नदिन गॉर्डिमर या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या, पहिल्या दक्षिण आफ्रिकी लेखिका. लेखन हेच त्यांचे सामथ्र्य ठरले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आणली गेली, कारण त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध बुलंद आवाज उठवला. कृष्णवर्णीयांना बोलता येत नाही तर त्यांच्या वतीने आपणच बोलले पाहिजे हे या ‘गोऱ्या’ स्त्रीला जाणवले आणि त्यांच्या आयुष्याने खूप मोठे वळण घेतले. लेखकांच्या लेखनस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या सेन्सॉरशिपचा निषेध करण्यासाठी, आफ्रिकी  लोकांविरुद्धचे कायदे बदलावेत, त्यांना सरकारात स्थान मिळावं यासाठी नदिन यांनी प्रथम आवाज उठवला.

‘तुमच्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा, उत्कट क्षण कुठला?’ १९९१चा साहित्याचा नोबेल पुरस्कार नदिन गॉर्डिमर यांना जाहीर झाला आणि त्यांना हा प्रश्न विचारला गेला. त्या तत्काळ उत्तरल्या होत्या, ‘नोबेल पुरस्कार मिळाला तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि समाधानाचा होताच. पण १९८६ मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या २२ कार्यकर्त्यांसाठी मी डेल्मास खटल्यात साक्ष दिली, ज्याने त्यांची न्याय्य बाजू भक्कम झाली, तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात अभिमानाचा, गर्वाचा दिवस होता.’ दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविषयक लढय़ात कायम आफ्रिकी, काळ्या लोकांची बाजू घेऊन लढणाऱ्या नदिन गॉर्डिमर या सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या साहित्यिका होत्या.

‘आयुष्यात मी चुका केल्या असतील, कारण मी माणूस आहे, पण मी कशाला घाबरले नाही, अन्याय, अत्याचाराला तर नाहीच, आणि कशापासूनही मी पळ काढला नाही,’ असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या नदिन गॉर्डिमर या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या, पहिल्या दक्षिण आफ्रिकी नागरिक होत्या, आणि नोबेल पुरस्कारांच्या नव्वद वर्षांच्या इतिहासातील सातव्या स्त्रीसाहित्यिक होत्या.

नदिन यांचे साहित्य मी आधीपासून वाचत होते, आणि त्यांच्या कादंबऱ्यांचा मनावर चांगलाच प्रभाव होता. पण याला आणखी एक आत्मीयतेचा, वैयक्तिक क्षण जोडला गेला, तो नोव्हेंबर २००८ मध्ये त्या भारतात आल्या तेव्हा! त्या वेळी आम्ही एशियाटिक सोसायटीत त्यांच्या भेटीचा कार्यक्रम केला आणि त्यांना प्रत्यक्ष, जवळून पाहण्याची, ऐकण्याची, त्यांच्याबरोबर चार शब्द बोलण्याची संधी मिळाली. गच्च भरलेल्या दरबार हॉलमध्ये त्यांना प्रश्न विचारताना आफ्रिकेच्या वर्णभेदविषयक संघर्षांविषयी, गॉर्डिमर यांच्या पुस्तकांवर सरकारने आणलेल्या बंदीविषयीही विचारले गेले. त्या ताडकन उत्तरल्या, ‘त्यात काय? बंदी येणारच! आली नसती तरच मला वाईट वाटले असते.’ तिथेच लगेच त्यांनी पुस्तकबंदीसंबंधी जर्मन कवी ब्रेख्तने लिहिलेली कविताच म्हणून दाखवली. वयाच्या ८५व्या वर्षीही देखणे रूप, उंची बेताची पण ताठ उभे राहणे, स्पष्ट व ठाम बोलणे! (अनेक बाबतीत दुर्गाबाईंची आठवण व्हावी.)

