र्मचट नेव्हीमध्ये प्रमुख अभियंता पदावर पोहोचलेल्या पहिल्या भारतीय स्त्री म्हणजे सुनीती बाला. जहाजावरील सर्व पुरुषांमध्ये एकमेव. पण त्यांचं बाईपण कधी आडवं आलं नाही, कारण जहाजांवरची जड इंजिन्स उचलण्यापासून सर्व कामे त्या लीलया करायच्या.  ‘शेवरोन शिपिंग’ या कंपनीत ज्युनियर इंजिनीयर, ‘इंडियन एक्सपोर्ट्स शिपिंग’मध्ये सव्‍‌र्हेअर, नंतर ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’  त्यानंतर ‘एमएईआरएसके’ या कंपनीत चीफ इंजिनीयर अशी पदे मिळवत त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय, त्या सुनीती बाला, यांच्याविषयी.

भारतीय सागरी अभियंत्यांमध्ये र्मचट नेव्हीमध्ये काम करणारी, प्रमुख अभियंता पदावर पोहोचलेली पहिली भारतीय स्त्री म्हणून ज्यांचा उल्लेख सन्मानाने केला जातो त्या म्हणजे सुनीती बाला. सुनीती जेव्हा या क्षेत्रात आल्या तेव्हा भारतीय मुलींना असंही एखादं क्षेत्र आपल्यासाठी आहे, हे माहीत नव्हतं. एवढंच नाही तर भारत सरकारदेखील १९९५पर्यंत या क्षेत्रात स्त्रियांनी यावे किंवा कसे याबाबत साशंक होते.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

जिथे शारीरिक क्षमता किंवा ताकद यांचा कस लागतो अशी काही ठरावीक क्षेत्रे मुलींच्या दृष्टीने तेव्हा अस्पर्शित होती. मर्चंट नेव्ही वा सागरी व्यापारी जहाजावर मुलीदेखील काम करू शकतात आणि अव्वल स्थानी पोहोचू शकतात हे सुनीती यांनी दाखवून दिले. सुनीतींचा जन्म दिल्लीचा असला तरी त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण बरेलीमध्ये पार पडले. वडील एअर फोर्समध्ये असल्याने धाडस आपसूकच त्यांच्यात संक्रमित झालेलं! वडील उदारमतवादी आणि स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचारसरणीचे. सुनीतींच्या आईवडिलांचा विवाह झाला तेव्हा तिची आई जेमतेम दहावी उत्तीर्ण झालेली होती. पण विवाहानंतर त्यांनी बारावी आणि पुढे कायद्याची पदवी घेतली.

सुनीती यांना तीन भाऊ  आणि एक बहीण आहे. पाच अपत्ये असूनही त्यांच्या आईने आपले शिक्षण पूर्ण केले त्यामागे सुनीतींच्या वडिलांचे प्रोत्साहन हेच कारण होते. काही काळानंतर तिच्या वडिलांनी एअर फोर्समधल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वत:चा व्यापार सुरू केला. उद्देश हा की सुनीतीच्या आई न्यायालयाच्या कामात व्यस्त असताना मुलांकडे दुर्लक्ष होऊ  नये. त्यांचा व्यवसाय ते बऱ्याच प्रमाणात घरूनच करत.

सुनीती सांगतात, ‘‘अभ्यासात मी हुशार होते पण त्याच बरोबर सर्व क्रीडाप्रकारांत आम्ही भावंडांनी भाग घ्यावा असा वडिलांचा आग्रह असे. मी शाळेत असताना थाळीफेक व बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा जिंकले आहे.’’ तीन भावांमध्ये वाढल्याने त्यांच्या सारखंच सुनीतीदेखील वागत असत. मुलांची सायकल त्या सातव्या वर्षीच चालवायला शिकल्या. पायही नीट पुरत नसत. जे जे काही म्हणून भाऊ  करीत असत त्याचे अनुकरण त्या करत. वयाच्या चौदाव्या वर्षी स्कूटर आणि सतराव्या वर्षी कार त्यांना उत्तम चालवता येत होती. त्या सांगतात, ‘‘स्कूटर चालवायला शिकव अशी भुणभुण भावाकडे लावल्यावर ‘तू स्कूटर फक्त स्टॅण्डवर लावून दाखव मग तुला शिकवतो’ असे भावाने म्हटलं. त्या वेळी माझी देहयष्टी अगदीच किडकिडीत होती, पण शालेय स्पर्धामध्ये सतत खेळत असल्याने माझे स्नायू बऱ्यापैकी बळकट होते. एक दिवस मी भावाला स्कूटर सहज स्टॅन्डवर लावून दाखवली आणि त्याने मग मला ती चालवायला शिकवली.’’

