|| डॉ. नीलम ओसवाल

हनुमानाच्या शक्ती लहानपणीच हरवल्या होत्या, पण जांबवंताने त्याला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली आणि मग हनुमानही ‘कोटी कोटी उड्डाणे’ घेऊ शकला.. असं आपलीच शक्ती हरवलेले अनेक जण ‘हनुमान कॉम्प्लेक्स’चे शिकार होतात. त्यांच्यातला ‘हेही दिवस जातील’ हा विश्वास नाहीसा होतो. माणूस सुखात असला तर त्याला हीच परिस्थिती कायम राहावी, अशी इच्छा असते, तर दु:खात असला तर हीच परिस्थिती टिकून राहील की नाही ही भीती. दोन्ही गोष्टी अ-स्वस्थतेला ओढूनच आणतात. त्यातून बाहेर पडायचे असेल, निरोगी ‘स्व’ तयार करायचा असेल, तर स्वत:च स्वत:ला बरे करायला हवे.. ‘हील दायसेल्फ’! नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘रिलॅक्सेशन डे’ निमित्ताने..

‘हील दायसेल्फ’ हा इंग्रजी वाक्प्रचार मराठीतल्या ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वाक्प्रचाराच्या जातकुळीतला! अगदी सुरुवातीला तो डिक्शनरीच्या पानांमधून हळूच डोकावलेला मी पाहिला. तेव्हाच त्याची एक गंमतही लक्षात आली. ‘हील दायसेल्फ’मधल्या शब्दांची फेररचना केली तर ‘हेल्दी सेल्फ’ तयार होतो. म्हणजे, निरोगी ‘स्व’ तयार करायचा असेल किंवा स्वस्थ व्हायचे असेल तर स्वत:च स्वत:ला बरे करायला हवे. पुढे कधी तरी कळले की प्रथमत: बायबलमधे वापरलेला हा वाक्प्रचार आहे, ‘Physician, heal thyself’ असा. भावार्थ असा की इतरांना सल्ला देण्याआधी स्वत:च्या चुकांवर काम करावे. मानसशास्त्रज्ञ म्हणून काम सुरू केले तेव्हा ‘हील दायसेल्फ’ सतत मनात रुंजी घालत होते.

‘हील दायसेल्फ’च्या अर्थाचे अनेक पदर स्पष्ट होतील, असे अनेक प्रसंग नंतरच्या काळात येत गेले. पहिला प्रसंग ‘इंडियन जर्नल ऑफ सायकॅट्री’च्या (आय.जे.पी.) एका अंकातील ‘हनुमान कॉम्प्लेक्स’ या लेखाच्या निमित्ताने सुरू झाला. चंदीगढ येथे काम करणारे ज्येष्ठ मनोविकार आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विग यांनी हा लेख लिहिला आहे. लेखाची सुरुवात रामायणातील हनुमानाच्या गोष्टीपासून होते. पवन-पुत्र हनुमानाला जन्मत:च मिळालेल्या अनेक शक्ती, विशेषत: त्याची उंच उड्डाणाची शक्ती, खटय़ाळ हनुमानाने काढलेल्या देवादिकांच्या खोडय़ा, त्याच्या कुरापतींनी तपोभंग झाल्यामुळे संतापून ऋषींनी दिलेला, ‘तुझ्या सर्व शक्ती नाहीशा होतील’ असा शाप, हनुमान-माता अंजनीच्या विनंतीला मान देऊन ऋषींनी दिलेला उ:शाप की ‘योग्य वेळेस योग्य व्यक्तीने आठवण करून दिल्यानंतर या शक्ती पुन्हा कार्यरत होतील.’ रामायणाच्या मुख्य कथेसोबत हे एक उप-कथानक येते.

