राहणारी आणि काळजी घेणारी संवेदनशील ती ‘परिपक्व मुलगी’. याच्या जोडीला हळूहळू काही नियम, काय चालतं आणि काय चालत नाही याविषयी अतिशय भिन्न असे निकष मुलाला आणि मुलीला लावले जातात. मुलाच्या आणि मुलीच्या असण्याचं वेगळेपण पुढे जाऊन आदर्श स्त्री आणि आदर्श पुरुष होण्याकडे जाऊ लागतं. स्वतंत्र विचारांचा, स्वतंत्र निर्णय घेणारा (याची गडद बाजू म्हणजे मनमानी करणारा), भावनांना कमी महत्त्व देणारा (पण राग अगदी सहजतेने व्यक्त करणारा आणि आपल्यामुळे दुसऱ्याला, विशेषत: स्त्रीला दु:ख झालं, त्रास झाला तरी त्याविषयी बेफिकीर असणारा), कुटुंबाची जबाबदारी घेणारा (पण त्याच वेळी कुटुंबावर वर्चस्व गाजविणारा) असा आदर्श पुरुष. प्रेमळ, मनमिळाऊ, नवऱ्याच्या कुटुंबीयांशी जोडून घेणारी (त्यांच्या तुलनेत स्वत:ला आणि माहेरच्यांना दुय्यम समजणारी), सहनशील (अन्याय झाला, त्रास झाला, तरी कुटुंबासाठी सगळं सहन करणारी), कर्तव्यदक्ष व त्याग करणारी (स्वत:ला नगण्य समजणारी व त्यामुळे स्वत:कडे दुर्लक्ष करणारी) ती आदर्श स्त्री. आदर्शाच्या प्रतिमांमध्ये स्वत:ला बसविण्याचा प्रवास नकळतपणे या दोघांचाही होऊ लागतो. अशी स्त्री आणि असा पुरुष जेव्हा लग्नाच्या नात्यात एकत्र येतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली परस्परभिन्नता पितृसत्तेमुळे उतरंडीत रूपांतरित होते. नवरा जबाबदारी घेणारा आणि बायको त्याच्यावर अवलंबून असणारी. नवरा अर्थार्जन करणारा आणि बायको घरकाम करणारी, नवरा निर्णयाचं स्वातंत्र्य असणारा आणि बायको निर्णयप्रक्रियेत स्थान नसलेली.  ढोबळ आणि तरल अशा अनेक पातळ्यांवर नवरा वरचढ आणि बायको दुय्यम, ही नात्यातील असमानता तयार होते. ‘अ’ (म्हणजे नवरा) आणि ‘ब’ (म्हणजे बायको) यांच्या नात्यामध्ये ‘अ’ला वरचढ आहोत असं वाटतंच, पण ‘ब’लादेखील ‘अ’ आपल्यापेक्षा वरचढ आहे असं वाटतं. इथे ‘अ’ला सत्तेच्या वापरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, म्हणजे नवरा-बायकोमधलं नातं हे नुसतं असमानतेचं न राहता नवऱ्याला सत्तेच्या वापराची मुभा देतं. मग मुद्दा येतो तो या सत्तेच्या ‘योग्य’ वापराचा किंवा ‘गैरवापराचा’.

नवऱ्याचे श्रेष्ठत्व आहे, पण त्या श्रेष्ठत्वाचा वापर समजुतीने, संयमितपणे आणि सर्वाचा विचार करून केला जात आहे आणि बायकोनेदेखील स्वत:च्या दुय्यम स्थानाचा त्याच्या मर्यादांसकट स्वीकार केला आहे असं नातं समाजाच्या दृष्टीने आदर्श वैवाहिक नातं ठरतं. अनेक ठिकाणी त्याचे गोडवे गायलेले आपण ऐकतो किंवा बघतो. मग अशा नात्यांमध्ये जर एखाद्या स्त्रीने आयुष्यातल्या एखाद्या टप्प्यावरती काही वेगळं पाऊल उचललं तर या नात्याला हादरा बसायला सुरुवात होते आणि त्या स्त्रीला पुन्हा त्या चौकटीत बसण्याची जणू काही सक्ती केली जाते. बायकांनी पुरुषांची बरोबरी करूच नये, असंही तत्त्वज्ञान सांगितलं जातं; पण ‘समानता’ म्हणजे ‘बरोबरी’ नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. जगात कुठल्याच दोन व्यक्ती समान किंवा बरोबरीच्या नसतात, पण प्रत्येक व्यक्तीला आदर आणि आत्मसन्मानाने जगण्याचा समान हक्क आहे. वैवाहिक नात्यामध्ये स्वत:च्या शरीरापासून ते स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याच्या ‘समान हक्कांचा’ हा मुद्दा आहे.