सुनीतीचे बारावीपर्यंतचे शिक्षण बरेलीच्या केंद्रीय विद्यालयात झाले. मुळातच तल्लख असलेल्या सुनीती यांनी ‘आयआयटी’साठी तयारी सुरू केली होती, परंतु त्या परीक्षेत त्यांना अपेक्षित ‘रँक’ मिळाली नाही. कोलकाताच्या मेरी (मरीन इंजिनीयिरग अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट) मध्ये त्यांना ‘आयआयटी’ प्रवेश परीक्षेतल्याच गुणांच्या आधारे प्रवेश मिळाला. या कॉलेजमध्ये जेव्हा काउन्सेलिंगसाठी बोलावले गेले तोपर्यंत इथे मुली प्रवेश घेत नाहीत हे सुनीती आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नव्हते. ज्या वेळी त्यांना या संस्थेत प्रवेश मिळाला त्या वेळेस त्यांना कळले की मुलगी म्हणून या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या आपण केवळ दुसऱ्या आहोत. ‘‘अशा परिस्थितीत सर्वाशी जुळवून घेत आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे हे सोपे नव्हतेच. पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान होते ते म्हणजे प्रोफेसर्स व इतर सहाध्यायी मुले यांना आपण त्यांच्यापैकीच एक आहोत, कोणी निराळे नाही हे सतत पटवून देत राहणे. पाचशे मुलांमध्ये मी एकटी मुलगी होते.’’ सुनीती सांगतात. तिथले काही नग मात्र सतत त्यांना मुलगी असण्यावरून टोकत असत आणि ‘हे क्षेत्र मुलींसाठी नसताना तू इथे का आलीस’ असं थेट विचारत. यांपैकी बहुतेक मुले आशियाई देशांतली असत. वाद घालून त्यांना आपली बाजू पटवून देणे कठीण असे, त्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा सोपा मार्ग सुनीतींनी निवडला होता.

सुनीती म्हणतात, ‘‘करियरची निवड ही स्त्री किंवा पुरुष या निकषांपेक्षा त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असावी असे माझे तेव्हाही म्हणणे होते व आजही आहे.’’ कारण त्या काळात म्हणजे नव्वदच्या दशकात ‘मुलीही हे करू शकतात’ ही मानसिकता तयार झालेली नव्हती. त्यामुळे मुलेही त्यांच्याशी नीट संवाद साधत नसत. अर्थात काही काळाने सुनीतींची सर्वाशी मैत्री झाली आणि त्यांच्याविषयी मुलांच्या मनात एक मुलगी म्हणून असलेले अंतर बऱ्याच अंशी कमी झाले.

‘‘हे पॅरामिलिटरी कॉलेज असल्याने आम्हाला रोज नेमाने एक तास शारीरिक कवायतीसाठी देणं अनिवार्य होते. पांढरा शुभ्र युनिफॉर्म परिधान केल्यावर आम्ही अधिकच ‘स्मार्ट’ दिसत असू. पण हा युनिफॉर्म महिन्याच्या ‘त्या’ चार दिवसात अत्यंत धोकादायक वाटे. न जाणो, डाग पडले तर सर्व जण काय म्हणतील? ही भीती कायम असायची. एकदा तसेच घडले. माझ्या ते उशिरा लक्षात आले आणि मी पटकन युनिफॉर्म बदलून आले. पण मला अभिमान वाटतो की कोणाही मुलाने मला नजरेनेही वेगळे काही घडल्याचे जाणवू दिले नाही. अत्यंत सहजतेने सर्वानी ते स्वीकारले.’’ सुनीती सांगतात.

२००२ मध्ये मेकॅनिकल इंजिनीयिरगची पदवी घेऊन सुनीती ‘शेवरोन शिपिंग’ या कंपनीत ज्युनियर इंजिनीयर म्हणून रुजू झाल्या आणि त्यांचे करियर खऱ्या अर्थाने सुरू झाले. एक स्त्री असल्याने मी ‘हे’ही करू शकते हे त्यांना सतत सिद्ध करून दाखवावे लागे.

