21 October 2018

News Flash

संक्रमणकाळाशी मैत्री

अंटाक्र्टिकामधल्या एका मोठय़ा हिमनगावर पेंग्विन्सची एक वसाहत असते.

अंटाक्र्टिकामधल्या एका मोठय़ा हिमनगावर पेंग्विन्सची एक वसाहत असते. पूर्वापार काळापासून, तो हिमनग हेच त्यांचं घर आणि त्यांचा कळप हेच कुटुंब असतं. एकत्र कुटुंबात असणारे मतभेद आणि प्रेम दोन्ही त्यांच्यातही असतं. तसंच किलर व्हेल आणि हिमवादळ या दोन जन्मजात शत्रूंपासून एकत्र राहूनच आपण सामना करू शकतो हेही पेंग्विनना कळत असतं. संतुलित विचार करणारा लुईस हा त्यांचा प्रमुख पेंग्विन असतो. एखादी गोष्ट पटली की ती पूर्ण होईपर्यंत तिचा पिच्छा न सोडणारी एलीस, सदैव ‘नाही नाही’नेच वाक्याची सुरुवात करणारा नोनो आणि असेच आणखी काही पेंग्विन त्यांच्या नेतृत्व गटात असतात.

या वसाहतीत फ्रेड नावाचा एक गोडगोजिरा पेंग्विन असतो. थोडा अबोल. भोवतालाबद्दल जरा जास्तच कुतूहल असणारा, समुद्राचं निरीक्षण करत तासन्तास एकटाच भटकणारा फ्रेड एकदा समुद्राच्या तळाशी हिंडत असताना, हिमपर्वतात त्याला एक मोठी घळ दिसते. कुतूहलानं तो आत शिरतो. आत एक प्रचंड गुहा असते. तिचं पलीकडचं तोंड किंवा पलीकडची बर्फाची भिंतही दिसत नसते इतकी मोठी. दोन्ही बाजूंच्या बर्फाच्या भिंतींवर असंख्य मोठमोठय़ा भेगा असतात आणि त्यातून पाणी आत झिरपत असतं. ते पाहून फ्रेडच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते. एवढं पाणी इथे जमतंय याचा अर्थ आपला हिमनग वितळतोय. हे साठलेलं प्रचंड पाणी हिवाळ्यात गोठणार आणि या हिवाळ्यात किंवा पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या हिवाळ्यात आतल्या बर्फाच्या दाबाने आपला हिमनग फुटणार याची त्याला खात्रीच होते.

परतल्यावर ज्यांच्या ज्यांच्याशी हे बोलण्याचा तो प्रयत्न करतो, ते ते त्याला वेडय़ात काढतात. एलीस मात्र त्याच्याबरोबर समुद्राच्या तळाशी जाऊन गुहा प्रत्यक्ष पाहते. तिची खात्री पटल्यावर लुईसच्या मागे लागून या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ती सर्व पेंग्विन्सची बैठक बोलावते. ‘आपला हिमनग वितळतोय’ या बातमीने सर्वाना जबरदस्त धक्का बसतो. मग ‘असं घडेलच कसं?’ यावरच चर्चा, होकार- विरोध वगैरे चालू होतात. अखेरीस ‘समजा हिमनग फुटलाच आणि नेमका हिमवादळ चालू असताना फुटला तर आपल्या मुलांचं, आजी-आजोबांचं काय होईल? कल्पना करा.’ असं भावनिक आवाहन एलीस करते, तेव्हा कुठे संकट आपल्या दारात उभं असल्याचा धसका त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर, ‘त्या गुहेच्या डोक्यावर एक मोठं छिद्र पाडू म्हणजे पाणी वाहून जाईल’ पासून ‘गुहाच बुजवू’ पर्यंत अनेक अतक्र्य उपाय सुचवले जातात. वितळणाऱ्या बर्फाला गोठवण्याची ताकद कुणातच नाही हे सर्वानाच ठाऊक असल्यामुळे चर्चा-चर्चा आणि भीती यात बराच काळ जातो.

