21 November 2017

News Flash

शाळेचा डबा विरुद्ध उपहारगृह?

नेत्रतज्ज्ञ स्नेहल ठाकरे यांचं मत आहे की, ‘‘मुलांना नेहमी दुसऱ्याच्या डब्यातला पदार्थ आवडतो

कांचन बापट | Updated: May 20, 2017 2:35 AM

घरचं जेवण विशेषत: काही भाज्या मुलांना आवडत नाहीत कारण त्यांना लहानपणापासून ते खायची सवय लावलेली नसते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

मुलांचा शाळेचा डबा आणि आईची व्यग्रता हा एक वेगळा विषय समोर आला आहे. मुलांनी पौष्टिक खावं ही प्रत्येक आईची इच्छा असते, पण रोज ते सांभाळता येतंच असं नाही. मग वेगवेगळे सँडवीच करून देणं, चपातीचे रोल करून देणं, रात्रीचं शिल्लक जेवण देणं असे पर्यायही वापरले जातात. शाळेतल्या उपहारगृहातून जंक फूड हद्दपार व्हायलाच हवं, पण मुलांना लहानपणापासून आपणच त्याची सवय लावलेली असते त्यावर उपाय काय?

अलीकडेच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘शाळांमध्ये जंक फूड विक्रीवर आली बंदी’ किंवा ‘शाळांमधील कँटीनमध्ये जंक फूड बंद’ या आणि अशाच बातम्यांनी शाळांमध्ये खूप दिवस चर्चा रंगली. गेल्या १३ – १४ वर्षांपासून ‘शाळेचा डबा’ या विषयाशी जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे अनेक जणींशी या विषयावर बोलणं झालं तेव्हा या बातमीचं महत्त्व प्रकर्षांने जाणवलं. का वाढलंय शालेय मुलांच्या आयुष्यात कँटीन अर्थात उपहारगृहाचं महत्त्व? घरचं अन्न मुलांसाठी देणं आईला, पालकांना जमत नाही, का मुलांनाच ते नको असतं? डबा नेण्यापेक्षा उपहारगृहांमध्ये खाणं मुलांनाच आवडतंय का?

सध्या चाळिशी-पन्नाशीत वा त्याही आधीच्या पिढीत असलेल्यांच्या शालेय जीवनात डोकावलं तर तेव्हा शाळेतल्या उपहारगृहाचं मुळीच प्रस्थ नव्हतं. जवळजवळ प्रत्येक जण शाळेत येताना डबा घेऊन यायचा. गेल्या १०-१५ वर्षांत मात्र मोठय़ा शहरांमध्ये एखादा डबा नेणं आणि एका वेळेचं शाळेच्या उपहारगृहामध्ये खाणं सुरू झालं. कुठे कुठे तर दोन (किंवा तीन) वेळाही मुलं ‘बाहेरचं’ खायला लागली. शाळांच्या वाढत्या वेळा, घरापासून शाळा दूर असणं, शाळा आणि टय़ूशन क्लास यांच्या वेळा सांभाळणं, पालकांचं दिवसेंदिवस जास्तीत जास्त व्यग्र होत जाणं, जागतिकीकरण आणि त्यातून मुलांना मिळणारे अगणित पर्याय, पाश्चात्त्यांचं अंधानुकरण, पीअरप्रेशर अशा अनेक गोष्टी यामागे असलेल्या दिसतात, पण प्रत्यक्ष पालकांच्या मनात याबद्दल काय विचार आहे? खरं तर आपल्याकडे अजूनही वडील मुलांच्या शाळेच्या डब्यात काय असतं, काय असायला हवं, या विषयात कोणतीच भूमिका घेत नसल्यामुळे (काही अपवाद असतीलच..) वेगवेगळ्या स्तरांतल्या मातांच्या मनातला विचार जाणून घेणे जास्त महत्त्वाचं ठरेल.

