डॉ. नंदू मुलमुले १९८३चे मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदकप्राप्त मनोविकारतज्ज्ञ. कवी ग्रेस यांच्या रचनांचा मनोविश्लेषक धांडोळा घेणारे ‘रचनेच्या खोल तळाशी’, ‘भानामातीचा भूलभुलय्या’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गेली बत्तीस वर्षे मानसिक समस्यांचा उपचार करताना आलेल्या अनुभवातून, विचार विकारापलीकडचा माणूस  शोधण्यातून मांडलेलं हे सदर दर पंधरवडय़ाने.

निर्मलाबाई शांतपणे थोडा वेळ माझ्यासमोर बसतात. प्रश्न सांगून संपलेले असतात. मी थातुरमातुर उत्तरांनी त्यांच्या समस्यांची बोळवण करू इच्छित नाही.  ‘स्किझोफ्रेनिया’ या निदानापलीकडे खूप मोठं आयुष्य आ वासून पडलंय याची मला जाणीव होते. त्याबद्दल मी निर्मलाबाईंचे मनोमन आभार मानतो. लक्षात येतं, माणूस उत्तरांनीच नाही, प्रश्नांनीही समृद्ध होतो..’’ मानसतज्ज्ञ म्हणून घेतलेल्या मानवी नात्यांची कथा व्यथा मांडणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

माझ्या मानसतज्ज्ञाच्या ‘भूमिकेला’ बत्तीस वर्षे उलटून गेली आहेत. रोज या खुर्चीत बसून मी विविध वृत्ती-प्रवृत्तीची माणसं पाहतो. त्यांच्या समस्यांची माहिती घेतो. माझ्या ज्ञान आणि अनुभवाच्या कसोटय़ा लावून त्यांचं निदान करतो. औषधयोजना करतो. त्यांना लिहून-समजावून देतो. आलेला रुग्ण समाधानानं परत जाईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो. रुग्ण निघून जातात. मी क्षणभर खुर्चीत रेलतो. विचार करतो, या माणसाच्या समस्या निदानाच्या चौकटीत मी बसवल्या खऱ्या, पण त्यापलीकडेही काही तरी उरलं आहे. काही तरी निसटते आहे. काय आहे ते?

विकार जडलेल्या मनापलीकडचा माणूस!

शेकडो लोकांच्या विकाराचं निदान एकच असतं, पण तो विकार जडलेला प्रत्येक माणूस समस्येची वेगळी छटा घेऊन येतो. ही छटा त्याच्या रोगापलीकडच्या माणूसपणाची! औषधोपचार होतो, व्याधी आटोक्यात येते, मग उरतो तो माणूस! हा माणूस माझं कुतूहल जागं करतो. रंगीत काचेचा एकच तुकडा कॅलिडिओस्कोपमध्ये टाकून फिरवून बघावा, तसा मला तो विविध कोनातून वेगळा दिसायला लागतो.

मनोरुग्णाची समस्या त्याची एकटय़ाची नसते. उखडलेलं झाड भोवतालची माती घेऊन पडावं तसा तो उन्मळलेला असतो. भोवतालचे आप्तस्वकीय त्याच्या मुळांना चिकटून आलेले असतात. त्याच्या समस्येचा भाग होऊन जातात. या विकाराच्या छायेत त्यांचंही आयुष्य जात असतं. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियाही मला मनोज्ञ वाटतात. त्यांची चिकाटी, त्यांचा आशावाद मला स्तिमित करतो. बरेचदा समस्यांना उत्तरं नसतात. पूर्ण उतारा नसतो. कधी औषधांच्या मर्यादा, कधी परिस्थितीची अगतिकता, कधी व्यक्तिमत्त्वाचे हेकेखोर वेढे. या निरुत्तरी प्रश्नांचा सामना करणारे आप्तही मला विकारापलीकडच्या पडछायेत घेऊन जातात. या सदरातून अशाच काही विकार-विचारांचे पदर उलगडत जाणार आहेत.

