विनया खडपेकर – vinayakhadpekar@gmail.com 

ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकरांच्या काळात मालती बेडेकर, अर्थात विभावरी शिरुरकरांनी भोवतालच्या वास्तवातील विधवा, परित्यक्ता, शिक्षित प्रौढ कुमारिका, स्त्रीच्या कामवासना, लग्नाचा बाजार येथे होणारी स्त्री-मनाची कोंडी, भोवतालच्या समाजाचा जाच थेटपणे  चित्रित केला. मालतीबाई शिक्षित स्त्री-मनाच्या कोंडीच्या विविध बाजू दाखवत गेल्या आणि त्यावरच्या वादळी चच्रेमुळे मराठी समाज हळूहळू खरेखुरे स्त्री-मन समजावून घेण्याच्या दिशेने पावले टाकू लागला..

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Holi 2024: Five Zodiac Signs Lucky On Rang panchami
होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?

मालतीबाई बेडेकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०५ आणि निधन ६ मे २००१. पंचाण्णव वर्षांचे आयुष्य. कथा, कादंबरी, संशोधन लेखन सर्व प्रकारांत त्यांची लेखणी यशस्वीपणे फिरली होती. अनेक परिषदांची, संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली होती. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेतून पदवीधर झालेल्या बाळूताई खरे यांनी, पुढे समाजाचं दाहक वास्तव मांडणारं, त्या काळी बंडखोरीचं ठरलेलं लेखन विभावरी शिरुरकर या टोपणनावाने लिहिलं आणि याच नावाने त्या मानमान्यता पावल्या. विवाहानंतर त्यांनी मालती बेडेकर या नावानेही लेखन केलं असलं तरी तत्पूर्वीच्या लेखनातून स्त्रीचे विषण्ण करणारे अनुभव मांडल्याने समाजात होणाऱ्या स्त्रीमनाच्या कोंडीला वाचा फुटली.

पुण्याजवळच्या शिरुर (घोडनदी) नावाच्या खेडय़ात मालतीबाईंचे वडील अण्णा खरे हे ख्रिस्ती मिशनच्या शाळेत चित्रकला शिक्षक होते. मालतीबाई आणि त्यांच्या बहिणींचे सातवीपर्यंतचे शिक्षण घोडनदीत मुलग्यांच्या शाळेत झाले. मालतीबाईंचे वडील त्या काळातले सुधारक होते. त्यांच्यामुळेच मालतीबाईंना शिक्षण, अर्थार्जन सर्व द्वारे खुली राहिली. घोडनदीमधल्या त्यांच्या वयाच्या मुली लग्नाच्या बोहल्यावर चढू लागल्या, तेव्हा वडिलांनी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील स्त्रीशिक्षण संस्थेत आपल्या मुलींची पुढील शिक्षणाची सोय केली. १९२३ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्या कर्वे विद्यापीठाच्या पदवीधर झाल्या. लगेच कव्र्याच्या संस्थेच्याच ‘कन्याशाळा’त शिक्षिका झाल्या.

मालतीबाईंनी प्रथम लिहिलेली पुस्तके म्हणजे ‘अलंकारमंजूषा’ आणि ‘हिंदू व्यवहार धर्मशास्त्र’. या पुस्तकांनंतर, त्यांचे मेहुणे ह.वि. मोटे त्यांना म्हणाले, ‘बाळूताई, तुमचं वय काय? हे विद्वत्ताप्रचुर लेखन करण्यापेक्षा, तुम्ही जे अनुभवताय, भोवताली घडतंय, जाणवतंय त्यावर लिहा.’ मालतीबाईंचे विचारचक्र सुरू झाले. शिकताना, नोकरी करताना भोवताली कुमारिका, विधवांची जी स्थिती दिसत होती, त्यावर त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया निर्माण होत होत्या. त्या लिहून काढायला काय हरकत आहे? अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी दहा-बारा कथा लिहिल्या. तो काळ ना.सी.फडके यांच्या श्रीमंती पाश्र्वभूमीवरच्या आणि वि.स. खांडेकरांच्या ध्येयवादी गरिबीच्या पाश्र्वभूमीवरच्या स्वप्निल, धुंद प्रीतिकथांचा होता. या वातावरणात मालतीबाईंनी भोवतालच्या वास्तवातील विधवा, परित्यक्ता, शिक्षित प्रौढ कुमारिका, स्त्रीच्या कामवासना, प्रणयी भावना, लग्नाचा बाजार येथे होणारी स्त्रीमनाची कोंडी, भोवतालच्या समाजाचा जाचच चित्रित केला. लेखिका लोकांना कळली असती, तर नोकरीला मुकावे लागले असते. लोकांनी कसा आणि किती त्रास दिला असता, याची कल्पना करवत नव्हती. म्हणून ‘कळ्यांचे नि:श्वास’ (१९३३)हा कथासंग्रह ‘विभावरी शिरुरकर’ या टोपणनावाने मोटे यांनी प्रकाशित केला. त्या शिरुरच्या होत्या म्हणून शिरुरकर आणि लेखिकेने अंधारात राहणेच पसंत केले, म्हणून विभावरी म्हणजे रात्र.