त्यांच्याशी बोलल्यावर सध्याची वाढलेली व्यग्रता, वाढलेल्या शाळेच्या आणि कामाच्या वेळा, वेगवेगळी सहज दिसणारी प्रलोभनं, पैशाची उपलब्धता, पीअरप्रेशर हे आणि असेच मुद्दे प्रकर्षांने समोर आले. गेली १२-१४ र्वष ‘टिफीन एक्स्पर्ट’ म्हणून काम करताना मलाही अनेक तऱ्हेचे पालक भेटतात. यामध्ये गरम पदार्थ साध्या अ‍ॅल्युमिनीअमच्या डब्यात घालून देणारी कामगार वर्गातली स्त्री, दर वर्षी महागडय़ा कंपनीचा नवीन डबा घेणारी, पण त्यामध्ये रोजच ब्रेड जॅम, ब्रेड सॉस देणारी डॉक्टर आई, आदल्या दिवशी हॉटेलमधून आणलेलं शिळं चायनीज किंवा बिर्याणी देणारी आई, स्वत:च्या मुलीबरोबर तिच्या मैत्रिणींसाठीही भरपूर ताजे पदार्थ करून देणारी आई या आणि अशा अनेक जणींचा समावेश असतो.

काळ जसा बदलतोय तशी स्त्रियांवर जबाबदारीही वाढत चालली आहे. आज प्रत्येक स्त्री जास्त जास्त व्यग्र होतेय. एकीकडे खूप व्यग्र असलेल्या पण तरी मुलांना व्यवस्थित डबा देण्याची इच्छा असलेल्या मातांचा वर्ग मोठा आहे. दुसरीकडे व्यग्र स्त्री, डबा देण्याची खूपच इच्छा आहे, पण नेमकं ते कसं साध्य करावं, डब्यासाठीचं नियोजन कसं करावं, त्यासाठीच्या वेळेचं नियोजन कसं जमवावं हे न कळणारा आणि त्यातून अधूनमधून डबा तर अधूनमधून उपहारगृहामधलं खाणं घेण्यासाठी मुलांना पैसे देणारा वर्ग आहे. तिसरा गट स्वत:चं बिझी असणं, नसणं काहीही असलं तरी मुलांनी आपण सकाळपासून करून दिलेलं दुपारी खायचं? जाऊ दे खाऊ दे कँटीनमधलं गरम गरम.. आपल्यालाही काही करायची गरज नाही, असा विचार करणारा आहे. तर या गोष्टीचा विचार करायला अजिबात वेळच नाही असा वर्गही आहे. उपहारगृहांमध्ये मिळणारे पदार्थ फारसे पोषक नसणार, आरोग्यदायी नसणार हे सामान्यत: सगळ्यांनीच मान्य केलेलं दिसतं. त्यातही मुलं मुख्यत: जंक फूड खाणार हेही त्यांना माहीत असतं. आपल्या मुलांचं एक वेळचं जेवण असं असण्याला फारसा कुणाचा आक्षेप असलेला दिसून येत नाही. एकूणच ‘बाहेरचं’ खाण्याची संस्कृती वाढल्यामुळे असेल किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे असेल, पण आज सरकारनं उचललेलं शाळांच्या उपहारगृहांमधून जंक फूड हद्दपार करण्याचं पाऊल सगळ्या जागरूक पालकांना आवडलेलं असलं तरी आधीच्या परिस्थितीविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्धार केला गेलेला माझ्या पाहण्यात आलेला नाही. (अपवाद असतीलच). घरच्या खाण्याच्या तुलनेत उपहारगृहातील खाणं महाग असणार यालाही फारसा कुणाचा विरोध दिसत नाही. बहुतेक वाढलेली पैशाची उपलब्धता याला कारणीभूत असावी.

