जेसिका स्टर्न, बलात्काराची एक घटना तिचं आयुष्य पार उलटं पालटं करून गेली, पण तिने आपल्या वेदनेलाच लेखणीचं माध्यम ठरवत दहशतवाद, हिंसा यांच्या मागचं सत्य जगापुढे आणलं. त्यासाठी ती अनेक देशातल्या दहशतवाद्यांना भेटली, त्यांच्या मुलाखती घेतल्या. तिची ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा प्रवास ठरली आहेत. त्यासाठी तिला स्वत:मधल्या भीतीशी आधी लढावं लागलं. त्यावर मात करत, निर्भय होत जगभरातल्या पीडितांना आधार देणं, निर्भय करणं हेच तिनं आता आपलं जीवित कार्य ठरवलं आहे.

‘‘तो दिवस होता, सोमवार. तारीख १ ऑक्टोबर १९७३. माझी सावत्र आई लिसा माझ्या सावत्र बहिणींना घेऊन बाहेर जेवायला गेली होती. मी आणि माझी सख्खी बहीण सारा घरीच होतो. लिसाने आम्हाला आमचा ‘गृहपाठ करा,’ असं सांगितलं होतं. आम्ही दोघी आज्ञाधारकपणे आमचं काम करीत होतो. तेवढय़ात एक माणूस आत आला. त्यानं आम्हाला पिस्तूल दाखवलं व म्हणाला, ‘किंचाळू नका. खाली बघा.’ अर्थातच मी खाली बघितलं. मग म्हणाला, तो आम्हाला इजा करणार नाही. आम्ही गप्प बसायचं. ब्र काढला तरी तो आम्हाला ठार करेल. मग शांत राहून, समजूतदारपणे खाली मान घालून, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही जिना चढून वर गेलो. आमच्या पाठीला त्याचं पिस्तूल टेकवलेलं. त्यानंतर त्याने जे जे काही करायला सांगितलं ते ते आम्ही केलं. नंतर त्यानं माझ्यावर बलात्कार केला. मला काही कळेनासं झालं. मी भानरहित अवस्थेत गेले का? मी त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत होते का? असेन बहुधा. तसंच असेल!

पण आज्ञाधारकपणे वावरणारी ती ‘मी’ कुणी तरी वेगळीच होते. माझ्या वागण्यात विचार आणि कृती यांचा मेळच नसावा. ज्याने माझ्या मनाचा ताबा घेतला, त्यानं माझ्या शरीराला निष्क्रिय, मूक आणि शांत राहण्याची आज्ञा दिली. किती वेळ गेला? माहीत नाही. कुणाचा आवाज? माझ्या बहिणीचा? वेदनेनं मला बाहेर काढलं. तिचं रक्षण मला करायचं होतं; पण त्याने तर आपला कार्यभाग तिच्या बाबतीतही साधला होता. मी भानावर आले; पण ‘ती’ मीच होते का याविषयी मला शंका आहे. तो म्हणाला, ‘पोलिसांना सांगू नका, आणखी गोत्यात याल.’ मी मान डोलावली. तो जाताना म्हणाला, ‘हे तर खेळण्यातलं पिस्तूल आहे.’ गाडीचा आवाज आला. तो गेला. सारा, माझी लहान बहीण आधी भानावर आली. तिने फोन फिरवला. फोन बंद. मी सैरभैर झाले. बलात्कारानंतर मी सुन्न अवस्थेत गेले. सारानेच सावरलं. बाहेर थंडीचा कडाका. तरी तिनंच बाहेर नेलं आणि एका हॉटेलमधून आम्हाला सांभाळणाऱ्या दाईला फोन केला. तिचा कसा विश्वास बसणार? आम्ही सुरक्षित गावात, चांगला शेजार असणाऱ्या घरात होतो; पण ती आली, फॅमिली डॉक्टरांना बोलावून तिनं आम्हाला दवाखान्यात नेलं. आमचे डॅड तेव्हा नॉर्वेला होते. ते कधी तरी आले, पण त्या वेळेपासून माझं जगच बदललं. अजूनही मी माझी मला पूर्णपणे सापडलेले नाहीये..’’

..अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना. ती सांगतेय अमेरिकन संशोधक, अभ्यासक डॉ. जेसिका स्टर्न. अमेरिकेतल्या कॉन्कॉर्ड या सुप्रसिद्ध गावात राहणारी. वयाच्या पंधराव्या वर्षी झालेला हा आघात तिनं आणि तिच्या बहिणीनं कसा पचवला असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तासभर तिथे असणाऱ्या त्या बलात्काऱ्याने दोघी बहिणींवर बलात्कार केला. त्या एका तासात जेसिका पार बदलून गेली. तिच्या आठवणी तिने ‘डिनायल- अ मेमॉयर ऑफ टेरर’ – या नावाने प्रकाशित केल्या आहेत. त्या घटनेनंतर ती पुन्हा कशी उभी राहिली, आपलं मन ताळ्यावर आणून आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती कसा करत राहिली याची ही कहाणी आहे. ती वाचताना तिच्याबद्दल दु:ख तर होतंच, पण तिच्या धाडसाबद्दल अभिमानही वाटतो, कौतुक वाटतं, आयुष्याचा वेगळा अर्थच जणू सापडतो.

