आयव्हीएफ किंवा कृत्रिम गर्भधारणेने मूल जन्माला घालण्याचे प्रमाण जगातच नव्हे तर भारतातही वाढले आहे. त्यातून जगभरात लाखो मुलं जन्मालाही आलेली आहेत. मात्र या संदर्भातला कायदा आपल्या देशात नाही. तसेच अलीकडे एम्ब्रियो फ्रीजिंग वा गर्भ गोठवण्याच्या तंत्राचा होऊ लागलेला वापर उशिरा मातृत्व स्वीकारणाऱ्या स्त्रियांना जसा फायद्याचा ठरतो आहे तसाच काहीबाबतीत तोटय़ाचाही ठरतो आहे. नैसर्गिक गर्भधारणेपलीकडे विज्ञानाने निर्माण केलेले हे पर्याय नेमके काय आहेत आणि त्यातून कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांचा ऊहापोह ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने..
टेस्ट टय़ूब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पद्धत आहे. जगातील पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीचा जन्म २५ जुलै १९७८ रोजी इंग्लंडमधील ओल्धाम जनरल हॉस्पिटल, ग्रेटर मँचेस्टर, इंग्लंड येथे झाला. त्यानंतर लगेचच ऑक्टोबर १९७८ मध्ये भारतात कोलकाता येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या नावे ‘दुर्गा’ हिच्या जन्माची नोंद झाली. या तंत्राचा शोध लागून आता जवळजवळ ४० वर्षे होत आली. एवढय़ा कालावधीत जगभरात लाखो बालके जन्मास आली आहेत.

आय.व्ही.एफ. या पद्धतीमध्ये, स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्राणू या दोघांचे मीलन शरीराबाहेर केले जाते. या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन देऊन ही बीजांडे बाहेर काढली जातात. त्यानंतर पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील एका जारमध्ये जमा करून, बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. हे भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जातात. त्यानंतर यातील चांगल्या प्रतीचे भ्रूण हे स्त्रीच्या गर्भाशयात परत सोडले जातात. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या उपचार पद्धतीने गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे रक्ताची चाचणी करून ठरवण्यात येते. सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुषांमध्ये कामामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, बदललेला आहार या सर्व गोष्टींमुळे जवळ जवळ ३०-४० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अशा जोडप्यांसाठी ही उपचार पद्धती एक प्रकारे वरदानच ठरली आहे. पण जसे प्रत्येक नाण्यास दोन बाजू असतात त्याप्रमाणेच या वरदानाचा योग्य प्रकारे वापर न केला गेल्यास ते शाप ठरण्यास वेळ लागणार नाही.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

बऱ्याच देशांमध्ये ही उपचार पद्धती त्या त्या देशातील कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली अवलंबिली जाते. आपल्या देशात अजूनपर्यंत असा कायदा अस्तित्वात आलेला नाही. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने इंग्लंडमधील Human Fertilization and  Embryology authority  (एचएफइए) अनुसरून अशी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत आणि त्याचा कायदा संमत होण्यासाठी २००८ मध्ये संसदेत मांडण्यात आला आहे.

