राजेंद्र आणि सुलभा मांजरेकर दोघंही पोलिओग्रस्त, अपंग; परंतु दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.. आज पंधरा वर्षांचं त्याचं सहजीवन त्यांच्यासारख्याच अनेक अपंग व्यक्तींच्या जगण्यात आनंद फुलवत अपंग नव्हे अभंग सहजीवनाचा संदेश देत आहे. या वेगळ्या सहजीवनाविषयी..

जिंदगी आसान नही है। उसे आसान बनाना है।
अंगारों पे चल। यही है खरी अकल॥

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

जीवनात आत्मबळ रुजवणारं हे संतवचन वाचायला सहज सोपं, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण. ‘आसान’ शब्दाची खोली किती? आणि ‘अंगारों पे चल’ पण किती काळ चालायचं? राजेंद्र मांजरेकर व त्यांची पत्नी सुलभा या दोघांनाही हे माहीत नाही तरीही त्यांनी ते भागधेय स्वीकारलं आहे. अपंग असूनही एकमेकांच्या साथीने आपलं वैवाहिक जीवन फुलवलं आहे.
राजेंद्र व सुलभा दोघंही लहानपणापासून पोलिओग्रस्त. सुलभांच्या दोन्ही पायांत जोर नाही. राजेंद्र यांचे दोन्ही पाय व उजवा हात कमकुवत झालेले. त्याही अवस्थेत ते दोघे आजही मुंबईतील सायनच्या ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’मध्ये कार्यरत आहेत. सक्रिय आहेत. अनेक अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचं काम ते दोघं मिळून करत आहेत. तीच त्यांची कर्मभूमी. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, कामामध्ये कुठेही अपंगत्व डोकावत नाही. याचं श्रेय त्या दोघांचं आहे. तसंच सहृदयी सुलभाताई वर्देचं आणि ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’चं आहे.
‘फाऊंडेशन’च्या ऑफिसमध्ये शिरलो की राजेंद्र शांतपणे संगणकावर काम करताना दिसतात. शांत, मितभाषी, आपल्या कामात गर्क. सुलभा वर्देयांनी राजेंद्र यांचे हेच गुण ओळखून त्यांच्यावर
‘फाऊंडेशन’च्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवली. तेथेच वर्कशॉपमध्ये सुलभा सॅनिटरी पॅड्स बनवताना दिसते. येथे दोघांचीही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ नसते. आज दोघंही आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असले तरी दोघांचाही इथपर्यंतचा प्रवास सुखावह नक्कीच नव्हता. राजेंद्रजी १३-१४ महिन्यांचे असतानाच त्यांना आलेल्या पोलिओच्या झटक्यानं त्यांना कायमचं अपंगत्व आलं. वडील बी.पी.टी.त पण मुंबापुरीत राहायला घर नाही. त्यामुळे राजेंद्र व त्यांच्या आईला गावी रहावं लागलं.
वयाची १७ र्वष राजापूर (कोकण) मधील आंबोळगड या खेडेगावात गेली. खेडेगावामुळे औषधोपचार फारसे नाहीत. शाळेची दिशा नाही. घरच्या घरी अभ्यासात प्रगती व्हायला लागली. दरम्यान, वडिलांना मुंबईत कॉटन ग्रीन येथील बी.पी.टी. कॉलनीत राहायला जागा मिळाली. मुंबईत आल्यावर शालेय जीवनाला गती मिळाली. ट्रायसिकल हीच मैत्रीण झाली. राजेंद्र म्हणतात, ‘‘ट्रायसिकल या मैत्रिणीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी माझ्या आयुष्याचं सारथ्य करू शकेन हे आत्मबळ मिळालं.’’
त्याच दरम्यान सायनच्या ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’मध्ये ते आले. तिथंच आयुष्याला कलाटणी मिळाली. आजपर्यंत नैराश्य, दु:ख, अपमान, एकटेपणा हे त्यांचे साथी होते. ते इथं आल्यानंतर निघून गेले. राजेंद्र सांगतात, ‘‘इथं आम्ही सर्वच समदु:खी, त्यामुळे एकटेपणा जाऊन आपुलकीचे बंध निर्माण झाले.’’ वर्कशॉपमध्ये काम करता करता ते बी.कॉम. झाले. ‘टॅली’चा कोर्स केला. त्याचा फायदा व्यवस्थापकपद सांभाळताना झाला.
