25 November 2020

News Flash

पिरियड मॅन

‘‘भगवानने मुझे पनिशमेंट दिया है. ’’

‘‘ शालेय शिक्षण पूर्ण न केलेल्या रोशनीला त्याचं कारण विचारलं तर म्हणाली, ‘‘भगवानने मुझे पनिशमेंट दिया है. ’’ तिच्या वडिलांनी त्याचं कारण सांगितलं, ‘‘बच्चीयोंको महामारी (पाळी) शुरू हो तो हम उन्हे स्कूल नहीं भेजते..’’ तेव्हा  विचार सुरू झाला, आपल्याला याबाबत काय करता येईल. ठरवलं, कठीण नक्कीच आहे, पण पिरियड्सबद्दल बोलायलाच हवं. मग मुलींशीच बोलायला सुरुवात केली  पिरियड्सबद्दल, पिरियड्सदरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल, शारीरिक स्वच्छतेविषयी. चांगले अनुभव आले, अपमानही वाटय़ाला आले.’’ ‘पिरियड मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवीणचे हे अनुभव.

कुठल्याही सामान्य मध्यमवर्गीय घरात असतं तसंच वातावरण माझ्याही घरात होतं. ना कुणी समाजसेवेत, ना कुणी डॉक्टर.. माझे बाबा पिंपरी-चिंचवड शहरातल्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये काम करतात. आई सुशिक्षित गृहिणी आहे. मला धाकटा भाऊ आहे, बहीण नाहीच. एखादी बहीण असती तर तिच्या निमित्ताने तरी कधीतरी मासिक पाळीचा म्हणजेच पिरियडस्चा विषय निघाला असता किंवा तिच्याशी त्याबद्दल बोलणं झालं असतं, पण माझ्या बाबतीत ती शक्यताही नाही. त्यामुळे शाळा संपली, ज्युनियर कॉलेज संपलं तरी पिरियड्स हा विषय मला कधी शिवलाच नाही. पुढे इंजिनीअिरगचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा ग्रेड्स पुरता मला ‘ह्य़ुमॅनिटीज’ हा विषय अभ्यासक्रमात आला. त्यातून पथनाटय़, वक्तृत्व अशा गोष्टी सुरू झाल्या आणि समाजाचेही अनेक प्रश्न आहेत, त्यावर तरुण मुलांनी बोलायला हवं, आणि इतरांना सांगण्याआधी सुरुवात स्वत: करायला हवी या विचारातून माझ्यात थोडं थोडं समाजभान यायला लागलं असं मला आता विचार करताना वाटतं..

तशातच एकदा एका अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं मला ईशान्य भारतात जायची संधी मिळाली. कदाचित तिथे जाणं हाच माझ्या आयुष्यातला टìनग पॉइंट ठरला असं आता म्हणायला हरकत नाही. ईशान्य भारतातल्या आसाममध्ये फिरताना तिथल्या शाळा बघायचा योग आला. काही कुटुंबांना भेटायला मिळालं. शाळकरी वयातली मुलं भेटली तर त्यांच्याकडून भरून घेण्यासाठी एक प्रश्नावलीही आमच्याकडे होती. एका घरी आम्ही गेलो. पारंपरिक आसामी सिल्कच्या साडय़ा विणणाऱ्या विणकराचं ते घर होतं. तिथे त्या विणकराची १७-१८ वर्षांची रोशनी नावाची मुलगी साडी विणत होती. तिच्याकडून प्रश्नावली भरून घेताना कळलं तिने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं नाही. तिला त्याचं कारण विचारलं तर म्हणाली, ‘‘भगवानने मुझे पनिशमेंट दिया, तो मैं स्कूल नहीं जा पाई..’’ देवानं दिलेली शिक्षा, अशी कुठली बरं शिक्षा ज्यामुळे हिला शिक्षण सोडावं लागावं.. डोक्याला भुंगा लागून राहिला, पण विचारणार कुणाला आणि कसं. मग तिच्या वडिलांनाच विचारलं. त्यांनी सांगितलं, ‘‘बच्चीयोंको महामारी शुरू हो तो हम उन्हे स्कूल नहीं भेजते..’’ महामारी म्हणजे मासिक पाळी, पिरियड्स हे ईशान्य भारतातल्या एका स्थानिक मित्रानं सांगितलं.. टीव्हीपर जो पॅड का एडवरटाइज चलता है ना, ये उसी के बारेमें है असंही तो म्हणाला.. तिथून पुण्यात परत येईपर्यंत मी आपल्याला काय करता येईल हाच विचार करत होतो. इथे परत आलो आणि मी मासिक पाळीबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. ती कशी येते, का येते, तिचे स्त्रियांच्या आरोग्याला असलेले फायदे अशा सगळ्या बाजूंचा मी अभ्यास सुरू केला. तेव्हा लक्षात आलं, इथे या विषयावर कुणाला बोलायचंच नाहीये. मासिक पाळी हा काही उघड उघड बोलायचा विषय नाही. इथे घरातल्या माणसांशी त्यावर बोलणं अवघड, तर बाहेरून आलेल्या माझ्यासारख्या एखाद्या मुलाशी पिरियड्सबद्दल कोण, कसं आणि का बोलेल हा प्रश्न होताच. पण तरुण वय, त्यातही स्वत:मध्ये जग बदलायची ताकद आहे वगरे स्वरूपाच्या आशा-आकांक्षा यांच्या जोरावर मी ठरवलं होतं, काम करायचं तर पिरियड्सबद्दल बोललं जायलाच हवं.. कधीतरी कुठल्यातरी व्यासपीठावरून भाषणं देण्यापुरतं किंवा फेसबुक कॅम्पेनपुरतं नाही, तर अगदी नियमित, शक्य झालंच तर रोजच्या रोज..

