05 July 2020

News Flash

पालकत्वाचे सार्वत्रिक आव्हान

माझ्या मुलीची तक्रार असते की तिला झोप येत नाही.

स्थळ इंग्लंड

‘‘माझ्या मुलीची तक्रार असते की तिला झोप येत नाही. केव्हातरी मी तिच्या खोलीवरून रात्री ११ च्या सुमारास जाते तेव्हा दाराच्या सापटीतून दिव्याचा उजेड दिसत असतो. अपरिहार्यपणे मी तिच्या खोलीत डोकावलेच तर मला दिसते की ती तिच्या लॅपटॉपसह बेडवर बैठक मारून बसलेली आहे. लॅपटॉपच्या पडद्यावरील निळाई तिच्या चेहऱ्यावर उजळून आलेली असते.’’ एक आई सांगत होती. ‘‘तू एखादे पुस्तक वाचायला हवे,’’ मी तिला सांगितलं तर ती डोळे फिरवते. ‘‘मी रग्गड पुस्तके वाचली आहेत’’, ती सांगते. ‘‘जणूकाही तिच्या सध्याच्या परिस्थितीशी तिने वाचलेल्या पुस्तकांशी काही संबंध असावा. खरोखरच तिने रग्गड पुस्तके वाचली आहेत आणि हे सारे मीच तिला शिकवले आहे. ‘वाचनामुळे चांगली झोप येते. तो लॅपटॉप मात्र तुला जागे ठेवतो.’ मी तिला सांगते खरी पण लॅपटॉपशी असलेला माझा संबंध तसा बेताचाच आहे. कधी कधी मला वाटते की लॅपटॉपने आमच्या आयुष्याची सूत्रे कधीचीच ताब्यात घेतली आहेत.’’ ‘‘लॅपटॉप हाच आता तिच्या आयुष्याचा होकायंत्र झाला आहे. मला जाणवायला लागलय की लॅपटॉप मला निकालात काढणार आहे. त्याबद्दल तिला बोललं तर ती नापसंती व्यक्त करते. एका क्षणात थर्मामीटर मधील पाऱ्यासारखा तिचा पारा चढतो. सोळा वर्षांच्या माझ्या मुलीचा पारा बहुतेक नेहमीच चढलेला असतो. खरे तर मला अलीकडे जाणवतोय आमच्यातील वाढता विसंवाद. आपल्या ओळखीच्या हस्ताक्षरातील मजकूर आपल्याला वाचता येऊ  नये असे काहीसे आमच्या नात्याचे झाले आहे. तिला जे हवे आहे असे मला वाटते त्यापेक्षा तिला प्रत्यक्षात हवे असते ते वेगळेच असते. कदाचित ते तसेच पहिल्यापासून असेल, पण मला हे सांगण्यासाठी तिला मोठं व्हायला लागलं आहे.’’

तर एक आई सांगते, ‘‘कधी कधी मी माझ्यातच दंग असताना अचानकपणे ती बाजूला येऊन उभी राहते व म्हणते, ‘‘माझ्याकडे बघ जरा.’’ बहुतेक वेळा मला वाटतं की मी तिच्यावर जबरदस्ती करते आहे. पाहुण्यांवर खाण्याची जबरदस्ती करणाऱ्या आग्रही गृहस्वामिनीसारखी. मला तिच्यावर जबरदस्ती करायची नाहीये, कसलाही आग्रह करायचा नाहीये. मला ज्याची अपेक्षा आहे त्यावर पाणी फिरले तरीही. पालकत्व म्हणजे जणूकाही जबरदस्ती, आग्रह, स्पष्टीकरण, आवेशपूर्ण भाषण वगैरे वगैरेची निर्थक मालिकाच आहे असे मला वाटायला लागले आहे. या सगळ्यांमध्ये माझाच आवाज जास्त घुमतो आहे असं मला जाणवतं आहे. तुम्ही जेव्हा आवेशाने बोलत असता तेव्हा तुम्हाला काहीही ऐकायला येत नसते. तुम्ही जेव्हा आग्रही असता, तेव्हा नवीन काही शिकण्याची संधी तुम्ही गमावून बसता. हेही लक्षात आलय माझ्या.’’ तर आणखी एक आई आपल्या पौंगडावस्थेतील मुलींबद्दल सांगते, ‘‘जेव्हा माझ्या दोन्ही मुली तेरा वर्षांच्या झाल्या तेव्हा माझ्या आजपर्यंतच्या पालकत्वाच्या अनुभवापलीकडचे आगळेवेगळे काही घडायला लागले. हे सारे भयानक असेल याबाबतचा इशाराही इतरांनी मला दिला होता. माझ्या दोन्ही मुलींची वये काय आहेत असे लोक विचारीत तेव्हा माझ्या उत्तराने त्यांचाच चेहरा गोरामोरा होऊन जायचा. ‘गरीब बिचारी’, ते म्हणत. ‘शुभेच्छा’, ‘काळजी करू नकोस, हे सारे पार पडेल आणि अखेर त्या तुझ्याकडे परत येतील.’.. त्यांचे उगाचच सल्ले मला मिळत.’’

