News Flash

‘आयर्न लेडी’

वर्षांतल्या एका परफॉर्मन्सने मी हलून गेले. तो परफॉर्मन्स माझ्या हृदयावर कोरला गेलाय.

ऑस्कर पुरस्कारांचा विक्रम करणाऱ्या, ४५ वर्षांची यशस्वी कारकीर्द असणाऱ्या मेरील स्ट्रीप. पराकोटीची संवेदनशीलता, लोकशाही मूल्यांवरचा विश्वास आणि समतेच्या तत्त्वांशी असलेली बांधिलकी यांतूनच मेरील यांच्या स्वभावात धैर्य आलं, ठामपणा आला आणि तो त्यांनी वेळोवेळी खटकणाऱ्या, निषेधार्ह वाटणाऱ्या गोष्टींच्या विरोधात व्यक्तही केला. आयर्न लेडीची भूमिका करत असतानाच स्वत:तलं कणखरपणही त्यांनी कायम जपलं. तेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देत राहिलं.

अभिनयाच्या क्षेत्रातली ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द.. कितीतरी बहुरंगी आणि बहुढंगी भूमिका.. तब्बल २० ऑस्कर नामांकनं आणि त्यातले तीन पुरस्कार पटकावण्याचा विक्रम.. चित्रपटांतून मिळवलेल्या संपत्तीचा सामाजिक कामांसाठी सढळ हाताने वापर.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्य! आपल्याला पटलेल्या गोष्टींसाठी ठाम भूमिका घेऊन उभं राहण्याचं आणि न पटलेल्या गोष्टींवर थेट टीका करण्याचं धैर्य. हॉलीवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सगळे पैलू. यातला प्रत्येक स्वतंत्रपणे लखलखणारा. मात्र, शेवटचा सर्वाना पुरून उरणारा. अनेक यशस्वी अभिनेते-अभिनेत्रींच्या गर्दीतून मेरील यांना वेगळं काढतं ते हेच. आपली भूमिका ठामपणे मांडण्याचं असामान्य धैर्य!

खरं तर मेरील स्ट्रीप यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू अवघ्या जगाला दिसली ती या वर्षांच्या सुरुवातीला, गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान सोहळ्यात. या सोहळ्यात सेसील बी. डीमिली जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात मेरील यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडलं आणि त्यांच्या या धैर्याची चुणूक अवघ्या जगाला दिसली. पाच वर्षांपूर्वी ‘आयर्न लेडी’ या ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थेचर यांच्या आयुष्यावरल्या चित्रपटासाठी कारकीर्दीतलं तिसरं ऑस्कर मिळवणाऱ्या मेरील खऱ्या आयुष्यातही ‘आयर्न लेडी’ आहेत याची जाणीव सगळ्यांनाच झाली.

मेरील यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेली टीका हा चर्चेत राहण्यासाठी केलेला सवंग प्रयत्न अजिबात नव्हता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढलेल्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मेरील स्ट्रीप पाठिंबा देत होत्या, हे सर्वज्ञात आहे. तरीही त्यांनी ट्रम्प यांच्यावर केलेली टीका आकसातून आलेली अजिबात वाटली नाही. कारण, पराकोटीची संवेदनशीलता, लोकशाही मूल्यांवरचा विश्वास, समतेच्या तत्त्वांशी असलेली बांधिलकी यांतून या टीकेचा जन्म झाला होता. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ‘न्यूयॉर्क   टाइम्स’मध्ये काम करणाऱ्या एका अपंग वार्ताहराची नक्कल केली, त्याबद्दल मेरील यांनी आपल्या सात्त्विक संतापाला वाट करून दिली आणि तो धागा पकडून स्वातंत्र्य, हुकूमशाही, तिरस्काराच्या राजकारणावरही टिप्पणी केली होती. बाहेरून आलेल्यांबद्दल, परदेशी लोकांबद्दलच्या ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली.