प्रथितयश समाजसेविका उषाताई धर्माधिकारी यांचा ‘फाऊंडेशन’शी घट्ट स्नेहबंध. त्यांनी राजेंद्र व सुलभा यांना लग्न करण्यास सुचवलं. सुलभाही ट्रायसिकलने ‘फाऊंडेशन’मध्ये ये-जा करत असे. ‘फाऊंडेशन’ हेच तिचं जग, जगण्याची ऊर्जा होती. सुलभा शांत, संयमी, मितभाषी, समंजस पण स्वावलंबी. दोघांनाही कधी आपलं लग्न होईल, अशी शक्यता दूरान्वयेही स्पर्शून गेली नव्हती. राजेंद्रना राहायला घर नव्हतं, तर सुलभाच्या आईची जागा सर्व भावंडांनी सुलभाला दिली होती. सर्व विचारांती २८ जून २००० रोजी त्यांचा विवाह झाला आणि आज त्यांच्या सहजीवनाला
१५ र्वष उलटून गेली आहेत. लग्नानंतर दिनक्रमाला कलाटणी मिळाली. एका चाळीत चौथ्या मजल्यावरच्या घरात संसार सुरू झाला. पायात ताकद नसतानाही खाली बसून हाताच्या साहाय्याने एक एक ‘पाऊल’ टाकत जिने चढण्याचे कष्ट घराच्या ओढीने त्यांना कधी जाणवलेच नाहीत. दोघंही एकमेकांना समजावून घेत होते. संसाराची घडी नीट बसत गेली.
यथावकाश मातृत्वाच्या भावनेने सुलभाच्या मनाचा कब्जा घेतला. वर्देबाईंच्या मदतीने सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषधोपचार सुरू झाले. इच्छापूर्तीचा क्षण आयुष्यात डोकावला. बाळाची चाहूल लागली. ‘आनंद पोटात माझ्या माईना’ अशी दोघांची स्थिती झाली. राजेंद्र सांगतात, ‘‘आम्ही दोघंही आनंद, भीती, चिंता, काळजी यांनी भांबावून गेलो होतो. पुन्हा ‘फाऊंडेशन’ मदतीला धावून आलं. सायन हॉस्पिटलमधूनही सर्वतोपरी मदत मिळत गेली त्यामुळेच बिकट परिस्थितीतही सर्व त्रास सहन करू शकलो. सुलभाला आठव्या महिन्यातच त्रास सुरु झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची सर्वतोपरी काळजी घेणं माझं कर्तव्य होतच. त्या काळात मी सगळं सोडून फक्त तिची काळजी घेत होतो. तिला जपत होतो.’’
योग्य वेळी घराचं गोकुळ झालं. तुमचं बाळ छानच होणार हे डॉक्टरांचे शब्द खरे झाले. बाळ सुदृढ होतं. पण त्याला वाढवणं ही एक कसरतच होती. त्याच्या बाललीलांमध्ये सर्व त्रास विरून जायचा. तो शाळेत जाऊ लागला. पाळणाघरात राहू लागला. पण मधून मधून त्याला फीट्स येऊ लागल्या आणि दोघांची काळजी वाढू लागली. त्याला सोबत मिळावी म्हणून ते त्याला ‘फाऊंडेशन’मध्येही आणायचे. तो सर्व कार्यक्रमात अग्रेसर असे. आठ र्वष कापरासारखी चटकन उडून गेली. एखाद्याच्या नशिबात दुर्दैवाचं पारडं जड असतं. मुलाचं अकाली निधन झालं अन् दु:खाची कुऱ्हाडच कोसळली. कोणी कोणाला सावरायचं?
‘‘मी तर अगदीच कोसळलो.’’ राजेद्र सांगतात. ‘‘इतक्या प्रेमानं वाढवलेलं बाळ जगलं नाही. मला जगण्याची इच्छाच उरली नाही. वारंवार आत्महत्येचे विचार येऊ लागले. कशाला जगायचं? माझी मनस्थिती सुलभानं ओळखली. ती माझी समजूत घालायची. आपण जिवंत आहोत याचाच अर्थ देवाच्या मनात आपल्याकडून काही करवून घेणं असेल. तुम्ही हा अविचार टाळा. तिच्या सतत बोलण्याचा परिणाम म्हणून हळूहळू आत्महत्येचे विचार निघून गेले. पण तो काळ आमच्यासाठी खूपच कसोटीचा होता. मोबाइलवर मुलाने म्हटलेली गाणी ऐकत आम्ही दु:खं हलकं करायचो. काही महिन्यांतच तो मोबाइलही ट्रायसिकलखाली आला आणि ते क्षणही आयुष्यातून हद्दपार झाले. तेव्हाही सुलभा शांतपणे म्हणाली, परमेश्वराची तशीच इच्छा असणार..’’ सध्या हे दु:ख मांजरेकर जोडप्यानं मनाच्या कुपीत बंदिस्त केलंय.