अचानक या काळात त्यांना एक भटका समुद्रपक्षी भेटतो. पेंग्विनना समुद्रपक्षी माहीतच नसतात. पक्षी सांगतो, ‘आम्ही ऋतुनुसार घरं बदलणारे भटके – अनिकेत आहोत. पुढच्या वसाहतीसाठी सोयीची जागा शोधणाऱ्या टीममधला मी स्काऊट आहे. हिमवादळात सापडून रस्ता चुकून इथे पोचलोय.’ पेंग्विन वर्षांनु वर्ष एकाच जागी राहताहेत याचं त्याला नवल वाटतं, तर एखाद्याला कायमचं घरच नसणं, आयुष्यभर पुढचं घर शोधत वणवण करण्याची कल्पना पेंग्विनना भयंकर, असुरक्षित वाटते. फ्रेड आणि कंपनीला मात्र त्या पक्ष्याच्या स्थलांतरात कुठेतरी आपल्या समस्येचं उत्तर जाणवतं. मग नवा सोयीचा हिमखंड शोधण्यासाठी तरुण स्काऊटच्या टीम सर्व दिशांना पाठवल्या जातात. त्यातच घाबरून काल्पनिक धोक्यांबद्दल सर्वाशी चर्चा करत फिरणाऱ्या नोनोच्या टोळक्यामुळे प्रचंड भीती पसरते. या भीतीतून बाहेर पडून सर्वानी स्थलांतराला तयार व्हावं यासाठी, पेंग्विनांची मानसिकता बदलण्यासाठी विविध उपाय शोधावे लागतात. कालांतराने मनासारखी नवीन जागा सापडते. सगळे पेंग्विन स्थलांतर करून त्या जागी नवीन वसाहत वसवतात. गरजेप्रमाणे हिमनग बदलण्यासाठी तयार असणारी अनिकेत जीवनशैली स्वीकारल्यानंतर, बदल घडला तर माझं काय होणार? ही भीतीच पेंग्विनना वाटेनाशी होते. या मुक्त, निर्भय वातावरणात वाढणाऱ्या पुढच्या पिढीला याच जीवनशैलीचं बाळकडू मिळतं आणि सगळे सुखी होतात. अशा प्रकारे ही कहाणी सुफळ संपूर्ण होते.

‘अवर आइसबर्ग इज मेल्टिंग’ नावाचं हे पुस्तक. ‘कुठल्याही परिस्थितीत यशस्वी कसं व्हायचं?’ त्याची दिशा दाखवणारं,असं लेखक जॉन कोटर म्हणतो. यशाची व्याख्या सापेक्ष असते. ‘बदलाला न घाबरता ताणविरहित आनंदात राहायची मानसिकता मिळवता येणं’ यात ‘यश’ किंवा ‘सुख-समाधान’ दडलेलं असतं असं मला वाटतं आणि त्यासाठी हे रूपक मनाला जरूर पटतं. कथेतला हिमखंड हा ‘चल’ (व्हेरिएबल) आहे. परंपरागत जीवनशैली, आदर्शाच्या कल्पना, रूढी, कुटुंब-घर-संसार-जोडीदार-नाती, भूमिका, स्त्री-पुरुषांच्या मर्यादांच्या कल्पना असं काहीही तिथे असू शकतं. हिमखंड असो की भारतखंड, खरी गरज असते ती, ‘सर्व काही बदलू शकतं, कारण बदल शाश्वत/स्थायी आहे – ‘चेंज इज कॉन्स्टंट’ हे  स्वीकारण्याची. तरच आलेल्या बदलाशी जुळवून घेण्याच्या दिशेनं विचार सुरू होऊ शकतो. अन्यथा पिढय़ान्पिढय़ा सांभाळलेल्या या गोष्टी चूक असूच कशा शकतील? हा बदलच चुकीचा आहे’ अशा निर्थक चूक-बरोबरमध्ये अडकून मन गोंधळून जातं. हिमनगाचं वितळणं रोखणं आपल्या कुणाच्याच हातात नाही हे जेव्हा पक्कं उमजतं तेव्हा सवयीचा कम्फर्ट झोन तुटण्याची भीती वाटते. असाहाय्य वाटतं, संताप होतो, अस्वस्थता आणि ताण तिथे निर्माण होतात, अर्थात आनंद संपतो.

