डॉ. अरुणा ढेरे aruna.dhere@gmail.com

ललितांबिका अंतर्जनम् यांची खरी ताकद आहे, ती त्यांच्या कथांमध्ये. पंधरा कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या कथांनी मल्याळी कथेला शक्ती दिली, ओज दिलं. सामाजिक परिवर्तनाचं एक हत्यारही दिलं. सगळ्या बायकांची एकच जात असते – ‘बाई जात’ – असं म्हणणाऱ्या ललितांबिका काळाच्या काळजातला स्त्रीमुक्तीचा स्वर मुखर करणाऱ्या लेखिका होत्या.

‘तुम्ही, पावित्र्यरक्षकांनो, सन्मार्गपथिकांनो, मी तुम्हाला विचारते की, आयुष्य म्हणजे काय असतं हेही ज्यांना माहीत नाही, अशा आम्हा दीनदुबळ्या जीवांसाठी तुम्ही कधी तुमचं बोट तरी मदतीसाठी उचललंय का? नियतीनं आम्हाला जगण्याचा अधिकारच दिला नाही आणि आम्ही दारोदार शांती-समाधान शोधत राहिलो. दाबू शकलो नाही आमच्या इच्छा. काबूत ठेवू शकलो नाही आमच्या वासना. त्यांच्याशी व्यर्थ झगडत राहिलो. ऐंद्रिय सुखाच्या त्या निसरडय़ा पायऱ्याच होत्या. त्यांच्यावरून जाताना आम्ही थोडय़ा जरी डगमगलो तरी तुम्ही आम्हाला खोल, अंधाऱ्या नरकात ढकलून दिलंत. त्याचा अंत आम्ही कधीच नाही पाहिला. आम्ही केलेल्या एखादष्ण्या आणि प्रदोषाचे उपवास आमच्या कामी कुठून येणार?’

‘कुट्टसमाथम्’ म्हणजे ‘पापाची कबुली’ देणारी एक तरुण विधवा पोटतिडिकीने म्हणत होती. केरळमधल्या नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातली बालविधवा. नवऱ्याचं फक्त तोंड आणि तेही फक्त एकदाच पाहिलेली विधवा. कुटुंबातली सगळी अवहेलना सोसणारी, आखून दिलेल्या सगळ्या मर्यादा मन लावून पाळणारी. पहाटेच्या अंधारात विहिरीवर स्नान करणाऱ्या तिच्या देहाला तिच्याही नकळत एक मिठी पडली आणि घडायचं ते घडून गेलं.

लग्न होऊनही कुंवार असलेली ती, कुंवार असतानाच विधवा झाली होती. जगाच्या दृष्टीनं ती आता भ्रष्ट झाली. तिनं पाप केलं; पण प्रत्यक्षात दोष तिचा होता का? असलाच तर तो एवढाच, की तिच्या देहानं त्या मिठीला अनपेक्षितपणे प्रतिसाद दिला; पण तिचा भोग घेणारा नामानिराळा राहिला आणि तिला मात्र ‘स्मार्तविचारम्’ला (तिच्या अपराधाची जाहीर सुनावणी करून तिला शिक्षा सुनावणाऱ्या समितीला) सामोरं जावं लागलं. मात्र त्या समितीसमोरही तिनं स्पष्ट सांगितलं, ‘इतर प्रत्येकीप्रमाणे नैसर्गिक ऊर्मीशी केलेल्या लढाईतला माझा पराभव मी मान्य करते; पण हे पाप असेल, तर मग माझा जीव मी त्या पापावर ओवाळून टाकते.’

