निर्मलाताईनी लॅपटॉप बंद केला आणि त्या स्वयंपाकघराकडे जाण्यासाठी टेबलजवळून दूर झाल्या. गेला महिनाभर त्या ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्या लॅपटॉपवरती टाइप करीत होत्या. त्यापूर्वीही त्या निवृत्त झाल्यानंतर दररोज ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्या वहीत लिहून काढत. आणि नंतर त्यांचे मनन करीत. हाताला अक्षरांचं वळणं राहावं, मनाला स्मरणाचं भान राहावं, थोडा मनोबोध लाभावा, एवढाच मर्यादित हेतू. नवीन काही जमेल तसं शिकावं, हे काळाचं भानही त्यांना होतं, म्हणूनच लॅपटॉपवर चुकतमाकत सुधारत त्या मराठी लेखनही शिकल्या. नोकरी करत असताना ज्या गोष्टी अवघड जात होत्या त्या आता निवृत्तीनंतर सहज वाटत.

निर्मलाताई स्वयंपाकघरात गेल्या. बाई पोळ्या करून गेल्या होत्या. इतर जिन्नस मात्र त्या स्वत:च रांधत. आरोग्याचा विचार करून, नेटकेपणाने. हा नेटकेपणा त्यांना आईकडून वारसानेच मिळाला होता. त्यांनी चॉपबोर्ड पुढे ओढला. एवढय़ात वीरेंद्र, त्यांचा मोठा मुलगा घाईघाईने स्वयंपाकघरात आला. ‘ तू? या वेळी? आता तर तू कोर्टात गेला होतास ना? तुझे बाबा तर कधीच कोर्टात गेलेत. तुमचं महत्त्वाचं अपील होतं ना. ’’

lawrence bishnoi
अधोविश्व : पंजाब ते कॅनडा… बिष्णोई टोळीची दहशत
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग

‘‘येस, डिअर मॉम,’’ हा ‘मॉम’ म्हणतोय, त्या अर्थी विशेष खुशी दिसतेय. एरवी, त्या ‘वीरेंद्र’ आणि ‘धीरेंद्र’च्या आईच होत्या. आणि मनोहर इनामदार बाबा होते. ‘‘अभिनंदन मॉम. आत्ताच न्यूज फ्लॅश झाली आहे. सेव्हन्थ पे कमिशन मंजूर झालंय, आणि तुझी पेन्शन वीस हजार रुपये होणार. प्लस लॉट ऑफ मनी, अ‍ॅज अ‍ॅरिअर्स. ग्रेट! उद्याच सेलिब्रेशन. माझ्या आणि धीरेंद्रतर्फे.’’ निर्मलाबाईंना छान वाटलं, पण तितकंच. कारण आता त्यांच्या घरात समृद्धी नांदत होती. पुण्यात तिघांचे तीन बंगले होते. शिवाय एक कमर्शिअल बिल्डिंगमधला पूर्ण मजला ‘इनामदार अ‍ॅडव्होकेट्स’च्या पाटय़ा मिरवत होत्या. मनोहर इनामदार आणि वीरेंद्र नावाजलेले फौजदारी वकील होते.  तर धीरेंद्र आणि त्याची बायको नंदिता, फॅमिली कोर्टाचे नावाजलेले वकील होते. वीरेंद्रची बायको शमा, एम. बी. ए. होती. ती सर्व व्यवसायाचे व्यवस्थापन पाहात होती. इनामदार वकिलांचा शहरात मोठा दबदबा होता. समृद्धी पालखीत बसून आली होती. पण या पालखीला पहिला आधार कोणी दिला, तर निर्मलाताईंनीच, याची कृतज्ञ जाणीव मनोहर इनामदारांना आणि त्यांच्या मुलांना होती. निर्मलाताई मात्र कधीच त्याचा उच्चारही करत नसत.

