16 December 2017

News Flash

प्रबळ जीवनेच्छा

जगताना कधी सर्वोच्च शिखरावर आणि कधी तळाशी असे आपण असणारच.

अंजली पेंडसे | Updated: June 17, 2017 4:45 AM

जगताना कधी सर्वोच्च शिखरावर आणि कधी तळाशी असे आपण असणारच. कधी मनासारखे, कधी मनाविरुद्ध, कधी छान- कधी वाईट, कधी सुखाचे- कधी दु:खाचे असे प्रसंगापरत्वे प्रत्येकाचेच चालू असते. तेच तर जीवन. जगताना संकटं येऊन, कठीण प्रसंग येऊन आपल्या साऱ्या क्षमतांचा कस लावला जातो. असे कसोटीचे प्रसंग वारंवार आले आणि आपण आपल्या सर्व शक्ती आणि क्षमतांचा वापर त्यातून निभावण्यासाठी करत राहिलो तर या क्षमता आणखी तल्लख होतात. मात्र त्यासाठी जीवनेच्छा प्रबळ हवी..

बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. एक बाबा आपल्या मुलाचा निकाल ऑनलाइन पुन्हा पुन्हा पाहत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. माझ्या मुलाला इतके कमी गुण? कसं शक्य आहे? एकुलता एक मुलगा कुणाल. त्याचे खूप लाड करून वाढवलेला. उत्तम खाणे, उत्तम कपडे, तशीच उत्तम शाळा आणि उत्कृष्ट महाविद्यालय. शहरातला सगळ्यात चांगला क्लास त्याला लावला होता. दहावीत त्याला नव्वद टक्क्यांच्या वर गुण होते. आता बारावीतही तो चांगल्या गुणांनी यशस्वी होईल ही खात्री कुणालाच नव्हे, तर त्याच्या सर्व शिक्षकांना आणि सर्वात जास्त त्याच्या बाबांना होती. दुकानात गर्दी होते म्हणून कालच त्यांनी मलई पेढय़ांची ऑर्डर देऊन ठेवली होती आणि आता हा प्रकाशित पडदा निकाल दाखवत होता- एकाहत्तर टक्के! फक्त एकाहत्तर टक्के. निकाल पाहून कुणाल त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला काय करावं ते सुचतच नव्हतं. एक-दोन पेपर्स त्याला थोडे कठीण गेले होते. पण एवढय़ा कमी गुणांची त्याने कल्पनाही केली नव्हती. आईच्या डोळ्यात पाणीच आलं. मुलगा वाह्य़ात नव्हता. सरळ मार्गी आणि मेहनत करणारा होता. त्यामुळेच इतके कमी गुण कसे काय मिळाले? हे कोडं तिला सुटत नव्हतं. त्यातल्या त्यात तिला निकाल लागण्याच्या आधी घरातल्या सगळ्यांची जेवणं झाली त्याचंच बरं वाटत होतं.