रामाला त्याच्या अपहरण झालेल्या पत्नीला- सीतेला शोधायला मदत करायला निघालेली वानरसेना सीतेचा शोध घेत घेत अथांग महासागराच्या टोकाशी येऊन उभी राहते, तेव्हा हनुमानासाठी ती योग्य वेळ येते. या महासागराच्या पलीकडे असलेल्या लंकेत रावणाने सीतेला ठेवलेलं आहे. पण हा विशाल समुद्र पार करून तिथे पोहोचायचे कसे? सतत इकडे-तिकडे उडय़ा मारत असलेल्या कुणाही वानराला आपण एका दमात इतकी लांब उडी मारू शकू याची खात्री वाटेना. कुणाला वाटत होते, आपली उडी निम्म्या समुद्रापर्यंतच पोहोचेल. वानरसेनेतील वयोवृद्ध जांबवंत विचार करत होता, ‘तरुण वयात मला शक्य झालेही असते, पण आता नाही!’ मग एका कोपऱ्यात खिन्न बसून असलेल्या हनुमानाकडे पाहून तो म्हणाला, ‘‘तू असा शांत आणि उदासीन का? तुला माहीत आहे ना की, तू पवन-पुत्र आहेस. उडून जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यात पोहोचण्याचे सामथ्र्य तुझ्यात आहे.’’

वयोवृद्ध जांबवंताला हनुमानाची पूर्वकथा माहिती होती. ती सांगून हनुमानाला त्याच्यातील अफाट शक्तींची तो आठवण करून देतो. कथा ऐकता ऐकता हनुमानाला त्याचा आत्मविश्वास आणि शक्ती परत मिळते. आपल्या संपूर्ण सामर्थ्यांनिशी तो उड्डाण करतो आणि लंकेत सीतेजवळ जाऊन पोहोचतो. आणि त्याबरोबरच रामायणाची कथा हनुमानाच्या पराक्रमांसहित पुढे सुरू होते. ही कथा सांगून डॉ. विग लिहितात, ‘मनाने आजारी असणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती ‘हनुमान कॉम्प्लेक्स’ च्या शिकार झालेल्या असतात. स्वत:जवळ आयुष्यातील आव्हाने पेलण्याची ताकद असूनही काही ना काही कारणाने आत्मविश्वास हरवून गेलेल्या असतात. ‘उदास हनुमंताचे’ आयुष्य बदलण्याची शक्ती आपल्याकडे नाही तर ती त्याच्याकडेच आहे, पण तो तात्पुरता ते विसरून गेला आहे. मानसोपचारतज्ज्ञांचे काम जांबवंतासारखे. हनुमंताला त्याच्यातील सुप्त शक्तींची आठवण करून देण्याचे फक्त!

विचारांचा हा धागा पुढे नेताना वाटते, मुळात प्रत्येक व्यक्तीत असणाऱ्या शक्ती निरनिराळ्या. रामायणाच्या पटावर हनुमानाच्या शक्तींसाठी स्थान होते, तसे चिमुकल्या खारीच्या शक्तीसाठीही. मानसोपचारतज्ज्ञाचे काम प्रत्येक व्यक्तीमधील शक्ती काय असेल याचा शोध घेण्यापासून सुरू होते. त्या शक्तींची एकदा आठवण करून दिल्यानंतर मनाची मरगळ झटकून उड्डाण करण्यास आवश्यक असे जे बदल घडतात ते त्या व्यक्तीच्या अंतरंगात. त्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती स्वत:च स्वत:ला मदत करत असते.

हनुमानाच्या शक्ती हरवल्या त्या त्याने शक्तींच्या केलेल्या गैरवापरामुळे! अनेकांच्या शक्ती हरवतात त्या ‘हेही दिवस जातील’ हा विश्वास नाहीसा झाल्यामुळे. माणूस सुखात असला तर त्याला हीच परिस्थिती कायम रहावी, अशी इच्छा असते, तर दु:खात असला तर हीच परिस्थिती टिकून राहील की नाही ही भीती. दोन्ही गोष्टी अ-स्वस्थतेला ओढूनच आणतात. का असे होते? आजूबाजूला तर दिसते की कुठलीही गोष्ट सतत आहे तशी रहात नाही. बाहेरची नाही आणि अंतरंगातीलही नाही. मग एखादी गोष्ट सातत्याने आहे तशीच राहावी किंवा राहील या विचाराचे मूळ कुठे असावे बरे?