तो क्लेशकारक प्रसंग घडल्यावर त्या दोघी बहिणी एकमेकींना धरून होत्या. साराला तर किती तरी दिवस एकटीला झोपायची भीती वाटे. आपल्या घरात सगळे निर्भय आहेत. आपण भिऊन कसं चालेल, डॅड रागावतील या दडपणाने त्या तो प्रसंग मनाच्या तळात दडवत राहिल्या. काळ कुणासाठी कधी थांबत नाही. सावत्र आईने या काळात त्यांना सांभाळले, त्यांना समजून घेत जीवनचक्र चालू ठेवलं. दोघींची शिक्षणं झाली, लग्नं झाली. मुलं झाली. वरवर पाहता ठीक होतं; पण आपल्यासारखं कुणी भीतीला कवटाळून राहू नये, भीती व त्यातून येणारी निराशा लपवू नये, असं काही तरी करायची सुप्त इच्छा जेसिकाच्या मनात होती.

‘मग त्यासाठी तिनं काय केलं?’ असं विचारण्यापेक्षा ‘काय केलं नाही तिनं’ असंच म्हणायला हवं. शाळा संपवून ती कॉलेजमध्ये गेली. त्यानंतर १९८५ मध्ये तिने बर्नार्ड कॉलेजमधून रसायनशास्त्रात बी.ए. केलं. तेव्हा तिचा दुय्यम विषय होता- रशियन भाषा. १९८८ मध्ये अमेरिकेच्या एम.आय.टी. या सुप्रसिद्ध संस्थेतून एम.एस. केलं ते केमिकल इंजिनीयिरगमध्ये. त्या वेळी तिचा विशेष विषय होता, अमेरिकेची तंत्रज्ञानविषयक धोरणे. १९९२ मध्ये तिनं हार्वर्डमधून पीएच.डी. मिळवली ती लोकहितवादी (सार्वजनिक) धोरणांच्या विशेष विषयात.

खरं म्हणजे तिला लेखनाविषयीचा अभ्यासक्रम घ्यायचा होता; पण त्यासाठी आवश्यक तेवढे गुण तिला मिळाले नाहीत. रसायनशास्त्र हा तिचा दुसरा आवडीचा विषय होता. तिने रसायनशास्त्रात काम करताना रासायनिक शस्त्रांवर संशोधन केलं, पण तिची तिला जाणीव होत होती की, आपल्याला काही वेगळं शोधायचं आहे. शिकत असतानाच दहशतवाद, हिंसा आणि माणसांमधील खलप्रवृत्ती यांचा अभ्यास करण्याचं तिनं मनावर घेतलं आणि १९८३ मध्ये दहशतवादावरील पहिला लेख तिने लिहिला. टॉक्सिक केमिकल्सचा वापर व केमिकल प्लान्ट्सवरील दहशतवादी हल्लय़ांच्या शक्यतेबद्दल सरकारला सावधानतेचा इशारा देणारा तो लेख होता.

राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंन्टन यांच्या कारकीर्दीत तिने ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ या अमेरिकेच्या उच्च पातळीवरील सुरक्षा समितीत काम केलं ते रशिया, युक्रेन आणि युरेशिया यांच्या बाबतीतील धोरण समितीची संचालक म्हणून. १९९२-१९९४ या काळात ‘लॉरेन्स लिव्हमोर नॅशनल लॅबोरेटरी’मध्ये खास विश्लेषक म्हणून ती काम  करीत होती. ते करीत असताना, रशियामधील काही राजकीय घडामोडींमुळे दहशतवाद्यांच्या हाती, अणुशस्त्रांसंबंधित सामग्री लागण्याची शक्यता आहे व ते घातक ठरू शकेल, असा धोक्याचा इशारा तिने दिला होता.

२००१ मध्ये ‘टाइम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने तिची जगातील सात विचारवंतांमध्ये निवड केली. त्यासाठीचा निकष होता, आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील असे विचारवंत! माणसांवरील आघात (ट्रॉमा) आणि हिंसा यावर तिने जे लेखन केलं त्यासाठी तिला २००९ मध्ये प्रतिष्ठित अशी ‘गुगनहाईम फेलोशिप’ मिळाली. त्यानंतर आजपर्यंत दहशतवाद, हिंसा व माणसांमधील खलप्रवृत्ती यांचाच ती अभ्यास करत आहे. या विषयातील जागतिक पातळीवरील तज्ज्ञ अशी तिची ख्याती आहे. जनकल्याणासाठी, मानवतेसाठी उपयुक्त असे संशोधन करून तिने काढलेले निष्कर्ष अमेरिकन सुरक्षा खात्यास साहाय्यकारी ठरले आहेत.