सध्याच्या वेगवान बदलाच्या काळात अनेक हिमखंड वितळतायत. उदाहरणार्थ मोबाइल-कॉम्प्युटरच्या वापरामुळे संवाद संपतोय, नाती संपताहेत, स्त्री-पुरुष मोकळेपणाच्या कल्पना बदलताहेत. पुस्तकं, वाचन कमी होतंय इत्यादी. आपल्या सवयीच्या कम्फर्ट झोनला हे बदल झेपत नाहीयेत, एक अस्वस्थ चिडचिड होतेय. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापराबाबत मुलं आपल्या पुढे आहेत कारण त्यांच्या जन्मापासून या गॅजेट्सची त्यांना सवय आहे. कदाचित मुलांची यातली सहजता हेदेखील आपल्या नाराजीचं एक कारण असू शकतं. मोठय़ांनी लहानांना शिकवायचं, सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं (पालकांनी दिलेला आकार निमूटपणे घ्यायचा) या पूर्वापार गृहीतकाचा हिमखंड इथे वितळायला लागतो. त्याचा धक्का बसतो. आता मुलं हाताबाहेर जातील किंवा त्यांना व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेटचं व्यसन लागेल याची मोठय़ांना जीवनमरणाची भीती वाटते. या आपल्या भीतीकडे आधी नीट पाहायला हवं. उपाय न शोधता भीतीचं ‘भयंकरीकरण’ करणाऱ्या नोनो पेंग्विनच्या टोळक्यासारख्या चर्चा थांबवायला हव्यात. काळ बदलतोय आणि यापुढच्या पिढीसाठी मोबाइल हाच वही, पुस्तक, पेन असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. त्यातले धोके मान्यच आहेत. पण धोके कशात नसतात? साध्या ‘सेफ्टी मॅच-काडेपेटी’तल्या काडीनंही आग लागण्याचा धोका असतोच की. फक्त आता आपल्याला त्याची सवय झालीय आणि काय काळजी घ्यायची ते माहीत आहे. तसाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी हा संक्रमणकाळ आहे. उद्या त्यांचीही सवय झाल्यावर सावधानताही अंगवळणी पडणार आहे यावर आपण विश्वास ठेवायला हवा. आनंदानं जगणं कदाचित त्या विश्वासामुळे जमू शकेल.

आपल्या जुन्या सवयींचा अनेकदा ‘संस्कार’ म्हणून आपण कम्फर्ट झोन बनवून घेतो. आपला लहानपणीचा संस्कार घेण्याचा काळ वातावरणासारखा आपल्या सोबत असतो. त्यात स्वत:ला गुरफटून घेऊन ‘आमच्या वेळी’मध्ये आपण अडकलेलो असतो. उदाहरणार्थ काटकसर करण्याचा संस्कार. त्या वेळच्या परिस्थितीत काटकसर ही तीव्र गरज होती, पण आजच्या गरजा, उपलब्धी, वस्तू-सेवांच्या किमती याचा विचार न करता, ‘आमच्या वेळी’शी तुलना करत राहिलो, अजूनही त्या संस्कार-सवयीच्या गुरफटून घेतलेल्या पांघरुणातून डोकं बाहेर काढणं जमलं नाही, तर नव्या पिढीच्या वागण्याचा प्रचंड ताण येतो, असाहाय्य वाटतं, प्रचंड काळजी, भीती वाटते आणि राग येतो. जग पुढे जातच असतं, आपण या सगळ्या चक्रात अडकून एकटे पडायला लागतो, आणखी असाहाय्यता.. भीती.. संताप. काटकसर योग्यच असते पण सोबत बदलत्या परिस्थितीचंही भान ठेवावं हे आपल्याला सुचत नाही, पटत नाही. ‘आमच्या वेळी’ हा मनाचा खुलेपणा अडवणारी वाट आहे, आपल्याला बांधून ठेवणारा पिंजरा आहे हे ओळखू शकलो नाही, तर २०१८ उगवलं तरी आपण १९५०, ६०, ७०, ८० इथंच अडकलेले असू. अगदी चांगुलपणाचे संस्कारसुद्धा, आपल्यात अतिरेकी रुतून बसलेले लक्षात येण्यासाठी मन खुलं ठेवायलाही शिकावं लागतं. आनंदानं जगायला शिकताना हे अडकून न राहणं आपल्याला शिकायचंय, अंगवळणी पाडायचंय.

