|| अ‍ॅड्. बळवंत रानडे

आजी-आजोबा आणि नातवंडं याचं नातं खूपच मायेचं आणि जवळकीचच असतं. आम्ही आजी-आजोबा आपल्या नातवांची जबाबदारी नैसर्गिकपणे स्वत:हूनच घेतच असतो. ते ओझं आहे, असं आम्हाला कधी वाटतही नाही. नातवंडांवर चांगले संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, चुका दाखवून देणं, पालन-पोषणात मदत करणं यात आजी-आजोबा म्हणून आम्हाला आनंदच होत असतोच.

28-Year-Old Ayodhya Biker Dies In Fatal Collision With Nilgai Crossing Road
निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!
mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

पूर्वी तर प्रत्येक घर हे एकत्र कुटुंब असायचं. आई-वडील, आजी-आजोबा आणि त्यांची नातवंडं, अशी अनेक कुटुंबं एका घरात राहायची. त्यामुळे एकत्रपणाचा संस्कार फार पूर्वीपासूनच सगळ्यांवर झालाय. त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम वाटणं आणि अडीअडचणीला धावून जाणं हे आजी-आजोबांमध्ये आपसूक असतंच तसं आमच्यातही आहेच. पण काळ बदलला तसं अनेक गोष्टी बदलल्या आणि आजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळायलाच हवं, अशी जबरदस्तीची मागणी न्यायालयापर्यंत गेली. अर्थात न्यायालयाने ते मान्य केलं नाही तरीही या नातेसंबंधांमध्ये कायदा येऊ शकतो, ही जाणीवच भीतीदायक आहे.

प्रत्येक आजी-आजोबाचं नातवंडांशी नातं खूपच वेगळ्या पातळीवरचं असतं. जे नातं कदाचित आमच्या मुलांबरोबर असणाऱ्या नात्यापेक्षा खूप वेगळं. म्हणूनच एक-दोन दिवस जरी काही कामासाठी आम्हाला बाहेरगावी जावं लागलं तरी नातवंडांची आठवण बेचैन करते. पंचतारांकित हॉटेलमध्ये जरी आम्हाला राहण्याची सोय केली तरी नातवंडांची उणीव आम्हाला बोचत राहील, अशी आमची मानसिकता आहे. अर्थात आजही आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक म्हणून कुटुंबात आम्हाला स्थान असतं. कोणताही निर्णय घेताना घरातील सर्वाच्या सोयीचा विचार केला जातो. त्यामुळे कुटुंबपण जपलं जातंय.

भारतीय कुटुंबामध्ये नातवंडं संभाळण्यासाठी एक खात्रीशीर उपाय म्हणूनच आजी-आजोबांकडे फार पूर्वीपासूनच पहिलं जात आहे. वृद्ध आजी-आजोबा म्हणून आम्ही ही जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. अन्यथा उतारवयात वेळ कसा घालवावा हा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. प्रसंगी आमची हौसमौजदेखील आम्ही स्वत:हून सोडून देतो. ज्यांना आजी-आजोबांचा सहवास मिळतो तेथील मुलांची प्रगती होते, असं एका पाहणीत आढळून आलं आहे. मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आणि निरपेक्ष प्रेम आमच्याकडून नातवंडांना मिळतं. पालक त्यांच्या करिअरमध्ये व्यग्र असल्याने मुलं आमच्या सहवासात राहिल्याने घरातील लहानसहान कामं करण्यात मुलांना आनंद मिळतो. एकमेकांना मदत करण्याची सवय होते. नात्यातील गोडवा, स्नेह, आपुलकी, प्रेमळ गप्पा यांतून त्यांचं भावविश्व समृद्ध होत जातं. लहान मुलांमध्ये स्वयंशिस्त आणि स्वावलंबीपणा येतो. मात्र वेगाने लयास चाललेली एकत्र कुटुंब पद्धती नातवंडांच्या विकासाला मारक ठरत आहे.