आजवर तिची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या मुलाखतींवर आधारित पहिले पुस्तक, ‘द अल्टिमेट टेररिस्ट्स’ (२००१), ‘टेरर इन द नेम ऑफ गॉड- व्हाय रिलिजस मिलिटन्टस् किल’ (२००४), ‘डिनायल’ (२०१०) आणि दीडेक वर्षांपूर्वी आलेलं ‘इसिस- द स्टेट ऑफ टेरर’ (२०१५).

ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा  प्रवासच आहे म्हणा ना! पण केवळ तेवढंच नाही. दहशतवाद्यांच्या मुलाखती घेण्यासाठी ती जगभर फिरली. सौदी अरेबिया, आखाती प्रदेश, पाकिस्तान, भारत, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, यासारख्या देशांमधून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेटी, त्यांच्या प्रमुख, दुय्यम नेत्यांना भेटणं, प्रश्नावली देऊन उत्तरं मिळवणं अशा अनेक मार्गाचा अवलंब करत ती गेली.

धार्मिक दहशतवादाचा फार बारकाईने तिने विचार केला आहे. त्याची वेगवेगळी रूपे, त्यामागची कारणे कोणती, त्या संघटनांमधील नवीन भरती कशी होते, त्यांचे क्रौर्य कशातून जन्माला येते हे सांगताना त्यांच्या दृष्टीने सत् आणि असत् यांचे सापेक्ष रूप कसे ठरवले जाते, सामान्य जनतेलाही त्यांचे आकर्षण कसे व का वाटते अशा अनेक गोष्टी तिने यात वर्णन केल्या आहेत. भाषा अगदी सोपी, लिहिण्यातली तळमळ व अचूकता यामुळे तिची पुस्तके ‘वाचलीच पाहिजेत’च्या यादीत पहिल्या दहांमध्ये राहिली.

इसिस या संघटनेच्या जन्मापासून तिचे रूप कसे होते, कसे आहे, इतर दहशतवादी संघटनांपेक्षा तिची कार्यप्रणाली कशी वेगळी आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाचा वापर त्यांनी किती प्रभावीपणे केला आहे याचे अतिशय सखोल विवेचन तिच्या या पुस्तकात दिसते. त्यांच्याविरुद्ध आपणही सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करू शकतो हे ती सांगते.

दहशतवाद हा आज आपल्यासाठी दूरस्थ विषय राहिला नसून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे, कारण तो आपल्या घरात आला आहे. त्याचे रूप विलक्षण क्रूर व भीतीदायक आहे, ते तुम्हाला विळखा घालत आहे तेव्हा सावध राहण्याचा इशारा जेसिका आपल्या लेखनातून सतत देत आहे. यासाठी सरकारी उच्च स्तरावरून तिचे प्रयत्न चालू आहेत. तरीही या साऱ्या उज्ज्वल कारकीर्दीतही तिचं मन अस्वस्थ होतं. तिचं तिला ते कळत होतं. तिला हळूहळू जाणवत होतं की, आपण एकीकडे करारी, निर्भय अधिकारी असलो तरी दुसरीकडे बलात्कारपीडित, लज्जेनं काळवंडलेली एक जेसिकाही आपल्यात आहे. ‘तिला’ आपल्यातून बाहेर काढून मोकळी करणं भाग आहे. आपल्याला दहशतवादाची भीती वाटतेय का? असेल तर ती विघातक आहे, ती काढून टाकायला हवी. तसं होत नाही तोवर आपण असं दोन स्तरांवर जगत राहणार का? अशा विचारांनी ती मध्येच सैरभैर होई. अतिशय भीती आणि आत्यंतिक आनंद या भावना देखील तिला अनुभवता येत नव्हत्या. तिच्या साऱ्या भावनाच जणू गोठून गेल्या होत्या.

