News Flash

डार्क इज ब्युटिफुल

खरं तर नंदिता दास हिला कुठल्याही चौकटीत बंदिस्त करता येत नाही.

अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दास

नंदिता दास, संवेदनशील आणि चोखंदळ अभिनेत्री, दिग्दर्शिका. चित्रपट क्षेत्र हेच तिचं महत्त्वाचं आणि आवडीचं क्षेत्र, मात्र तरीही खटकणाऱ्या, समाजावर थेट परिणाम करणाऱ्या मानसिकतेचा तिने वेळोवेळी ठामपणे निषेध केला. त्यातलीच एक मोहीम ‘स्टे अन्फेअर, स्टे ब्युटिफुल’. सौंदर्याच्या पूर्वापार संकल्पनेवरच थेट प्रहार करत आपल्या जन्मजात रंगावर प्रेम करायला सांगणाऱ्या नंदिताविषयी.

चंदेरी दुनियेचं एक वेगळंच आकर्षण असतं. पण त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही. म्हणूनच त्याचा योग्य वापर गरजेचा. याच चंदेरी दुनियेचा योग्य पद्धतीने माध्यम म्हणून उपयोग करत सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भाष्य करत आपल्या स्वत:च्या मतांचा लखलखाट तयार करणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणजे नंदिता दास. खरं तर नंदिता दास हिला कुठल्याही चौकटीत बंदिस्त करता येत नाही. मग तिची एखाद्या विषयावरची मतं असोत की, चित्रपट क्षेत्रातील तिची भूमिका. आपण अपघातानं अभिनेत्री झालो आहोत आणि हेच माझं करिअर अशी आकांक्षा आपल्या मनात कधीही तयार झाली नाही, याची प्रांजळ कबुली नंदिता दास देते. नंदिता दास ही नाटक, चित्रपटांत काम करणारी एक उत्तम अभिनेत्री व दिग्दर्शिका म्हणून आपल्या सर्वाना परिचित आहेच, मात्र त्या पलीकडे ती सामाजिक कार्यकर्तीही आहे.