..अ‍ॅरिअर्सच्या मोठय़ा रकमेचा चेक आला. निर्मलाताईंनी तो आईच्या फोटोजवळ कृतज्ञ भावाने ठेवला. गेले कित्येक वर्षे ही कृती त्या आपोआप सहजतेने करीत होत्या. त्यात देखावा नव्हता. ‘‘ढीगभर कमावलेस तर मूठभर तरी दानधर्म कर. आईच्या शिकवणीनुसार त्या अ‍ॅरिअर्सच्या रकमेतला अंशभाग दानधर्मात खर्च करणारच होत्या. पण एक काळ असा होता की खर्चाला तोंड ढीगभर आणि आवक मूठभर तीही त्यांची एकटीच. अशा काळात फक्त आईच्या सहज, वस्तुस्थितीचे भान राखणाऱ्या चिमुकल्या तत्त्वांच्या जिवावरच निर्मलाताईंनी ‘तो’ काळ पुढे नेला. (रेटला नाही.) तो काळ आणि आईची सय नव्याने दाटून आली.. निर्मलाताई इनामदार तेव्हा  ‘निर्मला घळसासी’ होत्या. नुकत्याच इंटरची परीक्षा पास झाल्या होत्या.  नारायण पेठेत भाडय़ाच्या  जागेत राहणारे निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, त्यात निर्मला आणि विमला या मुली, आणि माधव हा मुलगा त्यांच्या प्राथमिक  शिक्षक असणाऱ्या वडिलांच्या माफक उत्पन्नातही टुकीने राहत. कारण त्यांची आई. ती नुसती प्रेमळ, भाबडी, कष्टाळू गृहिणी नव्हती, तर भवतालाचे भान असणारी चाणाक्ष, आणि व्यवहारी होती. आपल्या मुलांनी आपल्यापुढे ‘चार पाऊले’ असावे, या धोरणाने वागणारी होती. म्हणूनच मोठय़ा निर्मलेला ‘सेंट्रल एक्साइज’मध्ये नोकरी करायची संधी मिळाली. बरोबर, शारदाबाई घळसासीनी ताबडतोब होकार देऊन त्यांना नोकरीवर रुजू होण्यास चक्क भाग पाडले. तो काळ सरसकट मुलींनी सरकारी नोकरी करण्याचा नव्हता तरीही.. ‘‘आई, माझी पदवी? ती राहून जाईल अशानं?’’ निर्मलाला संभ्रम पडला होता. ‘‘कशी राहील? सकाळी सात वाजताच दोन डबे घेऊन घर सोडायचं. ती व्यवस्था मी करीनच निमा. एस. पी. कॉलेजमधले दहा वाजेपर्यंतचे वर्ग. तिथे हजर राहायचं.. नंतर थेट ऑफिस गाठायचं. होईल त्रास, पण झेल. तरुण वयात एवढे कष्ट घेतलेच पाहिजेत. तुझी पदवी प्राप्त करायची इच्छा पूर्ण होईल. पण ही आणि अशी नोकरी परत सहज मिळेलच असं नाही.’’

तरुण निर्मलासुद्धा जिद्दी होतीच. तिने नाइलाजाने नाही, किंवा आई म्हणते म्हणूनही नाही. मनापासून या परिस्थितीचे आवाहन स्वीकारले, दिवसभर शरीर आणि मनाला लागलेली भिंगरी, रात्रीचा तासभर अभ्यास, पहाटेचे उठणे, पहिल्या पगारातून घेतलेल्या लेडीज सायकलवरून, पाय भरून येईतो केलेली भ्रमंती, हे सगळं आईच्या पाठिंब्यावरच पार पडलं. वडिलांचा कशाला विरोध नसे. पदवी, पहिले प्रमोशन आणि वडिलांच्या शाळेचे मुख्याध्यापक इनामदार सरांचा मुलगा मनोहर इनामदारांशी झालेलं लग्न, हे सगळं आसपासच घडलं.

