मीना गोखले gokhalemeena@gmail.com

गीता साने यांची साहित्यनिर्मिती त्यांच्या जीवननिष्ठेतून झाली आहे. स्वातंत्र्य ऊर्मीची जाणीव साहित्याच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केली. सभोवार जे पाहिले, अनुभवले आणि अभ्यासले ते उत्कटतेने व्यक्त करण्यासाठी आणि समाजजीवनाचे, विशेषत: स्त्रीजीवनाचे प्रखर, वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यासाठी या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्या कुटुंबसंस्थेवर प्रहार करणाऱ्या, स्त्रीमुक्तीची, स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याच्या ऊर्मीची जाणीव व्यक्त करणाऱ्या असल्यामुळे ‘बंडखोर’ ठरल्या.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

गीता साने (३ सप्टेंबर १९०७ ते १२ सप्टेंबर १९९१) हे नाव, मराठी वाचकाला मुख्यत: ‘चंबळची दस्युभूमी’ (१९६५) आणि ‘भारतीय स्त्रीजीवन’ या पुस्तकांच्या लेखिका म्हणून माहीत आहे. पहिल्या पुस्तकाला ‘महाराष्ट्र राज्य पारितोषिक’ आणि ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार दोन्ही मिळाले. १९८४ मध्ये ‘विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गीता साने यांनी भूषविले होते. १९९० मधील ‘महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार’ याच्याही त्या एक मानकरी होत्या.

मूळच्या नागपूरच्या असलेल्या गीता साने यांचे, बिहारमधील धनबादसारख्या दूरच्या गावी वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाच्या, कर्तृत्वाच्या विविध पैलूंचा, मराठी समाजाला असावा तेवढा परिचय झाला नाही. ‘चंबळची दस्युभूमी’ हे पुस्तक १९६५ मधील असले तरी, गीता साने यांनी त्याआधी किती तरी वर्षे, आपल्या वैशिष्टय़पूर्ण व विपुल कादंबरी लेखनाने लक्ष वेधून घेतले होते. १९३६ ते १९४७ या कालावधीत, त्यांनी एक-दोन नव्हे तर दहा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. लेखनातील रूपकात्मकता, वि. स. खांडेकरांची आठवण करून देणारी असली तरी तत्कालीन स्वप्नरंजनवादी कादंबरीविश्वाशी त्यांच्या कादंबरीचे नाते नव्हते. सभोवार जे पाहिले, अनुभवले आणि अभ्यासले ते उत्कटतेने व्यक्त करण्यासाठी आणि समाजजीवनाचे, विशेषत: स्त्रीजीवनाचे प्रखर, वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यासाठी या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्या कुटुंबसंस्थेवर प्रहार करणाऱ्या, स्त्रीमुक्तीची, स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याच्या ऊर्मीची जाणीव व्यक्त करणाऱ्या असल्यामुळे ‘बंडखोर’ ठरल्या.

कथानक मांडणीतील विस्कळीतपणा, रचनासौष्ठवाचा अभाव, धावते आणि अपुरे चित्रण, खडबडीत भाषाशैली इत्यादी लेखनत्रुटी लगेच लक्षात येण्यासारख्याच होत्या आणि त्याविषयीची नाराजीही तत्कालीन अभिप्रायातून व्यक्त झालेली दिसते. पण या सर्वावर मात करणारा एक विशेष आंतरिक जोम आणि चैतन्य यांचा या निर्मितीत प्रत्यय येत होता. या कादंबरीविश्वाचा वैचारिक आवाका आणि जाणिवांची झेप मोठी होती. त्यामुळेच गीता साने यांचे नाते जाणवते ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर किंवा ग. त्र्यं माडखोलकर या तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकारांशी नव्हे तर त्याआधीच्या काळातले तत्त्व चर्चात्मक कादंबरी देणारे वा. म. जोशी, समाजशास्त्रीय कादंबरीचे नवे परिमाण देणारे श्री. व्यं. केतकर आणि बंडखोर नायिका चित्रित करणारे मामा वरेरकर यांच्या लेखनाशी!

गीता साने यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांत, स्त्रीस्वातंत्र्याशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना प्राधान्य मिळालेले दिसून येते. स्त्रीशिक्षण, कुटुंबसंस्था, विवाह संस्था, विवाह पद्धती, सामाजिक रूढी आणि चालीरीती, पती-पत्नी नाते, आर्थिक स्वातंत्र्य, नैतिक मूल्ये इत्यादी संदर्भात परखड, उपरोधपूर्ण भाष्य केले आहे. नमुन्यादाखल काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. ‘..हॉलला शोभा म्हणून आग्य््रााहून ताजमहालाचे मॉडेल, मुंबईहून चित्रे, काश्मीरहून गालिचा आणतात त्याप्रमाणे सुंदर, मुलगी पत्नी म्हणून विकतसुद्धा नाही, फुकटच आणलीत!’ ‘तिची तीव्र बुद्धी, अचाट कल्पकता आणि सत्यशोधनाची आवड ही आपल्या मोडकळीस आलेल्या समाजाला झेपत नाहीत हेच खरे!’ (‘निखळलेली हिरकणी’) ‘पुरुषाचे पावित्र्य सोन्याचे भांडे, कुठे डाग पडायची भीती नाही आणि पडला तरी विस्तवात घातले की पवित्रच! स्त्रियांची अब्रू-काचेची फुलदाणी-नव्हे मूर्तीच! जरा भग्न होताच, तडा जाताच पूजेला निरुपयोगी! मग या दोन भांडय़ांचे जमायचे कसे?’