पण मुलांना खाण्यापिण्यासाठी जास्तीचा पॉकेटमनी देण्याची गरजही यामुळे वाढत जाते. शहर जेवढं मोठं, शाळा घरापासून जेवढी लांब, शाळेची वेळ जेवढी जास्त त्या प्रमाणात मुलांचं खाण्यापिण्याचं बजेट वाढत गेलेलं दिसतं. तुलनेनं छोटय़ा शहरात, गावात अंतर कमी, शाळेच्या वेळा कमी असल्यामुळे कँटीनची गरज आणि बजेट असं दोन्ही कमी असलेलं दिसतं.  एमएसईटीसीएलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या मंजूषा दुसाने यांना उपहारगृहामध्ये जंक फूड बंद करण्याच्या निर्णयामुळे खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, ‘‘एक आई म्हणून आपल्या मुलांनी ताजं, घरचं उत्तम अन्न खावं असं वाटतं. पण वरिष्ठ पदावर असलेल्या स्त्रियांकडे उपलब्ध असणारा वेळ पाहता मुलांना घरचं उत्तम अन्न देण्याची इच्छा असूनही ते शक्य होत नाही. शाळेच्या वाढत्या वेळांचंही उत्तम गणित त्यांनी मांडलं. सध्या खूपशा शाळा सकाळी ७.३० किंवा ८ ते दुपारी ३.३० किंवा ४ पर्यंत असतात. ७ ला मुलांना घ्यायला बस येणार म्हणजे त्याच्या अर्धा-पाऊण तास आधीच टिफीन बनवायला लागणार. म्हणजे सकाळी ६.३० ला बनवलेला पदार्थ मुलं साडेबारा किंवा एक वाजता खाणार. मुळात डब्यात फार गरम पदार्थ भरता येत नाही. त्यात ५-६ तास ठेवल्यावर ते गारढोण अन्न मुलांनी खाण्यापेक्षा उपहारगृहामधलं गरमागरम ताजं अन्न मुलांनी खावं. त्यामुळे जंक फूडऐवजी पौष्टिक, स्वच्छ, गरम अन्न त्यांना उपहारगृहामध्ये मिळालं तर उत्तम.’’

आजच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे असलेल्या वेळेच्या कमतरतेबद्दल त्या म्हणतात, ‘‘कार्यालयांमधून संध्याकाळी उशिरा घरी आल्यावर स्वयंपाक, घरातली इतर कामं यांमध्ये जो वेळ जातो तो सोडल्यास मुलांना देण्यासाठी फार थोडा वेळ राहतो. मुलांबरोबर घालवण्याच्या वेळातही टीव्ही, पाहुणे, खरेदी, घरची किंवा ऑफिसची जास्तीची कामं आणखीनच वेळ खातात. सकाळी उठल्यावर मुलांची तयारी करून स्टॉपवर नेऊन सोडायचं असतं. त्यात मुलांची वेगवेगळ्या डब्यांची फर्माइश म्हणजे चिडचिड आणि वेळेच्या नियोजनाची कसरत आलीच. त्यापेक्षा मुलांनी उपहारगृहातलं गरम खाल्लेलं बरं असं वाटतं.’’

सध्या ज्या शाळा एकाच शिफ्टमध्ये चालतात त्यांचा उपहारगृहांमध्ये जेवण्याचा फारसा प्रश्न येत नाही. साधारण १ वेळचा डबा बनवून देणं आई जमवतेच. पण सकाळी साधारण ८ ते ४ एवढा वेळ शाळा असली की कमीत कमी दोन किंवा तीनदा मुलांना खायला लागतं. त्यातली मुख्य जेवणाची वेळ मग बहुतेकदा उपहारगृहांमध्ये भागवली जाते. पण तिथे जर पोषक अन्न मिळणार नसेल तर आई मुलांना डबा नेण्याचा आग्रह करते.. आई डबा करून द्यायला तयार असली तरी कधी कधी मुलांना डबा न्यायचाच नसतो. याबाबत ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट असलेल्या सोनाली देशमुख म्हणतात की, ‘‘घरून डबा न्यायला मुलांना कधी कधी लाज वाटते. ‘अभी भी घरसे टिफीन लाता है..’ असं इतर मुलांनी चिडवल्यामुळे किंवा ‘पिअर प्रेशर’मुळे मुलांना डबा न्यायला नको असतो.’’

