‘लोकसत्ता नवदुर्गा पुरस्कार २०१५’च्या मानकरी पंढरपूरच्या मीनाक्षी देशपांडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत स्वत:ला आर्थिक स्वतंत्र तर केलंच, पण खेळाच्या आवडीतून स्वत:ही विविध क्रीडास्पधार्ंमध्ये भाग घेतला. पुढे अनेकांना खेळाडू म्हणून तयार केलं. तिघींना ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळवून दिला. दिव्यांग असूनही अडचणींवर मात कशी केली हे सांगणारा लेख.

‘रियो’ कधी काळी भूगोलात वाचलेलं ब्राझीलमधील प्रमुख शहर. गेले १५/२० दिवस आम्हा दिव्यांग क्रीडाप्रेमींसाठी पंढरी झालेलं. प्रथम लांब उडीमध्ये थंगवेलू मरियप्पनने सुवर्णपदक जिंकलं तर त्याच्या पाठोपाठ वरुणसिंग भाटीने त्याच स्पर्धेत कांस्य पदक संपादन केलं. नंतर दीपा मलिक या व्हीलचेअरवरील स्त्रीने गोळाफेकमध्ये (४.६१ मीटर) रौप्यपदक जिंकलं आणि भारताचा तिरंगा फडकला.. शेवटच्या दोन दिवसांत तर सर्व रेकॉर्ड तोडत भालाफेकीमध्ये देवेंद्र झाझरिया याने ‘एफ-४६’ गटातून सुवर्णपदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला..

२१ वर्षीय मरियप्पनचा संघर्षही फार मोठा. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचा उजवा पाय चिरडला गेला. त्याची आई भाजी विकून घर चालवते. कुणाचंही कसलंही पाठबळ नाही, पण ‘टी ४२’ गटात अमेरिकेचा विक्रम असलेल्याला हरवून मरियप्पनने सुवर्णपदक मिळवलं. त्याची ही विजयी दौड म्हणजे सगळं असूनही रडगाणं गाणाऱ्यांना, आयुष्यभर आपल्या परिस्थितीला दोष देत बसलेल्यांना झणझणीत अंजन घालणारी म्हणावी लागेल. मरियप्पनच्या या अतुलनीय यशाला, त्याच्या लढावू बाण्याला त्रिवार वंदन! तेच कर्तृत्व दीपाचंही. दिव्यांग असूनही चाकाच्या खुर्चीने तिच्या आयुष्याला गतिमान केलं. ६ पौंड लोखंडाचा गोळा उचलून बघाच एकदा. पण ४६ वर्षीय दीपा मलिकने तो लीलया उचलला अन् ४.६१ मीटर अंतर तोडत जमिनीवर स्थिरावला, तोही व्हीलचेअरवर बसून. सर्वात कळस चढवला तो देवेंद्र झाझरियाने.. पूर्वीच्या दिव्यांग स्पर्धेतील सगळे विक्रम तोडून ६३.९७ चा नवा विक्रम करीत ‘एफ ४६’ म्हणजे हाताने अपंग असलेल्या गटात भालाफेकीमध्ये त्याने सुवर्णपदक खेचून आणले. केवळ शारीरिकच नव्हे तर आर्थिक, सामाजिक सर्वच स्तरावर अत्यंत प्रतिकूलता असूनही जगाने विकलांग, अपंग म्हणून हिणवलेली ही माणसं यशाची उत्तुंग शिखरे तीही क्रीडाक्षेत्रात गाठतात. कुठून येते त्यांच्यात ही प्रेरणा? तुटल्या हातापायांसह हे आत्मबळ, निर्धार कसा सामावून घेतात? याचं उत्तर एकच- आत्यंतिक दुर्दम्य इच्छाशक्ती, ईश्वराने मला जे दिलंय त्यासह स्वत:ला सिद्ध करण्याची.. सक्षमता अजमावण्याची!