आणि मग सुरुवात झाली. पिरियड्सबद्दल, पिरियड्सदरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल, शारीरिक स्वच्छतेबद्दल बोलायला मी सुरुवात केली. ओळखीच्या मुलींशी, माहितीतल्या मुलींशी फक्त तोंडओळख आणि प्रस्तावना करून मी बोलायला लागलो. काही मुली छान उत्तरं द्यायच्या. मोकळेपणी बोलायच्याही. पण कधीतरी नव्हे बऱ्याचदा ‘कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त अपमान’सुद्धा वाटय़ाला आलाय. पण ते अपेक्षितही होतंच.

मुळात कुठल्या वर्तमानपत्रानं दखल घ्यावी एवढं मोठं काम मी करत नाही. पण ज्या समाजात आई-वडीलही आपल्या मुलींशी पाळीबद्दल बोलणं शक्य नाही त्या समाजात मी बोलतोय, मुलींना ही बोलणाची सवय लावतोय एवढंच माझं श्रेय हे मी प्रामाणिकपणे नमूद करतो.. आसाममध्ये भेटलेल्या रोशनीमुळे मासिक पाळी, त्यातून समाजात खोलवर रुजलेली विषमता, त्यातून स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक या सगळ्यांशी माझा परिचय झाला आणि त्यामुळे मी या कामाकडे वळलो. म्हणून तिच्याच नावानं सुरुवात केली. ‘रोशनी’ ही आजही स्वयंसेवी संस्था म्हणून नोंद केलेली नाही. माझ्याबरोबर येऊन, पुढे जाऊन अनेकांनी स्वयंसेवी संस्थेची नोंदणीही केली, पण मला त्याची अजून तरी गरज वाटली नाही. सध्या तरी लोकांना बोलतं करणं आणि पिरियड्सबद्दल बोलणं ‘अ‍ॅबनॉर्मल’ नाही हे लोकांच्या गळी उतरवणं हाच माझा ध्यास आहे!

सुरुवात शाळेतल्या मुलांपासून करायची असं ठरवत मी त्या वयातल्या मुलांसाठी शाळांमध्ये जाऊन छोटी सेमिनार घ्यायला लागलो. आपल्या शरीरात होत असलेले बदल का आणि कसे होतायेत, त्यांच्याशी कसा सामना करायचा, त्या काळातली मानसिक आंदोलनं हे सगळं जसं मुलींच्या बाबतीत होतं तसं मुलांच्याही बाबतीत हे होतं, फक्त ते बोलता येईल अशी जागा नसते. त्यामुळे मी बोलायला लागलो तसा प्रतिसादही मिळायला लागला. मुलींना तुमची पहिली पाळी कधी आली, मग तेव्हा तुम्ही कापड वापरलं होतंत की सॅनिटरी नॅपकिन या प्रश्नांमध्ये सुरुवातीला वाटणारं अवघडलेपणही आता कमी झालंय, पहिल्यांदा पाळी आली तेव्हा आपल्याला कर्करोग आहे असं वाटून हात-पाय गळल्याचं सांगणारी मुलगी भेटली तेव्हा हसावं की रडावं हेही कळेना आणि आपण लैंगिक शिक्षण, पाळीबद्दलची जागृती या सगळ्याच बाबतीत किती मागे आहोत हेही प्रकर्षांने जाणवलं.. मला खंतही वाटते की, पाळीच्या काळात बाजूला बसावं लागणं असेल किंवा स्त्रीला पाळी येते म्हणून तिला मिळणारी दुय्यम वागणूक, यात बऱ्याच सुशिक्षित मुलींनाही काहीच गर वाटत नाही.

