व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांनी अभिनयाबरोबरच आपले राजकारणही चालू ठेवले. आपली राजकीय मतं, तत्त्वं आणि मूल्यं यांच्यासाठी जाहीर भूमिका घेणं व त्याच्यासाठी आपला पैसा खर्ची करणं हे त्यांनी चालूच ठेवले. अमेरिकेच्या इराक युद्धाला त्यांनी जाहीर विरोध केला. मानवी हक्कांच्या त्या खंद्या पुरस्कर्त्यां आहेत. इतका प्रदीर्घ काळ अभिनय आणि आपल्या तत्त्वांसाठी लढा देणं ही विशेष गोष्ट आहे. त्यावरूनच व्हॅनेसा रेडग्रेव्ह या एक कणखर बाई आहेत, हे समजते. 

चित्रपट व रंगभूमी क्षेत्रात आपल्या अभिनय सामर्थ्यांने स्वत:चे एक स्थान निर्माण करणाऱ्या; ऑस्कर, एमी, गोल्डन ग्लोब यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणाऱ्या व्हॅनेसा रेडग्रेव्ह या जगप्रसिद्ध अभिनेत्रीची आणखी एक ओळख म्हणजे आपल्या अभिनय क्षेत्रापुरतं समाधानी न राहता, राजकीय क्षेत्रातही निश्चित भूमिका घेऊन आवाज उठवणाऱ्या त्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्या ब्रिटिश अभिनेत्री आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका व कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या आहेत.

३० जानेवारी १९३७ ला जन्मलेल्या म्हणजेच नुकती वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांनी जवळ जवळ ६० वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात घालवली आहेत. रंगभूमी, चित्रपट व टेलिव्हिजन या सर्वच क्षेत्रांमध्ये त्या सक्रिय होत्या व आहेत. व्हॅनेसा यांचे संपूर्ण कुटुंबच चित्रपट व रंगभूमी क्षेत्रात आहे. त्यांचे आईवडील ब्रिटिश रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते होते. व्हॅनेसा यांनीही १९५८ मध्ये रंगभूमीवर पदार्पण केले. १९६१ मध्ये रॉयल शेक्सपीअर कंपनीच्या ‘अ‍ॅज यू लाइक इट’ या नाटकातील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी त्यानंतर जवळजवळ ३५ नाटकांमध्ये काम केले.

प्रख्यात नाटककार टेनेसी विल्यम्स यांनी व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांचे ‘आपल्या काळातील महान अभिनेत्री’, असे वर्णन केले होते. व्हॅनेसा यांच्या अभिनयाला मिळालेली ही मोठीच दाद होती. अनेक चित्रपटांमधीलही त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘इसाडोरा’ चित्रपटातील इसाडोरा डंकन या नर्तकीची भूमिका अशीच गाजली, जिच्यासाठी त्यांना ऑस्कर नामांकन मिळालं. अभिनयातील या यश व लोकप्रियतेसोबतच त्यांची राजकीय सक्रियताही वाढली. व्हिएतनाम युद्धाला विरोध करणाऱ्या निदर्शकांमध्ये त्यांची उपस्थिती महत्त्वाची होती. त्यांनी अमेरिकन दूतावासावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. ‘बॅन द बॉम्ब’ या अण्वस्त्र विरोधी मोर्चादरम्यान त्यांना अटक झाली होती. त्यांनी जाहीरपणे यासर अराफत यांच्या पॅलेस्टिन लिबरेशन ऑरगनायझेशन (PLO) या संघटनेला पाठिंबा दिला. याखेरीज अनेक मानवाधिकारांच्या संबंधातील उद्दिष्टांसाठी लढा दिला.