बाबा तर निकाल पाहिल्यापासून एकदम गप्प झाले होते. कुणाशीच काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनात विचारांचा, भावनांचा नुसता कल्लोळ उठला होता. कुणाल चांगला मुलगा होता. उनाड नव्हता. जरी भरपूर लाड होत असले तरी त्याचा अभ्यास तो लहानपणापासूनच गोडीने करत होता. नववीपासून तर अगदी जबाबदारीने नियमितपणे तो अभ्यास करत होता. कुणाल खूप हुशार नसला तरी सरासरीपेक्षा चांगला नक्की होता. दहावीत इतके घवघवीत गुण मिळाल्यावर त्याच्या मेहनतीचं चीज झाल्यागत वाटलं होतं. नातेवाईकांना, घरच्यांना, कार्यालयातील सहकाऱ्यांनाही बाबांनी वेगवेगळ्या पाटर्य़ा दिल्या होत्या. त्यांना मुलाचा खूप अभिमान होता. त्याच्या उज्ज्वल भविष्याची त्यांना खात्रीच होती आणि आता पाठीत खंजीर खुपसावा तसे हे इतके कमी गुण. कुणाल आता काय करेल? कुठल्या कोर्सला त्याला प्रवेश  मिळेल? कोणत्या महाविद्यालयात? लोक आता काय म्हणतील. ‘अरेरे बिचारा’ असं काहीजण म्हणतील. ‘होईल सगळं चांगलं’ किंवा ‘सगळ्यांचाच निकाल कठीण लागला आहे’ असे फोल सांत्वन करतील. मी माझ्या मुलासाठी काय काय स्वप्नं बघितली होती. आता त्यांचा तर चक्काचूर झालाय. असे गुण म्हणजे कुणालला पुढच्या आयुष्यात भरपूर तडजोडी कराव्या लागतील. साधेच सर्वसामान्यांसारखे शिक्षण, साधीशी नोकरी, कमी पैसे, आयुष्य रेटणं- छे! माझा कुणाल हे सगळं कसं करेल? यासाठी का मी त्याला जन्म दिलाय? राग, दु:ख, निराशा, हतबलता या सगळ्या भावनांची आवर्तने एकापाठोपाठ उत्कटतेने येत होती. अचानक बाबा उठले. समोरच्या खुर्चीवर ओढणी पडली होती. ती घेतली. बाथरूममध्ये गेले. दार बंद केले आणि ओढणीने गळफास लावून घेतला. वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी बातमी आली- ‘मुलाचे कमी गुण पाहून वडिलांची गळफास लावून आत्महत्या!’ ज्यांनी ती वाचली ते हळहळले आणि पुढची बातमी वाचू लागले..

वाचक जरी ‘मूव्ह ऑन’ झाले तरी त्या कुटुंबासाठी ती बातमी तिथेच थबकली, काळ थांबावा तशी. एखादा मोठा धोंडा संथ नितळ पाण्यात भिरकावला की त्याचा मोठा आवाज होतो. त्याबरोबर मोठे तुषार वर उडतात. मोठे तरंग उठतात आणि त्यांच्या पुढे छोटे छोटे तरंग येत राहतात. काही काळाने तो धोंडा पचवून पाणी पुन्हा संथ नितळ होतेही, पण काही काळ जावा लागतो!

असेच जगण्याचेही असते. बाबांनी गळफास लावून आत्महत्या केली. लौकिक इहतापातून ते सुटले. पण मग कुणालचे काय? त्याने या संकटकाळी भांबावलेल्या प्रसंगी ज्या हक्काच्या बाबांचा आधार घ्यायचा आणि करिअर सुधारण्यासाठी पुन्हा उभारी घेऊन प्रयत्न करायचे ते बाबाच यापुढे नाहीतच. उपलब्धच नाहीत. त्यांचा मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक पाठिंबाच नाही. ‘माझ्या वाईट निकालामुळे बाबांनी जीव दिला’, हा सल, ही खंत, हे दु:ख त्याला मरेपर्यंत छळत राहणार. आपण गुन्हेगार असल्याचा अपराधी भावही त्याला सतत टोचत राहणार. बाबा कमकुवत मनाचे होते. वाईट निकाल कुणालने मुद्दाम लावला नव्हता. पण मुलाच्या निकालामुळे संसार उद्ध्वस्त झाला यासाठी जर आईने मुलाला जबाबदार धरले तर त्या कुणाल बाळाचे घरच संपले! शिवाय लोक आता त्याला कायमच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार की काय याचीही भयंकर भीती कुणालला वाटू शकते. शिवाय यापुढे पैशांचा स्रोत बंद होणार. मग पुढे कसे काय करायचे हे संकट आईवर आणि कुणालवर असणारच आहे! मग हे सगळे असह्य़ होऊन आता आईने आणि कुणालनेही जीव द्यायचा का?