इंग्लंडमध्ये १९७८ मध्ये पहिली टेस्ट टय़ूब बेबी लुइस ब्राऊन हिचा जन्म झाला, त्यापाठोपाठ जुलै १९८२ मध्ये चौकशीसाठी वोर्नाक समिती स्थापली गेली. या समितीचा मुख्य उद्देश होता मानवी भ्रूणशास्त्र विषयातील नवीन तंत्र आणि शोध यांचा पाठपुरावा करणे. त्याचप्रमाणे या विषयाशी निगडित सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर बाबी तपासून त्यावर नियंत्रण ठेवणे आणि या नवीन तंत्रज्ञानाचा सामाजिक, नैतिक आणि कायदेशीररीत्या समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करणे. १९९० मध्ये इंग्लंडमधील संसदेत ‘एचएफईए’ हा कायदा मंजूर केला गेला. या कायद्यांतर्गत ‘एचएफईए’ ही सरकारी संस्था निर्माण केली गेली. या संस्थेंतर्गत मानवी भ्रूणांवरील संशोधन आणि वंध्यत्व निवारण केंद्राची देखरेख आणि त्यासाठी लागणारी परवानगी या गोष्टी नियंत्रित केल्या जातात. खालील काही प्रकारच्या घटना ‘आयव्हीएफ’ प्रयोगशाळेत कळत-नकळतपणे घडलेल्या उघडकीस आल्या होत्या. या आणि अशा प्रकारच्या अवधानाने किंवा अनावधानाने घडणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी ही संस्था सतत कार्यशील असते. काही रुग्णांच्या बाबतीत अनावधानाने चुकीची बीजांडे आणि शुक्राणू एकत्र करण्यात आले, चुकीचे भ्रूण त्या रुग्णाच्या गर्भाशयात सोडण्यात आले. या घटनांमुळे वंध्यत्व निवारण केंद्रावर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे चुकीच्या पालकत्वासंबंधी गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. कॅलिफोर्नियातील एका बाईच्या गर्भाशयात दुसऱ्याच जोडप्याचे भ्रूण सोडले गेले आणि त्या बालकाच्या जन्मानंतर त्या स्त्रीला या गोष्टीची कल्पना देण्यात आली. याच गोष्टींमुळे इंग्लंडमध्ये ‘एचएफईए’ संस्थेने प्रत्येक वंध्यत्व निवारण केंद्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक रुग्णांसंबंधित करण्यात येणारी प्रत्येक कृती ही दोन व्यक्तींनी (रुग्णाचे नाव, त्याचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख इत्यादी बाबी) प्रत्येक वेळी तपासून मगच ती कृती करण्यात यावी, असा नियम अस्तित्वात आणला. यालाच ‘दुहेरी साक्षीदार प्रणाली’  (double witness system) असे संबोधण्यात येते. ज्या प्रत्येक कृतीमध्ये रुग्णाची अंडी, शुक्राणू किंवा भ्रूण इनक्यूबेटरमधून बाहेर काढले जातात आणि हाताळले जातात ती प्रत्येक कृती दोन व्यक्तींकडून तपासण्यात येते. ज्या व्यक्तीने ती कृती केली आणि ज्या व्यक्तीने ती कृती करताना साक्ष दिली त्या दोघांच्या सह्य़ांची त्या त्या कृतीसमोर रुग्णाच्या उपचार फॉर्ममध्ये नोंद करावी लागते. जर चुकून काही अघटित घटना घडली किंवा साक्ष देऊनही अनावधानाने काही घडले तर त्या दोन व्यक्ती आणि ते केंद्र त्या घटनेस जबाबदार धरले जाते. या गोष्टीची नोंद ‘एचएफईए’च्या नोंदणी पुस्तकात ‘घटना इशारा’  (incident alert) या नावाने केली जाते. त्या घटनेच्या तीव्रतेनुसार त्या व्यक्ती आणि सबंधित सर्व व्यक्तींवर आणि केंद्रावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर घटनेची तीव्रता फारच जास्त असेल तर संबंधित केंद्राचे आणि व्यक्तीचे प्रमाणपत्र रद्द होऊ शकते. अशा प्रकारच्या कडक कायद्यांमुळे इंग्लंड आणि युरोपीय देशांमध्ये या क्षेत्रामध्ये खूपच पारदर्शकता पाळली जाते. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृती तेथे घडत नाहीत. अशा प्रकारची ‘दुहेरी साक्षीदार प्रणाली’ आता अमेरिकेतील काही केंद्रांमध्ये पाळली जाते, पण अजूनही तिकडे सर्वत्र ही पद्धत अवलंबिली जात नाही.

‘एचएफईए’ने ‘मॅन्युअल दुहेरी साक्षीदार प्रणाली’, ‘बार कोडिंग प्रणाली’ आणि रेडिओ फ्रीक्वेन्सी वापरून होणारी इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टीम अशा विविध प्रकारे कृतींना साक्ष देणाऱ्या पद्धतीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी एक गट नेमला. इंग्लंडमधील वेगवेगळ्या केंद्रातील अघटित घटना घडल्यामुळे हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. इंग्लंडमध्ये एका रुग्णालयातील प्राध्यापक ब्रायन टोफ्ट यांनी या चार घटना शोधून काढल्या होत्या त्या पुढीलप्रमाणे- दोन घटनांमध्ये स्त्री रुग्णाची बीजांडे फलित करण्यासाठी तिच्या नवऱ्याचे शुक्राणू न वापरता दुसऱ्याच बाईच्या नवऱ्याचे शुक्राणू वापरण्यात आले. तिसऱ्या घटनेत भ्रूण गोठवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रातील द्रवीय नायट्रोजनच्या पातळीची नीट नोंद न केल्यामुळे ते भ्रूण उपचारासाठी वापरण्यास अयोग्य ठरले होते आणि चौथ्या घटनेत लेखा विभागातील कर्मचाऱ्याच्या कामातील त्रुटीमुळे चुकीच्या रुग्णाचे भ्रूण नष्ट केले गेले. २००८ मध्ये प्राध्यापक टोफ्ट यांनी असे निदर्शनास आणले की या चुकीच्या घटना बऱ्याच वेळा मानवी आणि व्यवस्थेमधील त्रुटीमुळे घडू शकतात. त्या टाळण्यासाठी काही कडक नियम असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारच्या मॅन्युअल तपासणी पद्धती या पारंपरिकरीत्या वैद्यकीय क्षेत्रातल्या इतर विभागांतदेखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ प्रत्येक रुग्णाला योग्य ती उपचार पद्धती देताना, रुग्णावर शस्त्रक्रिया करताना तोच रुग्ण आणि त्या रुग्णावर होणारी शस्त्रक्रिया तीच आहे हे पडताळून बघण्यासाठी, रुग्णाच्या रक्ताच्या चाचण्या करताना, रुग्णांना इंजेक्शन देताना, औषधे लिहून देताना किंवा रक्ताचे संक्रमण या सारख्या महत्त्वाच्या उपचार पद्धतीमध्ये याचा उपयोग केला जातो आणि अशी खात्री करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आय.व्ही.एफ. उपचारासंदर्भात प्रयोगशाळेत खालील बाबीसाठी मानवी साक्ष होणे अतिशय गरजेचे असते.