तिच्यापेक्षाही धीट निघाली ती तात्री. प्रतिकारदेवता! तिच्या नवऱ्यानंच तिला वेश्या बनण्याची सूचना केली आणि तिला तडफडत ठेवून एक खरीखुरी वेश्या घरी आणली. तेव्हा ती कुलीन स्त्री – घर सोडून बाहेर पडली आणि सुडानं पेटून अखेर एक वेश्याच बनली. त्या खानदानी, बुद्धिमान, सुंदर वेश्येकडे नगरातले सर्व प्रतिष्ठित लोक येत राहिले आणि अखेर नवराच जेव्हा आला, तेव्हा तिनं आपलं खरं रूप उघड करत तिच्याकडे येणाऱ्या सगळ्यांची नावं जाहीर करण्याची धमकी दिली. सुडानं पेटली होती ती. म्हणाली, ‘एक काळ असा होता की – जेव्हा माणूस म्हणून स्वत:ची ओळख जपण्यासाठी मी धडपडत होते; पण आता मला कळलंय की माणूस असणं, त्यातही बाईमाणूस असणं ही  फार वेदनादायक गोष्ट आहे.’

या दोघींमागून आणखी एक बोलत राहिली. तिच्या सवतीनं नवऱ्याचे कान भरले म्हणून त्यानं हिला सरळ घराबाहेर हाकलून दिलं. कुठे जाणार ती? कशी जगणार? पण ती जगली आणि तिच्यापासून तोडून घेतलेला तिचा दहा वर्षांचा मुलगा तिच्या अंतिम घडीला जवळ यावा म्हणून तळमळत राहिली. तिच्या जोडीला उभी राहिली पाप्पी. तिच्या कुंवारपणी तिच्याशी प्रेमाचे खेळ करून तिला सोडून जाणाऱ्या एट्टनसाठी आयुष्यभर व्रती राहिलेली आणि त्यानं केलेली फसवणूक लक्षात आल्यावर नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागणारी पाप्पी!

अशा किती तरी बायका. तरुण, प्रौढ, म्हाताऱ्या! शतकानुशतकांचा अंधार त्यांच्याभोवती दाटलेला. अंतर्गृहातला अंधार. त्या नंबुद्रींच्या घरातल्या ‘असूर्यपक्ष्या’ बायका. म्हणजे सूर्यानं ज्यांना पाहिलेलं नाही अशा किंवा ज्यांनी सूर्यही पाहिलेला नाही अशा बायका. आपला उरोभाग उघडा ठेवायची, फक्त पांढरेच वस्त्र नेसायची, कानाच्या पाळ्यांची भोकं अति मोठी करून घेण्याची ज्यांच्यावर सक्ती होती, घराच्या चार भिंतींतच चिणून राहण्याची ज्यांच्यावर सक्ती होती, क्वचित बाहेर पडावंच लागलं, तर घट्ट शाल गुंडाळून, चेहरा छत्रीनं झाकून घेण्याची ज्यांच्यावर सक्ती होती, अशा या बायका. त्यांना ‘अंतर्जनम्’ म्हणत.

विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळातल्या या दुर्दैवी, असाहाय्य, घुसमटत्या बायकांनी ‘ललितांबिका अंतर्जनम्’ यांच्या कथांमधून श्वास घेतला. त्यांचं हृदय त्या कथांमधून स्पंद पावत राहिलं. हसणं हे ज्यांच्यासाठी रडण्यापेक्षा जास्त भयकारी असतं अशा बायकांचा अनुभव त्यांच्या गाठीला होता. नंबुद्री घरात बाई म्हणून जन्माला येण्यापेक्षा कुत्र्याचं जिणं परवडलं, असं म्हणणाऱ्या या बायकांना ललितांबिकांनी हात देऊन उभं केलं, पुन्हा जिवंत केलं, आपल्या कथांमध्ये आणि त्या बायका मग समाजाच्या नजरेला नजर भिडवून विचारू लागल्या, ‘कोणाला जास्त दोष द्याल? स्वत:ची वासना शमवण्यासाठी स्त्रीला फशी पाडणाऱ्या पुरुषाला, की त्याला विरोध करताना समाजानं आखलेली लक्ष्मणरेषा नकळत ओलांडणाऱ्या बाईला?’

