राधा जोगळेकर joglekarradha@rediffmail.com

डॉ. प्रतिभा राय यांच्या कथांमध्ये ‘स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून समाजातील तिचे स्थान, तिची अगतिकता, वेगवेगळ्या कारणांनी होणारी तिची लाचारी, तसेच विविध नातेसंबंध यांचा शोध घेतलेला दिसतो. त्याचप्रमाणे नवरा, मुलगा म्हणून स्त्रीवर असलेले पुरुषांचे वर्चस्व, स्त्री शरीराची होणारी विटंबना यांचे भेदक विश्लेषणही असते; पण या सर्व अडथळ्यांवर मात करून ती कशी पुढे जाते व स्वत:चे स्थान कसे निर्माण करते याचाही प्रत्यय त्यांच्या कथांमध्ये येतो.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

गावच्या देवीच्या जत्रेत ‘वस्त्रहरण’ हे द्रौपदीवरचे नाटक बघून, सगळ्यांच्यावर रागावलेली, आठवीत शिकणारी मुलगी, आपल्या वडिलांना विचारते, ‘‘तुम्हाला हे सर्व बरोबर वाटते का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘जे व्यासांनी लिहिले आहे, ते इथे सादर झाले. तुला जर याचा राग आला असेल तर त्यावर विचार कर आणि लिही.’’ ती मुलगी म्हणजे डॉ. प्रतिभा राय. विद्रोहाची पहिली ठिणगी त्या वयात पडली आणि पुढे त्यातूनच ‘याज्ञसेनी’ जन्माला आली. ‘बंडखोरी असल्याशिवाय लेखिकेचा जन्म होत नाही.’ हे डॉ. प्रतिभा राय यांनी आपल्या लेखनातून सिद्ध केले.

रामायण-महाभारत हे लहानपणी घरातच कानावर पडल्याने त्यातील पात्रांशी परिचय झालेला होता. त्यातील द्रौपदी आणि अहल्या या दोन स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून प्रतिभाताईंनी अनुक्रमे ‘याज्ञसेनी’ व ‘महामोह’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. महाभारतातील द्रौपदी व वेदकाळातील अहल्या, एवढय़ा एका धाग्यावर त्या त्या पात्राभोवती, त्यांना आधुनिक काळाशी जोडून, त्यांच्या व्यक्तिरेखांची गुंफण त्यांनी फार सुंदरपणे केलेली दिसते.

व्यासांनी लिहिलेल्या महाभारताच्या चौकटीबाहेर ही ‘याज्ञसेनी’ आहे किंवा दुसऱ्या शब्दांत असेही म्हणता येईल की, ‘याज्ञसेनी’ म्हणजे द्रौपदीच्या नजरेतून दिसणारे महाभारत प्रतिभाताईंनी मांडलेले आहे. त्यांची ही द्रौपदी मानव अधिकारांची जाणीव असलेली स्त्रीवादी स्त्री आहे. ही द्रौपदी स्वत:ची स्वतंत्र ओळख असलेली, वेगवेगळी आव्हाने पेलणारी, स्वतंत्र विचारांची, हुशार अशी एक आधुनिक स्त्री आहे. त्यांची द्रौपदी युधिष्ठिरासाठी एक सोंगटी, भीमासाठी उत्तम स्वयंपाक करणारी व रतिक्रीडेत सहभागी होणारी, अर्जुनासाठी प्रेयसी, तर नकुल व सहदेवासाठी अनेक नात्यांचं मिश्रण आहे. कृष्णासाठी असलेले तिचे प्रेम व कर्णासाठी क्षणासाठी का होईना, पण तिच्या मनात निर्माण झालेली ओढ हे सर्वच त्यांनी अगदी उघडपणे अतिशय सुंदर लिहिले आहे. त्यांच्या लिखाणाचा व्यापकपणा त्यातून दिसतो. द्रौपदीवर झालेल्या अन्यायाबद्दल भर कौरवसभेत त्या काळी तिने जे प्रश्न मांडले होते, तेच प्रश्न आजच्या आधुनिक काळातील स्त्रीने मांडले असते. तिचे प्रेम, राग, अपमान हे सर्व असूनही तिची जी संवेदनशीलता दाखवली आहे, त्यामुळे प्रतिभाताईंची द्रौपदी कालातीत वाटते. (‘याज्ञसेनी’ची १००वी आवृत्ती २०१९ च्या सुमारास निघणार आहे. ही एक भारतातील उच्च नोंद होईल असे म्हणायला हरकत नाही.)