हो.. मी स्वत: लहानपणापासून पोलिओने पराकोटीचं अपंगत्व आल्याने हे सारं पुन्हा पुन्हा अनुभवलंय. अपंग असल्याने खेळण्यासाठी  मला पूर्ण मज्जाव.. त्यावेळचे खेळ – लंगडी, फुगडी, लपंडाव, विटीदांडू याचं मला आकर्षण. उभीच राहू न शकणारी मी हे सारे खेळ खेळणार कशी हे मलाही समजत नसे. अन् माझ्या सोबतच्या मैत्रिणींनाही.. सायंकाळी शाळा सुटताच सगळे गल्लीत एकत्र येऊन खेळायचे. एक दिवस एका मैत्रिणीने दोन्ही हाताची फुली मारत मला फुगडीसाठी ओढलं अन् वर खेचलं. माझी अशी फरपट झाली, कुठल्या कुठं भिरकावली गेले मी.. मग मात्र माझी रवानगी खिडकीत झाली. शाळेतही तसंच असे. पण खेळण्याचा मोह सुटत नव्हता. सुट्टीच्या दिवशी साऱ्याजणी मिळून ओसरीवर एकत्र खेळ सुरू करत. काचा, कवडय़ा बाजार, सागरगोटे. थोडं मोठं झाल्यावर ४ थी, ५ वी पासून सिक्वेन्स, गाढवपाणी खेळू

पत्तेही हाती आले. त्यानंतर कधीतरी घरात ६४ घरांचं ३२ सोंगटय़ांचा बुद्धिबळ आणि कॅरम बोर्डही आला. पण.. त्यातूनही मी कधीतरी एकदा हळूच बाहेर जाऊन विटीदांडू खेळणाऱ्यांच्या मागे लागले. ‘ए मला दे ना ग, एकच एकच’ म्हणत मी विट्टीला दांडू असा जीवापाड जोर लावून मारला की विटी आणायला मित्रांना लांबवर जावं लागलं. मग पुन्हा संधी नाहीच दिली गेली कधी. बघता बघता हे सारं मागे पडलं. खूप शिकायचं, अभ्यास करायचा, पदवी मिळवायची अन् लवकरात लवकर ‘आर्थिक दृष्टय़ा’ स्वत:च्या पायावर उभं राहायचं. त्यासाठी चांगली नोकरी मिळवायची हेच एकमेव ध्येय बनलं. कुणी म्हणायला नको, ‘ही अपंग हिला कुणी सांभाळायचं?’ घरात आई-वडील अनेकदा असं बोलत. ऐकू येत असे. तेच मनावर ठसत होतं. यथावकाश चांगल्या मार्काने (बी. कॉम) पदवी मिळालीही. मग नाकेरीचा शोध, तेही सोप्पं कुठे होतं? ४० वर्षांपूर्वी हातावर सरकत चालणाऱ्या मुलीला नोकरी कोण देणार? छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या लागतही होत्या, सुटतही होत्या. पण तेव्हाही भली माणसं होती. धरसोड करीत १९७९ मध्ये मी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये लिपिक पदावर रुजू झाले आणि कायमही झाले.

१९८१ वर्ष जागतिक अपंग वर्ष म्हणून घोषित झालं. खूप पूर्वी ‘आदमी’ सिनेमात दिलीपकुमारला व्हीलचेअरवर पाहिलेलं.. तेव्हापासून मनात भरलेली व्हीलचेअर दिल्लीच्या एव्हरेस्ट इंजिनीयर कंपनीकडून मी ११०० रुपयांना मागवली. व्हीलचेअर फोल्डिंग असल्याने मला परगावी जाणं सोप्पं झालं. नाव्हेंबर १९८१ मध्ये मी बेळगावच्या शकुंतला परांजपे यांच्याबरोबर बंगळुरुला गेले. तिथं श्रीकंठीरवा स्टेडियमवर आमच्यासाठी स्पर्धा होत्या. प्रभा, लीला, मी आणि बंगळुरुची मालती अशा चौघी ‘व्हीलचेअर’ गटात खेळलो. मला एकही बक्षीस मिळालं नाही. काही समजतच नव्हतं ना .. पण माझ्यासारखीच व्हीलचेअरवरील सिंडिकेट बँकेतील मालती होल्लाशी माझी मैत्री झाली. ती गेली ३०-३५ र्वष टिकून आहे. त्यानंतरची १९८३ मधली नेसिओ मुंबई आयोजित राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा. व्हीलचेअर रेस. आम्ही चार जण होतो. पहिला एक मुलगा, नसिमा दुसरी तर मला तिसरा क्रमांक मिळाला. म्हणजे कांस्य पदक मिळालं. आणि मग समजलं, अपंगांना भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, सर्व मैदानी खेळ व्हीलचेअरवरून खेळता येतात. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा बंगळुरुपाठोपाठ १९८७ ला पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या व्हीलचेअर नॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि भालाफेक, व्हीलचेअर स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवलं.

