शबाना आझमी.. अभिनयातली बुद्धिमत्तेची तिची झेप चकित करणारी आहेच, पण तिच्या कलावंत मनाला सामाजिक जाणिवेची रुंद, भरजरी आणि टिकाऊ किनार आहे म्हणूनच ‘अंकुर’, ‘पार’, ‘स्पर्श’, ‘गॉड मदर’, ‘खंडहर’सारखे चित्रपट ती करू शकली. आणि त्याच बरोबरीने ‘एड्स’ हा त्याकाळी अस्पर्श ठरलेला रोगही तिने त्याविषयी ठाम भूमिका घेऊन लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करून देणारा ठरवला. झोपडपट्टीयांसाठी केलेलं काम असो, मिजवाँ गावचा विकास असो वा अन्य तिची भूमिका कायमच प्रगल्भच राहिली.

नीटनेटकी नेसलेली साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, अंबाडा किंवा वेणी. चेहरा इतका भावपूर्ण आणि आपलासा वाटणारा की ती मला आजपर्यंत महाराष्ट्रीयच वाटत आली आहे. ती मुंबईतच राहते जन्मापासून म्हणजे एका अर्थाने ती महाराष्ट्रीयच. पण तरीही तिच्या एकूण आविर्भावावरून तरतरीत मराठी स्त्री वाटते. तिच्या अभिनयातली बुद्धिमत्तेची झेप चकित करणारी आहेच शिवाय तिच्या कलावंत मनाला सामाजिक जाणिवेची रुंद, भरजरी आणि टिकाऊ किनार आहे. विचारांचा ठामपणा असल्याने एकादी समाजाला अप्रिय वाटणारी भूमिका घेताना त्याचं योग्य समर्थनही ती करू शकते. यातूनच अभिनयापेक्षा तिचं वेगळेपण उठून दिसतं जे तिच्या हातून महत्त्वाची सामाजिक कामं करवून घेतं.

ती शबाना आझमी! तिचं नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर तिच्या सशक्त भूमिका उभ्या राहतात. आपल्या अभिनय सामर्थ्यांने त्या भूमिकांना साचेबंद पठडीतून मुक्त करून त्या भूमिकेचा खराखुरा भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात ती कायम यशस्वी ठरत आली आहे. ‘स्पर्श’मधली ‘कविता’, ‘साज’मधली ‘बन्सी’, ‘दिशा’मधली नऊवारी साडीतली गावाकडची ‘हंसा’ या शबानाच्या भूमिका पाहताना जाणवतं की ती भूमिका तिनं तिच्यामध्ये भिनवून जिवंत केली आहे. पुष्कळ अभिनेते-अभिनेत्री यांची मुलंमुली चित्रपटात आले. परंतु आईचा अभिनय आणि वडिलांचा काव्यगुण याचं उत्कट रूप आणि तरल संवेदना तिने आपल्या अभिनयात सामावून घेतल्या. घरात जरी असं वातावरण असलं तरी शबानासारख्या अभिनेत्री जन्मत:च कलेचं उन्नत रूप घेऊन येतात. यात शंका नाही.

उत्कटता आणि अभ्यास, भूमिकेमागचं, त्या व्यक्तिमत्त्वाचं अभिन्न स्वरूप जाणून घेण्याचं तंत्र शबानाला उत्तम अवगत आहे. उदाहरणार्थ, सई परांजपे यांच्या ‘साज’मधे शबानाची भूमिका बन्सी या गायिकेची. त्यासाठी चित्रपटातली ध्वनिमुद्रणाची दृश्यं चोख व्हावीत म्हणून शबाना कविता कृष्णमूर्ती यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला हजर राहिली आणि तिच्या.. मध्येच पाणी पिणं, संगीत दिग्दर्शकाला ठीक आहे का विचारणं या लकबी उचलल्या, असं सई परांजपे यांनी सांगितलं. ‘स्पर्श’मधे कविताचा प्रियकर अनिरुद्ध (नसिररुद्दिन शहा) तिच्याबरोबरचं लग्न मोडल्याचं सांगतो. या भूमिकेबद्दल सांगताना या चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक सई परांजपे यांनी तिचा एक मनस्वी अनुभव सांगितला. शबाना यांनी सईंना विचारलं, ‘‘लग्न मोडल्याचं कळल्यावर ती रडणार नाही का?’’