त्या काळाला सोवळ्या-ओवळ्याचे नियम असल्याने भांडी – धुणी या दोन कामांव्यतिरिक्त सगळ्या कामांची भिस्त निर्मलावरच, शिवाय दहाच्या ठोक्याला ऑफिस गाठायचे. कामाच्या धबडग्याने जीव मेटाकुटीला येई. आई मी नोकरी सोडावी म्हणते. नाही झेपत हे सारं. निर्मला कित्येकदा आईजवळ रडवेली होई. ‘‘नाही निमा सोस कळ. कष्टानं का कोणी मरतं? नाही ना? हेही दिवस जातील. पण नोकरी सोडायची नाही. बाईजवळसुद्धा हक्काचा पैसा हवा. त्यात स्वत:चाही मान राखला जातो.’’ या ना त्या शब्दात आई निर्मलाची समजूत पटवे. कधी धाकही दाखवे. कधी ना ना उदाहरणं देई. पण निमाने सराकरी नोकरीचा हक्काचा पाट सोडू नये, हे पटवून देत  होती.

निर्मलाताईच्या लग्नाच्या वेळी, मनोहर इनामदार सहकारी बँकेत क्लार्क म्हणून काम करीत होते. सहवासाने निर्मलाच्या लक्षात आले, मनोहर अतिशय बुद्धिमान आहेत. यशस्वी होण्याच्या योग्यतेचे आहेत. सध्याच्या मर्यादित कामात त्याचा विकास होणार नाही. याची खूणगाठ निर्मलेने  बांधली. आणि नानाविध मार्गानी पटवून, समजावून तिने मनोहरांना बँकेतली नोकरी सोडायला लावून, लॉ कॉलेज जॉइन करायला उत्तेजन दिले.

संसाराची सर्व आर्थिक जबाबदारी घेतली. मनोहर पुणे विद्यापीठात प्रथम आले आणि त्यांनी वकिलाची सनद घेतली. त्या दिवशी निर्मलाला पहिल्यांदा आठवण आली ती आईची. त्या सगळ्यामागे प्रेरणा आईची..

‘इनामदार अ‍ॅडव्होकेट्स’ ही सुरुवातीला छोटय़ा जागेवर लावलेली पाटी. आणि आताची भरभराटीला आलेली लॉ फर्म. हा टप्पा फार सहज सोपा नव्हता. पण निर्मलासुद्धा जिद्दीने खात्याच्या परीक्षा देत होती. आणि घराला समृद्धीच्या दिशेने घेऊन जात होती. ‘‘नवरा खूप कमवता झाला, म्हणून नोकरी सोडू नको हो. म्हातारपणीसुद्धा हक्काची पेन्शन घेशील.. मानाने राहशील. तेव्हा माझी आठवण येईल बघ निमे.’’ आई म्हणत असे. अ‍ॅरिअर्सचा तो चेक आईच्या फोटोजवळ ठेवताना निर्मलाबाईंचे डोळे भरून आले. आता आईला जाऊन पंधरा र्वष उलटून गेली. तिने इनामदारांचे यश डोळ्यांनी पाहिले. काळाच्या थोडी पुढे जाऊन, तिने निर्मलेला आत्मसन्मान शिकवला, व्यवहाराचे भान दिले. पारंपरिक मायाळू आईपेक्षा वेगळी भूमिका घेऊन काही कठोर निर्णय घेतले. त्याचं फलित म्हणजे इनामदारांचे यश आणि त्या यशामागे निर्मलाताईंच्या परिश्रमांच्या असलेल्या भक्कम पायाची सर्वानाच असलेली कृतज्ञ, अबोल जाण..आईचे कधी आभार मानायचे नसतात असं मुलांना नेहमी म्हणायच्या. निर्मलाताईचे हात त्यांच्या नकळत आईच्या फोटोसमोर जोडले गेले..!

– डॉ. सुवर्णा दिवेकर

drsuvarnadivekar@gmail.com