30 October 2020

News Flash

इंटरनेट साक्षरतेकडे..

गर्भारपणात गावच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी प्यावे की पिऊ नये हा प्रश्न तिला सतावत होता

इंटरनेट नावाच्या अदृश्य शक्तीनं ज्ञानाचं एक नवं जग खुलं केलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेले राहिल्यामुळे स्त्रियांना नवनवीन माहिती मिळविण्याबरोबरच इतर अनेक आर्थिक संधीही खुल्या होत आहेत. आधुनिक जगातलं पुढे जाण्याचं हे महत्त्वाचं पाऊल प्रत्येकाने आणि विशेषत: लिंगभेदामुळे ‘इंटरनेट निरक्षर’ राहिलेल्या स्त्रियांनी उचलायलाच हवंय. येणाऱ्या नवीन वर्षांत हा संकल्प आपण नक्कीच करू शकतो. संगणक, इंटरनेट शिका आणि शिकवा.

या वर्षांच्या सुरुवातीला घडलेली ही घटना आहे. गोष्ट आहे बांगलादेशातील एका तेवीस वर्षीय गर्भवती स्त्रीची. गर्भारपणात गावच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी प्यावे की पिऊ नये हा प्रश्न तिला सतावत होता. मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तिनं ‘माया’ या मोबाइल अ‍ॅपची मदत घेतली. हा अ‍ॅप आरोग्य आणि कायदेविषयक कोणत्याही प्रश्नांबाबत मार्गदर्शन करतो. त्या अ‍ॅपवर तिला माहिती मिळाली आणि तिच्या शंकांचं निरसन झालं. आता ती एका निरोगी जिवाला जन्म द्यायला सज्ज झाली आहे..
इंटरनेट ही एक शक्ती आहे..अदृश्य शक्ती. या शक्तीच्या माध्यमातून आज स्त्रियांना आपली आणि इतर स्त्रियांची प्रगती साधणे शक्य झाले आहे. शिक्षण घ्यायचंय-इंटरनेट वापरा, तुमचा शोधनिबंध जगापुढे मांडायचाय-इंटरनेटची मदत घ्या. एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, जगातील सुशिक्षित स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची उत्तम काळजी घेतात, त्या स्वत: आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र व सक्षम असतात, त्यामुळे घरची अर्थव्यवस्थाही उत्तम सांभाळतात. मात्र आज जगातील एकतृतीयांश स्त्रिया निरक्षर आहेत आणि म्हणूनच त्यांना सतत मदतीची, योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. पण आता इंटरनेट नावाच्या अदृश्य शक्तीनं ज्ञानाचं एक नवं जग खुलं केलं आहे. ज्याचा वापर या स्त्रियांनाही होऊ शकतो.
आज विकिपीडिया, ई-बुक्सपासून ते ऑनलाइन शिक्षण देण्यापर्यंत या इंटरनेटनं मजल मारली आहे. सव्‍‌र्हेक्षणात असंही निरीक्षण नोंदवलं गेलंय की स्त्रियांना जर अ‍ॅपवरून माहिती घेण्याची संधी मिळाली तर त्या संधीचा (अ‍ॅपचा) वापर स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक करतात. विकसनशील देशांमधील इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या स्त्रियांपैकी अध्र्याअधिक स्त्रियांनी नोकरीच्या अर्जासाठी इंटरनेटचा वापर केला असल्याचे तर एकतृतीयांश स्त्रिया ऑनलाइन कमाई करत असल्याचे सव्‍‌र्हेक्षणात दिसले आहे.
ज्यांना या माध्यमाची जाण आहे. ज्यांनी हे ज्ञान आत्मसात करून घेतलं आहे त्या स्त्रिया आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करीत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ‘स्मार्ट बिझनेस’ या साइटचा उपयोग अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योजिकांना होतो आहे. भारतातील ‘पेल्ली पुळा जाडा’ हे तीन वर्षांपूर्वी तीन स्त्रियांनी सुरू केलेले ऑनलाइन स्टोअर आज सुमारे दोनशे जणांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन देणे ही गोष्ट केवळ त्या एका स्त्रीसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी उपकारक गोष्ट सिद्ध होते आहे. स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा आणि तंत्रज्ञानाच्या वापरात सक्षम केल्यास मुलांचे आरोग्य आणि त्यांचे पोषण यासाठीही त्याचा ती निश्चितच उपयोग करू शकते. संशोधनात असं दिसून आलंय की ज्या देशांमध्ये रोजगार निर्मिती आणि शिक्षण या बाबतीत पुरुष-स्त्रिया समानता असते त्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वृद्धिंगत होते आणि तेथे बालमृत्यूंचे प्रमाणही कमी राहते.
इंटरनेटने स्त्रियांना ‘आवाज’ तर दिला आहेच, पण तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवलाही आहे. काँगो देशातील यशस्वी स्त्रियांनी त्यांच्या गोष्टी, कथा, अनुभव सांगण्यासाठी त्यांचे स्वत:चे इंटरनेट कॅफे उभारले आहेत. तर युद्धग्रस्त केनियामधील स्त्रियांनी लिंगभेदावर आधारलेल्या समाज रचनेला आणि त्यातून उद्भवणाऱ्या हिंसात्मक प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून पाऊल उचलले आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणि पीडितांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या गटांबरोबर काम करण्यासाठी त्यांनी या इंटरनेट माध्यमाचा प्रभावी वापर करून घेतला. ब्राझिलमध्ये स्त्रियांनी ‘आय विल नॉट शट अप’ नावाचे अ‍ॅप सुरू केले त्यातून स्त्रियांवर होणारे अत्याचार उघड केले गेले आणि त्यायोगे समाजातील नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली गेली.