सई म्हणाल्या, ‘‘फार तर एखादा अश्रू.’’

शबानाने विचारलं, ‘‘डावा की उजवा?’’

सई म्हणाल्या, ‘‘मी उत्तर द्यायचं म्हणून डावा म्हटलं. तो प्रसंग चित्रित होताना शबानाचे डोळे अश्रूंनी पूर्ण भरले होते, पण अश्रू ओघळला तो मात्र फक्त डाव्या गालावरून!’’

‘स्पर्श’मध्ये अंध मुलांची शाळा पाश्र्वभूमीला आहे. प्रथमच शबानाने एवढी अंध मुलं पाहिली आणि ती उन्मळून रडली. मात्र ती अशाही स्थितीत आपला आवाज बाहेर येऊ देत नव्हती. असे काही प्रसंग शबानाच्या अभिनय क्षमतेची उंची आणि संवेदनक्षमतेची जाणीव करून देतात. तिने खूप वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या, नवरा आणि प्रेयसीच्या मुलाशी कोरडेपणाने वागणारी ‘मासूम’मधली शबाना त्या अलिप्ततेनेच भूमिकेतलं वेगळेपण दाखवून देते. शबानाच्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. पण तिने केलेल्या भूमिका तिच्या अभिनय सामर्थ्यांमुळे लक्षात राहतात.

तिची आई जरी नाटय़ कलाकार होती तरी शबाना चित्रपटाकडे आकर्षित झाली, ती जया भादुरीचा ‘सुमन’मधला अभिनय पाहून. शबाना त्याबद्दल म्हणते, ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधल्या परीक्षार्थीनी केलेला जया भादुरी यांचा ‘सुमन’ हा चित्रपट पाहण्याचा योग मला आला. आणि जया भादुरी यांच्या अभिनयाने मी भारावून गेले. मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांपेक्षा त्यांचं सादरीकरण वेगळंच होतं. त्यानंतर मी मनाशी स्वप्न रंगवलं की फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन (पुणे) या संस्थेत जाऊन असं काही साध्य करू शकले तर मला तेच करायचं आहे.’ आणि तिथे तिने प्रवेश घेतलाही.

पुढे शबानाने १२० हिंदी आणि बंगाली चित्रपट केले. हा इतिहास आहे. शबानाच्या ‘अंकुर’मधल्या भूमिकेबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे म्हणाले होते, ‘अंकुरमधल्या गावरान (खेडय़ातली) भूमिकेत शबाना कधीही फिट बसली नसती. पण तिची एकूण ढब आणि तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. ‘अंकुर’मधल्या काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये तिने स्वत:ला झोकून देऊन सिद्ध केलं आहे की, ती सवरेकृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.’

दीपा मेहता यांच्या ‘फायर’मध्ये (१९९६) एकाकी राधा तिने साकार केली. या भूमिकेने तिचं नाव जगभर पोहोचवलं. तिला अनेक पारितोषिकं मिळाली. तिचे किती तरी चित्रपट आवर्जून बघण्यासारखेच आहेत, तिच्या अभिनयाचे अनेक पैलू दाखवणारे आहेत. उदाहरणार्थ ‘निशांत’, ‘जुनून’, ‘अंतर्नाद’,

