‘‘अहो, मी एकटी कधीच राहिलेली नाही. अमित सहा महिन्यांसाठी परदेशी जातोय. माझे आई-वडील माझ्या मोठय़ा बहिणीच्या बाळंतपणासाठी गेले आहेत. माझा भाऊ परदेशी असतो. माझ्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीचे सासरे फार आजारी आहेत आणि दुसऱ्या मैत्रिणीला डोहाळ्यांचा त्रास होतोय – त्या दोघी येऊ शकत नाहीत. म्हणजे माझ्या सोबतीला रात्री येणारं कुणीच नाही. दिवसाचा वेळ मी माझा घालवू शकते. पण रात्री मला एकटीला भयंकर भीती वाटते. लहानपणापासून मी कधीही रात्री घरात एकटी राहिलेली नाही. एवढय़ा मोठय़ा घरात रात्री मी एकटीने राहणं – तेही सहा महिने – अशक्यच आहे. काय करायचं ते सुचतच नाही. अमितला हा त्याच्या करिअरच्या दृष्टीने चांगली संधी मिळालीय. पण त्याच्या आनंदातही मी सहभागी होत नाही. कालच तो रागावला आणि म्हणाला, ‘‘मी एक तर जॉब सोडून चोवीस तास घरी तुझ्यासोबत राहतो नाही तर आपण घटस्फोट घेऊन मी माझं लक्ष करिअरवर केंद्रित करतो. कारण दोन्हीचा बॅलन्स साधणं शक्य नाही.’’ छाया रडू लागली.

छायाचे ‘मोठे’ घर म्हणजे एका मोठय़ा कॉम्प्लेक्समधला भर वस्तीतला दोन बेडरूमचा फ्लॅट होता. छाया शिक्षित होती. एका कंपनीत पार्टटाइम नोकरी करीत होती. सगळ्यांमध्ये मिसळणारी होती. पण तिच्याच घरात रात्री एकटं राहण्याची तिला भयंकर भीती वाटत होती. भीती का वाटत होती? ‘चोर आले तर? मी एकटी आहे हे कळून कुणी घरात घुसला तर? माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून घर लुटले तर? माझ्यावर बलात्कार झाला तर? मी आजारी पडले तर? एकदम छातीत कळ येऊन हार्ट अ‍ॅटॅक आला तर?  अपरात्री दारावरची बेल वाजली तर? मी झोपेतच मरून गेले तर फोन नुसता वाजत राहील पण घरी प्रत्यक्ष येऊन दार फोडून आत आल्याखेरीज माझा मृत्यू झालाय हे सुद्धा कुणाला कळणार नाही. ठीक आहे हे समजा, थोडं अतिशयोक्तीचं वाटत असेल तरी समजा ओल्या लादीवरून मी घसरून पडले आणि फ्रॅक्चर झालं तर? आपण ऐकतो ना अशा गोष्टी?’’ मी या थोडय़ाच गोष्टी सांगितल्या पण छायाकडे अशा गोष्टींची खूप मोठी यादी होती!

What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”
mahavikas aghadi marathi news, vanchit bahujan aghadi marathi news, mahavikas aghadi alliance with vanchit bahujan aghadi marathi news
मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
chaturang article, ganesh matkari, my female friend, common thoughts, subjects, two way communication, sharing,
माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट

छायासारखी एकटं राहण्याची किंवा आणखीही काही गोष्टींची भीती आपल्यातल्या अनेकांना असते. कुणाला अंधाराची भीती वाटते, कुणाला रस्ता क्रॉस करण्याची. कुणाला नव्या जागी – नव्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते, कुणाला विमानातून प्रवास करण्याची भीती वाटते. माझे एक स्नेही विमानातून प्रवास करण्याच्या भीतीपोटी कुठेही देशात-परदेशात जात नाहीत. त्यांची लग्नं होऊन परदेशी गेलेली मुलं बोलावून थकली. त्यांना अशी भीती का वाटते यावरचं त्यांचं म्हणणं – कारला, गाडीला अपघात झाला तरी आपण जमिनीवर असतो. आजूबाजूच्या लोकांची पटकन् मदत मिळू शकते. पूर्वी बोटीत असलो आणि काही झालं तर मी पाण्यात पोहून माझा जीव वाचवू शकतो असं वाटायचं, पण टायटॅनिक पाहिल्यावर ते मत बदललं. विमानात काही झालं तर जीव वाचवण्याची काही संधीच नाही. पॅराशूटने उडी मारली आणि ते उघडलंच नाही तर?’’

त्यांच्या या विचारांवर आपण काय बोलणार?

चार लोकांमध्ये मिसळण्याची भीती अनेकांना वाटते. असे लोक समारंभ टाळतात. स्टेजवर जाऊन काही बोलण्याची भीती खूप जणांना असते. नीता म्हणते, ‘‘माइकसमोर मी उभी आणि सगळ्या समोरच्या लोकांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या – मला तर भीतीने घामच फुटतो. पाठ करून बोलणं जाऊ दे – हातातला लिहून आणलेला कागदही नीट वाचता येत नाही.’’

परीक्षेची भीती खूप लोकांना वाटते. एका मोठय़ा कंपनीचे मालक एकदा म्हणाले, ‘‘हा मी बिझनेस चालू केला म्हणून ठीक आहे. पण मला जर नोकरीसाठी इंटरव्हय़ू द्यायची वेळ आली असती तर मी आजपर्यंत बेकार राहिलो असतो. अजूनही मला अधूनमधून माझी परीक्षा आहे आणि मला खूप उशीर झालाय किंवा सगळे जण पेपर लिहिताहेत आणि मला काहीच आठवत नाही, रिझल्ट लागलाय आणि मी एकटा नापास झालोय असली स्वप्नं पडतात!’’