आपली विवेकबुद्धी ठामपणे सांगते- अजिबात नाही! असा विचारही त्यांनी करू नये! जगताना कधी सर्वोच्च शिखरावर आणि कधी तळाशी असे असणारच. कधी मनासारखे, कधी मनाविरुद्ध, कधी छान- कधी वाईट, कधी सुखाचे- कधी दु:खाचे असे प्रसंगापरत्वे प्रत्येकाचेच चालू असते. तेच तर जीवन. जगताना संकटे येऊन, कठीण प्रसंग येऊन आपल्या साऱ्या क्षमतांचा कस लावला जातो. धैर्याने आणि कणखर मनाने अशा वेळी उत्तर शोधण्याबरोबरच टिकून राहणेही खूप महत्त्वाचे असते. असे कसोटीचे प्रसंग वारंवार आले आणि आपण आपल्या सर्व शक्ती आणि क्षमतांचा वापर त्यातून निभावण्यासाठी करत राहिलो तर या क्षमता आणखी तल्लख होतात. काही कौशल्ये आपण नव्याने शिकतो. कधी भीती वाटली, चिंता वाटली तर त्यावर नियंत्रण आणायला शिकतो. मनातली ‘पुढे चांगले होईल’ ही आशा आणखी प्रबळ करतो. त्यासाठी मन:पूर्वक योग्य दिशेने प्रयत्न करण्याचा निश्चय करतो आणि जिद्दीने तो अमलातही आणतो.

खरं तर या जगात जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही शिकण्यासाठी आणि आहोत त्यापेक्षा अधिक- सर्वार्थाने चांगले होण्यासाठी आपण आलो आहोत हे सदैव लक्षात ठेवायला हवे. त्याचबरोबर आपण कसोटीच्या वेळी पळून जाण्याने प्रश्न सुटत नाही तर इतरांसाठी आणि कधी आपल्यासाठीही आपण नवे प्रश्न नव्या कसोटय़ा निर्माण करतो, याचेही भान ठेवायला हवे. संकटकाळी, आपत्काळी एकमेकांना मदत करण्याने, धीर देण्याने आणि कृतिशील प्रयत्न करण्याने त्या संकटाची व्याप्ती आणि उत्कटता आपण कमी करू शकतो. इथे स्वत:वर आणि इतरांवरही भरवसा हवा. संकटकाळी मन गोंधळले तरी त्याला सावरायला आपला आत्मविश्वास मदत करतो. इतरांचाही आत्मविश्वास वाढायला कारणीभूत होतो. शांतपणे काही वेळ जाऊ दिला तर कोणत्याही मानसिक धक्क्याची आणि दु:ख, क्रोध, नैराश्य, उद्विग्नता यांसारख्या नकारात्मक भावनांची उत्कटता कमी होते. घाबरून बधिर झालेले मन हळूहळू विचार करू लागते. आपला आत्मविश्वास सकारात्मक विचारांना प्रेरणा देतो. नुकसानीचा अंदाज घेत काम केल्याने आपण सावरू, पुन्हा उभारी धरू या दृष्टीने प्रयत्न करू लागतो. हळूहळू आपण पुन्हा प्रगतीच्या वाटेवर चालू लागतो. कोणतेही यश-अपयश हे आपल्यापेक्षा नेहमीच छोटे असते. कारण अपयशावर मात करण्याची क्षमता आपल्यात असते. नसली तर ती शिकून विकसित करण्याचेही आपण ठरवून अमलात आणू शकतो. मात्र या सगळ्यात आपल्यामधली जीवनेच्छा प्रबळ पाहिजे आणि आपले आपल्यातल्या आत्मारामाइतकेच इतरांवरही प्रेम पाहिजे. म्हणजे अकाळी मृत्यूला कवटाळून आपण स्वत:ला आणि आपले प्रेम असलेल्यांनाही क्लेश देण्याचा विचारसुद्धा मनात येणार नाही. अगदी कोणतीही कसोटी असली तरी! आपल्या जगण्यावर आपण एकदा नाही तर शतदा प्रेम करत राहू!!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in

 

 

 

First Published on June 17, 2017 4:45 am

Web Title: indian student commits suicide after failing in ssc board exams