आतापर्यंत ३० हून अधिक चित्रपटांत तेही १० वेगवेगळ्या भाषांत काम करणारी चाळिशीकडे झुकलेली नंदिता दास ही एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री आहे. ‘फायर’, ‘अर्थ’, ‘बवंडर’ यांसारख्या विविध आणि खास करून चाकोरीबाहेरील भूमिका निवडण्यामुळे कधी तिच्यावर जहरी टीका होते तर कधी कौतुकही. नंदिता दास हिने साकारलेल्या भूमिकांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की, या भूमिका चाकोरीबाहेरील असल्या तरी त्या अनेकदा प्रवाहाच्या विरुद्धच जातात. नंदिता चर्चेत आली ती तिच्या दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ या चित्रपटाच्या वेळी. यात लग्नसंस्थेत फसलेल्या दोघी जणी एकमेकींच्याच प्रेमात कशा पडतात याची कहाणी तीही समलैंगिक संबंधांवर भाष्य करत पुढे सरकते. यातील एका समलैंगिक स्त्रीची भूमिका नंदिताने स्वीकारली आणि ती उत्तमरीत्या साकारही केली. अनेक अभिनेत्रींनी ही भूमिका वादग्रस्त मुद्दय़ांमुळे करणं टाळलं तर त्याच वेळेस या क्षेत्रात नवीन असूनही वादग्रस्त वाटणाऱ्या भूमिकेचं आव्हान तिने स्वीकारलं आणि जबाबदारीनं पेललंही. त्यावर अनेक उलटसुलट चर्चाही झाल्या. पण ती ठाम होती कारण ती नेहमीच स्वत:च्या विचारावर ठाम असते. तिचं हे वेगळेपण केवळ भूमिकांमधून समोर येतं असं नाही तर तिच्या ठाम आणि सुस्पष्ट विचारांमुळेही ते अनेकदा अधोरेखित होतं. तिच्या विचारांशी सुसंगत असलेल्या भूमिकाच ती निवडताना दिसते. केवळ वाद होऊन चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी नंदिता निश्चितच नाही. तरीही तिच्या अनेक भूमिकांबद्दल ती चर्चेत राहताना आपल्याला दिसते. मग ‘अर्थ’ असो किंवा ‘बिफोर द रेन्स’सारखे चित्रपट असोत. याबद्दल नंदिता दास सांगते की, ‘मुळातच चित्रपट सृष्टीत स्त्रीविषयी काही ठोकताळे ठरवले जाऊन तिला चाकोरीबद्ध केलं जातं. मी नेहमी स्त्रीला माणूस म्हणून जगासमोर कसं आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करते आणि पुरुषप्रधान असलेल्या आपल्या समाजात याला वेगळ्या स्वरूपाची चर्चा कदाचित त्यामुळे मिळते. विविधतेबरोबरच स्त्रीरूपाच्या विविध छटा आपल्याला दास यांच्या भूमिकेतून पाहता येतात. ‘सुपारी’ या चित्रपटात तर लेडी डॉनची भूमिका तिने साकारली तर ‘चोबीस घंटे’ या चित्रपटात आपल्याच वडिलांचे पैसे चोरून प्रियकराला नेऊन देताना स्त्रीचा भावनिक प्रवासच साकारला आहे. ‘कगार’ या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची बायको साकारताना स्त्रीच्या आणि समाजाने लादलेल्या दबावाखाली अडकलेल्या स्त्रीची भूमिका साकारलेली आहे. या सगळ्या भूमिकांबद्दल नंदिता भरभरून बोलते. कुठलीही अर्थहीन वरवरची भूमिका ती स्वीकारतच नाही. आपल्या कामात नेहमीच काही तरी अर्थपूर्ण असावं हा तिचा आग्रह सतत असतो. त्यामुळेच चकचकीत, चमचमीत आणि अर्थहीन कामापासून ती स्वत:ला दूर ठेवते. आलेल्या सर्वच भूमिका ती स्वीकारत नाही, त्या आपल्या विचारांच्या पट्टीवर घासून जेव्हा योग्य वाटतात तेव्हाच स्वीकारते. संख्येसाठी ती गुणवत्तेबाबत तडजोड करत नाही. ‘फिराक’ हा तिच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीचा पहिलावहिला चित्रपट गुजरात येथे झालेल्या दंगलीवर भाष्य करत मानवी भाव-भावनेचं चित्रण करतो. या चित्रपटास अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.  प्रॉडक्शन कंपनीबाबत बोलताना नंदिता सांगते की, ‘आपण चित्रपटांना काही साच्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. नाच, गाणी पाहणारे अनेक लोक आहेत. ती त्यांची आवड आणि पर्यायही आहे. हे वास्तव असलं तरीही १० टक्के लोक असेही आहेत ज्यांना खरोखरीच संवेदनशील विषयावरील अर्थपूर्ण चित्रपट आवडतात. त्या लोकांना पर्याय देण्यासाठी म्हणून ही कंपनी सुरू केली आहे.

तिच्या आगामी स्पॅनिश चित्रपटात ती एका बॉलीवूड अभिनेत्रीची भूमिका साकारते आहे आणि त्यासाठी सरोज खान यांनी सांगितलेल्या स्टेप्सवर ती आपल्याला नाच करताना दिसणार आहे. अशा पद्धतीने आवश्यक तिथे लवचीकपणा आणि आवश्यक तिथे ठामपणा, पण गुणवत्तेशी तडजोड न करता ती दाखवते. हा ठामपणा एकंदरीतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं.

भूमिकेबाबत जशी ती ठाम असते तितकीच ठाम आणि अधिक सुस्पष्ट ती तिच्या विचाराबाबत असते. ते विचार मांडायला ती मुळीच कचरत नाही, गरज पडलीच तर ती त्यासाठी रस्त्यावरही उतरताना आपल्याला दिसते. तिच्या याच वेगळेपणामुळे ती आपल्याला एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणून भावते तर त्याच वेळेस ती एक सामाजिक परिवर्तनाचा आयाम म्हणूनही समोर येते. तिच्या विचारात ठामपणा आणि सुस्पष्टता येण्याचं कारण कदाचित तिच्या बालपणात दडलेलं असावं. कलेच्या वातवरणात मोठी होणारी नंदिता आपली सुट्टी वडिलांच्या मूळ गावी ओडिसाला घालवत असे तर पुढचाच महिना मुंबईत. अशा प्रकारे दोन टोकांचं जीवन तिने बालपणीच अनुभवलं होतं. आई-वडिलांकडून प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य लहानपणीच अनुभवलेल्या नंदिताला कुठलीही असमानता त्यामुळे खटकते.