सध्या दोघंही पहिल्या मजल्यावर राहतात. घर अगदी छोटं. नीटनेटकं. छोटेखानी घरामुळे ते व्हीलचेअर वापरूच शकत नाहीत. तरीही सर्व कामं लीलया पार पडतात. सुलभाने ओटा खाली करून घेतलाय. स्वयंपाक, धुणीभांडी सर्वच कामं सुलभा निगुतीने करते. ट्रायसिकलच्या मदतीने दोघं मिळून बाजारहाटही करतात. राजेंद्र घरकामात मदत करतात का? विचारताच सुलभाच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू आलं. ‘‘ते करायला तयार असतात. मीच करू देत नाही. मी घरी लवकर जाते. त्यांना खूप उशीर होतो. ते सतत काही ना काही शिकत असतात. त्यातच मला आनंद मिळतो.’’ सुलभाच्या नि:स्पृह प्रेमाची ही खूण.
राजेंद्रनाही प्रेमाचा रेशीमबंध उमगला आहे. एरवी अबोल असलेले राजेंद्र सांगत होते, ‘‘सुलभामुळे मला घरची अजिबात काळजी नसते. मला आता एम.बी.ए. करायचंय. सुलभाला सुखी ठेवायचंय.’’ दोघंही एकमेकांचा आधारवड झाले आहेत. दोघांवरही उत्तम संस्कार आहेत. सुलभाच्या आईच्या आजारपणात राजेंद्रांची खूप साथ मिळाली. राजेंद्रांचे आई-वडील, भावंडं तसंच सुलभाच्या बहिणीही अत्यंत प्रेमळ आहेत. सासर-माहेरचे सर्व जण त्यांच्या अडीअडचणीला हजर असतात, तसंच हेही त्यांच्या मदतीला धावतात.
राजेंद्र एक आठवण सांगतात. त्यांच्या भावाला पक्षाघाताचा झटका आला तेव्हा त्याला या दोघांनी याच पॅराप्लेजिक रुग्णालयात दाखल केलं. स्वत: अपंग असूनही सुलभाने त्यांची अगदी मायेच्या ममतेने काळजी घेतली. स्वत: अपंग असूनही त्याचं जेवण-खाणं, इतर सगळ्या गोष्टी तीच करायची. पाच महिने सतत एका रुग्णाला सांभाळणं तेही पक्षाघाताच्या, किती कठीण असेल पण सुलभाने ते चांगलं निभावून नेलं. जेव्हा तो स्वत:च्या पायाने चालत रुग्णालयातून गेला तेव्हाच तिने समाधानाने निश्वास सोडला. हे तिचं मोठेपण आहे. एकमेकांसाठी उभं रहाणं, सहजीवन यापेक्षा वेगळं का असतं?
‘‘आम्ही एकत्र आलो हे खरंच, पण ‘फाऊंडेशन’ने आम्हाला आत्मनिर्भर केलं. एकोपा शिकवला ,’’ राजेंद्रजी सांगतात, ‘‘शिवाय इथं एम.बी.ए.चे, आर्किटेक्टचे विद्यार्थी, डॉक्टर्स, समुपदेशक असे अनेक येतात, प्रेमाने बोलतात. जिव्हाळ्याने आमच्या अडचणी समजावून घेतात. आम्हीही समाजाचा एक घटक आहोत, यानेच आम्हाला उभारी मिळते. हीच ऊर्जा घेऊन आम्ही घरी जातो. सर्वच गोष्टी पैशाने मिळत नाहीत,’’ सुलभा सांगतात.
‘‘सुलभा, तुमच्या शांतपणाचं रहस्य काय? शनिवार, रविवार कसा घालवता?’’ विचारताच त्यांची कळी खुलली. हातातल्या कापसाशी खेळत म्हणाल्या, ‘‘हा कापूस नाही का सर्व काही टिपतो. तसं मनाची सुख-दु:खं टिपायला भगवंत आहे. रविवारी दोन तास मी आध्यात्मिक बैठकीला जाते.’’ तिच्या संयमी मनाचं इंगित यात दडलं असावं.
खरंच, दोघांचंही सहजीवन हे हृदय, बुद्धी व मन यांची सांगड घालणारं आहे. तिथून निघताना त्यांच्या जीवनाने दिलेला संदेश मला भावला, मनात रुजला.
का लाविसी बोल नशिबा दु:ख येता दारी।
दु:ख म्हणजे असे सुखाचा सख्खा शेजारी॥
sulabha.aroskar@gmail.com