‘त्याग’ या कथेत, सुशिक्षित मिळवती मुलगी लग्न होऊन गेली की आपल्या कुटुंबाचे कसे होणार, ही चिंता आई-वडलांना जाळते. आपल्या यौवनसुलभ भावनांची आहुती देऊन ही तरुणी एक चकार शब्द न बोलता, लग्न न करण्याचा निर्णय घेते. त्यागाच्या कल्पनेने समाधान पावते. पण तिच्या मनातल्या ‘परमेश्वरा! हे समाधान पुढे असेच कायम टिकेल ना?’ या प्रश्नचिन्हाशी कथा संपते. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ या कथेतले वडील, शिक्षणानंतर मुलीला भीती नाही, मुली मुलग्याइतक्या बहकत नाहीत इत्यादी बोलतात. तेव्हा ही सुशिक्षित मिळवती मुलगी वडिलांपुढे आपली विवाहाची इच्छा सूचित करते. ‘संसार हे क्षणिक सुख आहे,’ असे म्हणणाऱ्या वडिलांबद्दल मनात म्हणते, ‘मला राग आला न् हसूही आले- आजपर्यंत सगळीच माणसं संसाराची असारता सांगत आली आहेत. बाबांनासुद्धा असं कुणी आधी सांगितलंच असेल की! पण ही चूकच अशी आहे, की कळूनसवरून प्रत्येकाला करावीशी वाटते..’ ती अनेक प्रकारे आई-वडिलांना दूषणे देते. ‘अंत:करणाचे रत्नदीप’ या कथेत कुरूप मुलीचा आई-भाऊ यांच्याकडून होणारा अपमान चित्रित झाला आहे. ‘प्रेम हे विष की अमृत’ या कथेत लोकवदंतेपायी, सुशिक्षित तरुण-तरुणींची अव्यक्त राहिलेली गुदमरलेली प्रीती आहे. आत्महत्येच्या टोकाला पोहोचलेली ही मुलगी म्हणते, ‘मी कुमारिका. जीव दिला तर लोक म्हणतील माझे वाकडे पाऊल पडले म्हणून मी जीव दिला. सरळ निष्पाप हृदयाची कुमारिकासुद्धा हीन लोकांना डागण्या देण्याची वस्तू वाटते. ‘छे:, मी नाही मरणार.’ इतर कथांमध्ये भावनांच्या भरात वाहून जाणाऱ्या मुलीची ससेहोलपट आहे. आईच्या विवाहबाह्य़ संबंधांमुळे मुलीचे मोडलेले लग्न आहे. भोवतालच्या वास्तवाला चित्रित करणाऱ्या या कथा ज्ञानकोशकार केतकरांसारख्या मूठभर सुधारकांनी उचलून धरल्या. इतरत्र वादळ उठले. असे लिहिणारी ही निलाजरी लेखिका कोण, याचा लोक जोरात शोध घेऊ लागले, पण थांग लागला नाही.