त्यांच्या ‘महामोह’ची नायिका ‘अहल्या’. रामायणात अहल्या प्रसंगाला घेऊन असे लिहिले आहे, की इंद्राने नदीवरून परत येणाऱ्या गौतमांच्या छद्मवेशात अवेळी, ब्राह्ममुहूर्तावर अहल्येबरोबर संभोग केला. म्हणजे अहल्या जाणतेपणाने इंद्राला समर्पित झालेली नाही. त्यावर प्रतिभाताई म्हणतात, हे मानसिकदृष्टय़ा विश्वसनीय नाही. पती आणि जारपुरुषाला छद्मवेशात ओळखण्याची एक शक्ती मूढ स्त्रीतदेखील असते. अहल्या तर वेदमती, बुद्धिमती स्त्री आहे. त्याच अनुषंगाने यात अहल्येचे चित्रण आहे. तिला आपले सौंदर्य, शान, ज्ञान व आवड यांची आधुनिक काळातल्या आजच्या एखाद्या स्त्रीसारखीच जाणीव आहे. लहानपणापासून ‘इंद्रयोग्या अहल्या’ हे ऐकत आलेली, प्रतिभाताईंची अहल्या इंद्रावर असलेल्या आपल्या प्रेमाची जाहीर ग्वाही देते; पण गौतमांसाठी पती म्हणून तिला आदर आहेच आणि पत्नी म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यादेखील ती उत्तमपणे पार पाडताना दिसते. तीन मुलांची माता असलेली अहल्या जगाच्या कल्याणासाठी, स्वत: इंद्राला संतुष्ट करण्यासाठी आपले पाऊल पुढे टाकते. शरीरसुखाचा परमोच्च क्षण ती प्रथमच अनुभवते. हे सर्वच त्यांच्या लेखणीने अतिशय प्रभावीपणे पण संयमाने लिहिले आहे. त्यांची अहल्या वैदिक नाही, पौराणिक नाही. ती ईश्वराची कलाकृती आहे. वेदकालापासून अनंतकालापर्यंत तिची ही यात्रा आहे. ती होती, ती आहे व ती राहील.

त्यांच्या कथांमध्ये ‘स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून समाजातील तिचे स्थान, तिची अगतिकता, वेगवेगळ्या कारणांनी होणारी तिची लाचारी, तसेच विविध नातेसंबंध यांचा शोध घेतलेला दिसतो. त्याचप्रमाणे नवरा म्हणून, मुलगा म्हणून स्त्रीवर असलेले पुरुषांचे वर्चस्व, स्त्री शरीराची होणारी विटंबना आणि स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू ही भावना, यांचे भेदक विश्लेषणही असते; पण या सर्व अडथळ्यांवर मात करून ती कशी पुढे जाते व स्वत:चे स्थान कसे निर्माण करते याचाही प्रत्यय त्यांच्या कथांमध्ये येतो. जातिभेद, धर्मभेद यामुळे उसळणाऱ्या दंगली, त्यामागचे खरे सूत्रधार या सर्वाचे त्यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले वर्णन आढळते. जगन्नाथाबद्दलची असीम भक्ती व श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये बघायला मिळते. त्यांच्या कथा संवेदनशील वाचकाला निश्चितच अंतर्मुख करतात.

२१ जानेवारी १९४३ मध्ये जगतसिंगपूर या ओरिसातील जिल्ह्य़ात त्यांचा जन्म झाला. त्यांचे गांधीवादी वडील परशुराम दास हे शाळेचे मुख्याध्यापक होते. ते संस्कृतचे मोठे पंडित होते. रामायण व महाभारतावर ते प्रवचने करायचे. आईची शिस्त, वडिलांचे संस्कार आणि निसर्गाबद्दल असणाऱ्या आकर्षणामुळे, पाचव्या इयत्तेत असतानाच डॉ. प्रतिभा राय यांचे ओडिया साहित्यात पदार्पण झाले. त्यांनी लिहिलेली ‘सकाळ हेला’ (सकाळ झाली) ही कविता तेव्हा ‘मीना बाजार’ पत्रिकेत छापून आली होती. त्या म्हणतात, ‘माझी पहिली कविता ज्या दिवशी छापून आली, त्या दिवशी माझी साहित्यिक पहाट उगवली.’