गेली चार वर्षे निर्मलाबाई माझ्याकडे नियमाने येत आहेत. त्यांचं वय अंदाजे पंचेचाळीस. किरकोळ प्रकृतीच्या, हडकुळ्या निर्मलाबाई त्यांच्या मुलीसाठी येतात. तिचं वय पंचवीस. तिला छिन्नमानस म्हणजे स्किझोफ्रेनिया आहे. तरुण वयात, चोर पावलांनी या विकाराने मनात प्रवेश केला असेल, तर तो कधी कधी पूर्ण दुरुस्त होत नाही. त्यात आनुवंशिकता असेल तर तो मूळ व्यक्तिमत्त्वालाही चिकटतो. आधीच अबोल स्वभावाचा रुग्ण असेल तर तो अधिक निष्क्रिय होऊन जातो. निर्मलाबाईंची मुलगी अशीच. ती कधी आक्रमक नव्हती, पण औषधोपचाराला सहकार्य करणारीही नव्हती. त्यामुळे सुरुवातीला एक-दोनदाच काय ती आली, नंतर पुढील चार वर्षे निर्मलाबाईच एकटय़ा येत आहेत. पोरीची कूर्मगतीने चाललेली प्रगती सांगतात. ती आता शांत आहे. गोळ्या घेते. दिवसभर एकटीच राहते. चार वर्षांपूर्वी निर्मलाबाईंच्या भाषेत ‘चौदावीला’ होती तेव्हापासून मनाशी पुटपुटायला लागली, संशय घ्यायला लागली, तिची झोप उडाली. तिला गोळ्या जेवणातून द्याव्या लागल्या. सत्तर टक्के लक्षणं लवकर संपले, मात्र आता विझून गेल्यासारखी झाली आहे. गोळ्या दिवसातून फक्त एकदा घेते, म्हणून मी सगळा डोज रात्रीच देतो.

पोरीचं प्रगतीपुस्तक दोन-चार वाक्यात आटोपते, मात्र निर्मलाबाई काहीतरी बोलण्यासाठी घुटमळत असतात. माझा किती वेळ खावा याचं त्यांना तारतम्य आहे, त्यामुळे त्या संभ्रमात दिसतात. व्यवस्थित नेटकी नेसलेली पांढरी धुवट साडी, तिला निळी किनार, चोपून बांधलेले विरळ केस, पाटाखालची घरगुती इस्तरी केलेला असावा तसा थोडा सुरकुतला पण गोरा चेहरा, नजरेत भरणारं कोरं कपाळ. ‘दोन पोरं झाली अन् काही दिवसांतच नवरा वारला. तोही मेंटलच होता काय की,’ त्या अलिप्तपणे सांगतात. कारण संसाराची पहिली चार-पाच वर्षे सोडली तर त्यांचं आयुष्य संसारासाठी राबण्यातच गेलं आहे. सासरा नव्हता. सासू कजाग होती, पण तीही लेकापाठोपाठ वारली. पदरी दोन पोरं. निर्मलाबाई कमिशनरांच्या घरी स्वयंपाकाला होत्या. हा कनवाळू अधिकारी. त्यानं निर्मलाबाईंना बेघर योजनेअंतर्गत दोन खोल्या मिळवून दिल्या. आपल्यासोबतच अजून चार घरी कामं लावून दिली. पुढे निवृत्त झाले तरी निर्मलाबाईंना वाऱ्यावर सोडलं नाही. अतिशय कर्तव्यदक्ष असेलला हा अधिकारी माझ्या परिचयाचा होता. त्यानेच निर्मलाबाईंना मुलीच्या उपचारासाठी माझ्याकडे पाठवलं होतं. ‘साहेबांचे उपकार म्हणून मी दोन घास खाते आहे, पोरीचा उपचार करते आहे,’ त्या मला दर वेळी न चुकता सांगतात.

मात्र आताशा दरवेळी पोरीच्या गोळ्या लिहून घेतल्यावर त्या घुटमळतात. एकच गोष्ट बोलतात, ‘मोठा पोरगा तिरसटच आहे. त्याला माझ्याकडे, बहिणीकडे बघायला वेळ नाही. त्याचं लग्न करून दिलं, तसं सुनेनं सांगितलं, ‘मला या हापमॅड नणंदेबरोबर राहायचं नाही. माझ्या लेकरांवर त्याचा परिणाम होईल, वेगळं घर करा!’ पोरानं बायकोची री ओढली, अन् वेगळा झाला. तो रिक्षा चालवतो, स्वत:पुरता कमावतो. माझ्याकडे फिरकतही नाही. आता आम्ही मायलेकी दोघीच एकमेकांना. पण डॉक्टर.. त्या आवंढा गिळतात, ‘मी आहे, हातपाय चालताहेत तोवर ठीक आहे. माझ्यानंतर हिचं कसं होणार हो?’

थोडा वेळ मी त्यांच्याकडे पाहात राहतो. उत्तर माझ्याही जवळ नाही. जबाबदारीच्या ओझ्यानं ही पन्नाशीची बाई आत्ताच सत्तरीला पोचली आहे. मनानं, शरीरानंही.