पुढील ‘हिंदोळ्यावर’ या कादंबरीत कायदा कोंडी करत असल्यामुळे, एका सुशिक्षित परित्यक्तेने विवाहाशिवाय मित्राबरोबर राहून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रण आहे. पुन्हा हाहाकार. विभावरीबाईंनी ‘जाई’ या कादंबरीत श्रमजीवी वर्गातली शिक्षकावर एकतर्फी प्रेम करणारी आणि त्यापायी अनेक प्रश्न ओढवून घेणारी शाळकरी मुलगी आहे. ‘शबरी’ या प्रेमविवाह करून समान पातळीवर संसाराला आरंभ करणारी, सुशिक्षित मिळवती स्त्री हळूहळू कुटुंबाच्या चार भिंतींत कशी जखडली जाते; ते चित्रित झाले आहे. ‘दोघांचे विश्व’ या कथासंग्रहातील निर्मलेच्या निमित्ताने स्त्रीच्या मातृत्वावर पुरुषप्रधान संस्कृतीचे नियंत्रण कसे आहे ते दाखवून म्हणतात, मंगलाक्षता पडल्या तरच मातृत्व पवित्र असतं नाही तर तो शाप होतो. रशियाला जाऊन आलेली चित्रा मोकळेपणाने म्हणते, ‘मला तेथली फक्त एकच गोष्ट आवडली. कुटुंबव्यवस्था. ज्यांनीत्यांनी आपलं कमवावं आणि मत्रीनं राहावं!’

विभावरी शिरुरकर शिक्षित स्त्री-मनाच्या कोंडीच्या विविध बाजू दाखवत गेल्या. त्यावरच्या वादळी चच्रेमुळे मराठी समाज हळूहळू खरेखुरे स्त्रीमन समजावून घेण्याच्या दिशेने पावले टाकू लागला. ‘बळी’ आणि ‘विरलेले स्वप्न’ या मालतीबाईंच्या कादंबऱ्या स्त्रीकेंद्री नाहीत. पण राजकारणाचे रेटे व्यक्तीव्यक्तीपर्यंत कसे पोहोचतात त्याचे दर्शन येथे घडते.

मातृत्व हे स्त्रीचे वैशिष्टय़ आहे. ते दूषण नाही, तसेच भूषणही नाही, असे मालतीबाईंचे मत होते. तिला संभोगसुख हवे असेल तर मातृत्व स्वीकारावे लागत होते. त्यामुळे आपल्या समाजातील आईपणाचा खूप गौरव, त्यांना पटत नाही. ‘मनस्विनीचे चिंतन’मधील एका निरीक्षण-लेखात मालतीबाई म्हणतात, ‘सगळ्याच आध्यात्मिक पुस्तकांत स्त्री पुरुषाला मोहात पाडते, ज्ञानमार्गापासून भ्रष्ट करते, तू स्त्रीकडे पाहू नकोस, तिला स्पर्शू नकोस इत्यादी सांगितलेले असते. पण इतकी अधम स्त्री माता झाली की एकजात सगळे तिचा कोण गौरव करतात! मला तरी हे गूढ उकलत नाही. स्त्री ‘कामिनी’ असते म्हणूनच ‘माता’ होते ना?’.. मातेचा गौरव झाला आहे तितकी तिची लायकी किंवा अधिकार तिला नव्हताच नि नाहीच.. शिक्षणाला वंचित ठेवलेली आई गुरूंची गुरू?.. शेकडो वर्षे जिला अज्ञानात ठेवली ती सुमाता कशी होणार?’

धर्म स्त्रीच्या मार्गात अडथळा आणतो, पण तिची प्रगती पूर्णपणे रोखण्याची ताकद आता धर्मात उरलेली नाही, असे मालतीबाईंना वाटत होते. अनाथ आश्रमांतील स्त्रियांचा अनेक प्रकारे अभ्यास केल्यानंतर ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ या प्रबंधरूप पुस्तकात त्या म्हणतात, ‘आता धर्म व देव यासंबंधीच्या भावनांचा ऱ्हास होत आहे. कार्य व कारण पाहण्याची चिकित्सक बुद्धी उत्पन्न झाल्याने आंधळ्या श्रद्धेने कोणताही आचार, विचार, नियमने यावर माणसाचा विश्वास बसणार नाही. यासाठी भावी स्मृतिकारांना समाज व व्यक्ती यांची कर्तव्ये सांगताना त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन समजावून द्यावा लागेल.. स्त्रियांची पुन्हा बालपणी लग्न करा, त्यांना घरात ठेवा, शिकवू नका हे स्त्रियांच्या अस्थिरतेवर उपायच नव्हेत.’