‘वर्षांतल्या एका परफॉर्मन्सने मी हलून गेले. तो परफॉर्मन्स माझ्या हृदयावर कोरला गेलाय. अर्थात तो चांगला होता म्हणून नव्हे. तो चांगला वगैरे अजिबातच नव्हता. परिणामकारक मात्र होता. हा परफॉर्मन्स कोणत्याही चित्रपटातला नव्हता, तर खऱ्या आयुष्यातला होता.’ हा परफॉर्मन्स म्हणजे सांध्यांचा विकार असलेले वार्ताहर सर्ज कोवालेस्की यांची ट्रम्प यांनी एका निवडणूक रॅलीदरम्यान केलेली नक्कल. ‘देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी आपण लायक आहोत हे सर्वाना सांगणारी व्यक्ती एखाद्याच्या शारीरिक व्यंगाची नक्कल करते तो हा क्षण. एका अशा माणसाची खिल्ली त्यांनी उडवली, जो सत्ता, अधिकार, प्रतिकाराची क्षमता यापैकी कशातच त्यांच्या जवळपास फिरकण्याजोगा नव्हता. राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर बसू घातलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे त्याची खिल्ली उडवली, तर सामान्य माणसं का तिचं अनुकरण करणार नाहीत? ते बघून मला खूप दु:ख झालं. माय हार्ट ब्रोक.’ मेरील म्हणाल्या, ‘अधिकारपदावरले लोक त्यांची सत्ता दुसऱ्याचा छळ करण्यासाठी वापरतात, तेव्हा मला वाटतं तो पराभव असतो आपल्या सगळ्यांचा!’

निवडणूक प्रचारापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी लावून धरलेल्या ‘बाहेर’च्या लोकांच्या मुद्दय़ाचाही समाचार मेरील यांनी या भाषणात घेतला. मुळात अमेरिका हा देश घडवलाच आहे तथाकथित बाहेरून आलेल्यांनी. ‘परदेशी लोकांना अमेरिकेबाहेर घालवण्याचं धोरण ठेवलं, तर हॉलीवूडमधल्या बहुतेकांना बाहेर जावं लागेल आणि मग लोकांना बघायला इथे फुटबॉल आणि मार्शल आर्ट्सशिवाय, ज्या खरं तर आर्ट नाहीतच, दुसरं काहीच उरणार नाही.’ त्यांच्या या विधानावर फुटबॉलप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आपल्याला स्वत:ला फुटबॉल खूप आवडतो. हे उदाहरण विनोद म्हणून घ्या. मूळ मुद्दा बाहेरून आलेल्या लोकांबद्दलच्या धोरणाचा आहे, असं स्पष्टीकरण मेरील यांनी दिलं.

ट्रम्प यांच्यावर केलेल्या टीकेवर मेरील ठाम राहिल्या हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. अनेकदा चित्रपट किंवा क्रीडा क्षेत्रातल्या सेलेब्रिटी राज्यकर्त्यांच्या एखाद्या धोरणावर टीका करतात आणि प्रकरण अंगाशी येईल असं वाटलं किंवा त्यामुळे काही लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली की, ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, मी तसं बोललोच/बोललेच नाही’ अशी सारवासारव करतात. मेरील मात्र ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या विधानांवर अत्यंत ठाम आहेत. एवढंच नाही, तर मानवी हक्क चळवळीतर्फे मेरील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळीही त्यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केलं.

मेरील स्ट्रीप यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या धैर्याचा परिचय जगाला झाला असला, तरी ही काही त्यांची एखाद्या गोष्टीवर भूमिका घेण्याची पहिली वेळ निश्चितच नव्हती. यापूर्वीही हॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. २०१५ मध्ये मेरील ‘सफ्रागेट’ नावाच्या एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होत्या. मतदानाच्या हक्कासाठी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमधल्या स्त्रियांनी दिलेल्या लढय़ाचं चित्रण या चित्रपटाद्वारे करण्यात आलं होतं. त्या वेळी आजही स्त्रियांना लिंगभेदाची वागणूक मिळतेय याकडे मेरील स्ट्रीप यांनी सर्वाचं लक्ष वेधलं होतं. आजही आपल्याला अनेक पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत कमी मानधन दिलं जातं आणि वर्तणूकही पुरुषांच्या तुलनेत कमी लेखणारी असते, असं मेरील यांनी बेधडक सांगितलं होतं. हॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या पहिल्या दहा अभिनेत्रींचं मानधन पुरुषांच्या निम्मंही नाही, ही बाब यातून पुढे आली होती. मेरील यांनी हा मुद्दा चर्चेला आणल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुरुषांच्या तुलनेत कमी मानधन दिलं जात असल्याचं उघडपणे मान्य करून त्याबद्दल निषेध व्यक्त केला होता.