हे सर्व करीत असतानाच अभिनयाची कारकीर्द चालूच होती. तसेच व्यक्तिगत जीवनातही उलथापालथी होत होत्या. १९७१ मध्ये त्यांनी

सलग तीन चित्रपट केले. परिणामी प्रकृतीवर ताण येऊन त्यांना गर्भपात करावा लागला. अगोदर तीन अपत्ये होतीच. त्यांचा तेव्हाच्या जोडीदाराबरोबर ब्रेकअप झाला. याच सुमारास त्यांच्या भावाने त्यांना ‘वर्कर्स रिव्होल्युशनरी पार्टी’ या राजकीय पक्षाची ओळख करून दिली. कॉरिन रेडग्रेव्ह हा त्यांचा भाऊही राजकीय दृष्टय़ा सक्रिय होता. वर्कर्स रिव्हॉल्युशनरी पार्टीची राजकीय उद्दिष्टे भांडवलशाही नष्ट करणे व राजसत्ता संपणे ही होती. या पक्षातील त्यांची सक्रियता बरीच वाढली. त्या दोन वेळा पार्लमेंटच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या. पण त्या बाबतीत त्यांना अपयश आलं. या राजकीय सक्रियतेमुळे या काळात त्यांच्या अभिनयाची कारकीर्द काहीशी बाजूला पडली.

१९७४ पासून परत चित्रपटातील करिअर सुरू झाली. ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका त्यांनी केली. आणखीही काही छोटय़ा भूमिका त्यांनी पुढच्या वर्षांत केल्या.

१९७७ मध्ये त्यांच्या दोन चित्रपटांमधील भूमिका वादग्रस्त ठरल्या. पैकी एक ‘ज्युलिया’, ज्यात व्हॅनिसा यांनी जेन फोंडा यांच्याबरोबर काम केले. यात त्यांनी ज्युलिया या जर्मनीत राहणाऱ्या व नाझी राजवटीविरुद्ध काम करणाऱ्या स्त्रीची भूमिका केली होती. त्याच वेळी त्यांनी निर्मितीमध्येही मदत केली होती व ज्यामध्ये त्यांचा आवाज होता अशी ‘द पॅलेस्टिनिअन’ नावाचा माहितीपटही प्रदर्शित झाला. या माहितीपटामध्ये त्यांनी काला श्निकोव्ह रायफल घेऊन नृत्य केलं होतं. त्यांनी यात ‘झायोनिस्ट गुंडांचा’ निषेध केला होता. या माहितीपटामुळे ज्यू समुदायांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यांनी या फिल्मचे प्रदर्शन अडवले. एवढेच नाही तर व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांना ‘ज्युइश डिफेन्स लीग’ या संघटनेने व्यक्तिश: धमकावलं.

‘ज्युलिया’ चित्रपटातील अभिनयासाठी व्हॅनेसा यांना ऑस्कर नामांकन मिळालं. या पुरस्कार सोहळ्याला हजर राहताना त्यांना मागच्या दरवाजाने प्रवेश करावा लागला. कारण ज्युइश संघटना पुरस्कार स्थळाबाहेर निदर्शनं करीत होत्या. ‘द पॅलेस्टिनिअन’ या फिल्ममध्ये स्वतंत्र पॅलेस्टिन राज्याचा पुरस्कार केला असल्यामुळे ही निदर्शनं चालू होती. व्हॅनेसा यांना ‘ज्युलिया’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. स्वीकाराच्या भाषणात व्हॅनेसा यांनी या निदर्शकांची ‘झायोनिस्ट’ गुंड म्हणून संभावना केली. अर्थात या वक्तव्यामुळे प्रेक्षक मात्र थक्क झाले. या प्रसंगाचा व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांच्या कीर्तीवर थोडा परिणाम मात्र झाला.

१९८० मध्ये व्हॅनेसा यांनी दूरचित्रवाणी आणि छोटय़ा मालिकांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी ‘प्लेइंग फॉर टाइम’ या टीव्ही फिल्ममध्ये नाझींच्या छळछावणीतून वाचलेल्या फॅनिया नावाच्या ज्यूइश गायिका व संगीतकार स्त्रीची भूमिका साकारली. ही भूमिका अप्रतिम झाली. पण तरी वादग्रस्त ठरली. कारण प्रत्यक्षातील फॅनिया फेनेलॉन हिला व्हॅनेसाने ही भूमिका करणे मान्य नव्हते. या भूमिकेसाठी व्हॅनेसा यांना प्रतिष्ठेची एमी पुरस्कार मिळाला. या मालिकेला त्यावर्षीचे सर्वाधिक रेटिंग मिळाले होते.