इंटरनेट स्त्रियांना शिक्षण देणारा, व्यवसाय सुरू करण्याची संधी देणारा, संपर्काचं जाळं विस्तारायची मुभा देणारा आणि त्यांच्या अधिकारांविषयी त्यांना जागृत करणारा मुख्य स्रोत असूनही या महाजालात प्रवेश मिळवताना आजही अनेक बंधने आड येतात किंबहुना तिथेही लिंगभेद केला जातो. जगात आजही सुमारे चार अब्ज लोक इंटरनेटच्या वापरापासून वंचित आहेत. आणि त्यातील बहुसंख्य स्त्रिया आहेत. विकसनशील देशांमध्ये इंटरनेटशी जोडलेल्या पुरुषांच्या तुलनेत २५ टक्के कमी स्त्रिया इंटरनेटशी जोडलेल्या आहेत तर सब-सहारन आफ्रिकेत ते ४५ टक्कय़ांपेक्षा कमी आहे.
इंटरनेटच्या वापरातील ही असमानता प्रगतीच्या वाटेवर असलेल्या एका सुरक्षित, सुंदर आणि सशक्त जगाच्या निर्मिती प्रक्रियेला खीळ घालणारी आहे. जागतिक विकासाची दरी या लिंगभेदामुळे रुंदावत चालली आहे. स्त्रियांच्या मार्गात अडथळा ठरणारी ही भेदाची दरी आपण बुजवून टाकली पाहिजे.. आणि आपण ते करू शकतो.
२०२० सालापर्यंत इंटरनेट वापराची संधी सर्वासाठी खुली करण्याचे वचन संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच दिले आहे. अशासकीय, शासकीय आस्थापना आणि उद्योग-व्यवसाय ही तिन्ही क्षेत्रं त्यासाठी कामाला लागली असून त्यात तंत्रज्ञान क्षेत्र – जसे की गुगल आणि टायटन एरोस्पेस यांनी हा प्रकल्प दुरस्थ समाजापर्यंत पोहचविण्याचे ध्येय ठेवले आहे. स्पेस एक्स-नामक कंपनी इंटरनेट वापराची संधी सर्वदूर पोहचविण्यासाठी उपग्रहाच्या नेटवर्कचे नियोजन करणार आहे..तर फेसबुकचे ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ हे अभियान अ‍ॅप मोफत वापरायला देणार आहे आणि ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ हे संकेतस्थळ तीस देशांतील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मूलभूत वापरासाठी लागणारे इंटरनेट आता मोफत मिळणार असून त्यात बातम्या, शोध, आरोग्यविषयक माहिती या गोष्टी मोफत मिळविता येणार आहेत. हे सगळ्यांसाठी खुलं ठेवण्यात येणार असल्याने कुणीही त्यासाठी आपले योगदान देऊ शकेल.
‘माया’ हे अ‍ॅप आज बांगलादेशातील स्त्रियांसाठी मदतीचा हात आणि माहितीचा स्रोत ठरले असून ते ‘फ्री बेसिक्स’वर उपलब्ध आहे. पालकत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी आतापर्यंत सुमारे ३.४ दशलक्ष (३० कोटी) लोकांनी त्यातील ‘बेबी सेंटर’ लोकांनी वापरले आहे. भारतातही ‘फ्री बेसिक्स’ उपलब्ध होणार असून आरोग्यविषयक माहिती असंख्य वेळा पाहता येणार आहे. कोलंबियाच्या ग्रामीण भागातील लोकसुद्धा या मोफत अ‍ॅपचा उपयोग करून घेत आहेत. तिथे या सुविधेला 1ऊडउ3 या नावाने संबोधले जात असून त्यामार्फत डॉक्टरांशी बोलण्याची संधी लोकांना मिळते आहे. त्यातल्या अनेक जणोंनी त्याचा पहिल्यांदाच त्याचा वापर केला आहे.
‘फ्री बेसिक्स’ सुविधा म्हणजे पूर्ण इंटरनेट नव्हे किंवा ही सुविधा म्हणजे असे कोणतेही ठोस आर्थिक मॉडेल नाही जे तुम्हाला सगळं काही मोफत देण्याची हमी देईल. पण ही सुविधा म्हणजे एक दरी कमी करणारा आणि इंटरनेटला जोडणारा पूल आहे. पन्नास टक्कय़ांपेक्षा अधिक लोकांनी या ‘फ्री बेसिक्स’ चा वापर सुरू केला आणि तीस दिवसांनंतर इंटरनेटच्या पूर्ण वापराचे पैसे भरले. ज्या देशांमध्ये मूलभूत वापरासाठी इंटरनेट मोफत ही सुविधा सुरू झाली आहे त्या देशांमध्ये तर इंटरनेटच्या नव्या ग्राहकांसाठी दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत.
ज्या देशातील लोक आपल्यासाठी आणि आपल्या मुला-बाळांसाठी चांगल्या भविष्याची वाट शोधतात ते देश एकत्र जोडलेले असतात. स्त्रियांना जोडण्यासाठी एकत्र येऊन काम केले तर आपण आत्तापेक्षा अधिक चांगले भविष्य निर्माण करू शकतो एवढा विश्वास मात्र नक्की देता येईल.

(इंडियन एक्स्प्रेसच्या सौजन्याने)
भाषांतर : मनीषा नित्सुरे-जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:59 am

Web Title: how internet education empowering women in today world writes sheryl sandberg
टॅग Facebook
Next Stories
1 जुनं ते सोनं.. नवं ते परीस..
2 होय, मी बंडखोरी केली
3 पुदिना
Just Now!
X