घराबाहेर महाराष्ट्र बँकेतील वरिष्ठांसह सर्वाचे प्रोत्साहन मिळू लागले. अन् मनात वेगळा विचार येऊ लागला. माझं अपंगत्व पराकोटीचं. शक्ती खूप मर्यादित. अजून किती खेळणार होते, अन् काय मिळवायचं होतं. किती र्वष एकटीच खेळायला, स्पर्धाना जाणार होते? मग शोध सुरू झाला, आपल्यासारखे अजून कितीजण आहेत त्यांच्यापर्यंत हे खेळ कसे पोहोचतील,  मग मीच का ते पोहचवू नयेत? अगदी सुदैवाने पूर्ण आर्थिक स्थैर्य असलेली नोकरी होती. मग क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून तरी इतर अपंगांना पुढे जाण्याचा नवा मार्ग का दाखवू नये. विचार ठरला आणि सुरुवात झाली.  पंढरपूर रोटरी, बँक एम्प्लॉईज युनियन, सहकारी यांच्या सहयोगाने (दरवर्षीच) जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा सुरू केल्या. ११ तालुक्यातून १००-१२५ अपंग स्पर्धक येऊ लागले. बहुतेक विद्यार्थीच असत. त्यांना उपयोगी पडतील अशी खूप बक्षिसं आम्ही देत असू. त्याचं त्यांना खूप आकर्षण असे. जोडीला सुंदर नाव लिहिलेलं प्रमाणपत्रही असे. त्याची तर त्यांना कोण अपूर्वाई..यातूनच निवड करून १९८७ ला मुंबई राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी ७ जणांचा संघ तयार झाला. या पहिल्या संघाने ९ बक्षिसं कमावली..

पालकांना, त्यांच्या शिक्षकांनाही खूप समजावून सांगावं लागत असे. खेळाचे महत्त्व पटवून द्यावं लागत असे. हळूहळू अपंगांच्या खेळाकडे मुले ओढली जाऊ लागली. संख्या वाढत होती. आसपासच्या ग्रामीण भागातही संस्थेचा संपर्क वाढत होता. मग संधी मिळेल तिथे राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अपंगांच्या क्रीडास्पर्धात.. पुणे, मुंबई दौंड, अहमदनगर, नागपूर, गोंदिया, बंगळूरु आणि दिल्लीतही अपंग संघ सहभागी झाला. सुनीता घाडगे (सध्या अर्थशास्त्र प्राध्यापक) तेजस्विनी पाटील (अतिरिक्त तहसीलदार) सुमन जगताप, द्रौपदी शेळके, सुनीता लेंडवे, मंत्रु बिराजदार, राणी क्षीरसागर, स्वाती डिसले या मुलींनी १९९३ ते २००५ पर्यंतचे तप गाजवलं. त्यांच्या जोडीला विक्रमी रवी गायकवाड, हनुमंत भगत, पवार, सतीश थोरात ही मुलेही होतीच. प्रवासात व मैदानावरही बरीचशी जबाबदारी माझ्या बरोबरीने रवी गायकवाड हा दोन्ही पायाने अपंग असलेला खेळाडू घेत असे.

शरीराने अपंग असले तरी मन मात्र कणखर बनले ते या खेळाच्या प्रवासाने. मनाची धाव मैदानावरील पडापडी, धडपडी याचबरोबर मिळणारा निखळ आनंद शोधत राही. त्यासाठी खुल्या मैदानातील अपंगांसाठी खेळ कसे असतात हे अनेकांकडून समजावून घेतलं. अपंगत्वानुसार गट कसे पडतात ते जाणून घेतलं. उदाहरणार्थ, हाताने अपंग असेल तर ‘एफ ४६’, दोन्ही पायाने चालता, उभं राहता न येणाऱ्याचा ‘एफ ५२’ ते ‘एफ ५६’, मग त्यांचे खेळ कुठले त्यांचे नियम.. भाला नेमका हातात (अंगठा व करंगळी) रुंदावून मधल्या तीन बोटाने कसा पकडतात. थाळी मनगटाच्या शक्तीवर पेलून हाताची चार बोटं कशी पकडतात, गोळाफेक करताना तो उचलून कानापर्यंत धरून नजर मात्र समोर ठेवत आखलेल्या भागात कसा फेकला जातो, इत्यादी गोष्टी समजू लागल्या. तशा मुलीही तयार होऊ लागल्या.

आता ४-५ वर्षांत प्रत्येक खेळाडूचे त्या त्या खेळातील प्रावीण्य लक्षात येऊ लागले तसे त्यांचे विक्रम, उच्चांकही तयार होऊ लागले. १०-१५ वर्षांत पंढरपूरचा संघ सर्वत्र नावाजला जाऊ लागला. १९९८ मध्ये नवनिर्वाचित खासदार विनोद खन्ना (अभिनेता) यांच्या हस्ते संघाला बेस्ट मार्च पास्टची ट्रॉफी मिळाली.