माझ्या परिचितांच्या वर्तुळात मग एकेक गोष्टी उकलत गेल्या.. आरडाओरड, आक्रस्ताळेपणा, दरवाजे आपटणे, अपशब्दांचा वापर, परीक्षेतील अपयश, गुप्तता, अप्रामाणिकपणा यांच्याबरोबरीने आहारातील असंतुलन, आत्मक्लेश, लैंगिक बाबतीतील अकाली प्रौढत्व आणि औदासीन्य. प्रत्येक घरात कमी अधिक पद्धतीने या किंवा अशा घटना घडत होत्याच.

‘‘किती गोड होती माझी मुले’’, माझे एक मित्र त्यांच्या मुलांबद्दल सांगत होते. ‘‘नक्की काय झाले मला माहीत नाही. हे सारे एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे.’’ दुसरे एक मित्र म्हणाले, ‘‘ते माझा तिरस्कार करतात असच वाटतं. मी त्यांच्या खोलीत शिरलो की ते चेहरा पाडतात. मी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची बोलायची इच्छा नसते. ’’

‘‘पौगंडावस्था ही घटस्फोटाशी मिळतीजुळती असते’’, माझा एक मित्र सांगतो. ‘‘जीवनाकडे बघण्याचे दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन घटस्फोटाच्या धक्कादायक निर्णयामागे असतात. पौगंडावस्था येईपर्यंत कौटुंबिक कथेची सारी सूत्रे सर्वसाधारणपणे पालकांच्या हातात असतात. या मुलांमुळे या कथेत रंजकता आणि चैतन्य येत असले तरी अखेर ही मुले या कथेचा केवळ एक विषय असतात, यातील ‘पात्रे’ असतात.’’ पण ही ‘कठपुतळीची’ कथा जास्त लांबवणे शहाणपणाचे नसते. मोठय़ा विश्वासाने जपलेला हा मौल्यवान डोलारा केव्हातरी कोलमोडतोच. अतिबोलबाल झालेल्या कादंबरीचे एखादा समीक्षक थंड डोक्याने कठोर विश्लेषण करून तिच्या चिंधडय़ा उडवतो तसच काहीसं ही मुले करतात आणि या कथेची सूत्रे आपल्या ताब्यात घेतात. यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांला जबाबदार कोण? कथेची सूत्रे आपल्याच हातात ठेवण्याचा अट्टहास करणारे पालक की ही सूत्रे ओरबाडून घेणारी मुलं? यांचे उत्तर कोणाकडेच नाही.

एक आई म्हणते, ‘‘माझ्या मुली त्यांच्या मैत्रिणींच्या कथा सांगतात. त्यातील एक आई तिच्या एकुलत्या एक मुलीच्या सुरक्षेबाबत टोकाची आग्रही आहे. ती तिच्या मुलीला एकटी तर सोडाच पण मैत्रिणींबरोबरही कुठेच जाऊ देत नाही. याउलट दुसरी आई इतकी बेफिकीर आहे की तिची मुलगी ड्रग्जच्या आहारी गेली आहे याचा तिला पत्ताच नाही. आणखी एका आईची कथा वेगळीच आहे. नीतिमत्ता, शिक्षण, व्यक्तिगत जीवन या तिन्हींबाबत थोडी जरी कुचराई झाली तरी कठोर शिक्षा करणारी ही आई आहे.’’

आणखी एक आई म्हणते, ‘‘माझ्या मुलीच्या मैत्रिणी त्यांच्या आयांबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या मनातील संताप उसळून येतो. हा संताप कशाचा असतो तर गरज नसतानाही त्यांच्या गोष्टीत लक्ष घालण्याचा!’’