पीअर प्रेशर हा सध्याच्या काळातला मुलांच्या सहज वागणुकीतलाही एक महत्त्वाचा मुद्दा झालाय. वर्गात इतर काही कारणांमुळे इतर मुलं जेव्हा डबा न आणता शाळेच्या कँटीनमध्ये खातात तेव्हा सगळ्यांच्या बरोबर राहण्याच्या भावनेनं डबा आणू शकणाऱ्या मुलांनाही डबा नकोसा होऊन उपहारगृहां मध्ये खावंसं वाटतं. बरेचदा घरून डबा आणणं किंवा घरचे पदार्थ खाणं हे ‘गावठी’ समजलं जातं.. आणि ते लोण सगळीकडे पसरत चाललं आहे, अयोग्य असलं तरी..

गृहिणी असलेल्या बकुल देशपांडे यांना वाटतं की प्रत्येक आई डबा जास्तीत जास्त आरोग्यदायी कसा होईल हे बघत असते. त्यामुळे अर्थातच मुलांच्या तब्येतीला हानीकारक ठरणारं जास्तीचं तेल, साखर, मैदा असं साहित्य घरच्या स्वयंपाकात कमीत कमी वापरलं जातं. याउलट उपहारगृहाच्या पदार्थात चव वाढवणारे पण अनिष्ट घटक मोठय़ा प्रमाणावर असू शकतात. अर्थातच त्यामुळे असे चविष्ट पदार्थ मुलांना आवडतात, मुलांना तेच हवे असतात. हे दुर्दैव.’’

स्वत: बनवलेल्या पदार्थाच्या पौष्टिकतेची खात्री एका आईशिवाय कुणीच देऊ शकत नाही. याबाबत सुनीता जहिराबादकर यांना वाटतं की, जंक फूड मुळातच खाऊ नये, पण ते आताच्या काळात टाळता येणं शक्य नाही. अशा वेळी आईच्या देखरेखीखाली कधी कधी खायला हरकत नाही, कारण आई पाकिटावरची माहिती पडताळूनच मुलांना योग्य ते पदार्थ खायला देईल, पण उपहारगृहामध्ये जे सॉस किंवा मसाले वापरतात त्यांच्याबद्दलची खात्री कोणीच देऊ शकणार नाही. उपहारगृहांमध्ये जंक फूड न देण्याच्या निर्णयाबद्दल त्या म्हणतात की, ‘‘आई किंवा आजी जेव्हा जंक फूड खाऊ नका, असं म्हणतात तेव्हा मुलांना ते पटत नाही, पण आता शाळेतच जंक फूड मिळणार नाही. तेव्हा मुलांना ते ऐकावंच लागेल. जेव्हा कोणालाच उपहारगृहांमध्ये जंक फूड मिळणार नाही तेव्हा आपोआपच मुलांना ते मानावंच लागेल.’’

इंजिनीयर असलेल्या, स्वत:चा उद्योग चालवणाऱ्या अपूर्वा दंडगव्हाळ यांना वाटतं की, आई डबा द्यायला तयार असली तरी मुलांना जंक फूड आवडतं आणि त्यामुळे मुलं वारंवार ते मागतात. पिझ्झा, बर्गर यांसारख्या पदार्थाची मुलांना ‘क्रेझ’ वाटण्यामागे दूरचित्रवाणीची मोठी भूमिका असल्याचं म्हणतात.