त्या त्यांच्या कथानायिका आपल्या स्वयंपाकघराचे आभार मानत राहिल्या आणि म्हणत राहिल्या की, ‘पोटाची भूक भागते तिथे, पण भावना-संवेदनाही भुकेल्या असतातच ना? त्यांची भूक रक्तात उतरते; नसांतून वाहते.. पण पुरुष हा पुरुषच असतो आणि बाई ही बाई. एक शापित समाजात जन्माला आलेली बाई!’

नंबुद्रींच्या घरात बाई असण्याचं प्राक्तन काही प्रमाणात ललितांबिकांच्या वाटय़ालाही आलेलं होतं. १९०९ चा त्यांचा जन्म. त्या जन्मल्या तेव्हा त्यांचे कविहृदयाचे आणि प्रागतिक विचारांचे वडील कोट्टावट्टथ दामोदरन् पोट्टी फार उद्वेगाने म्हणाले, ‘आता राहत नाही मी इथे. जातो मद्रासला. ख्रिस्ती होतो आणि एखाद्या मडमेशी लग्न करतो.’ ‘आणि त्या बाईलाही मुलगीच झाली तर?’ त्यांच्या आईनं- नागय्यानं विचारलं, तीही शिकलेली होती. कवयित्री होती. एका प्रख्यात कवीची मुलगीच होती. ललितांबिकांचे वडील म्हणाले होते, ‘मग तिला माणूस म्हणून मला वाढवता तरी येईल, शिकवता येईल तिला. एखाद्या चांगल्या माणसाशी तिचं लग्न करून देता येईल, तिला स्वातंत्र्य देता येईल.’ कारण मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत कर्मट नंबुद्री समाजाच्या तुलनेत ख्रिस्ती समाज खुला दृष्टिकोण असणारा होता. वडिलांच्या या उद्गारात काय नव्हतं? मनाजोगतं वाढण्याचं, शिकण्याचं, वागण्या-वावरण्याचं, लग्न करण्या-न-करण्याचं, जोडीदाराच्या निवडीचं, स्त्रीला नाकारलं गेलेलं स्वातंत्र्य आणि मुख्यत: नाकारलं गेलेलं माणूसपण यांच्याविषयीचा विषाद होता. काळाचा स्त्रीकडे पाहणारा कठोर, असहिष्णू चेहरा पाहताना होणारं दु:खही होतं. केरळच्या नंबुद्री घरांमधल्या स्त्रियांची स्थिती त्या काळी खरोखर फार शोचनीय होती. ललितांबिका मोठय़ा होत गेल्या, तशा या स्त्रियांच्या दु:खाशी बांधल्या गेल्या. बंडखोरी तर त्यांनी केलीच. स्वत: तर उरोभाग उघडा ठेवणं त्यांनी नाकारलंच; पण एक दिवस प्रकटपणे शाल आणि छत्री फेकून दिली. त्यासाठी कुटुंबातून बहिष्कृत होणंही स्वीकारलं.

एकीकडे भोवतालच्या स्त्रीजीवनाकडे सहजपणे पाहताना आवश्यक ठरलेला विद्रोह आणि दुसरीकडे गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीला दिला गेलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ललितांबिका एकीकडं मुलांचा पाळणा झुलवत कथा-कविता लिहीत होत्या, तान्हं मूल छातीशी धरून भाषणं करीत होत्या. नवऱ्याबरोबर शेतीत कष्ट करता करता मनाचं मशागत करणारी पुस्तकं वाचत होत्या आणि स्वत:मधली धगधगती बंडखोरी शब्दांतून पेटती ठेवत होत्या.

सात कवितासंग्रह, मुलांसाठी लिहिलेली चार पुस्तकं, एक वैचारिक लेखसंग्रह, एक आत्मकथन, एक कादंबरी असं ललितांबिकांचं विपुल लेखन आहे. त्यांच्या ‘अग्निसाक्षी’ या कादंबरीला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत; पण त्यांची खरी ताकद आहे, ती त्यांच्या कथांमध्ये, पंधरा कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या कथांनी मल्याळी कथेला शक्ती दिली, ओज दिलं; सामाजिक परिवर्तनाचं एक हत्यारही दिलं.