हल्ली पैशाला फार महत्त्व आलं आहे. पैशांच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट घेऊ शकतो, असं अनेकांना वाटू लागलं आहे. परंतु प्रेम, माया, आपलेपणा, संस्कार हे असे पैशाने विकत मिळत नाहीत. त्यासाठी आमच्यासारखे आजी-आजोबा सदैव मदतीला हवेत. ज्या नशीबवान कुटुंबाना ते मिळाले आहेत त्यांनी त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा. आम्हीही आयुष्यभर धावपळ केलेली आहेच. नोकरी-व्यवसाय करताना अनेक चढउतार सहन केले आहेत. शक्यतो त्याचे चटके मुलांना बसणार नाही याची काळजी घेतली आहे. म्हणूनच आता आम्हालाही वाटतं, आम्हाला थोडी मोकळीक हवीच. नातवंडं आमचीच आहेत, त्यांना सांभाळणं आमची जबाबदारी आहेच, पण जेव्हा ती सक्ती होते तेव्हा मात्र ती कुणालाच आवडत नाही. न्यायालयात गेलेल्या त्या प्रकरणातही बहुधा तसच झालं असावं. आयुष्याचा उत्तरार्ध मजेत, आनंदात मुख्य म्हणजे समाधानात जावा हीच आम्हा आजी-आजोबांची इच्छा असते. थोडे पैसे गाठीशी असतात, अपूर्ण इच्छा पूर्ण कराव्याशा वाटतात. अशा वेळी नातवंडांचं कारण सांगून थांबवलं गेलं की मग थोडं वाईट वाटतच ना. पण अनेकदा तेही आम्ही बाजूला ठेवतो. जरा वेगळं उदाहरण पण तो प्रसंग आठवतोय, त्या घरातल्या आजी-आजोबांची वडिलांबरोबर सारखी भांडणं होत होती. घरातील कामावरून आजी आणि आई यांच्यातही सारखी कुरबुर सुरू होती. नातवंडं हे सर्व दररोज पाहत होती, पण त्यावर कोणताच मार्ग त्यांच्याकडे नव्हता. शेवटी दररोजच्या या भांडणाला कंटाळून आई-वडीलांनी आजी-आजोबांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. आजी-आजोबा वृद्धाश्रमात जाण्यासाठी घरातून बाहेर आले.. त्यांना नेणारी रिक्षाही आली.. पण नातवंडांनी आजी-आजोबांना गराडा घातला. ‘आजी तू जाऊ नको,’ म्हणून रडत रडतच लहानगी आजीला बिलगली. वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय नातवंडांच्या प्रेमाखातर मागे घेतला गेला. मुलगा आणि सुनेशी जमवून घेण्याचा निश्चय केला गेला हे सर्व नातवंडांच्या सहवासासाठीच  आमची नातवंडामध्ये अशी भावनात्मक गुंतवणूक असल्यामुळेच हे शक्य होतं. याचा विचारदेखील होणं गरजेचं आहे.

दुसऱ्या कुटुंबातही असाच पेचाचा प्रश्न उभा राहिला. त्या आजी-आजोबांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा आणि सून नोकरी करतात करण आजच्या महागाईच्या जमान्यात दोघांनीही नोकरी केल्याखेरीज संसार चालणार कसा? आजी-आजोबा आणि नातवंडांचं मेतकूट छान जमलं होतं. नातवंडं आजी-आजोबांशिवाय एक दिवसदेखील कोठेही राहत नाहीत. दरम्यान दुसऱ्या मुलाला परदेशात नोकरी मिळाली आणि त्याची तीव्र इच्छा होती की आई-बाबांनी माझ्याबरोबर परदेशात यावं. त्यांनाही वाटतं जावं परदेशी, पण मग या नातवंडांकडे पाहणार कोण? शेवटी त्यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली. हे सर्व भारतीय कुटुंबामध्येच होऊ  शकतं. आम्हाला ही जबाबदारी नको, अशी भूमिका जर त्यांनी घेतली असती तर कुटुंबं टिकू शकलं नसतं.

आमची नातवंडांबरोबर अशी भावनिक गुंतवणूक असतेच. आम्हाला जबाबदारीतून मुक्त करण्याचा निकाल न्यायालयाने जरी दिला असला तरीदेखील आमची मानसिकता ते स्वातंत्र्य स्वीकारू देत नाही. मात्र प्रेमाला सक्ती नको, थोडय़ा तडजोडी तर प्रत्येकानेच करायला हव्यात. नातवंडांसाठी.. शेवटी त्यांच्यावरच तर ‘उद्या’ अवलंबून असतो.

balwant.ranade@gmail.com

chaturang@expressindia.com