दिल्ली विद्यापीठातून ‘मास्टर इन सोशल सायन्स’ची पदवी घेतलेली नंदिता चित्रपटात अपघाताने आली तरी केवळ चित्रपटातून सामाजिक विषयांना हात घालून ती तिथेच थांबली नाही तर त्यावर शेवटपर्यंत ठाम राहिली. अभिनय करत असताना अनेक जण तिला सल्ला देत, ‘‘तुमचा रंग गव्हाळ आहे आणि तुम्ही चित्रपटात सुशिक्षित, काम करणाऱ्या स्त्रीची भूमिका करत आहात, पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला गोरे करू. गावाकडच्या अशिक्षित महिला काळ्या वर्णाच्या असतात.’’ या वाक्याने खरं तर नंदिताला संताप येतो. वरकरणी सर्वसामान्य वाटणारे हे संवाद म्हणजे आपल्या शोषण करणाऱ्या समाजाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे उच्चशिक्षित असणारी मुलगी गोरीच हवी. या धारणेमागे दडलेल्या जातीयवाद आणि वर्णभेदाचा वास तिला येत असे. असं असलं तरी ती संतापून, धावून जात नसे. कारण तिचा राग त्या व्यक्तीवर नव्हता तर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोणावर होता. ती शांतपणे उत्तर देई, ‘‘या भूमिकेसाठी जर माझी निवड झाली आहे तर मी आहे तशीच ती भूमिका करणार.’’ आपला रंग बदलून तिने कधीच घेतला नाही. त्यासाठी गरज पडलीच तर चित्रपटही सोडण्याची तिची तयारी असे. अशी ठाम भूमिका घेणारी नंदिता बहुधा एकमेव भारतीय अभिनेत्री असावी.

