होलिस्टिक मेडिसिन हा शब्द अलीकडे आपण बरेचदा ऐकतो. उपलब्ध असलेल्या विविध उपचार पद्धतींचा यथायोग्य उपयोग करून रुग्णाला शक्यतो पूर्ण व्याधिमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे होलिस्टिक मेडिसिन. यामध्ये अलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, समुपदेशन, योगोपचार, निसर्गोपचार, अ‍ॅक्युपंक्चर, आहारशास्त्र, फिजिओथेरपी अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. अमुक उपचार श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नसतं तर विशिष्ट रुग्णासाठी काय जास्त उपयुक्त ठरेल हे बघणं महत्त्वाचं असतं. यासाठी रुग्णाची शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी इत्यादी अनेक स्तरांचा अभ्यास करून उपचारांची दिशा ठरवली जाते. थोडक्यात, याला इंग्लिशमध्ये टेलरमेड किंवा डिझायनर उपचार म्हणता येईल.

उदाहरणार्थ सर्वसामान्य अशा अर्धशिशी ऊर्फ मायग्रेनचा विचार करू. या आजाराचं निदान केलं, औषध दिलं, डोकेदुखी थांबली, विषय संपला, असं होत नाही. कशामुळे सुरू होते डोकेदुखी? हा प्रश्न राहतोच. सविस्तर माहिती मिळवावी लागते. रुग्णाला स्वत:चाच अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, ज्यात डोकेदुखीचे ट्रिगर्स त्यानं हुडकून काढायचे आहेत. त्यावरून त्या रुग्णाला अनेक प्रकारच्या सूचना दिल्या जातात. वेळेवर जेवलं पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे. अ‍ॅसिडिटी टाळावी म्हणजे पित्त वाढेल असं वागू नका. फास्ट फूड टाळा. पोट भरल्याबरोबर उन्हात जायचं नाही. कामाचा ताण घेऊ नका. त्यासाठी योगाभ्यास, मेडिटेशन, कला, छंद वगैरे जोपासा. व्यसनापासून दूर राहा. जनरल फिटनेस चांगला ठेवा. त्यासाठी नियमित व्यायाम. बऱ्याच रुग्णांना मसाजमुळे बरं वाटतं, तर करू देत मसाज. या शक्यता विचारात घेऊन डॉक्टर जेव्हा उपचार करतात, त्याला होलिस्टिक म्हणता येईल. यात काय काय आलं? युक्ताहारविहार आला, ताणतणावाचं  समायोजन आलं, मसाज आला, काऊन्सेलिंग तर आलंच आलं आणि हे सगळं योग्य औषधोपचारांनी रुग्णाला आराम मिळाल्यावरच. म्हणजे एका आजारावर बहात्तर उपाय अशी स्थिती असू शकते. अट एवढीच, की उपचार शास्त्रशुद्ध असावेत. प्रयोगांती सिद्ध झालेले असावेत. यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? उपचारांचा केंद्रबिंदू रोग नसून रोग झालेली व्यक्ती म्हणजे रुग्ण आहे.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
balenciaga bracelet looks exactly like a roll of tape internet shocked with price
लक्झरी ब्रँडने लाँच केले चिकटपट्टीसारखे दिसणारे ब्रेसलेट; किंमत जाणून तुम्हीही व्हाल अवाक्!
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

होलिस्टिक मेडिसिनची काही एक तात्त्विक बैठक आहे. ती अशी- प्रत्येक माणसामध्ये स्वत:ला बरं करण्याची ताकद असते. मात्र आजाराच्या मुळापर्यंत जायला हवं. नाही तर ती वरवरची मलमपट्टी ठरते. दुसरी गोष्ट, रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं आरोग्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. मधुमेह, रक्तदाब यांच्या उपचारात आम्ही रुग्णाला सामील करून घेतो. इथे डॉक्टरची भूमिका जास्त शिक्षक, समुपदेशक अशी असते, डॉक्टरांनीसुद्धा हुकूमशहा बनून चालत नाही. माझं ऐकलंच पाहिजे हा दुराग्रह नको. रुग्णाशी वागताना जास्त सहिष्णु, समजूतदार असलं पाहिजे. जेवढं रुग्ण आपल्याकडून शिकत असतात तेवढंच आपणही रुग्णांकडून शिकत असतो अशी भूमिका डॉक्टरांनी ठेवली तर बहुतांशी यश मिळतं.