एखाद्याचा आलेला संताप फार काळ टिकत नाही, तेच कुणाबद्दल वाटलेल्या आत्यंतिक प्रेमाचे. टोकाचा राग निघून जातो, पण चिडचिडलेली मन:स्थिती जरा जास्त वेळ टिकते. या मन:स्थितीतील व्यक्ती मनाविरुद्ध काही घडलं की रुसत रहाते, चिडत रहाते. पण अशी मन:स्थितीही १-२ दिवसांचीच पाहुणी. पण जो/जी मनाविरुद्ध वागला त्या/तिच्याबद्दलची अढी मात्र महिनोन्महिने, वर्षांनुवर्षे राहू शकते. राखेखाली गाडला गेलेला निखाराच जणू. ‘ही माझ्याशी असं वागूच कशी शकली?’ हेच सतत या व्यक्तींच्या बोलण्यात डोकावत असते. सगळं ‘माझ्या मनासारखंच घडलंच पाहिजे!’ हा हव्यास एखादी गोष्ट सातत्याने आहे तशीच राहावी किंवा राहील या विचाराच्या मुळाशी असावा का? तथाकथित दृष्टीने त्रासदायक नसणाऱ्या आनंद, प्रेमादी भावना सातत्याने हव्याशा वाटणे हेसुद्धा मनाला अस्वस्थच बनवणारेच, पण त्याकडे तर अजिबातच लक्ष दिले जात नाही.

मनात खोलवर रुतून बसलेले हे काटेही बाहेर निघू शकतात, मन स्वच्छ, शुद्ध होऊ शकते, हा विश्वास विपश्यनेच्या अभ्यासाने आणि अनुभवाने मिळाला. मानवी आयुष्यातील दु:ख समूळ दूर करता यावे यासाठी २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने शिकवलेली ही ध्यान पद्धती अनेक गुरू-शिष्यांच्या परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचली. शारीरिक कष्टांनीही आपला श्वास बदलतो, तसेच मनात उमटणाऱ्या आनंद, राग, भीती इत्यादी तरंगांनीही श्वासात फरक पडतो. श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा. सतत सोबत असणाऱ्या श्वासाचे निरीक्षण करणे या गोष्टीपासून सुरू झालेल्या विपश्यनेने मनाचे अंतरंग उलगडत जातं. आपलाच श्वास आणि आपणच केलेले निरीक्षण. विपश्यनेशी झालेली ओळख हा ‘हील दाय सेल्फ’चे पदर उलगडवणारा पुढचा टप्पा.

कधीतरी वेळ मिळाला आणि शांतपणे आपल्याच मनाकडे पाहू गेलं तर लगेच लक्षात येतं, ‘पवन-पुत्रापेक्षाही’ आपलं मन अधिक चंचल. कुठही धावतं बेटं! कधी काल काय झालं तिथं रमतं, तर कधी उद्या काय करायचंय त्याकडे धावत सुटतं. दुसरं सर्वसंचारी आहे तर वाऱ्यासारखं सतत वाहात राहावं की त्यानं, पण तेही नाही! गत-काळात संचार करताना एखाद्या प्रसंगात ते गेलं, की पहिली त्याला विभागणी करायची असते, प्रसंग आवडीचा की नावडीचा अशी! आवडीचा प्रसंग त्याला पुन्हा पुन्हा हवा असतो. मग ते वर्तमानात डोकावून पाहातं. जे आवडलंय ते आत्ताच्या क्षणी नसेल तर बिचारं अस्वस्थ होऊन जातं. तेच भविष्यकाळासंबंधीही. मला जसं हवं तेच योग्य आहे, आणि ते उद्या घडेल ना या चिंतेनं व्यथित होऊन जातं. थोडक्यात, मनाच्या अस्वस्थपणाची बीजं वर्तमानात टिकून न रहाण्यात, अनावश्यक गोष्टी मनात साचवून ठेवण्यात आणि नसलेल्या गोष्टीची हाव धरण्यात!