पण तिच्या राजकीय भूमिकेचा फटका तिच्या अभिनयाच्या करियरला बसल्यावाचून राहिला नाही. तिच्या मानधनात कपात झाली होती आणि काही भूमिका तिच्याकडून काढून घेतल्या गेल्या. याप्रकारे अन्याय पद्धतीने करार रद्द करण्यामागे आपल्या राजकीय भूमिकेसाठी आपल्याला भेदभावाने वागविले जात आहे असा खटला त्यांनी अमेरिकेतील न्यायालयात दाखल केला. करार रद्द करण्याबद्दलची तिची बाजू मान्य झाली. पण भेदभावाची तक्रार न्यायालयाने मान्य केली नाही.

यानंतर अनेक महत्त्वाच्या फिल्मस्मध्ये त्यांनी भूमिका केल्या. पण त्या लहान होत्या. त्यांच्या अभिनयाला वाव मिळेल अशा भूमिका त्यांना मिळत नव्हत्या. अखेर २००३ मध्ये त्यांना ‘द लाँग डेज जर्नी इनटू नाइट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला. मात्र ही पुरस्कारांची मालिका २००७, २०१० आणि २०११ पर्यंत चालू राहिली.

व्हॅनेसा यांनी अभिनयाबरोबरच आपले राजकारणही चालू ठेवले होते. आपली राजकीय मतं, तत्त्वं आणि मूल्यं यांच्यासाठी जाहीर भूमिका घेणं व त्याच्यासाठी आपला पैसा खर्ची करणं हे त्यांनी चालूच ठेवले. अमेरिकेच्या इराक युद्धाला त्यांनी जाहीर विरोध केला आणि ‘ग्वांटाना मोबे’ येथील तुरुंग बंद करण्यासाठी त्यांनी मोहीम चालवली. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांना त्यांनी पाठिंबा दिला. एड्सविषयक संशोधनाला त्यांनी मदत केली. मानवी हक्कांविषयक अनेक मुद्यांबाबत त्या सक्रिय राहिल्या. १९९३ मध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. त्यानंतर काही वर्षांनी युनिसेफने त्यांची ‘गुडविल अँबेसेडर’ म्हणून निवड केली.

त्यांच्या अभिनेत्रीच्या कारकीर्दीसाठी ब्रिटिश राणीने देऊ केलेली ‘डेम’ ही पदवी त्यांनी नाकारली.

२००२ मध्ये व्हॅनेसा रेडग्रेव्ह यांनी चेचेन फुटीरतावादी आखमद झाकायेव्ह यांच्या जामिनासाठी ५०,००० पौंड इतकी रक्कम भरली. झाकायेव्ह यांनी रशियन सरकारविरुद्धच्या गनिमी युद्धात भाग घेतला होता व ते इंग्लंडमध्ये राजकीय आश्रय मागण्यासाठी आले होते.

२००४ मध्ये व्हॅनेसा व त्यांचे भाऊ कॉरिन यांनी ‘पीस अँड प्रोग्रेस पार्टी’ स्थापन केली. इराक युद्धाविरोधात आणि मानवी हक्कांच्या समर्थनासाठी या पक्षातर्फे त्यांना मोहीम चालवायची होती. पण २००५ मध्ये त्यांनी हा पक्ष सोडला. ‘दहशतवादाविरोधी युद्ध’ या संकल्पनेच्या त्या टीकाकार असून त्याबाबत त्या स्पष्ट भूमिका घेतात. त्यांच्या राजकीय भूमिका या नाझींविरोधी लढय़ातून व लोकशाहीच्या समर्थनातून घडल्या आहेत असे त्या म्हणतात. छळछावण्या, खटला न चालवता लोकांना अटक करून ठेवणं या गोष्टी लोकशाहीत कशा बसतात असा प्रश्न त्या करतात. ‘‘ही भूमिका ‘अतिडावी’ आहे असे मला वाटत नाही. ही कायद्याचे राज्य संकल्पनेचा पुरस्कार करते.’’ असे व्हॅनेसा म्हणतात. मानवी हक्कांच्या त्या खंद्या पुरस्कर्त्यां आहेत. इतका प्रदीर्घ काळ अभिनय आणि आपल्या तत्त्वांसाठी लढा देणं ही विशेष गोष्ट आहे. व्हॅनेसा रेडग्रेव्ह या एक कणखर बाई आहेत. आपल्या समकालीन. आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.

अरुणा पेंडसे aruna.pendse@gmail.com