एकदा एक रुग्ण आला माझ्याकडे. अनेक वर्षांचा डायबेटिक. रिपोर्ट्स पाहिले, उत्तम होते. रुग्ण मात्र समाधानी नव्हता. ‘‘ही नवीन गोळी बंद करा डॉक्टर, मी नाही घेणारे ती.’’ तो निग्रहानं म्हणाला. म्हटलं, ‘‘काहो, रिपोर्ट तर इतका चांगला आहे. एचबीएवनसीसुद्धा किती नॉर्मल आलंय बऱ्याच महिन्यांनी.’’ (मधुमेहाची तीन महिन्यांची चाचणी) यावर त्यानं दिलेलं उत्तर मला बरंच काही शिकवून गेलं. म्हणाला, ‘‘माझ्या जीवनाचा उद्देश ती टेस्ट नॉर्मल असणं हा नाहीये. मला चांगलं जगायचंय. या गोळीनं माझं अन्नपचन पूर्ण बिघडलंय, तुम्ही कितीही आग्रह धरला तरी मी ऐकणार नाही.’’ या ठिकाणी त्यानं मला शिकवलं की डॉक्टरला समाधानकारक वाटलेल्या रिपोर्ट इतकंच रुग्णाला स्वत:ला चांगलं वाटणं हेही महत्त्वाचं आहे.

भारतात होलिस्टिक मेडिसिनची अनेक केंद्रं कार्यरत आहेत. विशेषत: केरळमध्ये आयुर्वेदिक औषधं आणि मसाज, हिमाचलमध्ये तिबेटी मेडिसिन, मॅग्नेट उपचार, गुजरातमध्ये सुजोक पद्धत, निसर्गोपचार असे असंख्य प्रकार यात आहेत. हजारो डॉक्टर्स आणि त्याच्या कित्येकपट रुग्ण अशा उपचारांकडे आकृष्ट होत आहेत. पण तरीही होलिस्टिक उपचार अजून मेनस्ट्रीम किंवा लोकमान्य उपचार नाही. असं का? याचं कारण ‘होलिस्टिक’चा नीटसा अर्थ लावला गेला नाही. त्याविषयी अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा यथायोग्य समन्वय कुठेच केला जात नाहीये. विशेषत: अशा केंद्रांची जाहिरात ‘औषधोपचारातून कायमची सुटका’ अशी दिशाभूल करणारी असते, हे बरोबर नाही. होलिस्टिक उपचार म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं विकसित झालेल्या अलोपॅथिक उपचारांना राम राम ठोकायचा असं नाही. किंवा ज्याला कोणतंही प्रमाण नाही, ज्यांची कोणतीही मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अशी शिक्षणपद्धती नाही आणि ज्यांना अकाउंटबिलिटी नाही, असे उपचार बिनधास्त करून घ्यावेत असंही नाही. जुनाट आजारांनी गांजलेल्या रुग्णांना खोटय़ा शास्त्रीय (स्यूडो सायंटिफिक) गप्पा मारून फसवणाऱ्या भोंदू डॉक्टरांनी ही एक चांगली उपचारपद्धती बदनाम केली आहे.

मला वाटतं, होलिस्टिकला (समग्र) अल्टेरनेटिव्ह (पर्यायी) म्हटल्यानं हा गोंधळ झालाय. चांगल्या शास्त्रीय उपचार पद्धती ‘म्युचुअली एस्क्लुझिव्ह’ का असाव्यात? अलोपॅथिक डॉक्टरांनी जसं इतर ‘पाथीज’ना कमी दर्जाचं समजायचं कारण नाही तसं ‘अल्टर्नेटिव्ह लोकांनीही अलोपॅथीला तुच्छ समजू नये. औषधोपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियादी उपचार यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषबाधा झालेला, अपघातात जखमी झालेला, दम्याचा उद्रेक झालेला, हार्ट अटॅक आलेला अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्येच उपचार केले पाहिजेत ना?