अजून पालक न झालेल्या पण खाद्याच्या शौकीन असलेल्या आदिती जंबगींनाही वाटतं की, कोणतीच आई मुलांना जाणीवपूर्वक जंक फूड देणार नाही. कधी तरी चवीत बदल म्हणून किंवा तातडीच्या वेळी उपहारगृह हा पर्याय त्यांना योग्य वाटतो. तिथे स्वत: पैसे देऊन पदार्थ विकत घेऊन खाण्यामध्ये मुलांना आपण ‘स्वतंत्र’ झाल्याचा वेगळा आनंद येतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. या मुद्दय़ाशी बकुल देशपांडेही सहमत आहेत. त्या म्हणतात, ‘‘डब्यातला पदार्थ निवडण्यामागे खूपदा आईच असते. तिला जे योग्य वाटतं तेच बहुधा ती मुलांना डब्यातून देते, पण कँटीनमध्ये स्वत:च्या आवडीचा पदार्थ घेऊन खाणं यामध्ये मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मुलांना खूप आवडतो.’’

मुलांनी उपहारगृहामधले पदार्थ घेण्यामागचा एक महत्त्वाचा मुद्दा अपूर्वा दंडगव्हाळ मांडतात. त्या म्हणतात की, ‘‘रेस्टॉरंट किंवा कँटीनमध्ये मिळतात तसे, थोडक्यात मुलांच्या आवडीचे पदार्थ कसे बनवायचे हे बऱ्याच जणींना माहीत नसतं. आईने प्रयत्न केला आणि तो फसला तर मुलं परत उपहारगृहांकडे वळणारच. किंवा आई तू हॉटेलसारखं बनवत नाहीस, असं ही मुलं सांगून मोकळी होतात.’’

इथे मुलांना चांगलं खायला द्यायची आईची इच्छा असते, पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आईला ते शक्य होत नाही. पण वैशाली जोशी मुद्दा मांडतात की, ‘‘बऱ्याच जणींना आजकाल असा स्वयंपाकच करायचा नसतो. म्हणजे वेळ नसतो किंवा स्वयंपाक करणं जमत नाही यापलीकडे जाऊन काही जणींना स्वयंपाकाचा कंटाळा असतो.’’ अगदी आवश्यक असला तरच पूर्ण स्वयंपाक बनवणाऱ्या काही जणी त्यांच्या पाहण्यात आहेत. अर्थात याला पर्याय स्वयंपाकाला बाई असणं हा आहेच. त्यांच्याकडून पौष्टिक अन्न करून घेता येऊ शकतं.

नेत्रतज्ज्ञ स्नेहल ठाकरे यांचं मत आहे की, ‘‘मुलांना नेहमी दुसऱ्याच्या डब्यातला पदार्थ आवडतो.. त्यामुळे त्यांना आपल्या डब्याविषयी नाराजीच असते.’’

या सगळ्यावर उपाय काय करता येईल हे सांगताना अपूर्वा म्हणतात की, ‘‘मुलं, आई असं दोघांनाही आरोग्यपूर्ण खाणं आणि बनवण्याबद्दल प्रशिक्षित करावं. म्हणजे मुलं आपोआपच आरोग्यपूर्ण खाणं खायला लागतील. आईला जर आरोग्यदायी खाणं चविष्ट बनवता आलं तर प्रश्नच येणार नाही.’’

सोनाली देशमुख आणखी एक पर्याय सुचवतात, चार मित्रांच्या आईने एकेक दिवस चौघांचाही डबा द्यावा म्हणजेच प्रत्येकीला चार दिवसांत एकेकदाच डबा बनवावा लागेल. आठवडय़ाचा मेनू ठरवून त्याप्रमाणे डब्याचं नियोजन करणं हाही एक उपाय त्या सांगतात. एकूणच मुलं आणि त्यांचे डबे हा चर्चेचा विषय झालेला आहे हे नक्की.