१) स्त्रीची बीजांडे आणि पुरुषाचे शुक्राणू हे त्या नवरा-बायकोचे आहेत हे पडताळून पाहणे.
२) अशा प्रकारे निर्माण केलेले भ्रूण हे योग्य जोडप्यातील स्त्रीच्याच गर्भाशयात सोडले जात आहेत याची खात्री करणे.

या उपचार पद्धतीचा उपयोग करणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अशा केंद्रांची संख्या भारतातही सध्या वाढली आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावर नोंदी नसल्यामुळे अशा केंद्रांची संख्या भारतात किती आहे याची योग्य माहिती उपलब्ध नाही. अलीकडच्या काळात आयसीएमआर या संस्थेंतर्गत अशी सुविधा देणाऱ्या सर्व केंद्राचे नोंदणीकरण करणे क्रमप्राप्त झाले आहे. परंतु या उपचार पद्धतीमुळे जन्मलेल्या मुलांची नोंदणी आणि त्यानंतर पाठपुरावा या गोष्टींचा अजूनही अभाव असल्यामुळे ही उपचार पद्धती वापरून जन्मास आलेल्या मुलांमध्ये जन्मत:च काही दोष असतात का, याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीतील काही फसवणुकीचे प्रकारही वर्तमानपत्रांतून उघडकीस आहे आहेत. हे गैरप्रकार फक्त भारतातच नव्हे तर जगातही उघडकीस आले आहेत. याचमुळे बऱ्याच पुढारलेल्या देशांमध्ये अशा गोष्टी टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत. परंतु भारतामध्ये अजूनही या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वंध्यत्व निवारण केंद्राची नोंदणी आणि त्याच्या कामाचा तपशील ठेवणे या सर्व गोष्टींची म्हणावी तितकी कृतिशीलता आलेली नाही.

आपण आतापर्यंत वंध्यत्व म्हणजे काय आणि मुख्यत्वे इंग्लंडमध्ये या नवीन उपचार पद्धतीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात का आली? आणि ती अस्तित्वात आल्यावर काय काय बदल घडत गेले ते बघितले. आता आपण वंध्यत्व उपचार निवारण केंद्र कसे निवडावे हे जाणून घेऊ. कोणत्या अटी पूर्ण होत असतील तर त्या केंद्रात उपचार घेण्यासाठी जावे? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.

