05 July 2020

News Flash

ऋण : धाडसी लेखणीचं, बंडखोर मनाचं..

आजची ‘चतुरंग’ची ही वर्धापन दिन विशेष पुरवणी समग्र भारतीय लेखिकांच्या धारदार, कसदार लेखणीला वंदन करणारी

(संग्रहित छायाचित्र)

आरती कदम  arati.kadam@expressindia.com

भर राजसभेत वयोवृद्धांना, विद्वत्जनांना, कुटुंबीयांना थेट प्रश्न विचारण्याचं धाडस करणारी द्रौपदी फक्त आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही तर ती पुरुषप्रधान स्वामित्वालाच तेथे आव्हान देते. हजारो वर्षांपूर्वीच्या या आवाजातलं सच्चेपण नंतरच्या काळात अनेक स्त्रियांच्या रक्तातून, धमन्यांतून वाहत जाऊन त्याचा एक बुलंद आवाज तयार झाला आणि तोच सामाजिक परिवर्तनाचं हत्यारही झाला. या शब्दांना लेखणी मिळाली आणि स्वत:मधली धगधगती बंडखोरी शब्दांतून पेटती ठेवत अनेक साहित्यकृती घडत गेल्या. प्रश्न मांडले गेले, उत्तरं शोधली गेली, बदल घडू लागला.. स्त्री लेखणीतील ताकद विलक्षण प्रतिसाद उमटवत चाललेली आहे.. आजची ‘चतुरंग’ची ही वर्धापन दिन विशेष पुरवणी समग्र भारतीय लेखिकांच्या धारदार, कसदार लेखणीला वंदन करणारी. निमित्त आहे, बंडखोर लेखिका अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षांचं! यानिमित्ताने भारतातल्या त्या लेखिकांची ही ओळख, ज्यांनी कथा-कादंबऱ्यांच्या माध्यमातून दाहक वास्तव मांडत समाजाला प्रश्न विचारायचं धाडस केलं. जागेच्या मर्यादेमुळे या विशेषांकात फक्त दहाच भारतीय लेखिकांचा समावेश करू शकलो, मात्र उर्वरित तमाम लेखिकांचं ऋण आमच्यावर कायमच राहणार आहे. या अंकात मराठीतल्या गीता साने या फारशा प्रकाशात नसलेल्या मात्र दाहक वास्तव मांडणाऱ्या लेखिकेपासून, मालतीबाई बेडेकर, गौरी देशपांडे, जहाल स्त्रीवादी लेखिका इस्मत चुगताई, स्त्रीमुक्तीचा स्वर असणाऱ्या ललितांबिका, ‘बंडखोरी असल्याशिवाय लेखिकेचा जन्म होत नाही,’ असं म्हणणाऱ्या डॉ. प्रतिभा राय, दबलेल्यांचा आवाज ठरलेल्या महाश्वेतादेवी, बदल घडवण्याची ताकद असलेल्या इंदिरा गोस्वामी, बेधडक जगत तेच लिहिणाऱ्या कमला दास यांचा समावेश आहे. अर्थात या सगळ्या लेखिकांनी आपल्या या बंडखोरीची किंमतही मोजली. बहिष्कारा पासून जिवे मारण्याच्या धमकीपर्यंत, मात्र ना त्यांची लेखणी थांबली, ना ते धाडसीपणाने मांडण्याचं बळ. द्रौपदीसारख्या धगधगत्या धाडसी ज्वालेचं आपल्यावर तेच तर कर्ज आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 2:00 am

Web Title: indian women authors article in chaturang on occasion of anniversary special issue
Next Stories
1 स्त्री परिवर्तनाच्या सक्रिय साक्षीदार
2 मानवतावादी लेखन
3 प्रतिकारदेवतेचं अवतरण घडवणारी कथा
Just Now!
X