‘‘.. फुलपाखरांप्रमाणे फुलांना चुंबीत हिंडणे आणि ‘शील’ यात मध्ये पायऱ्या नाहीतच जणू! आम्ही सदैव कडय़ाच्या टोकावर उभ्या असतो. पाय चुकला की दरीत. (हिरवळीखाली). अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कादंबरीतील व्यक्तिरेखांमार्फत व्यक्त करणाऱ्या लेखिकेची, त्या काळात ‘बेछूट’ म्हणून संभावना झालेली दिसून येते.

‘फेरीवाला’, ‘आविष्कार’, ‘माळरानात’,  ‘धुके आणि दहिवट’ आणि ‘दीपस्तंभ’ यानंतरच्या कादंबऱ्यांत समाजजीवन आणि राजकारण यांना प्राधान्य आहे. वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणालींचा पुरस्कार करणाऱ्या, आव्हाने स्वीकारणाऱ्या ध्येयवादी तरुण-तरुणींचे जग त्यांत साकार झाले आहे.

गीता साने यांच्या लेखनाचे संदर्भ क्षेत्र विस्तृत असल्यामुळे, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक अशी विविध परिमाणे त्यांच्या निर्मितीला प्राप्त होतात. जाणिवांची समृद्धी हे त्यांच्या कादंबरीविश्वाचे बलस्थान आहे. धर्म, जात, वर्ग, नीती-अनीती, न्याय-अन्याय, हिंसा-अहिंसा, समाजक्रांती अशा अनेक संकल्पनातीत जटिलता, कादंबरीतील व्यक्तिरेखांमार्फत सूचित होते. त्यामुळे या कादंबऱ्या विचारप्रवर्तक ठरतात.

त्यांची ‘स्त्री’विषयक संवेदनशीलता आजच्या काळात अधिक प्रस्तुत वाटणारी आहे. १९३६ च्या आसपास, ही संवेदनशीलता जवळची न वाटल्यामुळे तिचे हार्दिक स्वागत झाले नसावे का आणि वाङ्मयातील स्त्रीचित्रणाचा विचार तेव्हा विभावरी शिरुरकरांच्या संदर्भात प्रामुख्याने झाल्यामुळे, गीता साने यांच्या लेखन वैशिष्टय़ांचा स्वतंत्रपणे पुरेसा शोध घेतला गेला नसावा का, असे प्रश्न मनात येतात. कुसुमावती देशपांडे यांच्यासारखा साक्षेपी, विचक्षण समीक्षकानेही, वृत्तीमध्ये स्त्रीजीवनाविषयीचा एक प्रकारचा आकस जाणवतो, असे विधान गीता साने यांच्या संदर्भात केले आहे, (‘मराठी कादंबरी : पहिले शतक, भाग २-१९५४.) त्याचे आश्चर्य वाटते.

गीता साने यांच्या कादंबरी लेखनात, व्यक्तिवादी आणि आत्मकेंद्रित सुरापेक्षा सामाजिक परिमाणाला असलेले महत्त्व हा त्यांचा लक्षणीय वेगळेपणा होता. आजच्या स्त्रीवादी साहित्यविचाराच्या प्रकाशात त्यांच्या वाङ्मयनिर्मितीचे नवे आकलन आणि मूल्यमापन होऊ शकते, असा विश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे याविषयी शंका नाही.

‘दीपस्तंभ’ (१९४७) ही त्यांची शेवटची कादंबरी समाजक्रांतीचे चित्र रंगवणारी आहे. यानंतर त्यांचे ललितलेखन मंदावले आणि त्या संशोधनाकडे वळल्या. डाकूंचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंबळ खोऱ्यात निर्भयपणे भ्रमंती करून आणि दस्यूंच्या जीवनाची प्रत्यक्ष पाहणी करून ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक संदर्भात आपली निरीक्षणे मांडणारे ‘चंबळची दस्युभूमी’ (१९६५) हे पुस्तक त्यांनी लिहिले. सामाजिक समस्यांबद्दल मराठीत विशेष लेखन उपलब्ध नसण्याच्या पाश्र्वभूमीवर, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून, अभ्यासपूर्वक या समस्येचे सर्वागीण विवेचन करण्याचा हा प्रयत्न मौलिक ठरतो.

