माझी नोकरीची सुरुवात गरज म्हणून वयाच्या अगदी अठराव्या वर्षीच झाली. खरं तर तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं लवकरात लवकर संधी मिळाली की रुबाबात राजीनामा द्यायचा आणि मस्तपैकी वाचन, लिखाण करायचं..पण कसलं काय.. स्वेच्छा-निवृत्ती घेईपर्यंत पन्नाशी आली. मी घरात जाहीर करून टाकलं, नोकरीत असताना सकाळी दहा ते संध्याकाळी सहा ही माझी घरात नसण्याची वेळ होती. पण आता उलट म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ माझी घरात नसण्याची वेळ राहील. मी सकाळचा प्राणायाम- योगासनांचा क्लास सुरू केला आणि संध्याकाळी मस्त कार्यक्रम बघायचा रतीब लावला. हो, आणखीन एक गोष्ट.. डायरी लिहायला सुरुवात केली आणि ती डायरी म्हणजे नुसती दैनंदिनी न लिहिता त्या डायरीतून मी मनाशी संवाद साधत गेले. त्यामुळे ती डायरी माझी सखी झाली. गेली १५-१६ र्वष मी खूपशा सातत्यानं हे सगळं जपलं आहे. योगासनं आणि प्राणायाम माझ्या तब्येतीची काळजी घेतात. त्याचप्रमाणे माझं मन दिवसभर ताजतवानं तर ठेवताच, पण मला जगण्याची ऊर्जा आणि लिहिण्याची ऊर्मी देतात.

माझे कागदावरचे लिखाणाचे प्रयोग पाहून माझ्या अहोंनी माझ्यामागे संगणक शिकून घ्यायचा तगादा लावला. मी कामाच्या सबबींची ढाल पुढे करत ते फारसं मनावर घेत नव्हते. पण एकदा अमेरिकेतल्या एका वारीत मराठी फॉन्टचा की बोर्डच बनवून त्यांनी माझ्या हातात ठेवला. लेकीकडे गेलो असल्यामुळे कामाची ढाल यावेळी माझं संरक्षण करायला असमर्थ ठरली आणि मी अक्षरश: पुढल्या चार दिवसांत की बोर्ड न बघता टाईप करू लागले. आता स्वच्छ, सुंदर लिखाण मी संपादकांकडे पाठवायला लागले. परत एकदा माझं मन कानात कुजबुजले, ‘कोणतीही नवीन गोष्ट शिकायला वयाचं बंधन नसतं, पण जरूर आहे ती नवीन गोष्ट शिकण्याच्या मानसिकतेची.’ म्हणून ‘आता काय माझं वय झालं’ असं म्हणत बसण्यापेक्षा नवीन, तरुण पिढीच्या वाटचालीत सहभागी व्हायला काय हरकत आहे? त्या स्पर्धेत भले थोडे मागे पडू, पण त्यातून मिळणारा आनंद तर अमर्याद असेल हे अगदी नक्कीच..’

– स्वाती लोंढे, प्रभादेवी