डॉ. अरुण गद्रे आणि डॉ. संकलेचा यांनी लेखात व्यक्त केलेल्या काही मतांबद्दल थोडे दुमत असल्याकारणाने व एक स्त्री-रोगतज्ज्ञ या नात्याने काही विचार व्यक्त करावेसे वाटतात. आधुनिक वैद्यकाची मी तज्ज्ञ असल्याने आयुर्वेदावर बोलण्याचा, लिहिण्याचा मला अधिकार नाही.
आमच्या आधुनिक शास्त्राला गर्भारपणी बदलणाऱ्या खाण्याच्या आवडीचे, ज्याला डोहाळे म्हणतो त्याचे कारण अजिबात सांगता येत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होणारी, बाळंतपण होईपर्यंत आधार देणारी संप्रेरके सारखीच असतात. मग प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी लक्षणे, वेगवेगळ्या आवडी का दिसून येतात? प्रत्येक बाबतीत शास्त्राने लावलेले निकष सिद्ध करता येतीलच, कारणमीमांसा देता येईलच असे होत नाही.
गर्भसंस्कार हा कुठलाही विधी नाही. ही कुठलीही पूजा नाही. हा कुठलाही क्लास नाही. गर्भसंस्कार म्हणजे गरोदर स्त्रीच्या अवतीभोवती तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानी तिच्या सर्वागीण शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक आरोग्याची काळजी व पर्यायाने गर्भाच्या निकोप व चांगल्या वाढीसाठी स्वास्थ्यपूर्ण वातावरणाची निर्मिती करणे. गर्भसंस्कार ही २४ तास घडणारी प्रक्रिया आहे. डॉक्टरांनी काही फोल उदाहरणांमधून गर्भसंस्काराच्या विषयाला केवळ बाजारात विकली गेलेली वस्तू या स्वरूपात दर्शवले आहे.
‘घंटाळी मित्र मंडळ’ या योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत गरोदर स्त्रियांसाठी ‘योगांकुर’ हा प्रकल्प गेली ९ वष्रे राबविण्यात येतो आहे. हजारो मुली आज या वर्गाच्या लाभार्थी आहेत. या साधनेचे शास्त्रीय निष्कर्ष कलर डॉपलर सोनोग्राफीद्वारे घेण्यात आले. ते जागतिक स्त्री-रोगतज्ज्ञ परिषदेमध्ये स्वीकारले गेले व मांडले गेले, यावर आधारित संशोधन आंतरराष्ट्रीय वैद्यक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याची डॉक्टरांना माहिती नसावी.
बाळाच्या मानसिक व भावनिकदृष्टय़ा निकोप वाढीसाठी आई व वडील यांना विचाराचा एक संस्कार देण्यात चुकीचे काय आहे? कदाचित या संपूर्ण वैचारिक प्रकियेतून प्रगल्भ पालक म्हणून बाळाच्या पुढच्या संगोपनात फायदा होणे नाकारता येईल का? ज्या डॉ कलामांचे उदाहरण डॉक्टर देतात, त्यांना डॉक्टर कलामांची पाश्र्वभूमी माहीत नसावी. अत्यंत उच्च विचारांच्या आध्यात्मिक वातावरणात
डॉ. कलामांचा जन्म झाला. पुढे याच विचारांच्या घट्ट पायावर डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्त्वाची आध्यात्मिक जडणघडण झाली. याचाच अर्थ गर्भावर होणाऱ्या संस्कारांचे, विचारांचे आरोपण कदाचित पुरावा देण्याइतपत दाखविता येईलच असे नाही, पण याचा अर्थ ते नाकारता येणार नाहीत. जन्माला येणारे बाळ फक्त रक्तामांसाचा गोळा असतो, असे डॉक्टरांना म्हणायचे असेल, तर जन्मत: होणारी भुकेची व दूध पिण्याची संवेदना कुठून निर्माण होते? मेलिनेशन पूर्ण झाले नसतानाही उचलून घेतल्यावर गप्प होण्याची नैसíगक प्रेरणा कुठून येते? गर्भारपणीच गर्भाच्या नाळेतील रक्त तपासणीसाठी काढताना ताणाशी संबंधित संप्रेरकांची रक्तातील पातळी खूप वाढलेली आढळते. याचाच अर्थ गर्भाला भावना, दु:ख जाणविते.