१६ मे २००४ कोल्हापूरला ए संघात क्रिकेटचे सामने झाले. आमच्या संघातील सर्व अपंग हे वय २५ च्या आतील. नवोदित १५ खेळाडूंचा संघ, त्याच वयाचे एक अपंग व्यवस्थापक आणि मी असे १७ जण होतो. बरोबर क्रिकेटचा जाणकार पुरुष सहकारी असा नव्हता..तीच आमच्यातील कमतरता. साखळी पद्धतीच्या सामन्यांत आम्ही जिद्दीच्या व दीड महिना केलेल्या सरावाच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचलो.. अंतिम फेरीत कोल्हापूर या १९८७ पासून खेळणाऱ्या अनुभवी संघाने आम्हाला हरवले. पण सर्वोत्तम खेळाडू, सर्वात जास्त धावा करणारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वात जास्त गडी बाद करणारा ही सर्व वैयक्तिक बक्षिसं आमच्या खेळाडूंना मिळाली ही जमेची बाजू.

मी स्वत: अपंग मुलींना येणाऱ्या आत्यंतिक अडचणी, त्या मागे का पडतात हे अनुभवले असल्याने मुलींना पुढे आणण्यात माझा जास्त ओढा होता. आता आमच्याच मुलींच्यात स्पर्धा सुरू झाल्या. ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’साठी नामांकन पाठवायचं ठरलं. पहिल्या वर्षी २००० मध्ये द्रौपदी शेळकेची निवड झाली. द्रौपदी शेळके दोन कुबडय़ा वापरणारी, बी.कॉम. झालेली शेतमजुराची मुलगी. १९९३ ते २००० सात र्वष ती सतत खेळत राहिली. भालाफेकमध्ये ती तरबेज.. सध्या पंढरपूर येथील गोपाळपूरच्या इंजिनीयर कॉलेजच्या वसतिगृहातील स्वागतकक्ष सांभाळते.

तिच्यासोबत खेळणारी सुमन जगताप २००७ मध्ये ‘शिवछत्रपती पुरस्कारा’ची मानकरी झाली. दोन्ही पायाने अपंग असणाऱ्या सुमनने ८ वर्षांत ३५ पदके- ६ सुवर्ण, १८ रौप्य, ११ कांस्य पदके मिळवली. तिची तपस्या, मेहनत कामी आल्याने संस्थेत, शहरात सर्वत्र तिचे खूप कौतुक झाले. पण हार, नारळ आणि शाल या पलीकडे सत्कार गेलेच नाहीत..

स्वाती डिसले ‘शिवछत्रपती’ पुरस्कार मिळवणारी संस्थेची तिसरी खेळाडू. एम ए.बी.एड. स्वाती एका पायाने अपंग. जन्मत:च खुबा निसटल्याने अपंग झालेली. तिच्यावर कसलेच उपचार होऊ न शकल्याने अपंगत्व कमीही झालं नाही. केवळ ६ वर्षांत ३६ सुवर्ण, ११ रौप्य, ५ कांस्य असे पदकांचे अर्धशतक पार करीत स्वातीने ५२ पदकांसह २००६ मध्ये ‘एकलव्य पुरस्कारा’वर आपले नाव दिमाखात कोरले.

रवी गायकवाड हाही एक हरहुन्नरी खेळाडू – ग्रामीण भागातून आलेला. १९९३ ते २००२ या काळात त्याने १९ सुवर्ण, ७ रौप्य, १० कांस्य अशी ३६ पदके जिंकली. दोन्ही पायाने अपंग असलेला रवी गोळाफेकमध्ये सदैव पहिला राहिला. पण घरच्या परिस्थितीने खेळात सातत्य न राहिल्याने  ‘शिवछत्रपती’पासून दूर राहिला..