लेखकाच्या स्वातंत्र्याचा सतत आग्रह धरणाऱ्या नदिनच्या मते लेखकाचे स्वातंत्र्य कोणते होते? ‘माझ्या मते लेखकाचे स्वातंत्र्य म्हणजे तो ज्या समाजात राहतो, तेथील परिस्थितीबद्दलचे लेखक म्हणून त्याला जाणवणाऱ्या सत्याचे सखोल, एकात्म आकलन, व त्या सत्याचे आविष्करण.’  आपल्या या भूमिकेशी शेवटपर्यंत त्या प्रामाणिक राहिल्या.

खरेच, कोण होती ही नदिन? तिने लेखनस्वातंत्र्यासाठी आणि आफ्रिकेतील वर्णभेदविषयक लढय़ात एवढा कृतिशील सहभाग का घेतला? ती चांगली कादंबरीकार होती. मग इतर अनेकांप्रमाणे ती केवळ लेखक म्हणून आपली प्रतिमा सांभाळत, काहीबाही लेखन करीत गप्प का राहिली नाही? ते शक्य नव्हते का? ती गंभीरच लिहायची की इतर काही? शिवाय शेवटपर्यंत जोहान्सबर्गसारख्या ठिकाणी, अशांत वातावरणात राहणे तिने का पसंत केले? तिची तीव्र सामाजिक बांधिलकी कुठून आली?    खरे पाहता आफ्रिकेतील युरोपियन वसाहतींमधील एका गोऱ्या मुलीने आपल्याला जन्मजात मिळालेले फायदे सोडून या कामात कशासाठी भाग घ्यायचा?

तिच्या आयुष्यपटाकडे ओझरती नजर टाकली तरी लक्षात येते की, लहानपणापासूनच नदिन वेगळ्या स्वभावाची होती. २० नोव्हेंबर १९२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल परगण्यात जन्मलेल्या नदिनचे आई-वडील स्थलांतरित ज्यू होते. आई लंडनमधील. वडील घडय़ाळजी. ट्रान्सवाल भाग सोन्याच्या खाणींमुळे प्रसिद्ध होता. तेव्हाही तेथे सत्तर टक्के जनता आफ्रिकी, कृष्णवर्णीय होती. ते सर्व अर्थातच खाण कामगार, मजूर होते. गोऱ्यांच्या वसाहती, त्यांची दुकाने, हिंडण्या-फिरण्याची ठिकाणे वेगळी होती. एकाच ठिकाणी दोन वेगळे समाज समांतरपणे वावरत असत. सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत, गोऱ्यांमधील अगदी खालच्या पातळीवरील व्यक्तीदेखील कृष्णवर्णीयांपेक्षा उच्च गणली जाई. जगभरच्या वंश, वर्ण, जाती यांच्यातील भेदाभेदाने आजवर मानवी समाजाचे अपरिमित नुकसान केले आहे. प्रत्येक वेळी संवेदनशील मनांना ती जाणीव अस्वस्थच करते.

नदिनची आई अशा प्रकारच्या भेदभावाविषयी नाराज असे, पण पती व समाज यांचा दबाव येऊन ती गप्प बसे. तरी तिने आफ्रिकन स्त्रियांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर सुरू केले होते. नदिनवर या साऱ्याचा परिणाम होत होता. ती म्हणते, ‘घरात व आजूबाजूला आढळून येणाऱ्या भेदभावाचा संपूर्ण अर्थ मला कळत नव्हता तरी मला तेव्हाही त्याचा राग येई, पण काय करावे हे कळत नसे.’

गोऱ्यांसाठीच्या विशेष शाळेत नदिन व तिची बहीण जात. पण शाळेला दांडी मारून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे तिला पसंत होते. जात्याच बुद्धिमान असल्याने अभ्यास पुरा करणे तिला फारसे अवघड नव्हते. नंतर आईनेच तिची यातून सुटका केली. तिची तब्येत नाजूक आहे, तिला हृदयविकार आहे आणि लग्न झाल्यावर गृहिणीला शिक्षणाची गरजच काय, अशा कारणांनी आईने शाळा बंद केली. मग नदिनची खरी शाळा सुरू झाली. तिला वाचनाचे वेड लागले. जास्तीत जास्त वेळ ती ग्रंथालयात घालवू लागली. तिचे वाचन तिला काय काय शिकवत होते, याची मोठय़ांना कल्पना येत नव्हती तर ती तिला त्या वेळी कशी येणार? त्या अर्थाने तिनेच स्वत:ला घडवले. चांगले लेखन कोणते याची उपजतच जाण यावी, असे ती वाचू लागली. प्रूस्त, दोस्तोयेव्हस्की, चेकॉव्ह या लेखकांनी तिला भरभरून दिले, तेच तिचे प्राध्यापक, मार्गदर्शक, मित्र, सारे काही होते.

