प्रतिभा रानडे ranadepratibha@gmail.com

कमला दास यांच्या एकूणच लेखनातून स्पष्ट होते ती म्हणजे त्यांच्या मनोवृत्तीतील अशांतता, अस्वस्थता आणि बंडखोर वृत्ती. कुणाला काय वाटेल याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही, उलट एक प्रकारचा हट्ट, आग्रहीपणाच स्पष्ट होतो. स्त्रीचं वयात येणं, तिच्या शरीरात, भावनांमध्ये होत जाणारे बदल, तिच्यात होत जाणारं वासनांचं उद्दीपन, पुरुषाकडून तिच्या अपेक्षा, त्यातून मिळणारं समाधान, निराशा, उदासपणा या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसतं.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

कमला दास म्हणजे एक अत्यंत विमनस्क कवयित्री, लेखिका. जन्म १९३४ चा. तिचं घराणं केरळमधील एका राजघराण्यातलं. वडील कलकत्त्यातील (कोलकाता) एका विश्वविख्यात कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी. आई बालमणी अम्मा, या लेखिका. त्यामुळे लहान वयापासूनच  साहित्याची आवड. शाळेत शिक्षण झालं ते कलकत्त्यातील एका मिशनरी शाळेतच. तिथले जात-धर्माबद्दलचे अनुभव दु:खदायकच होते. वयाच्या १५ वर्षीच त्यांचं लग्न लावून दिलं ते पती माधव दास बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना बायकोचं कौतुक होतं, ते ती कविता करते, कथा लिहिते म्हणून. पण नवऱ्यानं छळही केलाच, आपला पती ‘गे’ होता, असंही कमला यांनी लिहिलं. संसार सुरू होताच तीन मुलगे झाले, त्या दरम्यान लेखनदेखील सुरू होतंच.

कमला यांची मनोवृत्ती मात्र जगावेळीच. आपल्या भोवतीच्या साहित्याची जाण, सामाजिक बंधनं, व्यक्तीच्या ऊर्मीची होणारी घुसमट, वासनासक्ती या सगळ्याची घुसळण मनात चालली होती. १९७२ मध्ये त्यांचं ‘माय स्टोरी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. प्रसिद्ध झाल्या झाल्याच ते अपरंपार, सर्वाधिक लोकप्रिय झालं तेवढंच वादग्रस्तही ठरलं. कौतुक आणि तिरस्काराचा पाऊसच पडला कमला यांच्यावर. पंधरा दिवसांतच पन्नास हजार प्रती खपल्या. या आत्मचरित्रात स्त्रीच्या लैंगिक भावनांचा उद्रेक, आशा, अपेक्षा यांच्यावर भर दिलेला आहे. पती-पत्नीचं परस्पर चांगलं नातं असताना दोघेही आपापल्या मार्गानं ‘सुखं’ शोधत असतात. मल्याळी भाषेतील मान्यवर कवी सच्चितानंद यांनी ‘माय स्टोरी’बद्दल म्हटलं, ‘दुसरी कोणतीच स्त्री इतक्या हिमतीनं, एवढय़ा प्रामाणिकपणानं तिच्या मनातील प्रचंड मोठी आंदोलनं, दु:ख, प्रेमाची तहान, मनस्ताप, निराशा, आनंद सगळंच एवढय़ा स्पष्टपणानं मांडणं शक्यच नाही.’ दोन वर्षांनंतर ‘माय स्टोरी’चा अनुवाद ‘एन्टेकथा’ मल्याळी भाषेत प्रसिद्ध झाला. कमलाच्या आई, बहिणी, मित्रमंडळींनीदेखील या पुस्तकावर बंदी घाला, विक्री थांबवा, असा हट्ट धरला. पण कमला ठाम राहिल्या. त्यांनी एक गोष्ट मात्र जाहीर केली, ‘त्या पुस्तकातील पुष्कळसा भाग काल्पनिक आहे!’

त्यांच्या एकूणच लेखनातून स्पष्ट होते ती म्हणजे त्यांच्या मनोवृत्तीतील अशांतता, अस्वस्थता आणि बंडखोर वृत्ती. आपण जे जे लिहितोय त्याबद्दल कुणाला काय वाटेल याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही, की कधीही, कसलीही अपराधी भावना नव्हतीच. उलट एक प्रकारचा हट्ट, आग्रहीपणाच स्पष्ट होतो. स्त्री-पुरुषांच्या मनातल्या भावना, विचार समाजाला बेडरपणानं आव्हानं देतात. त्यांच्या शब्दांतून, भाषेतून, मांडणीमधून वाचकांना खेचून घेण्याची विलक्षण कला दिसते. स्त्रीचं वयात येणं, तिच्या शरीरात – भावनांमध्ये होत जाणारे बदल, तिच्यात होत जाणारं वासनांचं उद्दीपन, पुरुषाकडून तिच्या अपेक्षा, त्यातून मिळणारं समाधान, निराशा, उदासपणा या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसतं.