याच कालावधीत सुमन जगताप, रवी गायकवाड, द्रौपदी शेळके, सुनीता पेंडसे, सुनीता घाडगे या सर्वाना एकेक वर्षी जिल्हा पातळीवरील सोलापूरचा हुतात्मा क्रीडा पुरस्कार, कुकरेजा पुरस्कार, प्रशांतराव परिचारक यांचा अजिंक्य क्रीडा पुरस्कारही मिळाले. त्यांच्याच मागेपुढे सुनीता घाडगे, सुनीता लेंडवे, (२१ पदके) सोनाली तवटे, मंजुळा सुरवसे, अंकिता याही मुली खेळात सदैव अग्रेसर राहिल्या. या सर्वच मुली कमी उत्पन्न गटातील असल्याने खूप अडचणीतून मार्ग काढत होत्या. संस्थेच्या मदतीने सर्वजणी पदवीधर, टायपिंग, कॉम्प्युटरमध्येही चांगल्या पारंगत झालेल्या. आता साऱ्यांचंच लक्ष नोकरी मिळवून आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होण्याकडे लागलेले.. पण तिथे मात्र शासनाने सर्वाचीच घोर निराशा केली. सातत्याने त्या त्या वेळी मुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात राहूनही गाठीभेटी घेऊनही उपयोग झाला नाही. सर्व पात्रता असूनही या तीन ‘शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त’ मुलींना शासकीय नोकरी मिळवण्यात अद्याप यश आले नाही.

इथं नेमकी नकळत तुलना होते सर्वसाधारण खेळाडूंशी.. २००८ मध्ये कोल्हापूरच्या नेमबाज मुलीला क्लास वन नोकरीची ऑर्डर दिली गेली पण त्याच व्यासपीठावर सर्व पात्रता असलेली अपंग खेळाडू सुमन जगताप रिक्त हाताने परत आली. असं का होत असावं? इतर खेळाडूंवर शासन खुल्या जागा, फ्लॅट, रोख रकमा, नोकरीत बढती, पगारवाढ आदींची खरात करते. पण अपंग खेळाडू मात्र तितक्याच तोडीची कामगिरी अनंत अडचणींतून पार पाडून करीत असूनही ते सदैव वंचित. असं का होत असावं.. हा दुजाभाव कशासाठी? दरवर्षी फक्त दोन दिव्यांग राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवडले जातात. पण पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ठरलेली. या व्यतिरिक्त अपंग खेळाडूंना कसलेही लाभ मिळत नाहीत. एक लाखापेक्षा जास्त राज्य कर्मचारी असणाऱ्या महाराष्ट्र शासनास दरवर्षी सर्वथा पात्रता असणाऱ्या दोन अपंग खेळाडूंना कर्मचारी म्हणून नोकरीत सामावता येत नाही का? या अपंग खेळाडूंच्या वाटय़ाला ‘अच्छे दिन’ वाटय़ाला कधी येणार?

नुकत्याच झालेल्या ‘रियो’ ऑलिम्पिकमध्ये ११७ जण सहभागी झाले, त्यांना मिळालेली पदकं २, आणि अनंत अडचणी पार करीत शारीरिक व्याधींना तोंड देत हजारो मैलांचा प्रवास – तिथे सर्व परिस्थितीशी जुळवून घेत- पॅराम्लिपिकचा भारताचा संघ होता फक्त १९ जणांचा. त्यांनी मिळवली ४ पदकं. त्यात २ सुवर्ण आहेत. पाहा कोण जास्त सक्षम आहे, अग्रेसर आहे? अर्थात आम्ही खेळतो ते आनंदासाठी हेही मान्य करायला हवं.

एका स्पर्धेच्या उद्घाटनाची आम्ही तयारी करत होतो. मी व माझे बँकेतील वरिष्ठ ध्वज उभा करीत होतो. आजूबाजूला भाला, गोळा, थाळी,  थ्रो बॉलचा बॉल, क्रिकेटचे स्टम्प साहित्य होते. तिथे १०-१२ वर्षांचा एक मुलगा आला. १०-१५ मिनिटं त्याने निरीक्षण केलं. त्याला सर्वत्र अपंग दिसत होते. त्याने धीर करून माझ्या सहकाऱ्यास विचारले, ‘‘तुम्ही धडक्यांसाठी नाही का स्पर्धा घेत!’’ त्याच्या निरागस प्रश्नातच मी-आम्ही का खेळतो याचं उत्तर मला सापडलं.

केवळ आणि केवळ अपंग असल्यामुळेच.. उशिरा का होईना.. खूप र्वष मैदानावर अनेक प्रकारचे खेळ खेळता आले. अपंग क्रीडा क्षेत्रात खूप र्वष काम करता आलं. मैदानावरील हार-जीतने मला जीवनाला सजगपणे सामोरं जायला शिकवलं. निराश न होता.. मैदानावरील निखळ अनुभव घेत प्रत्येक क्षण नव्या उमेदीनं जगायला शिकवला.

मीनाक्षी देशपांडे

minakshideshpande50@gmail.com