जेसिकाने दहशतवाद व हिंसा असा विषय जेव्हा निवडला त्या वेळी हा काही अभ्यासाचा विषय म्हणून निवड करण्याजोगा नाही असंच साऱ्यांचं मत होतं. शिवाय स्त्रियांनी यात काम करणं ही गोष्ट असंभवनीय असंच साऱ्यांना वाटत होतं. तिला मात्र याच विषयात काम करण्याची आतून इच्छा होती. असं का? दहशतवाद या विषयात मला का आवड वाटते? त्या विषयाकडे वळताना मला भीती कशी वाटली नाही? असे प्रश्न तिला आधी पडले नव्हते; पण भूतकाळात घडलेल्या बलात्काराच्या त्या घटनेनंतर तिच्यावर झालेला जो परिणाम होता, त्यामुळे ती नकळत या विषयाकडे वळली होती. हा एक विरोधाभासच होता. मोठय़ा आघातानंतर येणाऱ्या तणावामुळे माणसाचे वागणे बदलते. अनेकदा त्याच्या वर्तनात जाणवेल-न जाणवेल अशी विकृती निर्माण होते. त्याला पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर (ढळरऊ) असे म्हणतात. तिचं तिला हे कळायला, किंबहुना तिला ते स्वीकारायला मात्र तब्बल तेहेतीस वर्षांचा काळ जावा लागला.

खरे म्हणजे १९७३ मध्ये पोलीस चौकीत या बलात्काराच्या गुन्ह्य़ाची नोंद झाली. त्याआधी तेथील आजूबाजूच्या परिसरात १९७१ ते १९७३ या काळात तेथे बलात्कारांच्या ४४ पेक्षा अधिक घटनांची नोंद झाली होती असे पोलीस फाइलमध्ये दिसते; परंतु पोलिसांना तेव्हा त्यात काही धागा सापडेना. त्यांनी ती फाइल बंद केली होती. २००६ मध्ये जेसिकाविषयी आस्था असणारा, शाळेतील तिचा वर्गमित्र, पोलीस अधिकारी होता. तो तेथे आला आणि त्याने ती बंद फाइल परत उघडली. तिच्याशी संपर्क साधला. पाठपुरावा करत हे सारे बलात्कार एकानेच केले हे दाखवले. मात्र त्याआधीच अमली पदार्थाचे सेवन करण्याच्या गुन्ह्य़ासाठी त्याच गुन्हेगाराला अठरा वर्षांचा तुरुंगवास झाला होता, त्याने बाहेर आल्यावर आत्महत्या केली, हेही तिला कळले. ती एक प्रकारे मुक्त झाली.

आतापर्यंत तिच्या लक्षात आले होते की, कोणत्याही भयानक प्रसंगात आपल्याला भीती वाटत नाही, पण विशिष्ट गंध, क्षुल्लक पण विशिष्ट आवाज, यांच्यामुळे आपण अत्यंत घाबरतो. तसेच दहशतवाद्यांच्या मुलाखती घेताना, दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना भेटताना भीती वाटत नाही हे खरे, तरी आपण अनैसर्गिकरीत्या शांत राहतो. त्यावरची एक उपाययोजना म्हणून, मानसशास्त्रज्ञांच्या सल्लय़ानुसार तिने या नकोशा वाटणाऱ्या, मनाच्या तळाशी खोल दडवल्या गेलेल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्यातून किती गोष्टी बाहेर आल्या. ज्या आपल्या मनाशी कबूल करणंही कठीण असतं, त्या गोष्टी मोठय़ा धाडसानं तिनं जगासमोर मांडल्या. ते करताना मनाशी केवढा तरी संघर्ष करावा लागला. कुटुंबाचा, नातेवाईकांचा रोष पत्करावा लागला. एक प्रकारच्या बेभान अवस्थेतच ते लेखन तिनं केलं. भावनांचे वादळ, अनेक पातळ्यांवरील फ्लॅशबॅक, शरम वाटत असतानाही गरज म्हणून अलिप्तता राखत लिहिणं हे सारं दिव्य तिनं पार पाडलं.

हेतू कोणता? तर वैयक्तिक, अत्यंत खासगी असं न मानता लिहिलं म्हणजे अशाच पीडितांना आधार वाटेल. बलात्कारासारखा नीच पातळीवरचा गुन्हा समाज पटकन विसरतो, ते करणारा उजळ माथ्याने फिरतो, पण पीडित व्यक्ती वा तिचं कुटुंब मात्र उद्ध्वस्त जीवन जगत राहतात-मरण येत नाही म्हणून!

मला वाटतं ‘डिनायल-अ मेमॉयर ऑफ टेरर’ ही केवळ जेसिकाची आत्मकहाणी नाही. अनेक गोष्टींची भीती बाळगत, सत्याचा अस्वीकार करत जगणाऱ्या पीडितांना आणि समाजालाही ती सत्य जाणून घेत, ते समजून घेण्याची प्रेरणा देतेय- भीतीचा, दहशतीचा अस्वीकार करून, आपल्या वेदनेला जाहीर वाचा फोडून!

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com

डिनायल- अ मेमॉयर ऑफ टेरर – मराठी अनुवाद–मैत्रेयी जोशी (मेहता पब्लिशिंग हाऊस) इतर सर्व पुस्तके इंग्रजीत उपलब्ध.
Everyday Humiliations  समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींसंबंधित संशोधनात्मक छोटी इंग्रजी पुस्तिका उपलब्ध