पाचवीत असतानाच, त्यांचा भाऊ सायकल शिकत होता तेव्हा मुलींनी सायकल शिकायची नाही, या विरोधाला न जुमानता, भावाबरोबर त्याही सायकल शिकल्या. त्यांच्या गावात सायकल चालवणाऱ्या त्या एकमेव होत्या.

डॉ. प्रतिभा राय यांच्या साहित्य संसारात १८ कादंबऱ्या, २४ लघुकथासंग्रह, ३ प्रवास वर्णने, बालसाहित्य व इतर भाषांमधून अनुवादित केलेले साहित्य यांचा समावेश आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘बरसा बसंत बैसाख’ १९७४ मध्ये प्रकाशित झाली व शेवटची ‘शेष ईश्वर’ २०१६ मध्ये प्रकाशित झाली. या बेचाळीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. यामध्ये ‘मग्नमाटी’ (१९९९ च्या वादळावर आधारित), ‘आदिभूमी’ (आदिवासी बंडा जमातीवर आधारित) या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. ‘पद्मपत्ररे जीवन’ (कमळाच्या पानावरचे आयुष्य) हे त्यांचे आत्मचरित्र २०१४ मध्ये प्रकाशित झाले. ‘शेष मणीस’ (शेवटचा माणूस) ही त्यांची आत्ता लिहिलेली कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. ही कादंबरी ‘शेष ईश्वर’चा पुढील भाग आहे. माणूस देवाच्या शोधात बाहेर पडतो, पण तो माणसाचाच शोध घेत असतो, हेच त्यांना सांगायचे आहे.

साहित्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भानही प्रतिभाताईंना आहे. दोन महिन्यांपूर्वी पुरीच्या जगन्नाथ मंदिरात, महाराष्ट्रातून आलेल्या एका जोडप्याला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी पैशांवरून वाईट वागणूक दिली. त्यावर लागलीच त्यांनी ‘धर्मर रंग पूणी कळा’ (धर्माचा रंग पुन्हा काळा) या मथळ्याखाली वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. खूप वर्षांपूर्वी त्यांना स्वत:ला त्या देवळात पैशांवरून असाच अनुभव आला होता. तेव्हा त्यांनी ‘धर्मर रंग कळा’ (धर्माचा रंग काळा) असा लेख लिहिला होता. मंदिरातील त्यांच्याबरोबरचे प्रकरण घडण्याअगोदर शंकराचार्य निरंजन देव तीर्थ यांनी, ‘नवरा गेल्यावर विधवांच्या समस्या वाढतात, म्हणून त्यांनी सती जावे’ असे मत राजस्थानात रूपकंवर सतीप्रकरणी मांडले होते आणि त्यासाठी वेदातील दाखले दिले होते. प्रतिभाताईंनी त्यांना विरोध केला. सतीची व्याख्या काय, असे विचारून, त्यांचे प्रत्येक म्हणणे खोडून, बाईने सती जाण्यापेक्षा जिवंत राहणे तिच्या मुलाबाळांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी व तिच्या आईवडिलांसाठी कसे गरजेचे आहे, हे वर्तमानपत्रात लिहिले होते. तेव्हाही त्या ओरिसाभर चांगल्या अर्थाने चर्चेचा विषय झाल्या होत्या.