‘द लुकिंग ग्लास’ कवितेत त्या स्त्रीला उद्देशून म्हणतात –

दे बक्षीस त्याला तुझ्या स्त्रीत्वाचं

तुझ्या घनदाट केसांचा गंध,

वक्षस्थळांमधला सुगंध

पाळीच्या रक्ताची उष्णता,

आणि स्त्रीची अखंड भूक,

अर्पण हो त्याला –

त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे तो स्त्रीच्या वासना, तिच्या आशा, वाटय़ाला आलेला विरह, उपेक्षा, दु:ख, अपमान यांचाच. ‘पद्मावती : दि हार्लेट अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’- ‘पद्मावती : एक वेश्या आणि इतर कथा’ या कथासंग्रहातील सगळ्याच कथा वेश्यांच्या जीवनसंबंधातीलच. ही पद्मावती, एक वेश्या आहे. आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी हा धंदा करणाऱ्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळत नाही, समाजातले स्थानही दर्जाहीन. गिऱ्हाईकांना खूश करणं हेच त्यांचं जगणं. सगळेच पुरुषदेखील क्रूर नसतातच, परिस्थितीचे बळी असतात, अशी या पुस्तकाची मांडणी आहे.

कमला दास यांच्या या अशा आगळ्यावेगळ्या साहित्याचे भरभरून कौतुक तर झालंच. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं अनेक भारतीय भाषांत भाषांतर झाली. शिवाय इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जर्मन, जपानी भाषांत भाषांतरं झाली. त्या देशांत भाषणांसाठी जावं लागलं. जगातील बंडखोर समजले जाणारे अ‍ॅना सॅक्स्टन, रॉबर्ट लोवेल यांच्या बरोबरीचे स्थान दिलं गेलं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर मिळालेच. नोबेल पुरस्कारासाठी नाव सुचविलं गेलं, पण मिळालं नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्याबद्दल म्हटलं होतं, ‘दि मदर ऑफ मॉडर्न इंग्लिश इंडियन पोएट्री’ – ‘भारतातील आधुनिक इंग्रजी

काव्याची जननी!’

कमला यांच्या जीवनाची उलथापालथ झाली ती त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर, एका विधवेचं जगणं वाटय़ाला आलं, तेदेखील कमलासारख्या उन्मुक्तपणानं जगणाऱ्या स्त्रीच्या वाटेला. एकटेपणाचं, अंधारातलं आयुष्य जगावं लागलं. त्या वेळी त्यांचं वय होतं ६३ वर्षांचं. त्यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी लहान असलेल्या सादिक अलीचे फोन येऊ लागले. सादिक हे मुस्लीम लीगचे असेंब्लीतील सभासद. कमला यांच्या काव्याचं, त्यांच्या देखणेपणाचं कौतुक सुरू झालं. उर्दूतील इश्कवाली शायरी ऐकवू लागले. सांगू लागले, माझं प्रेम बसलंय तुमच्यावर, माझ्याशी विवाह करा. मुसलमान व्हा, तुम्हाला मुस्लीम लीगतर्फे  असेंब्लीमध्ये सभासदत्व मिळवून देईन. दोन दिवस आपल्या घरी राहायला बोलावून घेतलं. अबूधाबीच्या घरी. कमला गेल्या अबूधाबीला. खूप लाड करवून घेतले आणि एका रात्री सादिक अलीनं त्यांच्या शरीरावर आपला पुरुषीपणाचा अधिकार गाजवला. त्याबद्दल कमलानं म्हटलंय, ‘आयुष्यात प्रथमच माझ्या शरीरात पुरुष आहे याची जाणीव मला झाली!’

कमला भारतात परतल्या, सादिक आल्यावर मुसलमान बनल्या. नखाशिखांत बुरखा घालून, सादिकशी शादी केली. ते वर्ष होतं १९९९ आणि समाजात वादळ घोंगावलं. आई, बहिणी, नातेवाईकांच्या दु:खाला, विरोधाला पारावर उरला नाही. हिंदू कट्टरवादींनी धमक्या दिल्या. वृत्तपत्रांनी टीका केली. पण कोणालाही न जुमानता त्यांनी सादिकची साथ सोडली नाही. कॅनेडियन घनिष्ठ मैत्रीण मेरील व्हीजबोर्डला तिनं भेटायला बोलावून घेतलं होतं. मेरीलनं आपल्या या मैत्रिणीबद्दल म्हटलंय, ‘‘खूप मोठय़ा घरात ती राहत होती. खूप सुखावलेली दिसली. बुरख्यातच होती, चेहरा झाकलेला नव्हता. अंगावर खूप सोन्या-हिऱ्याचे दागिने होते. कमरेभोवती जाडजूड सोन्याच्या साखळीला चांदीचा फोन लावलेला. सादिकचा कधीही फोन येईल म्हणून ती कायमचा फोन असा जवळ बाळगायची!’’