२०१५ मध्ये राष्ट्रकुल युवक कार्यकारिणीमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढवून मी आशियाई देशांचा प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून निवडला गेलो. अर्थातच, त्याचं श्रेय मी मासिक पाळी आणि काही प्रमाणात लहान मुलांच्या शिक्षणात करत असलेलं काम.. पण त्या व्यासपीठावर मला ५३ कॉमनवेल्थ देशांच्या युवक प्रतिनिधींना भेटायला मिळालं. तेव्हा लक्षात आलं, मासिक पाळीबद्दलचे ‘टॅबू’ फक्त आपल्याकडे नाहीत, तर बाहेरच्या अनेक प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांमध्ये ही ‘पिरियड्स’ हा न बोलण्याचाच विषय म्हणून ज्ञात आहे. स्वित्र्झलडच्या जिनिव्हामध्ये मी राष्ट्रकुल युवक कार्यकारिणीच्या कामासाठी गेलो होतो. तिथे एक स्थानिक वर्तमानपत्रात काम करणारी मुलगी माझी मुलाखत घ्यायला आली. ती संपल्यावर मी तिला तिचे मासिक पाळीचे अनुभव विचारले.. ती म्हणाली, ‘माझी पाळी सुरू झाल्यानंतर एक वर्षांनं माझी आई मला म्हणाली, नाऊ यू आर ए वुमन! तोपर्यंत माझ्या मत्रिणीनेच मला काय वापर, काय कर, काय करू नको हे सांगितलं आणि मदत केली. न्यूयॉर्कच्याही आधी वसलेल्या, राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या आणि साक्षरतेचं प्रमाण मोठं असलेल्या जिनिव्हामध्ये ऐकलेली ही गोष्ट धक्कादायक होती. झांबिया या देशातली गोष्ट त्यामानाने सुखद. भारतापेक्षा किमान ४० र्वष मागे असलेला हा देश. पण तिथे भेटलेल्या स्त्रीनं सांगितलं मासिक पाळी आलेल्या स्त्रीला कुठलीही कमीपणाची वागणूक आमच्या देशात दिली जात नाही. आमच्याकडे स्त्रिया आजही कापड वापरतात, पाळी संपल्यानंतर ते जाळून टाकलं जातं.. त्यामुळे आमचे पुढचे २८ दिवस चांगले जातात अशी आमची श्रद्धा आहे! झांबिया सारखा देश, जिथे राजधानीचं शहर सोडल्यास वाहतुकीचे पर्यायही उपलब्ध नाहीत तिथे ही गोष्ट ऐकायला मिळणं माझ्यासाठी आगळा अनुभव होता हे नक्की! नेपाळमध्ये मासिक पाळी आलेल्या स्त्रियांना घरात राहता येत नसे, चौपाली नावाच्या त्यांच्यासाठी बांधलेल्या झोपडीत त्यांना मुक्काम हलवावा लागत असे. त्यानिमित्तानं त्यांना मोकळीक मिळते, चार बायका भेटतात, गप्पा होतात. पण माझं मत, व्हाय अ‍ॅट द कॉस्ट ऑफ डिसक्रिमिनेशन?’  आणि हे स्वातंत्र्य आणि ही मोकळीक एरवी त्यांना मिळते का? पण याबद्दलचा विचार आता स्त्रियांनीही करायला हवा असं मला वाटतं. आपल्याकडे रस्त्यावर साडय़ा बांधून त्यांच्या झोपडय़ा करून राहणाऱ्या कुटुंबातल्या बाईलाही हे चुकत नाही आणि सुशिक्षित कुटुंबातल्या, फाइव्हस्टार बंगल्यात राहणाऱ्या बाईलाही हे चुकत नाहीच. हे बदलेल तेव्हा जग स्वत:ला पुरोगामी म्हणू शकेल.

मासिक पाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅड्सवर जीएसटी नको ही भूमिका घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र लिहिलं. तेव्हा मी अचानक प्रकाशात आलो. कोण प्रवीण निकम म्हणून न्यूज चॅनल्स आणि पेपर मला शोधत आले. पण तेव्हा माझाही मुख्य मुद्दा तसा दुर्लक्षितच राहिला. पर्यावरणपूरक साहित्य वापरून बनवलेल्या पॅड्सवर जीएसटी नको आणि प्लास्टिकचा वापर करून बनवलेल्या पॅड्सवर जीएसटी अधिक असावा हे माझं मत आहे, ते शक्य तितकं मांडायची धडपड मी करतो आहे, आणि करत राहीन. सध्या शाळांचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालयीन विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे गट या सगळ्यांच्यात मी जातो आहे. ‘रोशनी स्वयंसेवी संस्था म्हणून रजिस्टर करण्याचं’ कामही आता करायचं आहे. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट हाही एक जटिल विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका यांनीच याबाबत कायमस्वरूपी यंत्रणा सक्षमपणे उभ्या करायला हव्यात असं माझं मत आहे.. मी एकटा किंवा असे काही प्रवीण निकम काही करू शकत नाहीत. त्यासाठी प्रत्येक यंत्रणेनं आणि प्रत्येक व्यक्तीनं मुळात मासिक पाळी हा विषय बोलायला हवा, कारण तरच बाकी सगळं शक्य आहे..

प्रवीण निकम

bhakti.bisure@expressindia.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 5:07 am

Web Title: information about menstrual cycle 2
Next Stories
1 छायाचित्रण आणि भटकंतीचा मस्त मेनू
2 माझी आक्का
3 जगणं व्हावं गाणं
Just Now!
X