26 November 2020

News Flash

पुदिना

पदार्थाची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो

स्वयंपाकातील बनवलेल्या पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो. पुदिना हा मूळचा युरोपातील असून नंतर तो चीन व जपानमध्ये प्रसिद्ध झाला व त्याच काळात भारतामध्येही तो वापरला जाऊ लागला. भारतात पुदिना सर्वत्र उगवतो. पुदिन्याची पाने ही आकाराने तुळशीच्या पानांप्रमाणे परंतु जास्त गर्द हिरवी, लहान व लंबगोल असतात. या रोपांना एक विशिष्ट गंध असतो. पुदिन्याला संस्कृतमध्ये पुलिहा, इंग्रजीत फिल्डिमट तर शास्त्रीय भाषेमध्ये मेन्था पिपरिता म्हणतात. तो लॅबियाटी या कुळातील आहे.

औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात व कफ दोषहारक व कृमीनाशक आहे. तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शिअम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते. त्याचबरोबर प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ या सर्व गुणांनी परिपूर्ण असलेला पुदिना आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम आहे. असे म्हणतात की, ज्याच्या घरामध्ये कायम पुदिन्याचा वास आहे त्याच्या घरामध्ये सर्दी-खोकला हे आजार वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. त्याचे औषधी गुणधर्म नक्कीच शरीराला लाभदायक आहेत. म्हणून प्रत्येकाने घराघरातून तुळशीप्रमाणेच पुदिना लावला पाहिजे.

उपयोग
० पुदिना हा दीपक, पाचक असल्याने तो अपचन, आम्लपित्त, उलटी, मळमळ या विकारांवर उपयुक्त आहे. सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा पुदिना रस घेतल्याने पचन क्रिया सुधारून वरील विकार दूर होतात.
० पुदिना कृमीनाशक असल्याने लहान मुलांना जंत झाले असतील तर त्यांना १ चमचा दोन वेळा पुदिना रस द्यावा.
० पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळी पुदिन्याचा रस १ चमचा आणि आल्याचा रस १ चमचा घेऊन त्यात चिमूटभर िहग व संधव घालून ते प्यावे. याने पोटदुखी निश्चितच थांबते.
० भूक मंद झाली असेल व पोटात गुबारा धरला असेल तर अशा वेळी पुदिना, तुळशी, आले, जिरे, मिरे, आवळा यांचा काढा करून तो प्यावा. यामुळे पचनशक्ती सुधारून भूक चांगली लागते व आतडय़ांची हालचाल वाढून पोटातील गॅस कमी होतो.
० सर्दी-खोकला व ताप यांचा त्रास जाणवत असेल तर त्या वेळी पुदिना, तुळस व आले यांच्यापासून बनविलेला काढा कपभर प्यावा. या काढय़ाने त्वरित ताप कमी होऊन आराम मिळतो. तसेच सर्दीमुळे नाक चोंदले असेल तर अशा वेळी २ थेंब पुदिन्याचा रस नाकामध्ये टाकल्यास सर्दीपासून आराम मिळतो.
० पुदिन्यामध्ये अ, क व ई जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी पुदिन्याचा वापर करावा.
० डोळ्यांचे विकार तसेच रातांधळेपणा या विकारावर पुदिन्याचा वापर नियमित करावा. यामध्ये असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे विकार कमी होतात.
० त्वचाविकारांवर पुदिन्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. खरूज, नायटा या विकारांवर पुदिन्याचा रस त्वचेवर चोळावा तसेच १-१ चमचा पुदिना रस सकाळ- संध्याकाळ घ्यावा.
० मुखदरुगधी नाहीशी करण्यासाठी तसेच हिरडय़ा बळकट करून दंतक्षय थांबवण्यासाठी ताजी पुदिन्याची पाने रोज सकाळी चावावीत. यामुळे दात किडत नाहीत तसेच जिभेवरील पांढरा थर कमी होऊन तोंड स्वच्छ व सुगंधी राहते.
० चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या, पांढरे डाग व चेहऱ्याची त्वचा कोरडी झाली असेल तर हे विकार कमी करण्यासाठी पुदिन्याचा रस, लोणी (ताजे) व मध एकत्र करून चेहऱ्याला मालिश करावे.
० बाळंतिणीला जर अतिरिक्त दुधाचा त्रास होत असेल तर दूध कमी करण्यासाठी तिच्या आहारात पुदिन्याचा वापर करावा. पुदिन्यामुळे काही प्रमाणात दुधाचे शोषण होते.
० आरोग्य चांगले राखण्यासाठी घरातील गृहिणीने पुदिन्यापासून बनविलेले वेगवेगळे पदार्थ कल्पकतेने स्वयंपाकघरात वापरावेत. भाजी, आमटी करताना तसेच रुचकर चटणी करताना पुदिन्याचा वापर जरूर करावा, त्यामुळे भोजनाचा स्वाद वाढतो व घेतलेले भोजन व्यवस्थित पचते. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मामुळे आरोग्य चांगले राहते.
० हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात, आमवात हे विकार दूर करण्यासाठी आवळा, पुदिना, तुळस यांच्यापासून बनवलेला काढा नियमित प्यावा. यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारून शरीरातील विषद्रव्ये लघवी व शौचावाटे बाहेर फेकली जातात व वरील आजार आटोक्यात राहतात.
० पुदिन्याचा वापर वर्षभर करता यावा यासाठी पुदिना सुकवून त्याचे सूक्ष्म चूर्ण बनवून आहारामध्ये वापरावे.

डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com
(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:05 am

Web Title: health benefits of mint
टॅग Chaturang,Cooking
Next Stories
1 खेडी स्मार्ट कधी होणार?
2 ग्रामीण आरोग्याची ‘आशा’
3 आहारवेद- पावटा
Just Now!
X