जून २०१४ मध्ये भुवनेश्वरच्या जयदेव भवनमध्ये भारतभरच्या पंडित व विद्वान लोकांची सभा भरली होती. जगन्नाथ पुरीचे राजेदेखील हजर होते. त्या भर सभेत प्रतिभाताईंनी जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद यांना एक प्रश्न केला होता. त्यांनी विचारले, ‘‘जगन्नाथाच्या देवळात एखाद्या परधर्मी माणसाने प्रवेश केला अथवा एखाद्या लहान मुलाने शु वगैरे केली तर मंदिर अपवित्र झाले, देव अपवित्र झाले असे मानून देवांना पवित्र केले जाते. माझा प्रश्न असा आहे, की जगन्नाथ जो परमब्रह्म, परमपवित्र आहे, पतितपावन आहे, जो सगळ्यांना पवित्र करतो, तो अपवित्र कसा होऊ शकतो आणि त्याला पवित्र कोण करतात? तर माणसेच! मग इथे पवित्र अपवित्रला पवित्र करतो का अपवित्र पवित्राच्या स्पर्शाने पवित्र होतो? जो निराकार आहे त्याला पवित्र करण्याची गरज नाही. अशा कारणांमुळे देव अपवित्र होत असेल तर आपल्या देशात माणूस अस्पृश्य नाही तर देव अस्पृश्य आहे. यावर आपले म्हणणे काय?’ शंकराचार्य त्यांना म्हणाले, ‘‘माझ्या मठात या, तिथे सविस्तर चर्चा करू.’’    त्या म्हणाल्या, ‘‘मला आपला आदर आहे; पण मी आजपर्यंत कोणत्याही मठात वा आश्रमात गेलेली नाही. जे उत्तर द्यायचे ते इथेच सर्वासमक्ष द्यावे.’’ अर्थात ते निरुत्तर होते. जे उत्तर दिले त्यात काही अर्थ नव्हता. त्याचप्रमाणे मंदिर पवित्र करण्याची वेळ येते, तेव्हा देवळात तयार झालेले अन्न पुरून टाकतात. त्याबद्दलही प्रतिभाताई मुख्यमंत्री, राज्यपाल सर्वानाच विचारतात, ‘‘अन्न पुरण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्यात इतके भुकेले, अन्न न मिळणारी लहान मुले असताना लाखो रुपयांचे अन्न पुरतात. हा पैसा कोणाचा असतो?’’ पुरीच्या पंडय़ाच्या वाईट वागणुकीमुळे पुढे दहा वर्ष त्या जगन्नाथाच्या देवळात गेल्या नाहीत. पतितपावनाच्या दर्शनासाठी देवळात जायची गरज नाही, असे त्या म्हणतात. तो आपल्यातच आहे, कुठेही बसले तरी त्याचे दर्शन होते. नेहमी स्त्रियांच्या बाजूने बोलणाऱ्या प्रतिभाताई, ज्या बायका बाबा/महाराज यांच्या नादी लागतात, त्यांच्यावर ताशेरे झाडतात. कमकुवत मनाच्या बायका अशा जिवंत देवांकडे (!) जातात आणि बरेचदा नको ते घडते. शिक्षित बायकांच्या अशा वागण्याचे त्यांना दु:ख होते.

कोणार्क मंदिरावर लिहिलेल्या त्यांच्या ‘शिलापद्म’ला ओडिया साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये ‘याज्ञसेनी’ला ‘सारळा पुरस्कार’ व नंतर १९९१ मध्ये ‘मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री लेखिका आहेत. २००६ मध्ये ‘अमृता कीर्ती’ पुरस्कार, ‘उल्लंघन’ कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार व इतर पुरस्कारांमध्ये ‘विषुव पुरस्कार’, ‘सप्तर्षी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या ‘मोक्ष’ कथेवर आधारित निर्माण झालेल्या ‘मोक्ष’ या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. प्रत्येक साहित्यिकाचे स्वप्न असणारा, साहित्यातील सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ त्यांना २०११ मध्ये मिळाला. त्याआधी २००७ मध्ये ‘साहित्य आणि शिक्षण’ क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने विभूषित केले.

लेखकासाठी आलोचक-समालोचक या दोघांची गरज आहे, असे डॉ.प्रतिभा राय म्हणतात. काही जण त्या स्त्रीवादी असल्याचा त्यांच्यावर आरोप करतात. त्यावर त्या म्हणतात, ‘मी स्त्रीवादी नाही, तर मानवतावादी आहे. स्त्री आणि पुरुष अशी वेगळी रचना समाजाच्या उत्तम कार्यप्रणालीसाठी झालेली आहे. स्त्रीला मिळालेल्या अंगभूत गुणांची पुढे जोपासना झाली पाहिजे; पण मनुष्य म्हणून स्त्री आणि पुरुष दोघेही समानच आहेत.’

निवडक पुस्तके

कथासंग्रह

सामान्य कथन, अनाबना, अब्यक्त, भगबानर देश, मोक्ष, उल्लंघन.

कादंबरी

याज्ञसेनी, शिलापद्म, आदिभूमी, महामोह, बरसा बसंत बैसाख, अरण्य, अपरिचिता, अयमारंभ, देहातीत , मग्नमाटी, निसिध प्रिथीवी, पुण्यतोया, मेघमेदुरा, उत्तरमार्ग, समुद्रस्वर, शेष ईश्वर, शेष मणीस.

आत्मकथन

पद्मपत्ररे जीवन (कमळाच्या पानावरचे आयुष्य) हे त्यांचे आत्मचरित्र २०१४ मध्ये प्रकाशित झाले.

chaturang@expressindia.com