गेल्या कित्येक वर्षांत तुला किती तरी गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. तुझ्याबद्दल मला वाटणाऱ्या. आता लागलीच तुझ्या भारदार कपाळावर आठय़ा पाडून विचार करशील की, ‘झालं, माझ्या चुकांची लिस्ट सुरू केली बयेने.’ नाही रे. निदान आज तरी नाही. आज मनाच्या तळघरात दडवून ठेवलेल्या खास गोष्टी सांगणार आहे मी..

तुला कधी सांगितलं नाही की तू नुसता आहेस, या कल्पनेने किती सुखावून जाते मी. कणखर, स्वतंत्र बाईची भूमिका बाजवताना कित्येकदा घाबरून जाते मी. रडायला येतं मला खूप खूप..  पण अशा स्थितीत तुझा किती आधार वाटतो मला. तू एखादं वाक्य जरी म्हटलंस नं, ‘सगळं ठीक होईल मी आहे’ कीकमालीची आश्वस्त होऊन जाते मी. कितीही कामात असलास तरी माझे अगदी फुटकळ प्रश्न, टेन्शन्स किती संयतपणे समजावून घेतोस.अशा असंख्य गोष्टी आहेत रे, ज्या मी तुला कधी सांगत नाही.

जसं की तू अजिबात रोमँटिक नाहीयेस, अशी मी सतत तक्रार करत असते तुझ्यापाशी. पण तू हातात हात घेतोस ना अगदी काहीही न बोलता, ते खूप आवडतं मला. तू मिठी खूप आश्वस्त करते मला. आणि हो, तुझ्यातला बाबा मला जास्त आवडतो. त्यांना चांगलं आयुष्य देण्यासाठीची तुझी कायम चालू असणारी धडपड पाहिली, कामावरून थकूनभागून येणारा चेहरा पाहिला की गलबलून येतं. कित्येक तडजोडी करतोस तू, आपलं घरटं शाबूत राहावं म्हणून. तुला सांगावंसं वाटतं की किती आभारी आहे मी तुझी की मला कसली झळही लागू देत नाहीस. ज्या पद्धतीने तू स्वत:ला घडवलं आहेस ना ते पाहून मला तुझा खूप अभिमानही वाटतो.

खरं बघता समाज तुला पुरुष म्हणून अजूनही एका चौकटीत बसवू पाहतोय. पुरुष स्त्रीचा सन्मान करणारा हवा, तिला स्वातंत्र्य देणारा हवा, ती लढत असताना तिला बळ देणारा, कधी तिचे डोळे पुसणारा तर कधी चारचौघात तिच्यासाठी लढणारा हवा, मुलींची काळजी घेणारा बाबा हवा आणि त्यांना मोकळीक देणारा मित्रही हवा, मुलाला रडलं म्हणून न हिणवता समजून घेणारा बाबा हवा आणि त्याला पुरुषार्थाचा खरा अर्थ समजावून सांगणारा पुरुषही हवा! किती अपेक्षा असतात आम्हा बायकांच्या पुरुषांकडून! बायकोला स्वयंपाकात मदत करणारा, मुलाबरोबर  मैदानी खेळ खेळणारा, मुलीचा मित्र बनून राहणारा, पोरगी वयात आल्यावर तिच्या मित्रांमुळे मनातून इन्सिक्युअर झालेला पण बाहेरून तसं न दाखवता ‘कुल’ बाबा म्हणून वावरण्याचा प्रयत्न करणारा, बायकोची कामाच्या ठिकाणी होणारी प्रमोशन मनापासून सेलिब्रेट करणारा, बायकोला तिच्या कामात पाठिंबा देणारा, बायको, मुलीने त्यांना हवे तसे कपडे घातल्यानंतर त्यांच्याकडे हपापल्या नजरेने बघणाऱ्या इतर लंपट पुरुषांकडे दुर्लक्ष करायला शिकणारा, तू तर बायकोला घाबरतोस अशा कुजकट कॉमेंट हसत हसत स्वीकारणारा, बायकोचं स्वत्व जपणारा, बायकांवर होणाऱ्या बलात्काराची, छळाची बातमी ऐकून शरमेने मान खाली घालणारा, मुलीशी पाळीपासून ते वयात येतानाच्या शारीरिक बदलांवर चर्चा करणारा, मूल गर्भात न वाढवताही त्याच्यावर जिवापाड प्रेम करू शकणारा, स्वत: वेगळा असूनही बायकांकडून सतत अपराध्याच्या नजरेतून पाहिला जाणारा. जरा कुठे तू सोशिक झालास, संवेदनशील झालास तर तुझ्या पौरुषत्वावर बोट ठेवायला सज्ज असतोच समाज! या सगळ्यामध्ये तू जेव्हा आपल्या बायकोला, मुलीला वा मुलाला एक माणूस म्हणून बघू पाहतो, घडवू पाहतो तेव्हा तूही प्रवाहाविरुद्ध जातोच की! आणि त्याचं मला किती अप्रूप आहे म्हणून सांगू!