या उपहारगृहाच्या निमित्ताने दोन मुद्दे नव्याने समोर आले. ते म्हणजे स्वयंपाक करायला आवडतच नसलेल्या, कंटाळा करणाऱ्या स्त्रियांबद्दल कळलं.. अगदी आत्तापर्यंत स्वयंपाकासाठी रोज वेळ मिळत नसलेल्या स्त्रिया होत्या. पण स्वयंपाक करायला आवडतच नसलेल्या स्त्रिया क्वचित का होईना दिसायला लागल्या आहेत.. ही एका मोठय़ा बदलाची सुरुवात आहे का? या मुद्दय़ाच्या उलट म्हणजे अगदी मोठमोठय़ा हुद्दय़ावर काम करणाऱ्या, व्यग्र स्त्रिया कधी नव्हे ते स्वयंपाकामध्ये, वेळेच्या नियोजनामध्ये स्वारस्य दाखवतायत. आपल्या पिल्लांनी व्यवस्थित पोषक, घरचा डबा न्यावा आणि विशेष म्हणजे त्यांना तो आवडावा यासाठी आजची व्यग्र स्त्री तिच्या परीने प्रयत्न करताना दिसते आहे. मुलांचा शाळेचा डबा आणि आईची व्यग्रता हा एक वेगळा विषय यानिमित्ताने समोर आला आहे. मुलांनी पौष्टिक खावं ही प्रत्येक आईची इच्छा असते, पण रोज ते सांभाळता येतं असं होत नाही, असंही या निमित्ताने दिसून आलं. रोज वेगवेगळे सँडवीच करून देणं, (ब्रेडही पांढराच अनेकदा) चपातीचा रोल करून देणं, रात्रीचं शिल्लक जेवण देणं असे पर्याय वापरले जातात. उपहारगृहांमध्ये पौष्टिक अन्न मिळणार असेल तर त्याचं स्वागत करायला हरकत नाही, मात्र ते स्वच्छ, पुरेसं आरोग्यदायी, चविष्ट असेल तर अनेकींची त्यासाठी हरकत असणार नाही, पण याची काळजी कोण घेणार हा प्रश्न आहेच.

जोपर्यंत शाळेत डबा नेला जातोय तोपर्यंत प्रत्येक आईची धावपळ असणारच आहे आणि अनेकदा मुलांची त्यातल्या पदार्थाविषयी नाराजीही असणार आहेच. हे सारं कधीही न थांबणारं.. त्यासाठी  घरातल्या बाबांनाही यात कसे समाविष्ट करुन घेता येईल, हे ही प्रत्येक घराने पाहिले पाहिजे. लहानपणापासूनच मुलांच्या खाण्याच्या सवयी जाणीवपूर्वक बदलल्या पाहिजेत. मुलांना आवडतील असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ त्यांना डब्यातून मिळतील हे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. तर आणि तरच शाळेतल्या उपहारगृहांमध्ये जंक फूड मिळो वा न मिळो त्याने काहीच फरक पडणार नाही.

शाळांमध्ये ‘जंक फूड’वर बंदी!

‘जंक फूड’ खाण्याच्या सवयीमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी शाळांच्या उपाहारगृहांत जंक फूडवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शाळांच्या उपाहारगृहांतून बिस्किटे, चॉकलेट, नूडल्स, पिझ्झा, बर्गर आदी खाद्यपदार्थ हद्दपार होणार आहेत. शाळांच्या उपाहारगृहांत जंक फूड ठेवण्यास व त्यांची विक्री करण्यास प्रतिबंध आणावा, अशी शिफारस हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेच्या एका अभ्यासगटाने केली होती. अशा पदार्थाच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा व अन्य विकारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने हे पदार्थ शाळांच्या उपाहारगृहांत विकले जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व शाळांच्या व्यवस्थापनांची व मुख्याध्यापकांची असेल.  पोषक आहाराचे अधिकाधिक सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम समजावण्याकरिता विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा सल्लाही शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिला आहे. महाविद्यालयांच्या उपाहारगृहांतही अशा पदार्थावर बंदी आणावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविले होते; मात्र, या विद्यार्थ्यांनी स्वत:च स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे शासनाचे मत आहे.

कांचन बापट kanchan0605@gmail.com

First Published on May 20, 2017 2:35 am

Web Title: homemade food and school canteen food