‘एक दिन अचानक’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है’, ‘गॉड मदर’, सत्यजित रे यांचा ‘सतरंज के खिलाडी’, ‘खंडहर’, १२० चित्रपटांची नावं देणं शक्य नाही. परंतु एक सहजसुंदर योगायोग जाणवला की, अपर्णा सेन यांचे ‘पिकनिक’, ‘सती’, विजया मेहता यांचा ‘पेस्तनजी’, सई परांजपे व दीपा मेहता यांच्याबद्दल सुरुवातीला लिहिलं आहे. या चार दिग्दर्शक स्त्रियांना इतक्या अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत असताना शबानाच आपल्या भूमिकांना न्याय देऊ शकेल असा विश्वास वाटला. ही केवढी सुंदर गोष्ट आहे!

शबानाने हॉलीवूडचेही चित्रपट केले ते १९८८ आणि १९९२ मध्ये.

परंतु शबानाची आणखी एक विशेषता म्हणजे तिने केलेली नाटकं. ‘सफेद कुंडली’ (१९८०), ‘तुम्हारी अमृता’, सिंगापूर रेपर्टरी थिएटरसाठी इंग्रजी नाटक ‘अ डॉल्सहाऊस’ वगैरे. नाटकाबद्दल बोलताना शबाना म्हणाली, ‘खरं तर रंगभूमी अभिनेत्याचं माध्यम आहे. रंगमंच हा अभिनेत्याचा अवकाश आहे. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम तर दूरचित्रवाणी हे लेखकाचं माध्यम आहे. शबानाने टी.व्ही. मालिकाही केली(अनुपमा). आधुनिक भारतीय स्त्री आणि भारतीय संस्कृतीची मूल्य याचं दर्शन तिनं घडवलं. म्हणजे कोणतंही अभिनयाचं क्षेत्र तिनं बाकी ठेवलं नाही. जे हाती घेतलं त्याचं तिनं सोनं केलं.

शबानाची अभिनयाची कारकीर्द सशक्त आहेच, पण त्या बरोबरीने तिच्या सामाजिक कामगिरी दखल घेण्याजोगी आहे. त्याची सुरुवात झाली ती ‘अर्थ’ चित्रपटामुळे. त्या चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच पतीच्या दांभिकतेचा अनुभव घेतलेल्या अनेक जणी तिच्याकडे आल्या आणि मग त्यांच्या समस्या ऐकणं हे एक कामच होऊन गेलं. पुढे शबानाने दिल्ली-मेरठ पदयात्रेत भाग घेतला. त्याचबरोबर झोपडपट्टीतले हलाखीचं जिणं जगणारे लोक, काश्मीरमधून विस्थापित झालेली पंडितांची कुटुंबं आणि लातूरच्या भूकंपात बळी पडलेले लोक यांच्यासाठी त्यांचीही बाजू घेऊन ती या पदयात्रेत सामील झाली होती.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर झालेल्या दंगलीने व्यथित झालेल्या शबानाने त्याचा बसलेला धक्का जसा व्यक्त केला तसा अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ला हल्ला झाला तेव्हा जामा मशिदीचे मुख्य मौलवी यांनी भारतातल्या मुस्लीम लोकांना आवाहन केलं होतं की, ‘‘अफगाणिस्तानच्या लोकांना जाऊन मिळा आणि लढाई करून प्रत्युत्तर द्या!’’ शबानाने या फतव्याविरुद्धही आपलं मत मांडलं होतं. त्याचप्रमाणे धर्माध अतिरेक्यांवरही तिने टीका केली.