प्रेम फक्त बाईलाच करता येतं असा (गोड) गैरसमज कित्येक स्त्रियांना असतो. मला तर नेहमी वाटतं की जर एखादा पुरुष बाईच्या खरंच प्रेमात पडला तर त्याच्यासारखं पॅशनेट, समरसून, जिवापाड प्रेम बाईलाही करता येत नाही. कारण स्त्रीच्या मनात मुळातच खूप कप्पे असतात. अगदी सुरवातीपासून ती आपल्या मनाला, हृदयाला अगदी व्यवस्थित विभागून ठेवायला शिकते. तसं पुरुषांचं नसतं. त्याला कप्पे ठाऊक नसतात. आणि हे केवळ तुझ्यामुळे मला उमगलं. ज्या स्त्रियांना असं वाटतं की सगळ्या पुरुषांना बाईचं फक्त शरीर हवं असतं त्यांना ‘तो’ आजवर गवसलाच नाही, असं मला वाटतं. पुरुषही शरीरापलीकडे जाऊ शकतात. त्यालाही त्याचं मन समजावून घेणारा साथीदार हवाच असतो. पौरुषत्वाचा खरा अर्थ उमगलेला पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो ना तेव्हा तिचं स्त्रीत्व उजळून निघतं. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व उजळून निघालं आहे. जाता जाता माझ्या अत्यंत आवडत्या शायर जोहरा निगाह यांच्या गजलमधले काही शेर प्रत्येकीच्या ‘त्या’च्यासाठी ज्याच्यामुळे ‘तिला’ स्वत:च स्त्रीत्व उमजलं.

नक्क्ष की तरह उभरना भी तुम्ही से सीखा

रफ्ता रफ्ता नजम्र आना भी तुम्ही से सीखा

एखाद्या सुंदर कोरीव नक्षीकामासारखं पटकन डोळ्यांत भरलं जाणं मी तुझ्याकडून शिकले आणि संथगतीने मनाच्या तळापर्यंत पोहोचणं हे देखील मी तुझ्याकडूनच शिकले. इथे त्याला हे सांगू पाहत आहेत की माझं अस्तित्व निर्माण करायला तू मला शिकवलंस आणि संयमित राहून आपलं स्थान कसं निर्माण करायचं हे देखील मी तुझ्याकडूनच शिकले.

तुम से हासिल हुआ इक गहरे समुंदर का सुकून

और हर मौज से लडम्ना भी तुम्ही से सीखा

तुझ्याकडून गवसली एका अथांग समुद्राच्या गाभ्यातली शांतता आणि बेधुंद झालेल्या लाटेशी लढायलाही तूच शिकवलं. फार गहिरा अर्थ दडला आहे यामध्ये. माझ्या आयुष्यात शांतता, गांभीर्य आणि स्थितप्रज्ञताही तुझ्यामुळे मला मिळाली आणि कुठल्याही अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य हे देखील तूच शिकवलंस.

रिश्ता-ए-नाजम् को जाना भी तो तुम से जाना

जामा-ए-फम्खम् पहनना भी तुम्ही से सीखा

माझ्या मनात स्वाभिमानाचं बीज तूच पेरलंस आणि तो स्वाभिमान कसा परिधान करायचा हे देखील तूच शिकवलंस. जेव्हा मी स्वत:ला नगण्य समजत होते तेव्हा तुझ्यामुळे स्वत:ला घडवलं मी आणि माझ्यातला आत्मविश्वास, अभिमान तू जागृत केलास आणि तूच मला शिकवलंस की कुठेही गर्वाचा, अहंकाराचा स्पर्श होऊ  न देता एखाद्या अलंकारासारखा हा स्वाभिमान कसा परिधान करायचा ते.

तू मला जे काही दिलंस त्याचा हिशेब मी मांडूच शकत नाही पण तरीही शेवटी एवढंच सांगते तुला, तू आहेस म्हणून मी आहे!

सानिया भालेराव

saniya.bhalerao@gmail.com

chaturang@expressindia.com