‘‘त्या वेळेस बहुतेक जहाजांवरचे इंजिन्स हे मानवसंचालित असल्याने त्यासाठी बरीच जाड असणारी हत्यारे वापरावी लागत. पण मी खेळाडू असल्याने आणि आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये सर्व प्रकारचे बलसंवर्धनाचे प्रशिक्षण दिले गेले असल्याने मला ते फार जड गेले नाही. अवजड हत्यारे मी लीलया उचलून इंजिन्सवर लावत असे आणि दुरुस्त्या करीत असे. हल्ली सर्व इंजिन्स ही ‘हायड्रॉलिक सिस्टीम’वर चालत असल्याने कामाचे सुलभीकरण झाले आहे.’’ असे सुनीती सांगतात.

जहाजावर प्रत्यक्ष रुजू झाल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता हे विचारले तेव्हा त्या म्हणतात, ‘‘इथेही सहकारी किंवा वरिष्ठ हे विविध देशांतले असले तरी सुरुवातीला माझ्याकडे साशंकतेनेच पाहिले गेले. पण पंधरा-वीस दिवसांतच त्यांनी मला त्यांची सहकारी म्हणून (एक स्त्री म्हणून नव्हे) स्वीकारले. जहाजावर मी एकमेव स्त्री होते. मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे अशा परिस्थितीत मी स्वत:ला सुरक्षित समजत होते का? तर याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. आतापर्यंत मला माझे सर्व सहकारी हे अतिशय सुसंस्कृत आणि आश्वासक असे मिळाले आहेत. आम्हाला मिळणारे कठोर प्रशिक्षण आणि यासाठीची असणारी काटेकोर निवड प्रक्रिया हेही याचे एक कारण असावे.’’

सुनीती संपूर्ण शाकाहारी आहेत. आज जगभर शारीरिक ताकद वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार आवश्यक मानला जातो आणि त्यासाठी मांसाहाराचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. अशा परिस्थितीत विभिन्न प्रदेशांत सतत भ्रमण करताना हे शाकाहारी असणे कसे शक्य झाले असे विचारले असता सुनीती सांगतात, ‘‘आम्हाला ठरावीक उष्मांकाचा आहार ठरवून, नेमून दिला जातो. मी संपूर्ण शाकाहारी आहे तेव्हा माझ्या आहारात प्रथिनांची कमतरता राहणार नाही याची काळजी आमचे जहाजावरील स्वयंपाकी सतत घेत असतात. कधी (परदेशांत) ‘ऑफ शोअर’ राहावे लागले तर मी अंडी खाल्ली आहेत. कारण हॉटेलमध्ये शाकाहारी काही मागवले तरी ‘तुम्हाला मटण चालेल का’ असेही मला विचारले गेले. काही काही देशांत संपूर्ण शाकाहार ही संकल्पना फारशी प्रचलित नाही तिथे अशी अडचण होते.’’

या क्षेत्रात तुम्हाला सर्वाधिक आव्हानात्मक असे काय जाणवले असे विचारले असता सुनीती म्हणाल्या, ‘‘मला लहानपणापासूनच एखादे काम आपण करू शकत नाही असे कधी वाटलेच नाही. त्यामुळे ज्याला इतर लोक आव्हान मानत असतील ते माझ्यासाठी सहज करण्याजोगी गोष्ट होती. हे करियर हाही त्यातलाच एक भाग आहे.’’

योग्य वय उलटून जायच्या आधी त्यांचा विवाह होऊन त्यांनी सेटल व्हावे अशी त्यांच्या मातापित्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते.