श्रेष्ठतेचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्यावर मात्र कौटुंबिक हिंसेचा प्रश्न निर्माण होतो. मुळातच, सत्तेच्या वापरासाठी अनुकूलता निर्माण झालेली असतेच, फक्त फरक राहतो तो या अनुभवांना अर्थ काय लावला जातो हा. ४९ टक्के बायकांना हिंसा होण्याचा अनुभव हा त्रासदायक, दु:ख देणारा आणि राग आणणारा असला तरी त्यामध्ये तो हक्क समोरच्याला आहेच – ही धारणा आहे. तसंच सत्ता मिळणं आणि टिकणं हा आपला हक्क आहे, अशी पुरुषांची धारणा आहे. या धारणांमुळे हिंसा करणाऱ्याला आणि सहन करणारीला ती समर्थनीय वाटली नाही तरच नवल.

हिंसा समर्थनीय वाटते अशा ४९ टक्के स्त्रियांबाबत आपण काही अंशी जाणून घेतलं. आता उर्वरित स्त्रियांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हिंसा होऊ नये, सद्य:परिस्थिती बदलावी, असं त्यांना वाटलं तरी ते बऱ्याच वेळेला शारीरिक हिंसेबाबत तीदेखील गंभीर असेल तरच वाटतं. मानसिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक अन्यायकारक अनुभवांना त्या हिंसा समजतच नाहीत. परिस्थिती बदलण्यासाठी मी काहीच करू शकत नाही, सहन करत राहिले तर एक दिवस हिंसा थांबेल, नवरा म्हणेल तसे वागत राहिले, मुलं झाली तर, सासरच्यांपासून वेगळं राहिलं तर हिंसा थांबेल – असं त्यांना वाटत राहतं किंवा नवरा चांगला आहे, पण सासू त्याचे कान फुंकते, स्वभावाने चांगला आहे, पण दारू प्यायला की मारतो, त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो संशय घेतो आणि मारतो – अशी ही हिंसेची कारणं शोधली जातात. काही वेळा नातेवाईक, कुटुंबातील वयस्कर व्यक्तीने समजावून सांगावं. क्वचित प्रसंगी गावकी/ भावकीने हस्तक्षेप केल्यास हिंसा थांबेल, असं त्यांना वाटतं. यापलीकडे हे असंच चालणार, हेच माझं नशीब, असं म्हणून त्या परिस्थिती पुढे शरण जातात.

हिंसेच्या विरोधात मदत घेणाऱ्या ज्या तीन टक्के स्त्रिया आहेत, त्यादेखील बहुतेक वेळेला शारीरिक हिंसा होत असल्यासच मदत घेतात. संस्था, संघटना किंवा समुपदेशकाकडे येताना त्यांची अपेक्षा अशी असते की, समुपदेशकाने नवऱ्याला, सासरच्यांना बोलवावं, त्यांना समजावून सांगावं, कायदा, पोलीस यांचा धाक दाखवावा. त्यांना असं वाटतं की, सत्ता असल्यामुळे नवरा आणि सासरचे हिंसा करतात, त्यामुळे वरचढ सत्तेचा वापर करूनच ही हिंसा थांबेल. यामध्ये हवं ते हवं तितक्या लवकर घडलं नाही, तर आपले प्रयत्न त्या मध्येच सोडून देतात आणि परत त्याच परिस्थितीत जातात, तर काही नाइलाजाने किमान मुलं आणि भविष्याची सोय व्हावी यासाठी कायद्याची मदत घेतात.