शबाना आझमीची महत्त्वाची चळवळ म्हणजे एड्स झाल्यामुळे वाळीत टाकले गेलेले रुग्ण आणि लहान मुलं यांच्यासाठी काम करणं. एड्स पीडितांना माणूस म्हणून जगण्याची संधी समाजाने दिली पाहिजे, याबाबतीत ती आग्रही आहे. भारत सरकारने त्या काळात एड्स पीडितांवर एक लघुपट तयार केला, त्यात शबानाने काम केलं. एड्सग्रस्त मुलाला जवळ घेऊन तिने फिल्मचं शूटिंग केलं आणि सांगितलं, ‘या पीडितांना दूर लोटू नका त्यांना तुमचं प्रेम द्या. त्या प्रेमाची त्यांना गरज आहे.’ समाजाला अप्रिय वाटणारी ही गोष्ट तिने मात्र सहजपणे त्यात सक्रिय भाग घेऊन आपली त्यामागची भूमिका स्पष्ट केली. बंगाली फिल्म ‘मेघा आकाश’ यात एड्स या रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरची भूमिका केली होती. भारतातल्या एनजीओंनी एचआयव्ही किंवा एड्ससाठी शैक्षणिक अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअर तयार केलं त्यासाठी शबानाने आपला ‘आवाज’ दिला.

शबाना आझमीने जे काही सामाजिक काम जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे केलं त्याबद्दलची तिची दोन तासांची मुलाखत हार्वर्ड बिझनेस स्कूलने, मार्केट प्रोजेक्टसाठी घेतली ती आजही नेटवर पाहता येते. त्यातलं शबानाचं महत्त्वाचं वाक्य म्हणजे ‘कला हे एक असं साधन आहे की लोकांचा दृष्टिकोन कलेच्या माध्यमातून बदलू शकतो.’ चित्रपट तारका तारे हे सामान्यजनांचे लाडके असतात. ते सांगतील त्यावर लोकांचा विश्वास बसतो आणि हेच नेमकं ओळखून पीडित वंचित घटकांसाठी आपल्या सहवेदना शबानाने व्यक्त केल्या. शाम बेनेगलचा ‘अंकुर’ चित्रपट पाहताना शबानाने त्या चित्रपटात केलेली शोषित स्त्रीची भूमिका पाहून आजही आपलं मन पेटून उठतं.

इंग्रजी माध्यमात शिकलेली शबाना, वडिलांच्या कविता ऐकायला जाताना श्रमिकांची वस्ती पाहायची तिला सवय होतीच, परंतु तरीही उकीडवं बसणं, अंधाऱ्या खोलीत स्वयंपाक किंवा खेडुतासारखी साडी नेसणं किंवा खेडेगावातलं भयाण वास्तव याच्याशी एकरूप होऊन अभिनय करण्याएवढी तिची प्रगल्भता त्या चित्रपटात दिसून येते. एकदम वेगळंच जग तिने त्या निमित्ताने पाहिलं.

‘पार’ चित्रपटाच्या निमित्ताने गलिच्छ झोपडपट्टीचं जग जवळून पाहता आलं. आणि तेव्हा शबानाला वाटलं, ‘हा चित्रपट मला बक्षिसं आणि प्रसिद्धी मिळवून देईल, पण त्या घाणीत जगणाऱ्यांचं काय?  त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे.’ ती संधी शबानाला संजय गांधी नगर झोपडपट्टीच्या संदर्भात मिळाली. त्या वेळी तिला अटकही करण्यात आली.  मे १९८६ मध्ये तिने पाच दिवसांचं उपोषण केलं. तिच्याबरोबर त्या वेळी झोपडपट्टीमधील लोक व सिनेनिर्माते होते. या झोपडपट्टीत पन्नास हजार लोक राहत होते. त्यांना स्वच्छ घरं, पाणी पुरवणं ही गरज होती. त्यासाठी शबाना लढली एवढंच नव्हे तर पुढे जाऊन निवारा हक्क संघर्ष समितीची ती अध्यक्ष झाली. या समितीतर्फे  त्या लोकांना पक्की घरं बांधून दिली. हा आशिया खंडातला सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प आहे. हा प्रकल्प करता आला याचा तिला आनंद वाटतो. या कामामुळेच शबानाला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार मिळाला. नेल्सन मंडेला, दलाई लामा आदींना हा पुरस्कार मिळाला होता. त्या पंक्तीत शबानाही जाऊन बसली. हा पुरस्कार लंडनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’मध्ये देण्यात येतो. तिथे ‘अहिंसा शक्य आहे’ विषयावर तिचं भाषणही झालं.