आपल्या या काळाबद्दल बोलताना ती म्हणते, ‘वयाच्या बाराव्या वर्षी रविवारच्या वृत्तपत्रातील बालविभागात जेव्हा पहिली कथा छापली गेली, तेव्हा खूपच आनंद झाला. आतापर्यंत कल्पनेत रचलेली कथा आता ‘खरी’ झाली. पण मी त्यावर कुणाची प्रतिक्रिया मागितली नाही. का ते माहीत नाही. हे कोण आपल्या लेखनावर अभिप्राय देणार? असा कलावंताचा अहंकार होता की फाजील आत्मविश्वास होता? हे आता सांगणे कठीण.’

१५व्या वर्षी तिची पहिली प्रौढांसाठीची कथा प्रसिद्ध झाली. आपणच आपली समीक्षक होत तिने थोडेच लेखन तेव्हा प्रसिद्ध केले. नदिन आता कथेच्या सामर्थ्यांचा, अवकाशाचा नीट विचार करू लागली होती. जन्मापासून ती दक्षिण आफ्रिकेतील घटनांची साक्षीदार होती. त्या काळाने तिची संवेदनशीलता घडवली होती. समाजापासून फटकून किंवा केवळ गोऱ्यांच्यात ती कधीही वावरली नाही. पण आरंभी राजकीय संघर्षांत ती उतरली नव्हती. त्या वेळी मनात कथाच उमले. कथेतून आपण लोकांपर्यंत थेटपणे पोचू शकतो असे तिला वाटे. कथा म्हणजे जीवनाचा एक चैतन्यबिंदू असतो. तो पूर्ण तीव्रतेने समोरच्या कागदावर पसरत जातो व खोलवर जात त्यात रुततो, असे तिला वाटते.

१९४९ मध्ये गॅव्हरॉन्सी याच्याशी तिचे लग्न झाले. ते तीन वर्षे टिकले. एक मुलगी झाली. दुसऱ्या वेळी १९५४ मध्ये कॅसिरर या नाझी जर्मनीतून स्थलांतरित झालेल्या, एका आर्ट गॅलरीच्या मालकाशी विवाह झाला, मुलगाही झाला. २००१ मध्ये कॅसिरर यांचा मृत्यू होईपर्यंत हा विवाह टिकला. नदिनला फारसे मित्रमंडळ नव्हते. चटकन कोणाशी मैत्री करण्याचा स्वभाव नव्हता. मात्र एकदा केलेली मैत्री शेवटपर्यंत निभावण्याची आस होती. पण एक घटना तिच्या आयुष्याला बदलून गेली. दक्षिण आफ्रिकेत १९६० मध्ये ट्रान्सवालमधील शार्पविल गावी हत्याकांड झाले. आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या कृष्णवर्णीयांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केला. त्यात सत्तर माणसे मारली गेली. तेव्हा नदिनची जवळची मैत्रीण बेट्टी पकडली गेली. त्या धक्क्याने नदिन अतिशय अस्वस्थ होती. आफ्रिकन सरकारने काळ्या लोकांविरुद्ध कठोर आणि कडक कायदे केले. दर्जेदार साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींवर बंदी आणली गेली. तिला ते सारे असहय़ झाले. आपण आता गप्प राहून चालणार नाही. कृष्णवर्णीयांना बोलता येत नाही तर त्यांच्या वतीने आपणच बोलले पाहिजे हे तिला जाणवले. तिच्या आयुष्याने खूप मोठे वळण घेतले.