शारीरिक हिंसा म्हणजेच हिंसा व तीदेखील फक्त ग्रामीण भागात किंवा निम्न आर्थिक स्तरात घडते, असा गैरसमज समाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर आहे. अपशब्द बोलणे, शिव्या देणे, मारहाण करणे, अपमान करणे, निर्णयप्रक्रियेमध्ये सहभागी न करणे, माहेरचे नातेसंबंध ठेवण्यावर बंदी आणणे, पैसे न देणे, कमावती असूनदेखील आर्थिक निर्णयाचे हक्क नसणे, जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवणे किंवा लैंगिक संबंधापासून तिला वंचित ठेवणे हीदेखील हिंसा आहे असं अनेकांना वाटत नाही आणि अशा हिंसेची व्याप्ती गावं, शहरं, आर्थिक आणि सामाजिक, शैक्षणिक स्तर, धर्म, जात या सगळ्या ठिकाणी आहे. फक्त त्याविषयी बोलणे हेच अनेक स्त्रियांना मानहानीचे किंवा कमीपणाचे वाटते. उंबऱ्यातला प्रश्न उंबऱ्यातच ठेवावा या आदर्शाच्या मर्यादेच्या बेडय़ा तिच्या पायात समाजानेच नाही तर तिने स्वत:देखील घालून घेतलेल्या असतात. क्वचितप्रसंगी तिने आवाज उठवला तर घरातला प्रश्न चव्हाटय़ावर आणला म्हणून तिच्यावर अजूनच हिंसा होते. जोडीला सर्वाकडून निंदानालस्ती होते ती वेगळीच.

नातेसंबंध आणि समाजाच्या देवाणघेवाणीमध्ये माध्यमांचादेखील खूप मोठा प्रभाव दिसून येतो. स्त्रीत्वाची लक्षणे आणि पुरुषत्वाची लक्षणे माध्यमातून ज्या पद्धतीने ठसविली जातात ती बघता कालचक्र जणू काही उलटे फिरत आहे असे वाटावे. विविध जाहिराती, धारावाहिक आणि चित्रपटांमधून स्त्रीच्या उपभोग्य वस्तू असण्याला, दुय्यम असण्याला, त्या दुय्यम असण्यामध्ये धन्यता मानण्याला ज्या पद्धतीने रंगविले जाते त्यातून समानतेवर आधारित आणि तरीही एकमेकांना आनंददायी असं नातं असूच शकत नाही असा संदेश मिळतो.

म्हणूनच यापुढची दिशा ठरवायला हवी. कौटुंबिक हिंसेची ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन काही गोष्टींकडे लक्ष देणे इथून पुढे गरजेचे राहील. ‘‘कायद्याची भाषा करतेस का? आता जे काही व्हायचं ते कोर्टातच होऊ देत.’’, ‘‘सगळे कायदे बायकांच्याच बाजूने आहेत.’’ कायद्याविषयी असे दूषित दृष्टिकोन समाजामध्ये आहेत. वास्तविक कायदे हे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्यघटनेच्या चौकटीत राहून समाज सुधारण्यासाठी केले आहेत. स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क जिथे डावलला जातो तिथे तिच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, हे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी समाजापर्यंत सातत्याने पोहोचवलं पाहिजे. समुपदेशकांनी आणि समाजात बदल घडवून आणण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक घटकाने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’विषयी धारणांवर काम केले पाहिजे. आपण कोणा व्यक्तींशी सामना करत नसून, पितृसत्ताक पद्धतीमुळे निर्माण झालेल्या मानसिकतेशी सामना करत आहोत हे लक्षात घ्यावं. ‘न्याय’ किंवा ‘नातं’ अशा कात्रीत न सापडता जेव्हा स्त्रीला नात्यात न्याय मिळेल तेव्हा आपली वाटचाल योग्य दिशेने चालली आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. ‘बदल’ म्हणजे ‘अद्दल’ या मानसिकतेतून कायदा किंवा पोलिसांची मदत घेण्याऐवजी स्वत:चे आणि इतरांचे माणूस म्हणून जगण्याचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी या यंत्रणांची मदत घेणे हे निरोगी समाजाचे लक्षण आहे.

प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नाचे अस्तित्व मान्य करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल पाहता आपल्याला त्याबाबतीतच अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे निश्चित.

डॉ. शिरीषा साठे shirisha1964@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:16 am

Web Title: fact about married women in national family health survey 4 report
Next Stories
1 विवाहाचा अर्थ : लग्न कशासाठी?
2 कर्करोगाच्या पलीकडे..
3 स्वस्थवृत्ताचे पालन
Just Now!
X