माणसापरत्वे भीतीचे प्रकार बदलतात. भीतीची उगमस्थानं बदलतात. पण प्रत्येकाला कधी ना कधी कसली तरी भीती असते. भीती वाटू शकते. माणसाच्या मनातल्या मूळ भावनांपैकी भीती ही एक भावना आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू अटळ आहे हे सत्य माहीत असूनही मृत्यूची भीती अनेकांना वाटते. आपण नीट पाहिलं तर सर्वसाधारणपणे भीती दोन कारणांनी वाटते – एक म्हणजे जे अज्ञात आहे – माहीत नाही, पंचेंद्रियांना आकळत नाही, बुद्धीला समजत नाही, ज्याची माहिती आपल्याला नाही अशा गोष्टींची भीती वाटते. आणि दुसरं म्हणजे आपण काही गमावू, हरवू, आपल्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक इजा वा नुकसान होईल असं वाटलं तरी भीती वाटते.

भीती वाटण्याला जर प्रत्यक्षात खरोखर तशी परिस्थिती असेल तर त्यासाठी सावधपणाने, सजगपणाने उपाय करता येतात. चोरांची भीती वाटत असेल तर भक्कम दारं, कुलपं, राखणदार नेमणं, सीसीटीव्ही लावणं यासारखे उपाय करता येतात. शहरांत, गावांत एखादी साथ असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आपल्या आरोग्य सवयी पाळण्याचे, आहार-विहार-आचार याबाबत संयमित राहण्याचे उपाय करता येतात. आपण एखाद्या गुन्ह्यचे लक्ष होऊ नये म्हणूनही आपल्या जगण्याला एक शिस्त देणं आवश्यक असतं. व्यसनांनी आपला ऱ्हास होतो हे माहीत असून पुरत नाही तर त्यांचा मोह टाळणं यासाठी अशा शिस्तीचा उपयोग होतो.

अज्ञानामुळे, माहितीच्या अभावामुळे वाटणाऱ्या भीतीवर, ज्ञान मिळवून, माहिती मिळवून त्याचा जगताना उपयोग करून अशा भीतीवर मात करता येते. प्रश्न उरतो तो काल्पनिक भीतीचा आणि कल्पनेने नकारात्मक गोष्टींचा मोठा बागुलबुवा निर्माण करण्याची कल्पनाशक्ती ही खरोखर एक देणगी माणसाला लाभलेली आहे. पण आपण तिला वाईट, नकारात्मक, घातक गोष्टींची कल्पना करण्यासाठी जुंपतो आणि स्वत:चं मोठं नुकसान करून घेतो. ‘अगा जे घडलेचि नाही’ या उक्तीप्रमाणे कल्पनेतच आपण कित्येकदा अगणित मरणं मरत असतो.

हे थांबवायचं असेल तर मनाला समर्थ, बलवान आणि कणखर केलं पाहिजे. ते आपणच करू शकतो. दुबळ्या शरीराला आपण योग्य आहार, व्यायाम आणि सजग वागण्याने सुदृढ करतो तसंच दुबळं मन आपण सकारात्मक विचारांनी, मनावर आपणच केलेल्या योग्य संस्कारांनी आणि मनातल्या वाईट नकारात्मक घातक भावनांना आवर घालून सुदृढ, बलवान करू शकतो. त्यासाठी एक सोपा उपाय करायचा. आपल्याला नेमकी कसली भीती वाटते ते सविस्तर लिहून काढायचं. मग त्यातल्या अवास्तव गोष्टी शोधायच्या आणि त्यांना चॅलेंज करायचं. विवेकनिष्ठ उपचार पद्धतीने अशा काल्पनिक भीतीवर आपण नक्कीच मात करू शकतो. आणखी एक आपण करू शकतो ते म्हणजे ‘स्टॉप आणि स्विच’सारखी मनोनियंत्रण तंत्रं शिकून वापरायची. मनात सकारात्मक काल्पनिक भीतीचे विचार आले की त्यांना मनातच मोठय़ाने म्हणायचं ‘स्टॉप’. नको त्या विचारांना आपण थांबवलं. पुढचा शब्द मनात म्हणायचा ‘स्विच’ म्हणजे बदल. आता मुद्दाम जाणीवपूर्वक सकारात्मक वास्तवाशी निगडित, उमेदीचे विचार मनात आणायचे. काही वेळाने पुन्हा मन भरकटेल. पुन्हा मनात म्हणायचं ‘स्टॉप’, ‘स्विच’. दिवसात कितीही वेळा म्हणावं लागलं तरी म्हणायचं. पण मनाला सैराट सोडायचं नाही. काही दिवसांनी नकारात्मक विचार, काल्पनिक भीतीचे विचार कमी होतात -थांबतात. स्टॉप ऐवजी आपण डिलीट, एक्झिट, थांब, बंद – असेही शब्द वापरू शकतो. खरं तर काल्पनिक भीतीमुळे आपण आपल्याला संधीच देत नाही. थोडी हिंमत करून, मन सुदृढ करून स्वत:ला संधी दिली, आपल्या क्षमता वाढल्या की कळतं – डर के आगे जीत है।

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in