अर्थात रोगलक्षणांवर आधारित पण एकारलेले उपचार अशा तातडीच्या, तात्कालिक दुखण्यांवर उपयोगी पडतात खरे, परंतु जशी आयुर्मर्यादा वाढते तशी तात्कालिक आजारांची जागा जुन्या-बऱ्या न होणाऱ्या आजारांनी घेतलीय, जिथे कोणा एका उपचार पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही, तर उपचारांचा समन्वय करावा लागतो.

मात्र माझा आक्षेप आहे ‘बेटावर’ राहण्याला. एखाद्या तीव्र मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या घरापासून, ताणतणावा पासून दूर अतिशय प्रमाणित वातावरण असलेल्या केंद्रात नेऊन ठेवलं, मोजकंच (खूप कमी उष्मांक असलेलं) जेवण, व्यायाम अशा गोष्टी करून घेतल्या तर त्याचं वजन कमी होईल, रक्तातली साखर भराभरा खाली येईल आणि औषधं जवळजवळ लागणारच नाहीत हे उघडच आहे. पण हे सगळं किती दिवस चालू ठेवणार? रुग्ण त्याच्या रोजच्या कामात व्यग्र असतानासुद्धा अशी जीवनशैली त्याच्या दैनंदिन कार्यक्रमात अंतर्भूत करायला त्याला शिकवलं तरच त्याचा दीर्घकालीन परिणाम दिसेल.

आता होलिझम या शब्दाबद्दल बोलू. ‘होलॉस’ (म्हणजे संपूर्ण) या ग्रीक शब्दापासून तो तयार झाला आहे. या शब्दातूनच समग्रता व्यक्त होते. १९२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेते जॉन ख्रिश्चन स्मट्स यांनी आपल्या ‘होलिझमिंड इव्होल्यूशन’ या पुस्तकात होलिझम हा शब्द प्रथम प्रस्तुत केला. विषयाचं सम्यक ज्ञान होण्यासाठी त्याचा संपूर्णपणे सर्व बाजूंनी अभ्यास केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. नाही तर चार आंधळे आणि एक हत्ती या गोष्टीसारखं व्हायचं. ‘होल इज मोअर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स’ हा विचार यामागे आहे. एक मस्तक, हातपाय, आणि धड यांची बेरीज केली तर माणूस तयार होईल का? त्याच्यात मन, बुद्धी, आत्मा आणि चैतन्य ओतलं तरच त्याला पूर्णत्व येईल, त्याचा माणूस होईल. यालाच होलिझम म्हणतात. माणूसच नव्हे तर त्याचं कुटुंब, समाज, देश, त्याचं जग, नव्हे, हे संपूर्ण ब्रह्मांड इथपर्यंत तो विचार येऊन भिडतो.

पण आताचा जमाना रिडक्शनिस्ट होत चाललाय. स्पेशालिस्ट लोक प्रत्येक विषयाचे छोटे तुकडे पाडून आपापली नीश म्हणजे कोनाडा हुडकायच्या मागे आहेत. त्या कोनाडय़ाचा तो तज्ज्ञ. त्याची दृष्टीच मग संकुचित होऊन जाते. यालाच टनेल व्हिजन म्हणतात. गरज आहे ती रुग्णाला एक माणूस म्हणून ओळखायची. त्याला समग्रपणे पाहायची. त्याचं शारीरिक दुखणं बघताना त्याची मानसिकता, सामाजिक-सांस्कृतिक पातळी या गोष्टी लक्षात घेऊन केलेले उपचार जास्त यशस्वी होतात.

हिप्पोक्रेटिसची परंपरासुद्धा हे मानतेच की परिपूर्ण आरोग्यासाठी आपली मानसिकता, शरीराचं पोषण, जीवनशैली, शरीर-मन-आत्मा यांचा संबंध, आपलं पर्यावरण आणि व्यक्ती व समाज यांचा परस्परसंबंध हे सगळंच महत्त्वाचं आहे.

या सर्व तात्त्विक चर्चेतून सामान्य वाचकांनी काय लक्षात घ्यावं? होलिस्टिक मेडिसिन ही चळवळ मेन स्ट्रीम मेडिसिनला शह देण्यासाठी नाही किंवा रुग्णाला त्याच्या आजारासाठी जबाबदार ठरवून दुर्लक्ष करण्यासाठी नाही. तिचा समजून वापर केला तर तिच्यासारखी उपचार पद्धती नाही.

डॉ. लिली जोशी

drlilyjoshi@gmail.com