मनाने स्वस्थ असणे, अस्वस्थ असणे आणि आजारी असणे असे मनाच्या अवस्थांचे तीन गट करता येतील. पैकी अस्वस्थ असणे आणि आजारी असणे यातली सीमारेषा फारच पुसट. भयगंड (Phobia), नैराश्य (Depression), छिन्नमनस्कता (Schizophrenia) इत्यादी मनाचे आजार बहुतेकांना नावाने तरी माहीत असतात. भीती, निराशा, उदासीनता इत्यादी मनाचे घटक माहीत नाही अशी व्यक्ती विरळा. फक्त आजारी मनात या घटकांची वारंवारता, तीव्रता, आणि कालावधी जास्त. मनाला अस्वस्थ बनवू शकणारे राग (एखादी व्यक्ती/वस्तू अजिबात नकोशी वाटणे), लोभ (एखादी व्यक्ती/वस्तू बद्दल अतिशय हव्यास वाटणे), मोह (एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती कधीच बदलणार नाही अस भ्रम असणे) ही मूळे मात्र तीनही (स्वस्थ, अस्वस्थ आणि आजारी) मन:स्थितीत सामायिक. मनातल्या या अस्वस्थ करू शकणाऱ्या घटकांची जाणीव असूनही जो त्यांना फारसे डोके वर काढू देत नाही, किंवा काढलेच तर वेळेत आवरते घ्यायला भाग पाडतो ते तथाकथित दृष्टय़ा स्वस्थ मन. बुद्धाने तर स्वानुभवाने सांगितले की मनाची अशी मशागत करता येते की या राग-लोभ-मोहादी विषारी घटकांना समूळ दूर करता येऊ शकते.

बुद्ध म्हणतात, जसे मनाला अस्वस्थ बनवणारे घटक मनातलेच, तसेच मनाला स्वस्थ बनवणारे घटकसुद्धा बीजस्वरूपात मनातच असतात. त्यापैकी प्रमुख म्हणजे सता किंवा सजगता. आजच्या परिभाषेत सांगायचे तर माईंडफुलनेस! प्रत्येक क्षणी मनात घडणाऱ्या विविध घटना म्हणजे मनातील विचार, भावना, शरीरावरील संवेदना यांबाबत सतत जागरूक असणे म्हणजेच सजगता. वर्तमानात अंतरंगात घडणाऱ्या गोष्टींबद्दल मन सजग राहायला लागले, की त्याचं इकडे तिकडे धावणं, तिथेच अडकून पडणं नि त्यामुळे अस्वस्थ होणं कमी व्हायला लागतं.

सजगतेत सातत्य राहिले तर अंतरंगातील आणि बा परिस्थितीबद्दलची वास्तविक परिस्थिती समजून घेता येते. ‘हील दायसेल्फ’ कार्यरत होते. अल्डस हक्सले या लेखकाने मागील शतकात लिहिलेल्या ‘द युटोपिया’ या कादंबरीत अशा एका आदर्श समाजाची कल्पना मांडली जिथे सर्वाना सतत सजग राहाण्याचा संदेश मिळावा अशी सोय करण्यात आली होती. मन:स्वास्थ्यासाठी पोषक अशा अनेक औपचारिक आणि अनौपचारिक व्यवस्था उपलब्ध होत्या. मुलांना मनातील भीती, औदासीन्य, चिंता इत्यादी ‘राक्षसांना’ दूर करण्याची तंत्रे शालेय शिक्षणातच पद्धतशीरपणे शिकवली जात होती. मुलांच्या भावनिक समस्यांना हाताळण्याची जबाबदारी जैविक पालकांच्या बरोबरीने शेजाऱ्यांचीही होती. अशा अनेक गोष्टी पायाभूत असूनही एखाद्याला मानसिक अस्वास्थ्य निर्माण झालेच तर मानसोपचाराची मदत उपलब्ध होती आणि ती घेण्यात कुणालाही वावगे वाटत नव्हते. मन:स्वास्थ्याच्या बाबत अशा आदर्शापासून आपला समाज कित्येक योजने दूर आहे.