वयाच्या तेराव्या वर्षीच ललितांबिकांनी पहिला लेख लिहिला आणि तो छापूनही आला. नंतर टागोरांच्या ‘घरे-बाईरे’ कादंबरीनं प्रभावित होऊन तशीच एक कादंबरी लिहिली आणि पुढे तिचं स्वत:च मूल्यमापन करून ती फाडूनही टाकली. एक नाटक लिहिलं, प्रेम करणारी, स्वत:वरची अन्याय्य बंधनं झुगारणारी स्त्री केरळच्या रंगभूमीत दिसू लागली होती. एका तरुण विधवेच्या पुनर्विवाहावर आधारलेलं एक धाडसी नाटक लिहून ललितांबिकाही रंगभूमीवरच्या त्या बंडखोरीत सामील झाल्या. ते नाटक खूप चाललं, गाजलंही.

सुदैवानं त्यांना फार चांगला जीवनसाथी मिळाला. त्याच्याबरोबर त्या सूत कातू लागल्या, कापड विणू लागल्या आणि न घाबरता स्वातंत्र्य चळवळीचा पुरस्कारही करू लागल्या. १९०९ ते १९८५ पर्यंतचा म्हणजे मृत्यूपर्यंतचा वयाचा अमृतमहोत्सवी कालखंड ललितांबिकांनी कसदार लेखनानं गाजवला.

कलावादी दृष्टीनं विचार करून त्यांच्या लेखनातल्या उणिवांची चर्चा कुणी करेलही आणि त्यांना प्रतिष्ठेच्या उच्च पदावरून कुणी खालीही खेचू पाहील, पण ललितांबिका मुळी कोणत्याही खुर्चीवर बसणाऱ्या नव्हत्याच. त्या कायम उभ्याच राहिल्या. नाडलेल्या, दु:खी, अगतिक बायकांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. स्त्रीवरच्या अन्यायाचा निषेध करत राहिल्या. देशाचा स्वातंत्र्यसंग्राम, लेखिका म्हणून जगण्याचे संदर्भ आणि अंतर्जनम् म्हणून जगणाऱ्या स्त्रियांचं जीवन ही त्यांच्या लेखनातली मुख्य विषयसूत्रं राहिली.

त्यांचा एकच लेखसंग्रह आहे आणि तो आहे रामायण-महाभारतातल्या तेरा स्त्रियांविषयीचा. ‘सीता ते सत्यवती’ नावाच्या या लेखसंग्रहातून त्यांनी त्या दोन्ही महाकाव्यांमधल्या स्त्रियांना महाकाव्याच्या पानांमधून बाहेर काढलं आणि त्यांच्या प्रतिमांमधून उष्ण रक्त खेळवलं. मिथकांचं पुनर्वाचन करण्याचा त्यांचा तो यशस्वी प्रयत्न होता. सगळ्या बायकांची एकच जात असते – ‘बाई जात’ – असं म्हणणाऱ्या ललितांबिका काळाच्या काळजातला स्त्रीमुक्तीचा स्वर मुखर करणाऱ्या लेखिका होत्या. भारतीय स्त्रीच्या मुक्तीचा इतिहास ज्या साहित्याच्या आधारे लिहिला जाईल, त्यात ललितांबिकांच्या कथांची नोंद अग्रक्रमानं असेल यात शंका नाही.

निवडक पुस्तके

 कथासंग्रह

मुडुपदाथिल, कलाथिंडे इडुकल, कानििरटे पंजरी, इस पथु वर्षथिन्डु सेशम, अग्निपुष्पंगल

कवितासंग्रह

भावरीप्ती, नि:शब्द संगीतम्

कादंबरी

अग्निसाक्षी

आत्मकथन

आत्मकथाक्कोरु आमुखम्,

‘कास्ट मी आऊट इफ यू विल’ – ललितांबिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवडक कथा आणि आत्मकथन समाविष्ट असणारा संग्रह ‘स्त्री’ या प्रकाशन संस्थेने १९९८ मध्ये इंग्रजीतून प्रसिद्ध केला.

chaturang@expressindia.com