चेन्नईस्थित एका सामाजिक संस्थेने वर्णभेदाविरोधात मोहीम सुरू केली, तसेच या मोहिमेचा भाग म्हणून या संस्थेने जेव्हा नंदिताला तिचे फोटो वापरण्याची परवानगी मागितली तेव्हा अगदी आनंदाने या गोष्टीसाठी तिने होकार दिला. केवळ होकारच दिला नाही, तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ही मोहीम आणि तिचा विचार मांडला. ‘डार्क इज ब्युटीफुल’ या ओळीने तिने चळवळीला आपला पाठिंबा दर्शविला. या चळवळीमागची भूमिका स्पष्ट करताना नंदिता सांगते की, ‘वर्णभेद हा वरकरणी जरी आपल्या समजात नसला तरी तो अजूनही अस्तित्वात आहे. हे सांगण्यासाठी आपल्याकडच्या गोऱ्या बनवायचा दावा करणाऱ्या प्रसाधनांची संख्याच बरीचशी बोलकी आहे. का इतक्या मोठय़ा प्रमाणावर ही प्रसाधनं विकली जातात? का स्त्रियांना गोरंच व्हायचं असतं? अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर केवळ गोऱ्या मुलीच का? यामुळे अनेक काळ्या रंगाच्या मुलींच्या आत्मसन्मानाला तडा तर जातोच त्या बरोबरीने त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो. या वर्णभेदामागे जातीयवादही दबलेल्या पावलांनी येतो, हे सामान्य लोकांना कळत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांची पदवी घेत असताना नंदिताने अनेक सत्यं अनुभवली होती. वाडीवस्तीवर जिथे गोरगरीब राहतात, मोलमजुरी करून आपले दिवस भागवणाऱ्या घरातही तिला ही प्रसाधनं दिसत. या प्रसाधनांपेक्षा त्याच पैशात घरातल्या मुलांसाठी दूध आलं तर ते आरोग्यास नक्कीच चांगलं. मात्र असं असतानाही प्रसाधनांनाच प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसून येतं. याच सगळ्याचा विरोध म्हणून तिने ‘डार्क इज ब्युटीफुल’, ‘स्टे अन्फेअर, स्टे ब्युटिफुल’ या चळवळीचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर करायला सुरुवात केली. काळ्या वर्णाच्या विरुद्धचा वर्णभेद थांबवणं हेच या मोहिमेचं ध्येय आहे. त्यासाठी  गोऱ्या बनवण्याचा दावा करणारी प्रसाधनं तसेच त्या प्रसाधनांची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करण्याचा विरोध ती करते. आतापर्यंत गोऱ्या रंगासाठी स्त्रियांना आकर्षित केलं जायचं आता मात्र पुरुषांनाही यात सामील करून घेण्यात येत आहे. ही बाब तिला चिंताजनक वाटते. दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढतच चालल्याचं दिसून येतंय. ‘काखेखालची जागा’, अगदी ‘योनीजवळची जागाही गोरी करा’ अशा प्रकारची प्रसाधनं बाजारपेठेत येत आहेत आणि त्यासाठी ज्या पद्धतीच्या जाहिराती केल्या जाताहेत त्या खरं तर गोंधळ निर्माण करणाऱ्याच आहेत. एका मुलाखतीत ती सांगते की,  आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असलो तरी काही सामाजिक भान प्रत्येकानेच पाळलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला वादात ओढण्यापेक्षा मुद्दय़ांवर चर्चा करण्यात जास्त भर दिला जावा. सामाजिक दृष्टिकोन कसा बदलता येईल यावर बोलणं जास्त उत्तम, कारण या वर्णभेदामागे असलेले लिंग भेद राजकारण, अर्थकारणातील राजकारण, जातीयवाद, असमानता हे सगळेच मुद्दे येतात आणि ते नीट समजावून घेतले पाहिजे. मुळातच काळा रंग हा नैसर्गिक असताना त्याला उगीचच कुरूप बनवलं गेलं आहे. ही गैसमजूत सुधारायची सोडून, उलट आपल्या नफ्यासाठी या गैरसमजुतीचा मोठा बाजारच मांडलेला आपल्या दिसून येतो आणि या बाजारामुळे अनेकांच्या आयुष्याची हानी होते.’  समाज तुम्हाला सांगतो की सुंदरता म्हणजे काय? आणि त्या सुंदरतेच्या व्याखेत बसण्यासाठी अनेक स्त्रिया प्रयत्न करतात. त्यात त्या खरं तर स्वत:लाच हरवून बसतात. खरं तर सुंदरतेची व्याख्या स्वत:साठी स्त्रियांनी स्वत: करावी. ‘स्टे अन्फेअर, स्टे ब्युटिफुल’ हेच तिच्या मोहिमेचं घोषवाक्य आहे. आहात तशाच सुंदर दिसा आणि आत्मविश्वासाने वावरा, असं ती सांगते. आपल्या चळवळीतून आख्ख्या सौंदर्यप्रसाधनाच्या बाजारपेठेलाच नंदिताने आव्हान दिलं आहे.

नंदिता दास ही केवळ या मोहिमेसाठी लढते आहे असं नाही तर अनेक सामाजिक विषयांवर ती ठामपणे बोलताना दिसून येते. खास करून बालहक्क व स्त्रियांचे हक्क हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय. महिला आरक्षणाच्या विधेयकाला संमती मिळावी म्हणून जंतरमंतर दिल्ली येथे झालेल्या मोर्चातही तिने आपला सहभाग नोंदवला. अशा प्रकारे आपल्या विचारांवर ठाम असणाऱ्या या नंदिता दासला कुठल्याही चौकटीत बसवणं शक्य नाही.

कलेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरांवर पोहोचलेली नंदिता तितकीच प्रतिभासंपन्न अभिनेत्री दिग्दर्शिका आहे, त्याबरोबरीनं मानवी हक्क कार्यकर्तीही. अनेक पुरस्कार, सन्मान आणि विविध पदं भूषविलेली नंदिता दास खऱ्या अर्थाने परिवर्तनासाठी लढणारी एक सामाजिक कार्यकर्तीही. अशी ही विचारवंत, संवेदनशील, सामाजिक अभिनेत्री. आपली स्वत:ची एक वेगळीच अभेद्य छाप ठेवत ती आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहते.

प्रियदर्शनी हिंगे priya.dole@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:50 am

Web Title: international womens day 2017 bollywood actress nandita das
Next Stories
1 संधिप्रकाशातल्या संधी
2 ‘अज्ञ’ लक्ष्मीबाई
3 भारतीय मुस्लीम स्त्री : संघर्ष ‘स्व’शी
Just Now!
X