‘पोरीची जात! पोरगा असता तर कुठेही फिरून काहीतरी कमावलं असतं. भीक मागितली असती. एकटी पोरगी, तीही अशी मेंटल, कशी जगेल माझ्या माघारी?’

माझ्या जिवाचा सूक्ष्म थरकाप होतो.

प्रिस्क्रिप्शन लिहून थांबलेली माझी लेखणी आता, फाशीचा निकाल लिहिणाऱ्या न्यायाधीशाच्या लेखणीसारखी मोडून गेली आहे. काय उत्तर देणार मी. निर्मलाबाई मात्र स्वत:च एका उत्तराशी चाळा करतात,

‘तिचं लग्न करून दिलं तर?’

मी त्यांना वारंवार समजावलं आहे,

पोरीचं लग्न कराल तर नवऱ्याला तिच्या आजाराची, रोज गोळी देण्याची पूर्ण कल्पना देऊनच करा. नाहीतर गोळ्या बंद पडतील, तिचा आजार पुन्हा सुरू होईल आणि ती पुन्हा तुमच्या पदरात येऊन पडेल. लग्नाचा खर्च वाया जाईल.

‘असा नवरा कुठे मिळणार डॉक्टर?’

त्यांचा हा प्रश्नही मला निरुत्तर करतो. असा नरपुंगव मिळणं कठीण. आधीच कष्टकऱ्याला धडधाकट बायको लागते. ती आजारी पडली तर माहेरी आणून टाकली जाते, तिथे हिचा निभाव कसा लागेल?

काही वेळ शांततेत जातो. ‘निघेल हो काही तरी मार्ग, नवीन औषध निघतील, तुम्ही कुठे इतक्या लवकर..’ मी जुजबी समजूत घालतो. त्या थोडय़ा सैल होतात. जातात. मी निर्मलाबाईंचे प्रश्न मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो.

मात्र महिन्याभरात त्या माझ्यासमोर पुन्हा उभ्या राहतात, त्यांच्या अनाथ प्रश्नांसकट. हे प्रश्न मला टाळताही येत नाहीत, स्वीकारताही येत नाहीत. पुन्हा तीच चर्चा घडते. त्यांची व्यथा त्या बोलून दाखवतात. ‘माझ्या माघारी मुलीचं कसं होणार?’ मी दरवेळी नवनवीन तोडगे शोधण्याचा प्रयत्न करतो, ‘भावाची माया जागेल, तो देईल लक्ष, कमिशनरसाहेब काही मदत करतील, तुम्ही कुठे एवढय़ात..’ कुजक्या शेंगदाण्यासारखे माझे शब्द तोंडात घोळायला लागतात. माझी पोकळ बडबड मलाच ऐकवेनाशी होते. पण निर्मलाबाई उत्साहाने उठतात. जाताना त्यांचा चेहरा सैल झालेला असतो.

हळूहळू मला जाणवायला लागतं, निर्मलाबाईंच्या प्रश्नांना उत्तरं नसतील, पण प्रश्नांची चर्चा करण्यातच तिचा निचरा आहे. त्या कुणाहीजवळ न मांडता येणारी व्यथा माझ्याजवळ मांडतात, त्या समस्येची संभाव्य उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रश्न मांडण्याची भावनिक भूक आहे. माझ्याजवळ बोलून दाखवण्याची भूक आहे. त्यांची व्यथा कुणाला तरी ऐकवण्याची भूक आहे. माझ्या उत्तरांच्या जंत्रीची नाही, सहानुभूतीची भूक आहे.

मला एक शेर आठवायला लागतो,

‘समझ सके तो समझ जिंदगी की उलझन को,

सवाल उतने नही है, जवाब जितने है!’

निर्मलाबाई शांतपणे थोडा वेळ माझ्यासमोर बसतात. प्रश्न सांगून संपलेले असतात. मी थातुरमातुर उत्तरांनी त्यांच्या समस्यांची बोळवण करू इच्छित नाही. फक्त मधल्या शांततेत त्या समस्या भिजवतो. त्यांची तीव्रता कमी होते. त्या उठतात.

‘स्किझोफ्रेनिया’ या निदानापलीकडे खूप मोठं आयुष्य आ वासून पडलंय याची मला जाणीव होते. ती जाणीव मला निर्मलाबाईंनी करून दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनोमन आभार मानतो. माणूस उत्तरांनीच नाही, प्रश्नांनीही समृद्ध होतो, हे मला समजलं आहे.

डॉ. नंदू मुलमुले – nandu1957@yahoo.co.in