भारतासारख्या देशात या उपचार पद्धतीबद्दल साधारण रुग्णांमध्ये खूपच कमी जागरूकता आहे. या उपचार पद्धतीबद्दल अजूनही बऱ्याच गैरसमजुती समाजात आढळून येतात. रुग्णाच्या या अज्ञानाचा फायदा घेतला जाऊ शकतो. आपल्या देशात या उपचार पद्धतीसाठीचा कोणताही कायदा, मार्गदर्शक तत्त्वे अजूनही अधिकृतरीत्या सरकारकडून बंधनकारक केली गेली नसल्यामुळे रुग्णांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. उपचार पद्धती घेणाऱ्या रुग्णांचीच ही जबाबदारी आहे की, त्यांनी अधिकाधिक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन झाल्यावर मगच उपचार केंद्राची निवड करावी. आजकाल वेगवेगळ्या संकेतस्थळांवर ही माहिती उपलब्ध असते. या उपचारासाठी येणारा खर्च, ही उपचार पद्धती यशस्वी होण्याचा दर, ज्या केंद्रामध्ये तुम्ही उपचार घेऊ इच्छिता त्या केंद्रात साधारण किती रुग्ण उपचार घेतात? त्या केंद्रातील उपचार देणारे डॉक्टर, नर्सेस तसेच या उपचार पद्धतीत अत्यंत महत्त्वाचा असा ज्याचा वाटा असतो ती व्यक्ती म्हणजे गर्भवृद्धीशास्त्रज्ञ (Embryologist)), त्याचे कौशल्य या विषयी सर्व माहिती एकत्रित करावी. त्या केंद्रात उपचार पद्धतीतील गोपनीयता, पारदर्शकता आणि नैतिकता या सर्व बाबी पाळल्या जातात की नाही याची खात्री करून मगच त्या केंद्रात उपचार घेण्याचा निर्णय घ्यावा. तुम्ही खालील प्रकारे प्रश्न डॉक्टर व गर्भवृद्धीशास्त्रज्ञ यांना विचारून तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता.

१) रुग्णांची (नवरा व बायको) ओळख पटण्यासाठी प्रयोगशाळेत कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते? उपचारादरम्यान एकाच वेळी वेगवेगळ्या जोडप्यांवर उपचार चालू असू शकतात. प्रत्येक जोडप्याची बीजांडे आणि शुक्राणू एकत्र करून भ्रूण बनविले जातात. अशा वेळी वेगवेगळ्या रुग्णांची बीजांडे व शुक्राणू चुकून एकत्रित येऊ नये यासाठी त्या प्रयोगशाळेत कशा प्रकारे काळजी घेतली जाते हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

२) स्त्रीच्या शरीरातून किती बीजांडे बाहेर काढण्यात आली, त्यापासून किती भ्रूण बनले? त्यांचा काय दर्जा आहे? त्यापैकी किती पुन्हा आता सोडण्यास योग्य आहेत? ते जाणून घेणे.

३) भ्रूण तयार झाल्यावर किती भ्रूण परत गर्भाशयात सोडले जातात? मार्गदर्शक तत्त्वानुसार एकाच वेळी जास्तीत जास्त तीन भ्रूण गर्भाशयात सोडण्यास मान्यता आहे. परंतु ही उपचार पद्धती जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी जास्त भ्रूण गर्भाशयात टाकले जाण्याची शक्यता असते. असे केल्यास आणि जर ते सर्वच भ्रूण गर्भाशयात चिकटले तर एकापेक्षा जास्त गर्भधारणा जसे की जुळे, तिळे होण्याने स्त्रीच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणूनच त्याची पूर्ण माहिती डॉक्टरांकडून करून घ्यावी.

४) जर भ्रूण गर्भात सोडूनसुद्धा चांगल्या प्रतीचे जास्त भ्रूण उरलेले असतील तर त्या भ्रूणांचे काय केले जाते? असे गर्भ गोठवून ठेवले जाऊ शकतात. ती सुविधा उपलब्ध आहे ना? असे भ्रूण कशा प्रकारे साठवले जातात? ते गर्भ कोणत्या रुग्णांचे आहे कशा प्रकारे ओळखले जातात? त्याच रुग्णाचे आहेत हे खात्रीलायकरीत्या कसे सांगितले जाते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे भ्रूण गर्भाशयात सोडले जातात अथवा गोठवून ठेवले जातात ते रुग्णाला पाहायला मिळू शकतात का?

वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे उपयोगात आणणे शक्य आहे आणि त्यासाठी योग्य पद्धती उपलब्धदेखील आहेत. फक्त त्यांचे पालन होते की नाही आणि कशा प्रकारे होते या गोष्टीची पूर्णपणे माहिती करून घेण्याचा अधिकार हा उपचार घेणाऱ्या जोडप्यांना आहे. त्यांनी याचा वापर करून आपली दिशाभूल होणार नाही याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी.