मग आईने किंवा पालकांनी नक्की काय करायचे? जबाबदार पालकत्व म्हणजे काय? दुर्लक्ष करायचे नाही आणि अतिलक्षही द्यायचे नाही. ‘डोळ्याखाली’ सतत ठेवायचे नाही आणि ‘डोळ्याआड’ही करायचे नाही. पण या सीमारेषा ठरवणार कशा? आणि मुख्य म्हणजे ठरवणार कोण?

स्थळ अमेरिका –

‘‘मुलांचे सारे काही ठीक दिसत नाहीये. पौगंडावस्थेतील ही मुले चिंताग्रस्त, उदासीन, गोंधळलेली, कोणत्यातरी दडपणाखाली असलेली वाटतात.’’

‘‘या क्षेत्रातील तज्ज्ञ या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी धडपड करीत आहेत. या मुलांचे काय चालले आहे? परीक्षेत चांगली श्रेणी मिळवण्याचे दडपण त्यांच्यावर आहे का? की भविष्याची चिंता आहे? की नातेसंबंधांची? की या सगळ्याच गोष्टींची?’’ एक गोंधळलेली आई सांगत असतानाच दुसरी आई तिचा अनुभव सांगते, ‘‘माझ्या मुलीचे सारे काही छान चालू होते. तिचे आमच्यावर प्रेम होते. आम्हाला तिने काही मदत मागितली तर आम्ही नक्कीच तिच्या पाठीशी उभे राहू याची खात्रीही तिला होती. पण बहुधा आमच्या चेहऱ्यावरील चिंता ती सहन करू शकली नाही. उंच टाचांचे बूट घालून माउंट एव्हरेस्ट चढून जाण्यास तिला भाग पाडण्यात येत आहे, असं तिला वाटत असावं.’’ यातूनच येते का आत्मपीडा? आत्मक्लेश करून घेण्याची सवय? आत्महत्येला प्रवृत्त करणारी मानसिकता?’’

दुसरी एक आई म्हणते, ‘‘आजची पौगंडावस्थेतील मुले खूपच हळवी झाली आहेत. कशामुळे यांचा पापड मोडेल काही सांगता येत नाही. ही मुले अतिसंवेदनशील झाली आहेत. गोंधळून गेलेली आहेत.’’ खरं तर पालकही गोंधळलेले आहेत.

विचार करायला गेलं तर वाटतं, हे सारे अतिलाडामुळे होतय का? सारे काही सहजपणे उपलब्ध होतय म्हणून होते आहे का? बहुधा नाही. या मुलांच्या यातना, वेदना जरा जवळून अभ्यासल्या, आस्थापूर्वक समजून घेतल्या तर जाणवतं की हे सारं वेगळं आहे, अलीकडचं आहे. या मुलांच्या पालकांना या अनुभवातून जावं लागलेलं नाही. विशेषत: २०१२ नंतर ९ वी व १० वीत शिकणाऱ्या मुलांच्या चिंता आणि उदासीनतेत वाढ झालेली दिसते आहे. आणि हे सर्वदूर आहे, शहरी भागात, उपनगरांत आणि ग्रामीण भागातही. कुटुंबाला आर्थिक ताणातून जावं लागत असेल तर त्याचे बिकट परिणाम मुलांवर होतात. याबाबतच्या काही अभ्यासातून असं दिसलं आहे की याचे परिणाम मुलींवर जास्त होतात.

या मुलांचं याविषयावर वेगळच मत आहे. ते म्हणतात, ‘‘आमची पिढी बहुधा पहिलीच असेल जिला आपल्या समस्या, आपले प्रश्न टाळता येणार नाहीयेत. आम्हालाच त्यांना सामोरे जावे लागणारे आहे.’’ ‘‘आम्ही छोटय़ा ज्वालामुखीसारखे आहोत. सारखे कोणत्यातरी दडपणाखाली असलेले आणि केव्हाही स्फोट होईल असे. आमचे फोन, आमचे घरच्यांशी व बाहेरच्यांशी असलेले भावबंध आणि भोवतालची परिस्थिती.. यामुळे हे दडपण वाढतच चालले आहे.’’