आपल्या या करियरला समजून घेणारा, प्रोत्साहन देणारा पती हा याच क्षेत्रात काम करणारा असू शकतो असा सुनीतींना विश्वास वाटत होता. त्यांचा सहाध्यायी असलेल्या कुमार सहायसोबत त्यांनी २००७ मध्ये विवाह केला. ‘‘कुमार आणि मी दोघेही शक्यतो आमच्या असाइन्मेंट्स अशा तऱ्हेने ठरवतो जेणेकरून आम्हाला एकमेकांसोबत राहता येईल. आम्ही दोघेही वेगवेगळ्या जहाजांवर काम करतो. पदोन्नतीसाठी आम्ही परीक्षाही सोबतच देतो. २०१० मध्ये माझी  ‘इंडियन एक्सपोर्ट्स शिपिंग’मध्ये सव्‍‌र्हेअर म्हणून निवड झाली. पुढे मला ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये संधी मिळाली. नंतर मी ‘एमएईआरएसके’ या डॅनिश कंपनीत चीफ इंजिनीयर म्हणून रुजू झाले. माझे आतापर्यंत योजलेले ‘करियर टार्गेट’ मी प्राप्त केले होते. नंतर आम्ही दोघांनी बाळाचा निर्णय घेतला.’’ २०१३ मध्ये सुनीतींना मुलगी झाली आणि तीन महिन्यांच्या बाळंतपणाच्या रजेनंतर त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या.

 

सुनीतींच्या घरी त्यांच्या आई आजारी असल्याने बाळाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत. तर सासरे अजून नोकरीत असल्याने सासू त्यांच्या जवळ बिहारमध्ये वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत ‘आया’ नियुक्त करून त्या कामावर जातात. घरभर कॅमेरे लावून ठेवले असल्याने त्यांना घरातल्या सर्व घडामोडी फोनवर बघता येतात आणि आपल्या बळावर लक्ष ठेवता येते. यात त्यांना मिळणारी पतीची साथ अनमोल आहे.

‘‘असे ‘ऑफ बीट’ करियर असताना मातृत्व हे फार मोठे आव्हान आहे. माझी एकमेव स्त्री वरिष्ठ विवाहानंतर या क्षेत्रातून बाहेर पडली. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या मुलींना आश्वासक वातावरण सरकार, कॉर्पोरेट कंपन्या यांनी तयार करायला हवे. बाळाच्या जन्मानंतर काही वर्षांनी स्त्रियांना पुन्हा त्यांचा जॉब करता येणे शक्य असते. परंतु हे सहसा घडत नाही. अशा परिस्थितीत अतिशय कुशल आणि अनुभवी मानव संसाधन आपण वाया घालवतो. याचा विचार होणे गरजेचे आहे,’’ असे सुनीतींना वाटते.

‘‘माझ्या अशा हटके प्रोफेशनमुळे ‘तुला सर्वाधिक आव्हानात्मक असे काय वाटते’ हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. परंतु, माझे केवळ व्यावसायिक जीवनच आव्हानात्मक नसून वैयक्तिक आयुष्यदेखील तेवढेच आव्हानात्मक आहे. कारण ज्या क्षेत्रात मी काम करते तिथे अजूनही माझ्या ‘बाई’ असण्यामुळे माझ्या शारीरिक क्षमतेविषयी साशंकतेने बघितले जाते. खरे तर जहाजावर नोकरीसाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा शारीरिक क्षमतेच्या योग्यतेविषयीचे प्रमाणपत्र तुम्हाला यासंबंधीच्या वैधानिक समितीकडून घेतले असणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळालेले असतानाही मला ते वारंवार सिद्ध करून दाखवावे लागते. घरीही कुटुंब आणि करिअर यांच्यातला तोल सांभाळावाच लागतो. दूर असल्यान जवळच्यांना वेळ देता येत नसल्याची खंत असते परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा मात्र मी ती कसर भरून काढते.’’असंही त्यांनी सांगितलं.

मार्च २०१६ मध्ये पहिली भारतीय सागरी अभियंता असलेल्या सुनीतींना ‘एक्झेम्पलरी वूमन ऑफ सबस्टन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुलींनी या क्षेत्राकडे वळावे म्हणून त्यांना काय सांगाल, असे विचारले तेव्हा सुनीती म्हणाल्या, ‘‘या क्षेत्रात येऊ  इच्छिणाऱ्या मुलींना मी एवढेच सांगेन की जरी इथे महिलांची संख्या कमी असली तरी स्वत:ला कधीही एक स्त्री म्हणून बघू नका. आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर मैत्रीचे नाते ठेवा. आपल्या समस्या, अडचणी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून दाखवा. संवादाचा पूल तयार झाला की तुम्ही इथे केवळ एक अधिकारी असता. स्त्री की पुरुष हा मुद्दा गौण आहे.’’

शर्वरी जोशी  

sharvarijoshi10@gmail.com