या सर्व उपचार पद्धतींत प्रयोगशाळेत भ्रूण तयार करण्याच्या पद्धतीत डॉक्टरशिवाय अजून एक महत्त्वाची व्यक्ती जबाबदार असते ती म्हणजे गर्भवृद्धीशास्त्रज्ञ. हीच व्यक्ती प्रयोगशाळेत स्त्रीची बीजांडे आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे मीलन घडवून आणून त्यापासून भ्रूण तयार करते. तो भ्रूण आत गर्भाशयात सोडेपर्यंत प्रयोगशाळेत त्याची देखभाल करणे, वेगवेगळ्या रुग्णांचे गर्भ एकत्र होणार नाहीत याची काळजी घेणे ही जबाबदारी त्यांची असते. तोच तयार झालेल्या भ्रूणांपैकी चांगल्या दर्जाचे भ्रूण गर्भाशयात सोडण्यासाठी निवडून जर उरलेले भ्रूण गोठवण्यासाठी योग्य असतील तर ते भ्रूण गोठवून साठवून ठेवण्याविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतो. त्याची योग्य प्रकारे नोंद आणि ओळख पटेल अशी मार्गदर्शक तत्त्वे पाळणे हे त्याचे काम असते. डॉक्टरबरोबर तोही अतिशय जोखमीचा वाटा उचलत असतो. म्हणूनच तुम्ही उपचारासाठी निवडलेल्या केंद्रात कोण व्यक्ती गर्भवृद्धीशास्त्रज्ञ म्हणून काम करते? त्याची शैक्षणिक पात्रता, विषयाचे अवलोकन आणि त्याचा या क्षेत्रातील अनुभव काय आहे याची चौकशी करणे आणि त्याची खात्री पटवून घेणे हे रुग्णाचे काम आहे. रुग्णांना या गोष्टींची खात्री पटवून देणे हे क्लिनिक आणि डॉक्टरचे कर्तव्य आहे. आपल्या देशात बऱ्याच जणांना गर्भवृद्धीशास्त्रज्ञ ही संकल्पना अजूनही माहीत नाही. आता हळूहळू या गोष्टीची जाणीव व्हायला सुरूवात झाली आहे. गर्भवृद्धीशास्त्रज्ञ हाही या उपचार पद्धतीत तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्याचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यालाही डॉक्टरइतकेच महत्त्वाचे स्थान आहे.

 

भारतातील सद्यस्थिती
२०१३-१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातदेखील आयव्हीएफ केंद्रांची संख्या जवळपास ३०००च्या वर होती महाराष्ट्रातच जवळ जवळ ४५० केंद्रे नोंदविली गेली होती. त्यापैकी १८० म्हणजे ४२ टक्के उपचार केंद्रे ही एकटय़ा मुंबईतच होती. या संख्येत आता अधिकच वाढ झाली असणार. यावरूनच अंदाज येतो की अशी उपचार पद्धती करून घेणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही उपचार पद्धती देणाऱ्या बऱ्याच डॉक्टरांचेही एकमत आहे की, या क्षेत्राशी संबंधित कायदा होणे गरजेचे आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये विश्वास निर्माण होऊन, पारदर्शीपणे या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन त्यांना मातृत्वाचा आनंद उपभोगता येईल. वर उल्लेख केलेल्या विविध प्रकारच्या घटना या इतर देशांतही घडून गेल्या आहेत. या अशा घटना घडल्यामुळेच त्या त्या देशांनी आयव्हीएफ संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे, कायदे तयार करून त्याचे पालन करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारचा कायदा भारतातही होऊ घातला आहे, त्याची मार्गदर्शक तत्त्वे लिहून संसदेसमोर मांडण्यात आली आहेत. पण त्याचे कायद्यात रूपांतर होण्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. तोपर्यंत ही उपचार पद्धती घेणाऱ्या जोडप्यांनी स्वत:च आपली दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे. ज्या प्रमाणे एखादी वस्तू खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही, यासाठी आपण जागरूक असतो त्याचप्रमाणे याहीबाबतीत जोडप्यांनी जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

लेखासाठी संदर्भ –
http://www.hfea.gov.uk
National guidelines for accreditation, supervision and regulation of ART clinics in India
http://www.news.bbc.co.uk
Toft B. Independent review of the circumstances surrounding four adverse events that occurred in the reproductive medicine units at the Leeds Teaching Hospital NHS Trust, West Yorkshire (2004)

– डॉ. प्रज्ञा जोशी
(डॉ. प्रज्ञा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात पीएच. डी. मिळवली आहे. ‘ह्य़ुमन फॉलिक्युलर फ्ल्युइड’ हा त्यांचा पीएच. डी.च्या अभ्यासाचा विषय होता. गेली १५ वर्षे त्या गर्भवृद्धी शास्त्रज्ञ वा एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून भारतात आणि परदेशात काम पाहात आहेत. त्या ब्रिटनमधील प्लायमॉथ आणि बर्मिगहॅम येथील आयव्हीएफ क्लिनिकमध्ये सहा वर्षे एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या. डॉ. प्रज्ञा यांनी रॉयल कॉलेज ऑफ पॅथॅलॉजिस्टमधून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.)