लेखकांच्या लेखनस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या सेन्सॉरशिपचा निषेध करण्यासाठी, आफ्रिकन लोकांविरुद्धचे कायदे बदलावेत, त्यांना सरकारात स्थान मिळावे यासाठी गॉर्डिमरने प्रथम आवाज उठवला. १९६२ मध्ये नेल्सन मंडेलांचे सुप्रसिद्ध भाषण-मी लोकांसाठी मरायला तयार आहे – तयार करताना नदिनने मदत केली. नंतर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड, तुरुंगात रवानगी, खटले, १९९० मध्ये मंडेलांची सुटका आणि १९९४ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका व आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारची स्थापना या सगळ्या काळात नदिन या लोकांच्या मागे उभी राहिली. त्या वेळी भूमिगत कार्यकर्त्यांना आपल्या घरी आसरा देणे, पत्रके  वाटणे, त्यांना सुखरूपपणे एकीकडून दुसरीकडे पोचवणे, यांसारखी कामेही नदिनने केली. मंडेलांची दीर्घ मुदतीच्या कारावासातून सुटका झाल्यावर त्यांनी प्रथम ज्यांची भेट घेतली, त्यात नदिन होती.

या साऱ्यापेक्षा विशेष हे की, तिने आपल्या ओजस्वी भाषणांमधून आफ्रिकन लोकांवरील अन्यायाला वाचा फोडली. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्या समाजाची दु:खे, त्यांच्या मानसिक अवस्था, त्यांचे प्रश्न ती मांडत राहिली. तिच्या पहिल्या कादंबऱ्या ‘द लायिंग डेज’ किंवा ‘अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स.’ यामधून वर्णद्वेष नाहीसा होईल, आपण वर्णभेद मानायचा नाही व इतरांच्या तशा वागण्याकडे दुर्लक्ष करायचे, असा तिचा काहीसा दूरस्थ पण आशावादी दृष्टिकोन होता. १९६०नंतर मात्र ‘द लेट बूज्र्वा वर्ल्ड’ , ‘ओकेजन फॉर लिव्हिंग’ यामधून सरकारविषयीची तिची हतबल, निराश वृत्ती दिसते. त्यानंतरच्या कथा व ‘जुलायज पीपल’, ‘बर्जर्स डॉटर’ यांसारख्या कादंबऱ्या यातून ती वर्तमानातील परिस्थितीला पर्याय शोधताना दिसते. तिचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. आता ती संपूर्ण मानवी समाजाचा विचार करताना दिसू लागली.

‘द इसेन्शियल गेश्चर’ या तिच्या निबंधसंग्रहात तिने अनेक विषयांवर प्रकट चिंतन केले आहे. विशेषत: सेन्सॉरशिप, लेखकांचे स्वातंत्र्य व त्याबरोबर येणारी जबाबदारी, दक्षिण आफ्रिकेतील लेखकांची घुसमट, राजकीय संक्रमण काळातील लेखक व त्यांचे लेखन याबाबत तिने यातून विचार मांडले. लेखकाने राजकारणात भाग घ्यावा का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यासंबंधी बोलतानाही ती म्हणते, ‘लेखक हा समाजाचा एक भाग आहे. समाजातच त्याची घडण होत असते. आजच्या काळात राजकारण हे आपल्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे कवटाळून बसले आहे. ते लेखक टाळू शकत नाही. शिवाय लेखक हा बुद्धिजीवी समाजघटक असतो. समाजाला योग्य, हितकर मार्ग दाखवणे हे त्याचे कामच आहे. आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्याने हे करावे.’

याचा अर्थ ती प्रचारक होती का? तर अजिबात नाही. आपल्या साहित्यातून तिने आफ्रिकी लोकांचे जीवन रंगवले हे खरे, पण तिचा विशेष असा की, त्यात तिने कुठेही आपल्या कलात्मक दृष्टीला धक्का पोचू दिलेला नाही. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला अधिकृत मान्यता मिळण्याआधीपासून ती त्या पक्षाची सभासद असली तरी, तिने त्यांचा प्रचार केला नाही. लेखक म्हणून आपली बांधिलकी आपल्या लेखनाशी आहे ही गोष्ट तिने कधी नजरेआड होऊ दिली नाही. वेळप्रसंगी त्या पक्षाच्या नेत्यांनीही सत्ता मिळाल्यावर केलेल्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध ती ठाम उभी राहिली. त्याचमुळे २०१२ मध्ये ८८व्या वर्षीदेखील आफ्रिकन सरकारने आणलेला स्टेट इन्फर्मेशन बिल-सुरक्षा कायदा- भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतोय, असं लक्षात येताच तिने देशजागृती करण्यास सुरुवात केली.