मेरील यांचा स्त्रीवादी दृष्टिकोन यापूर्वीही दिसला होता. वॉल्ट डिस्ने यांनी एका स्त्री अ‍ॅनिमेशन कलाकाराला १९३७ मध्ये लिहिलेलं पत्र मेरील यांनी एका पुरस्कार सोहळ्यात वाचून दाखवलं होतं आणि त्यावरून डिस्ने यांचा स्त्रियांबद्दलचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन कसा दिसतोय, हे स्पष्ट केलं होतं.

मेरील स्ट्रीप यांनी चित्रपट व्यवसायातून मिळवलेला पैसा सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने खर्च करून एक आदर्श घालून दिलाय. १९८०च्या दशकात मेरील आणि त्यांचे पती डॉन गमर यांनी सिल्व्हर माउंटन फाउंडेशन फॉर आर्ट्स या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांना मदत करतात. ओहयोतलं बटलर म्यूझियम ऑफ अमेरिकन आर्ट, न्यूयॉर्कमधला शेक्सपीअर फेस्टिव्हल, जेकब बर्न्‍स फिल्म सेंटर आदी अनेक कामांना मेरील यांनी संस्थेमार्फत भरघोस देणग्या दिल्या आहेत. विद्यापीठं आणि कॉलेजांनाही त्यांनी देणग्या दिल्या आहेत. मेरील कायम स्त्रीवादी भूमिका घेत आल्या आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यातही हा दृष्टिकोन आहेत. अलीकडेच त्यांनी ४० वर्षांवरील स्त्रियांसाठी स्क्रीन रायटिंगबद्दलची कार्यशाळा प्रायोजित केली. न्यूयॉर्क विमेन इन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन या संस्थेने ही कार्यशाळा घेतली.

मेरील स्ट्रीप यांच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातल्या भाषणावर प्रतिक्रिया म्हणून ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावानुसार मेरील यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. ‘मेरील स्ट्रीप ही एक ‘ओव्हर-रेटेड’ अभिनेत्री आहे, ती हिलरी सपोर्टर आहे, हिलरी पडल्यामुळे सैरभैर झालीये, हे लिबरल सिनेमावाल्यांचे विचार आहेत.’ वगैरे वगैरे. ट्रम्प मेरील यांना ‘ओव्हर-रेटेड’ अभिनेत्री म्हणाले असले, तरी त्यांची ही टिप्पणी किती फोल आहे हे कोणालाही कळेल. तब्बल २० वेळा ऑस्करसाठी नामांकन हीच कामगिरी मेरील यांच्या अभिनयसंपन्नतेबाबत पुरेशी बोलकी आहे. त्यांनी तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त केला आहे. (साहाय्यक भूमिकांसाठी मिळालेले ऑस्कर पुरस्कार वेगळेच.) ही किमया हॉलीवूडच्या इतिहासात अद्याप केवळ सहा अभिनेते-अभिनेत्रींना साधली आहे. वैविध्य हे मेरील यांनी साकारलेल्या भूमिकांचं सर्वात ठळक वैशिष्टय़ म्हणावं लागेल. अमेरिकी समीक्षक त्यांना रंग बदलणाऱ्या श्ॉमेलिऑनची उपमा देतात. त्यांची एक भूमिका बघितल्यानंतर दुसरी भूमिका त्यांनीच केलीये यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. कोणत्याही भाषेची ढब सहीसही उचलण्याचं मेरील यांचं कसब तर अविश्वसनीय आहेच. मूळच्या न्यू जर्सीच्या असलेल्या मेरील पोलिश, ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, कोणत्याही भाषेचा अ‍ॅक्सेण्ट इतका बेमालूम उचलतात की त्यांचं मूळ त्याच देशात आहे असं वाटावं.

चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांत त्या सातत्याने काम करत आल्या आहेत आणि त्यापूर्वी न्यूयॉर्क थिएटरचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. रंगभूमीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या टोनी अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळवल्यानंतर त्यांनी ‘डेडलीएस्ट सीझन’ नावाच्या टेलिफिल्ममध्ये काम केलं, ‘ज्युलिया’मध्येही त्यांची छोटी भूमिका होती. हॉलीवूडमध्ये त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो १९७८ मध्ये आलेल्या ‘द डीअर हण्टर’ या व्हिएतनाम युद्धाची पाश्र्वभूमी असलेल्या चित्रपटातून. मूळ कथेत त्यांच्या व्यक्तिरेखेला अगदीच थोडं काम होतं. मात्र, दिग्दर्शकांनी मेरील यांचा आवाका ओळखून त्यांना स्वत:चे संवाद स्वत: लिहिण्याची आणि भूमिकेची लांबी वाढवण्याची मुभा दिली. या चित्रपटासाठी मेरील यांना ऑस्कर पुरस्कारांचं पहिलं नामांकन मिळालं.

त्याच्या पुढल्याच वर्षी १९७९ मध्ये आलेल्या ‘क्रॅमर व्हर्सस क्रॅमर’ या चित्रपटासाठी त्यांना पहिला ऑस्कर पुरस्कार (साहाय्यक अभिनेत्रीच्या विभागात) मिळाला.  कुटुंबापेक्षा वेगळं जग जगू इच्छिणाऱ्या, त्यासाठी नवऱ्याला आणि मुलाला सोडून गेलेल्या जोआना क्रॅमरची भूमिका मेरील यांनी या चित्रपटात साकारली होती. प्रेक्षकांची सहानुभूती तिच्या नवऱ्याची व्यक्तिरेखा करणाऱ्या डस्टिन हॉफमनला असली, तरी जोआनाला खलनायकी रंग न देता तिचं माणूसपण टिकवण्याचं आव्हान मेरील यांनी ताकदीने पेललं. मेरील यांच्या बहुरंगी अभिनयकौशल्याची साक्ष मिळते ती ‘द फ्रेंच लेफ्टनंट्स वुमन’ (१९८१) या चित्रपटातून. यात त्यांनी दोन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एका व्हिक्टोरियन काळातल्या सिनेमाचं शूटिंग या चित्रपटात दाखवलं आहे. त्यामुळे व्हिक्टोरियन काळातली एक व्यक्तिरेखा आणि ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीची व्यक्तिरेखा असा दुहेरी प्रवास मेरील यांनी अप्रतिमपणे साधला होता. या चित्रपटासाठीही त्यांना ऑस्कर नामांकन होतंच. १९८२ मध्ये आलेल्या ‘सोफीज चॉइस’ या चित्रपटातली भूमिका मेरील यांच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम भूमिका असल्याचा दावा अनेक समीक्षक करतात. नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये भोगलेल्या अमानुष यातना उरात बाळगून ब्रुकलीनमध्ये राहणारी सोफी मेरील यांनी जिवंत केली. खरं तर या भूमिकेसाठी दिग्दर्शक नॉन-अमेरिकन अभिनेत्रीला घेणार होते पण मेरील यांना या व्यक्तिरेखेबद्दल कळल्यानंतर त्या स्वत:हून दिग्दर्शकाकडे गेल्या आणि अक्षरश: गळ घालून त्यांनी ही भूमिका मिळवली. कोणत्याही व्यक्तिरेखेचं रोपण सहजपणे स्वत:वर करण्यात पारंगत असल्याने त्यांनी भूमिकेचं सोनं केलंच. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

१९८५ नंतर मेरील यांनी मेलोड्रामाकडे झुकणाऱ्या भूमिका केल्या अशी टीका समीक्षक करतात आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे. मात्र, त्यानंतर मेरील यांनी काही अप्रतिम विनोदी भूमिका साकारून समीक्षकांची नाराजी दूर केली. ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज’ या १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातली भूमिका कदाचित मेरील यांच्यासाठी सर्वात आव्हानात्मक ठरली असावी. कारण, यातली त्यांची व्यक्तिरेखा एका अत्यंत सामान्य कुवतीच्या अभिनेत्रीची होती. अर्थातच हे आव्हान समर्थपणे पेलून त्यांनी आणखी एक ऑस्कर नामांकन पटकावलंच.