पण हे लग्न टिकलं नाहीच. सादिकला पहिली पत्नी आहे हे कमलांना कळलं. सादिकनंही कमलांना धिक्कारलंच. अनेक मुलाखतींमधून त्यांची त्या वेळची मन:स्थिती कळते. त्यांनी सांगितलंय की, मुस्लीम धर्माबद्दल त्यांना कित्येक वर्षांपासून आकर्षण वाटलं होतं. दोन मुस्लीम मुलांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. त्यांना शिकवून मोठं केलं. त्या वेळी त्यांनी कुराण वाचलं होतं. माधव कुट्टींशी त्याबद्दल बोलणं झालं, तेव्हा त्यांच्या या पहिल्या पतीनं त्यांना सांगितलं होतं, ‘हा प्रश्न सोपा नाहीच. गंभीर विषय आहे. धर्म बदलणं  सोपं नाही. खोलवर विचार कर आणि मग धर्म बदलण्याचा निर्णय घे!’

‘‘मी प्रेमाचीच भुकेली आहे. इस्लाम हा प्रेमाचा धर्म आहे. हिंदू विधवा म्हणून जगणं ही शिक्षाच होती मला. मला प्रेम मिळालं म्हणून मी मुसलमान झाले. छानच वाटायला लागलं. मी माझ्या मनाला पटलं तेच लिहिलं, तर मला पापी ठरवलं. मला तसं वाटत नाही. जर मी अजाणतेपणानं पाप केलंच असेल तर अल्ला मला क्षमा करेल! बुरखा घालते तेव्हा सुरक्षित वाटतं. बुरखा घातलेल्या स्त्रीशी कोणी लग्न करण्याची हिंमत दाखवत नाही.’’ सादिकनं म्हटलं होतं, ‘‘कमला तर माझ्या आईसारखीच होती. तिची पुस्तकं ती मला भेट म्हणून द्यायची. तेव्हा त्यावर सही करायची, ‘अम्मा’. तिलाच माझ्याशी लग्न करायचं होतं. म्हणूनच लग्न झालं आणि तिला मुसलमान व्हावं लागलं.’’

कमला यांच्या लहान वयापासूनच्या कृष्णभक्तीबद्दल त्यांना विचारलं तेव्हा म्हणाल्या होत्या, ‘‘मी गुरुदासपूरच्या मंदिरातील कृष्णमूर्ती आणून माझ्या घरात ठेवलीय. तिथं तो तुम्हाला दिसणारच नाही. माझ्या घरी आता तो माझ्यासाठीचा प्रेषित मोहम्मद बनलाय!’’

सादिकनं धिक्कारल्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू व्हावं, असं लोक म्हणू लागले. पण जर ती पुन्हा हिंदू झाली तर तिला, तिच्या मुला-नातवंडांना इस्लामी कट्टरवादी मारून टाकतील, ही भीती होती. पण तिच्या मोठय़ा मुलानं म्हटलं की, ‘‘तिला पुन्हा हिंदू व्हायचं नव्हतं! तिला कुणाची पर्वाच नव्हती. मनासारखंच ती जगली. तिनं जे जे काय लिहिलंय त्यामध्ये बहुतेक सगळं तिच्या कल्पनाविश्वातलंच होतं.’’ तिनं स्वत:च एका मुलाखतीत म्हटलं होतं, ‘माझं स्वत:चं मन, शरीर याची मालकीण फक्त मीच. मला हवं तसंच ते मी वापरणार!’

कमला दास यांच्या जगण्याचं सत्त्व होतं ते हेच. याला कोणी बंडखोरी म्हणेल तर कोणी स्वार्थीपणा म्हणेल. मला वाटतं की, आपल्या अस्ताव्यस्त भावनांचा पसारा तिनं स्वत:च्या जगण्यात आणि साहित्यात मांडला आणि ती गंमत बघत बसली..

निवडक पुस्तके

आत्मचरित्रात्मक

माय स्टोरी (एन्टेकथा)

कथासंग्रह

पद्मावती : दि हार्लेट अ‍ॅण्ड अदर स्टोरीज,  दि केप्ट वूमन,  चाइल्डहूड ऑफ मलबार, अ डॉल फॉर चाइल्ड प्रॉस्टिटय़ूट,  बचपन की यादे, अमावसी.

कवितासंग्रह

दि ओल्ड प्ले हाऊस,  दि डिसेंडन्टस्,  समर इन कलकत्ता, या अल्ला,  क्लोजर – सम पोएम्स अ‍ॅण्ड ए कॉन्व्हर्सेशन; ओन्ली दि सोल नोज हाऊ टू सिंग.

chaturang@expressindia.com