‘समथिंग आऊट देअर’ या तिच्या लघुकादंबरीत गावात शिरलेल्या एका माकडाने घातलेला धुमाकूळ ही घटना घेऊन तिने अशा वेळी सरकारी यंत्रणा, राजकीय पक्ष, सामान्य जनता यांचे वर्तन कसे होते, बंडखोर याचा फायदा कसा घेतात याचे वर्णन केले आहे. एक रूपककथाच आहे ती! वाचताना सहजच जॉर्ज ऑरवेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ची किंवा व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ कादंबरीची आठवण होते.

१९९४ मध्ये सत्तापालट झाला तेव्हा लोकांना वाटले की आता गॉर्डिमर काय लिहिणार? तिच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये तर शोषित, पीडित आफ्रिकी  समाजजीवनातील समस्या व त्यातील लोक ही पात्रे असत. नदिनना विचारल्यावर उत्तर आले, ‘प्रश्न कुठे संपले? आता तर नवीन जीवन सुरू झाले. या जीवनाचे प्रश्न वेगळे असतील’. तिचा एक डोळा समाजशास्त्रज्ञाचा होता, तीक्ष्ण नजर होती. मानवी जीवनातील सत्य शोधणे हेच तिचे ध्येय होते, आपले आकलन आपल्या पात्रांच्या परस्परसंबंधांतून, मानवी नातेसंबंधांतून ती मांडत होती. ती म्हणते, ‘मी दक्षिण आफ्रिकेत जन्मले. मी जर जगात इतर कुठे असते तर माझ्या लेखनात थोडेही राजकारण प्रतिबिंबित झाले नसते.’ काळ्या लोकांच्या वसाहतीतील अवैध दारूचे गुत्ते, नदीकाठावरील बार्बेक्यू, गोऱ्यांच्या रात्रभराच्या पाटर्य़ा, असा अनेक ठिकाणी संचार करीत, त्यांच्यात मिसळत, त्यांची मनोभूमिका जाणून घेत तिने सत्यशोधन केले. त्यामुळे २०१४ मध्ये तिचा मृत्यू झाल्यावर आपला आधारवड गेला, अशी तेथील सामान्य जनतेची भावना झाली.

नदिनला नोबेल मिळाले तेव्हा पुरस्कार समितीचे सचिव म्हणाले होते की, ‘नव्वद वर्षांपूर्वी जेव्हा हे पुरस्कार सुरू झाले तेव्हा संवेदनशीलता व बुद्धी यांची गुणवत्ता लेखकात असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. आता नदिन यांच्या बाबतीत ती अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद नोबेल समिती व्यक्त करीत आहे.’

नदिन गॉर्डिमरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला लढाऊ  बाण्याची, संवेदनशील, उत्तम लेखिका व सामाजिक इतिहासकार लाभली होती. वर्तमानात असे भाग्य किती देशांना लाभेल?

 नदिन गॉर्डिमर -(१९२३-२०१४)

  १५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह, ५ निबंधसंग्रह

 ‘अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स’, ‘द लेट बूज्र्वा वर्ल्ड’, ‘बर्जर्स डॉटर’ या कादंबऱ्यांवर १० ते १२ वर्षे बंदी आली होती.

 नोबेलसकट वीस पुरस्कार व विविध विद्यापीठांच्या आठ डॉक्टरेट, शिवाय इतर सन्मान.

 ‘ऑरेंज’ हा साहित्यिक पुरस्कार नाकारला, कारण तो केवळ स्त्री साहित्यकारांसाठी होता.

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com