२००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’ हा चित्रपट मेरील यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याच्या कौशल्यावर आणखी एक मोहर उमटवतो. एका फॅशन मॅगझिनची निष्ठुर संपादक मेरील यांनी ताकदीने उभी केली होती. ही व्यक्तिरेखा खलनायकी असली, तरी टिपिकल काळ्या रंगात न रंगवता, त्यातल्या छटा दाखवण्याचं आव्हान त्यांनी पेललं होतं. या चित्रपटासाठीही त्यांना ऑस्कर नामांकन होतंच. त्यापाठोपाठ २००८ मध्ये आलेल्या ‘डाउट’ चित्रपटातही त्यांनी चर्चशी संलग्न असलेल्या एका शाळेच्या करडय़ा मुख्याध्यापिकेची भूमिका केली होती. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आयर्न लेडी’ या चित्रपटाबद्दल समीक्षकांची संमिश्र मतं आहेत. तरीही यात मेरील यांनी साकारलेली ब्रिटनच्या  पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका असामान्य आहे याबद्दल कोणाचंही दुमत नसेल. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं कारकीर्दीतलं तिसरं ऑस्कर मिळालं. आज

वयाच्या ६७व्या वर्षीही मेरील जोमाने काम करत आहेत. नवनवीन चित्रपटांत भूमिका करत आहेत आणि त्यासाठी नामाकनं, पुरस्कारही पटकावत आहेत.

अभिनयाच्या क्षेत्रातल्या सेलेब्रिटींना व्यक्तिगत आयुष्य असं राहत नाही हे बरेचदा बघायला मिळत असलं, तरी मेरील यांनी त्यांचं व्यक्तिगत आयुष्य चारचौघांसारखं ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय असं म्हटलं जातं. पती डॉन गमर यांच्यासह त्या कनेक्टिकट येथे राहतात. मेरील आणि गमर यांना चार अपत्यं आहेत. १९७८ मध्ये या दोघांचं लग्न झालं. त्यापूर्वी तीन र्वष मेरील जॉन केझल या अभिनेत्यासोबत राहत होत्या. केझल फुप्फुसाच्या कर्करोगाशी झुंजत होता. मात्र, मेरील यांनी या काळात त्याची साथ सोडली नाही. मार्च १९७८ मध्ये केझलचा मृत्यू झाला. मेरील आणि केझल यांच्या नात्याबद्दल प्रख्यात अभिनेते अल् पचिनो लिहितात, ‘जॉनसारख्या दिवसागणिक मरत जाणाऱ्या माणसासोबत मेरील अत्यंत निष्ठेने राहिली. तिच्यासारखं कोणी मी क्वचितच पाहिलं असेल. तिचं या माणसावरचं प्रेम खरोखर अंगावर यायचं.’ केझलच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांत मेरील यांनी शिल्पकार गमर यांच्याशी लग्न केलं. मात्र, केझलच्या दु:खातून त्या पूर्ण बाहेर आल्या नाहीत. त्या म्हणतात, ‘मी त्यातून बाहेर आलेली नाहीये आणि मला यायचंही नाहीये त्या दु:खातून बाहेर. आपण काहीही केलं, तरी मनाच्या एका कोपऱ्यात ती वेदना राहतेच आणि नंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर परिणाम करत राहते. मला वाटतं, तुम्ही ते दु:ख गिळून टाकता आणि त्याचं फारसं भांडवल न करता पुढे जात राहता.’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तणुकीने, धोरणांमुळे हृदयाला घरं पडत असल्याचं सांगून, गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या भाषणाचा समारोप करताना मेरील म्हणाल्या होत्या, ‘टेक युवर ब्रोकन हार्ट, मेक इट इंटू अ‍ॅन आर्ट.’ राजकीय विषयांवर ठाम भूमिका घेतली, समाजकार्यात सहभाग घेतला, तरी मेरील यांचा पिंड कलावंताचाच आहे. त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम कला हेच आहे. आता या वेदनांचं रूपांतर मेरील कोणत्या असामान्य कलाकृतीत करतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सायली परांजपे sayalee.paranjape@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:12 am

Web Title: international womens day 2017 most oscars award winning hollywood actress meryl streep
Next Stories
1 ‘निर्भया’
2 प्रगल्भ
3 स्त्रीवादाची मशाल
Just Now!
X