डॉक्टरांचा पुढचा आक्षेप मंत्रसाधनेवर आहे. या विषयावर बोलण्या अथवा लिहिण्यासाठी या विषयासंबंधी डॉक्टरांनी अधिक खोल वाचन करायला हवे असे वाटते. मंत्राची व्याख्या आहे ‘मननात् त्रायते इति मंत्र:’ भरकटणाऱ्या मनाला संरक्षण देणारी सुंदर साधना म्हणजे मंत्रसाधना. आईचे मन शांत झाले, स्थिर झाले, तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही?
डॉक्टरांच्या मते भावना व विचार यांचा गर्भावर परिणाम होत नाही. एका आधुनिक शोधनिबंधानुसार मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, स्थूलता या सर्वाची कारणमीमांसा गर्भावस्थेतील वातावरणावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. आईवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम सूक्ष्म स्तरावर बाळावर होतो असे आधुनिक शास्त्र मानते.
ताणयुक्त परिस्थितीमुळे वारंवार गर्भपात होऊ शकतो. Antidepressan औषधांमुळे ९० टक्के वारंवार गर्भपात होणाऱ्या स्त्रियांना मदत करता येते हे सिद्ध झाले आहे. आज आधुनिक वैद्यकात रिकरन्ट प्रेग्नसी लॉसला निश्चित उत्तर नाही. अत्यंत ताणामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. रक्तदाब वाढू शकतो. वेळेआधी प्रसूती होऊ शकते. गर्भारपणी ताणाला सामोरे जाणाऱ्या बाळांना आपल्या पुढील आयुष्यात वागणूक व भावनिक प्रश्न वयाच्या चार वर्षांनंतर दिसू लागतात, असे संशोधन सांगते. या ताणाचा परिणाम मुलांच्या Hypothalamus pituitary – adrenal axis वर होतो हे संशोधन सांगते.
मंत्रसाधनेचा या सर्वावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून फायदा होतो किंवा नाही हे सिद्ध करणे अवघड असले तरी अशक्य नाही. मंत्रसाधनेने बाळाकडील रक्तपुरवठा वाढतो, foetal middle cerebral artery मधील रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो (कदाचित बाळ शांत होते) असे दिसून आले आहे. मंत्रसाधना म्हणजे sound energy किंवा ध्वनिशक्ती आहे. ती गर्भजलातून प्रवास करणारच असे नसेल तर गर्भाच्या स्वास्थ्याची तपासणी आपण सोनोग्राफी, VAST या ध्वनिशक्तीवर आधारित उपकरणांद्वारे केलीच नसती.
कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही. त्याला पूर्णत्वही आहे आणि मर्यादाही. गभरेपनिषदासारखे उपनिषद गोरक्षनाथांचे सिद्धसिद्धांत पद्धती गर्भाच्या वाढीचे टप्पे उत्कृष्ट रीतीने विशद करतात. इतके छान, की आधुनिक सोनोग्राफीचे तंत्र त्या काळात अस्तित्वात असावे असे वाटते. या साऱ्या वाङ्मयाचा आधुनिक पिढीसाठी सुज्ञपणे वापर व्हावा असे वाटते. शेवटी वाईट प्रवृत्ती कुठल्याही क्षेत्रात नकळत प्रवेश करतात. याचा अर्थ ते क्षेत्र वाईट आहे, तिथे जाणारा रस्ताच चुकला आहे, असे दाखविणे म्हणजे चांगल्या विचारसरणीचा अपमान आहे. ल्ल
– डॉ. उल्का नातू, स्त्री-रोगतज्ज्ञ