मिजवाँ हे उत्तर प्रदेशमधलं आझमगढ जिल्ह्य़ातलं गाव. हे शबानाच्या वडिलांचं गाव अत्यंत मागासलेलं, अविकसित खेडं. तिच्या वडिलांनी कैफी आझमी यांनी त्या गावाला मुख्य प्रवाहात आणायचं ठरवलं आणि काम सुरू केलं. त्यासाठी ‘मिजवाँ वेलफेअर सोसायटी’ स्थापन केली. त्याची अध्यक्ष शबाना आहे. शबाना म्हणते, ‘स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून तिथे विकासाची कामं आम्ही सुरू केली.’ डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी त्या स्त्रियांकडून कामं करून घेतली. त्या स्त्रियांना आता आत्मविश्वास मिळाला आहे. मिजवाँ गावात शाळा, महाविद्यालय, संगणक प्रशिक्षण केंद्र याचबरोबर समाजातल्या अनिष्ठ प्रथांना नष्ट करण्याचं स्वप्न शबाना पाहात आहे. बालविवाह ही प्रथा समूळ उखडण्यात त्यांच्या संस्थेला यश आलं आहे. आंतरिक तळमळ आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा ही शबानाची वैशिष्टय़ं जाणवतात.

सामाजिक समता, न्याय-अन्यायाची जाण या संदर्भात शबानांनी परदेशी विद्यापीठात व्याख्यानं दिली. त्यात एमआयटी, बोस्टन, शिकागो, लंडन यांचा समावेश आहे. १९८९ पासून शबाना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय एकता परिषदेच्या त्याचप्रमाणे राष्ट्रीय एड्स आयोगाची सभासद आहे. १९९७ मध्ये शबानाची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली तर १९९८ मध्ये ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’साठी भारताचा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००२ मध्ये शबानाला अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातर्फे कला, संस्कृती, समाज यासाठीच्या योगदानाबद्दल, मार्टिन ल्युथर किंग प्रोफेसरशिप पारितोषिक देण्यात आलं. २००७ मध्ये ऑनररी डॉक्टरेट, लीड्स मेट्रोपॉलिटन विद्यापीठ, यॉर्कशायर, उत्तर इंग्लंड, २००९ मध्ये वल्र्ड इकॉनॉमी फोरम क्रिस्टल अ‍ॅवार्ड, २०१३ मध्ये सायमन फेझर विद्यापीठ (ब्रिटिश कोलंबिया कॅनडा) यांच्यातर्फे  डॉक्टरेट, जगभरातल्या महत्त्वाच्या विद्यापीठाकडून शबानाचा गौरव करण्यात आला.

स्वदेशाने तिला पद्मश्री बहाल केली. अभिनयासाठी तर शबाना आझमीने राष्ट्रीय पुरस्काराबरोबर अनेक पुरस्कार पटकावले. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या या कलावंत स्त्रीने स्वत:च्या पलीकडे जाऊन पीडितांचे अश्रू पुसले हे महत्त्वाचं वाटतं. तिने आपली मतं मांडताना अनेक गोष्टींबद्दल मते मांडली. जेव्हा जेव्हा तिच्या सामाजिक कार्याबद्दल शंका घेतली गेली, प्रसिद्धीसाठीचे स्टंट मानले गेले तेव्हा तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष करत काम करणं चालू ठेवलं म्हणून आज इतक्या वर्षांनंतरही तिची अभिनयाची कारकीर्द लखलखीत आहेच शिवाय सामाजिक कार्यही अखंडितपणे सुरूच आहे.

मधुवंती सप्रे  madhuvanti.sapre@yahoo.com