समानतेविषयी बोलताना एका मुलाखतीत मालतीबाई म्हणाल्या, ‘‘तुम्हाला अपत्य पाहिजे. बाई त्याला जन्म देते. त्याची स्वच्छता करण्याचं काम पुरुषानं करायला काय हरकत आहे? सगळी घाणीची कामं बाईनंच करायची? नìसगचा कोर्स बाईंसाठीच का? पुरुष आजाऱ्यांची सेवा पुरुषांनी करायला काय हरकत आहे?’’

मालतीबाईंची स्त्रीविषयक बंडखोरी त्यांच्या लेखनातून व्यक्त झाली. पण इतरत्रही त्या बंडखोरीने वागत होत्या. कॉम्रेड चितळे यांनी सुचवल्यावरून मालतीबाई एका मंडळाबरोबर १९५२ मध्ये रशियाला गेल्या. रशियन रेडिओ अधिकाऱ्यांनी रेडिओसाठी भारतीय स्त्रीस्वातंत्र्याचा इतिहास या विषयावर त्यांचे भाषण करायचे ठरवून मालतीबाईंकडे लेखी निबंध मागितला. मालतीबाईंनी लिहून दिला. भारतात पुरुषांनीच स्त्रीस्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले हा मालतीबाईंचा मजकूर बदलण्याची त्या अधिकाऱ्यांनी सूचना केली. कारण स्त्रियांनी आपली प्रगती स्वत:च केली अशी कम्युनिस्ट विचारधारा. मालतीबाई म्हणाल्या, ‘आमच्याकडची वस्तुस्थिती मी लिहिल्याप्रमाणेच आहे. माझे वडील, प्राध्यापक, अण्णा कर्वे या सगळ्यांना मी नाकारायचं?’ मालतीबाईंनी नकार दिला. त्यांचे भाषण रशियन रेडिओने स्वीकारले नाही. रशियन जनता सतत कोणत्या तरी दडपणाखाली आहे असे त्यांना वाटत असे. हे त्यांनी परत आल्यावर कम्युनिस्ट मंडळींपुढच्या व्याख्यानात सांगितले. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वत:ची नोकरी टिकवण्यासाठी मी पळपुटेपणा कसा केला तेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. ही बंडखोरीच होती.

मालतीबाईंच्या कोणत्याही पुस्तकात समाजविषयक अशी किती तरी मूलभूत निरीक्षणे आढळतात. स्त्रीस्वातंत्र्याची मूलभूत मागणी करणाऱ्या मालतीबाई आणि चित्रपट, नाटक क्षेत्रांत वावरणारे पती विश्राम बेडेकर यांचे संसारी जीवन तसे संघर्षमयच होते. पण त्यात मालतीबाईंची प्रतिभा आणि विचारशक्ती गुदमरली नाही. वयाच्या अठ्ठय़ाऐंशीव्या वर्षी मालतीबाईंनी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून ‘खरे मास्तर’ (१९९३) ही कादंबरी लिहिली. शैली आणि विचार दोन्ही बाजूंनी त्यांत कुठेही म्हातारपणाचा थकवा जाणवत नाही.

विसाव्या शतकातील महाराष्ट्रातल्या स्त्रीजीवन परिवर्तनाला त्या सक्रिय साक्षी होत्या.

निवडक पुस्तके

 कथासंग्रह

कळ्यांचे नि:श्वास, दोघांचे विश्व

 कादंबरी

हिंदोळ्यावर – कानडीत भाषांतर, विरलेले स्वप्न – गुजरातीत भाषांतर, उमा, बळी, जाई – हिंदीत भाषांतर, शबरी.

 निबंध

घराला मुकलेल्या स्त्रिया आणि काळाची चाहूल

मनस्विनीचे चिंतन (निरीक्षण लेख)

नाटकं

‘पारध’, ‘कलियुग ग बाई कलियुग’, ‘अलौकिक संसार’

chaturang@expressindia.com