‘हील दायसेल्फ’साठी उपयुक्त होतील असे अनेक घटक व्यक्तीमधे असूनही लोक कधी ना कधी अस्वस्थ होतात, आजारी पडतात, याचाच अर्थ नुसतेच हे घटक असून उपयोग नाही तर त्याचे पोषण सातत्याने आणि पद्धतशीरपणे करणे आवश्यक आहे. याबाबत व्यक्तिभिन्नता बरीच मोठी. काही जण सतत आत्मपरीक्षण करणारे. काही जण सतत मन:स्वास्थ्यासाठी उपयुक्त अशा एखाद्या प्रशिक्षणाचा शोध घेणारे. तर दुसऱ्या टोकाच्या काही जणांना वाटत असते, माझे जे चालू आहे ते उत्तमच चालले आहे, समस्या इतरांच्या स्वभावामुळे निर्माण झाल्यात. काही जण मन अस्वस्थ झाले आहे असे लक्षात येताच स्वत:च त्यांच्या आयुष्यातील जांबवंतासारख्या असणाऱ्या कुणाची तरी मदत घ्यायची ठरवतात. काही जण मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतात. तर काही जणांना वाटत असते माझे प्रश्न इतरांना सांगून काय उपयोग, ते माझे मीच सोडवायला हवेत. काही जणांसाठी विपश्यनेसारखी मनावर काम करण्यास उपयुक्त अशी शिबिरे सहायकारी होतात. तर काही जणांना अशा शिबिरांना जाणे हासुद्धा कमकुवतपणा वाटतो.

आत्मपरीक्षण एखादी व्यक्ती स्वत:चे स्वत: करत असो की मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने करत असो, मनाचे निरीक्षण करता करता एकदा का आपल्याच मनाच्या त्रासाबद्दल, त्याच्या कारणांबद्दल, त्याच्या परिणामांबद्दल अंतर्दृष्टी निर्माण झाली की होणारा त्रास गळूनच पडतो, पिकलं पान गळून पडावं तसा. हे लिहायला ५-७च वाक्ये लागली तरी बदलाच्या या प्रक्रियेसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येकाचा आरंभबिंदूही निरनिराळा. काही जणांच्या बाबत वर्तमानात होणारा हा त्रास इतका तीव्र स्वरूपाचा असतो आणि त्याने मेंदूतील रसायनांचे प्रमाणही इतके बदललेले असते की ते समप्रमाणात आणणाऱ्या औषधांचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. विश्लेषणात्मक दृष्टीच्या इतर काही जणांबाबत मात्र मानसोपचारकाची भेट ही सुपीक जमिनीत बीज पडावे इतकी सहज होऊन जाते.

काही काळापूर्वी टोकाचे मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीसाठी औषधे, ई.सी.टी. एवढेच उपचार उपलब्ध होते. परंतु आता मात्र मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात समुपदेशन, एखाद्या आजाराचे स्व-मदत गट, फोनवरील समुपदेशन, विवेकनिष्ठ वर्तनाचे प्रशिक्षण अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या चारेक दशकांत माईंडफुलनेस किंवा सजगतेचे उपयोजन मानसोपचारातही करून घेतले जात आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील विविध सेवा म्हणजे शुभार्थीमधील ‘हील दायसेल्फ’ यंत्रणेला चालना देणारी समाजातील व्यवस्था. ही सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे असते समोरच्या व्यक्तीचे म्हणणे तटस्थपणे, योग्य अयोग्य असा निवाडा न करता ऐकून घेण्याची क्षमता, समोरच्याचे दु:ख, अस्वस्थता सहानुभूतीने तरीही शांतपणे समजून घेणारी प्रगल्भता. या गुणांच्या आधारे मानसोपचारक शुभार्थी आणि त्याच्या संबंधात असा एक अवकाश निर्माण करतो जेथे तो/ती शुभार्थीला स्वत:च्या समस्येच्या विश्लेषणासाठी आणि समाधानासाठी मदत करू शकेल.

थोडक्यात एक शब्द-खेळ म्हणून जरी ‘हील दायसेल्फ’ या वाक्प्रचाराची ओळख झाली असली तरी त्याचा अर्थ फारच सखोल आहे. मानसोपचारकाची उत्तरोत्तर विकसित होत जाणारी ती एक भूमिका आहे. प्रत्येकाचा तो एक स्वतंत्रपणे चालू असलेला प्रवास आहे. जी जी व्यक्ती ‘माझेही’ मन कधीतरी अस्वस्थ बनू शकते या वास्तवाचा मनापासून स्वीकार करेल आणि ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मानसोपचार  वा मनोविकास पद्धतींची लवकरात लवकर मदत घेण्याची तयारी दाखवेल तिच्यासाठी ‘हील दायसेल्फ’ या आदर्शापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होत राहील.

neelvinchurni@gmail.com

chaturang@expressindia.com

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.)