समाजाच्या सर्व थरांतल्या स्त्रीजीवनाचे मूलगामी आणि सर्वागीण चिंतन करणाऱ्या गीताबाईंनी ‘भारतीय स्त्रीजीवन’ (१९८६) हा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे. सर्व वयात आणि सर्व काळात परतंत्र भारतीय स्त्रियांच्या, विशेषत: दुर्बल थरातील स्त्रियांच्या जीवनसमस्यांचा मूलगामी वेध घेण्याचा आणि त्यावरील उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या ग्रंथात आढळतो. ‘निखळलेली हिरकणी’, ‘हिरवळीखाली’ या कादंबऱ्यातील काही व्यक्तिरेखांमार्फत, गीता साने यांनी समाजपरिवर्तनाविषयी आशावाद व्यक्त केला होता, पण नंतरच्या अर्धशतकात हे स्वप्न साकार झाले नाही याची खंत या ग्रंथामागे आहे. स्त्रीजीवनात एवढे बदल झाले खरे, पण ते वरवरचे आहेत, त्या जीवनाचा गाभा अजून जुनाच आहे. स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. आजही स्त्रीला कोणी पालक असावा, ती पुरुषाच्या अंकित असावी अशीच समाजाची भावना आहे अशी मर्मस्पर्शी मांडणी त्यांनी केली आहे. भारतीय न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, वेश्यासंस्था अशा विविध संदर्भात केलेले, भारतीय स्त्रीजीवनाचे विश्लेषण अस्वस्थ करणारे आणि विचारप्रवर्तन घडवणारे आहे.

गीता साने यांच्या समग्र वाङ्मयातून एका परिवर्तनवादी विचारवंताचे दर्शन घडते, तर त्यांच्या जीवनातून एका आचारवंताचा दुर्मीळ प्रत्यय येतो. ‘भारतीय स्त्रीजीवन’च्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्या माझ्या आई-वडिलांनी मला स्वतंत्र विचार शिकवला आणि आचाराचे स्वातंत्र्य दिले, अर्धशतकापूर्वी मुलीच्या मन:पूत वागण्याने समाजात अंगावर उडणारे शिंतोडे वाशीमसारख्या मागास गावी सहजतेने सोसले, त्यांच्या मनाची उदारता, सहिष्णुता आणि धैर्य यांची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे.’’ १९३२ मध्ये नरसिंग धागमवार यांच्याशी गीता साने यांचा प्रेमविवाह झाला. या विवाहाला फक्त दीड रुपया खर्च आला होता. १९४४ पर्यंत कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी मीरत येथे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन पतीसोबत धनबाद येथे त्या वास्तव्यासाठी आल्या. खाण कामगार स्त्रिया, आदिवासी स्त्रिया यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी प्रत्यक्ष समाजकार्यही गीताबाईंनी केले. विवाहानंतर त्यांनी आपले नाव बदलले नाही, रूढ सौभाग्यचिन्हे धारण केली नाहीत. ८६ वर्षांपूर्वी कोणताही अभिनिवेश न बाळगता, आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सहजपणे जोपासण्याचा त्यांचा हा बाणा हेच त्यांच्या जगण्याचे वैशिष्टय़ होते.

गीता साने यांची साहित्यनिर्मिती त्यांच्या जीवननिष्ठेतून झाली आहे. स्वातंत्र्यऊर्मीची जाणीव साहित्याच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केली. त्यांनी म्हटले आहे, ‘समता’ हे तत्त्व मला पटतं. त्यातून माझं लेखन झालं आहे. ‘समता’ म्हटली की ती वर्गाची समता, स्त्री-पुरुष समता, सर्व प्रकारची समता समाजात यायला लागते; याची जाणीव मला होती.’’ ‘जे मला दिसलं, जाणवलं, पटलं, लिहावंसं वाटतं ते मी लिहिलं.’ (विनया खडपेकर यांच्या ‘स्त्रीस्वातंत्र्यदिनी’ (१९९१) या पुस्तकातील गीता साने यांची मुलाखत.) गीता साने यांना अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याचे नाते स्वैर आत्मकेंद्रिततेशी नसून प्रगल्भ, कणखर अशा जीवनजाणिवेशी आणि सामाजिक जाणिवेशी आहे. ७०-८० वर्षांपूर्वीच, निष्ठावान, जागरूक, जिज्ञासू आणि सुबुद्ध स्त्रीची प्रतिमा उभी करणाऱ्या, स्त्रीमुक्तीची जाणीव देणाऱ्या, बांधिलकीच्या भावनेतून लेखन करणाऱ्या विचारवंत लेखिका हे त्यांचे मराठी वाङ्मयातले स्थान आहे.

निवडक पुस्तके

कादंबरी

निखळलेली हिरकणी, वठलेला वृक्ष  हिरवळीखाली, लतिका, फेरीवाला, आविष्कार , माळरानात, आपले वैरी, धुके आणि दहिवट, दीपस्तंभ

वैचारिक संशोधनात्मक ग्रंथ

चंबळची दस्युभूमी, भारतीय स्त्रीजीवन

chaturang@expressindia.com