पौगंडावस्थेतील या मुलांचे भावविश्व त्यांच्या फोनच्या स्क्रीनशी किती सीमित झाले आहे हे अनेक प्रौढांच्या ध्यानातच येत नाही. भोवतालचे प्रखर वास्तव आणि फोनच्या स्क्रीनवरील आभासी जग यांच्यातील ठळक सीमारेषा कधीचीच पुसट झाली आहे. ‘हायपरकनेक्टेडनेस’मुळे आजची मुले ‘ओव्हरएक्सपोज’ झाली आहेत. मोबाइलवर सहजपणे उपलब्ध होणाऱ्या विविध अ‍ॅप्समुळे आजच्या मुलांपुढे भोवतालचे जग थोडे जास्तच उघडेवाघडे झाले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणी आत्महत्या केली तरी हे आजच्या मुलांना त्यांच्या पालकांच्याही आधीच कळते.

मोबाइलमुळे आलेली तांत्रिक व सामाजिक क्रांती गेली १५ वर्षे आपण अनुभवत आहोत. यापूर्वी या मुलांची आई या मुलांना घरातल्या (एकमेव) फोनपासून दूर राहा व टी.व्ही. बंद कर, असे सांगत असे. आणि आता? आता हे सारे आणि त्याहीपलीकडचे त्या मुलांच्या हातात आहे (दुनिया मुठ्ठी में!) ही मुलेच आता ‘ड्रायिव्हग सीटवर’ बसली आहेत. यांना कोण आणि कसे नियंत्रित करणार?

आजचे बरेच पालकही मुलांच्या वर्तनाचीच नक्कल करताहेत असे दिसते. विशेषत: ज्या पद्धतीने मोबाइलचा वापर होतो आहे ते अचंबित करणारं आहे. मोबाइलवर बोलत असताना भोवतालच्यांकडे दुर्लक्ष करणे, जेवताना मोबाइलवरील कॉल स्वीकारणं हे अगदी नेहमीचं झाले आहे. हे तंत्रज्ञान आपल्याजवळ आता आहे पण ते वापरण्याचे काही नियम ठरवून घेऊ या’ असे कोणीच म्हणत नाहीये.

सगळा दोष तंत्रज्ञानाला देऊन चालणार नाही. हातोडय़ाचा उपयोग एखादी मूर्ती घडवण्यासाठीही  करता येतो आणि एखाद्याचे डोके फोडण्यासाठीही करता येतो. यातले काय निवडायचे हे आपणच ठरवायला हवे.

स्थळ भारत –

‘‘संवादच नाही तर सुसंवाद कुठला?’’

‘‘ब्ल्यू व्हेलच्या प्रभावाखालील युवकांच्या समस्या -आणखी एक आत्महत्या’’

‘‘मोबाइलचा वापर नियंत्रित करता येईल?’’

एका बाजूला ही शीर्षके आणि दुसऱ्या बाजूला भावुक करणाऱ्या काव्यपंक्ती!

‘‘अशी कशी लेक, देवा माझ्या पोटी येते

नावसुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते’’

‘‘घर आने पर दौड कर जो पास आये,

उसे कहते है बिटिया’’

ही शीर्षके दाहक वास्तवाचे भान देणारी आणि या काव्यपंक्ती मनातील तगमग व्यक्त करणाऱ्या आहेत. दोन्हीही प्रामाणिक व अस्सल. पण यातील विसंगतीचं, विरोधाभासाचं काय करायचं? ‘इतने पास’ आणि तरीही ‘इतने दूर’ यातील संगती कशी लावायची? पालकत्व म्हणजे विसंगतीचं प्रारूप असतं का? सगुण निर्गुणाचा निवाडा लागत नाही, गुंता सुटत नाही तसेच पालकत्वाचंही असते का?

इंग्लंड असो अमेरिका असो किंवा भारत. तिथे राहिल्यानंतर पालकांशी बोलल्यानंतर तसेच तिथल्या वृत्तपत्रातून व नियतकालिकातून पालकांनी व्यक्त केलेले हे सगळे विचार, मते ती सगळीच प्रातिनिधिक आहेत, असा माझा दावा नाही. पण सर्वदूर पालकांचे भागदेय समान आहे एवढं मात्र निश्चित.

हर्षवर्धन कडेपूरकर

harsh.kadepurkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2017 5:14 am

Web Title: generation gap between parents and children
Next Stories
1 ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना
2 इन्शुलिनचा रंजक इतिहास
3 सहनशीलता, सहिष्णुता आणि लवचीकता!
Just Now!
X