‘आजकालच्या मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही, मग ती वाढणार कशी? जगायला लायक होणार कशी?’ हा शहरी पालकांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय – वितळता हिमनग! काही भाषातज्ज्ञांचं मत असं की, व्यक्तिश: किंवा समाज म्हणून आपलं भाषांवर कितीही प्रेम असू दे, मानवाच्या मेंदूसाठी, मुलांना वाचायला आवडेनासं होणं हादेखील एक टप्पा आहे. मेंदूसाठी समोर दिसलेलं भाषेत व्यक्त करणं आणि व्यक्त झालेलं समजून घेणं ही गुंतागुंतीचीच प्रक्रिया आहे. भाषेचा शोध लागून सुमारे ७५,००० वर्ष झाली. ही अर्थ लावण्याची प्रक्रिया करून मेंदू आता दमलाय. आत्ताआत्तापर्यंत व्यक्त होण्यासाठी किंवा मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हाच दुवा होता. आता एकीकडे जग लहान होतंय आणि जोडीला व्हिज्युअल कम्युनिकेशनचे अनेक सशक्त पर्याय उभे राहताहेत. त्यामुळे भाषांचा संकोच होणारच आहे. भाषा संपणार नाहीत पण कमी होतील आणि त्यातले स्थानिक बारकावे संपतील, त्याला वेगळं रूप येईल, हे मत तर्कबुद्धीला पटू शकतं. तरीही हा भावी (अजून बराच वेळ आहे) बदल स्वीकारायला खूप अवघड आहे. आमच्या पिढीला पायाखालची चादरच ओढून घेतल्यासारखं वाटतं. पण उद्याचा विचार करता, जन्मापासून कॉम्प्युटर-मोबाइल पाहिलेल्या मुलांचं ‘व्हिज्युअल कम्युनिकेशन’ कदाचित भाषिक संवादापेक्षा उपजत आणि चांगलं असू शकेल.  थोडक्यात, भाषिक संवाद हा काही वर्षांनंतर वितळणार असलेला हिमनग असू शकतो, हे समजून घ्यायला हवं. आपल्या सवयीच्या लाडक्या गृहीतकाकडे पाहण्यातला अभिनिवेश आपण जेवढय़ा लवकर तपासू, तेवढय़ा लवकर बदलाशी जुळवून घ्यायला, मैत्री व्हायला मदत होईल.

भारतात दीडशे वर्षांच्या काळातल्या संस्कृती एकाच वेळी नांदतात असं म्हटलं जातं. त्यामुळे ग्रामीण – शहरी- आदिवासी – महानगरी अशा प्रत्येक विभागातली वाचनाबाबतची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. एकीकडे ग्रामीण भागांत पुस्तक वाचनाचं प्रमाण वाढलं आहे अशी निरीक्षणे आहेत. तो सामाजिक विकासाचा भाग असावा. पण ज्या वेगाने इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचा आवाका आणि प्रसार वाढतो आहे, ते पाहता समान संधी आणि किमान समान सामाजिक पातळी कल्पनेच्या टप्प्यात नक्कीच आली आहे. थोडक्यात, आकलनासाठी फक्त भाषा हे माध्यम न राहता व्हिज्युअल माध्यमेही खूप लवकर सर्वासाठी उपलब्ध असतील.

एखाद्या नवीन गोष्टीला विरोध करण्यात, नावं ठेवण्यात शक्ती घालवतो तेव्हा त्या गोष्टीच्या सामर्थ्यांकडे नकळत दुर्लक्ष होतं. खासगी वाहिन्या सुरू झाल्या. त्या काळात ‘दूरदर्शन’वर नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि प्रस्थापित होऊ घातलेल्या एका तरुण लेखक-कलाकाराने अलीकडे एक खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले, ‘‘त्या वेळी दूरदर्शनच ‘सबकुछ’ होतं. आमच्या कार्यक्रमांच्या दर्जावर आम्ही खूश होतो. खासगी वाहिनी ही संकल्पना नवी होती त्यामुळे वाहिन्यावाले धडपडत होते. आम्ही वाहिन्यांना नावं ठेवत राहिलो. वाहिन्या नवीन असताना त्यांच्यासाठी खरंतर आमच्याकडे असलेला अनुभव महत्त्वाचा होता. लोकांना तर वाहिन्यांची सवयच नव्हती. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी तेव्हा वाहिन्यांचा आवाका ओळखायला हवा होता. जाणीवपूर्वक एकत्र येऊन हे महत्त्वाचं माध्यम जमेल तेवढं हातात घ्यायला हवं होतं. कदाचित थोडंफार वेगळं वळण देणं तेव्हा शक्य झालं असतं. पण विरोधाच्या नादात आमचा विचार तिथे पोचलाच नाही. आर्थिक गणितं सगळीकडेच असतात पण नंतर ती फार प्रबळ झाली, निर्ढावलेपण आलं. त्या वेळी आमचं-तुमचं करत बसल्यामुळे परिवर्तनाची क्षमता असलेली खूप मोठी संधी हातातून कायमची गेली असं वाटतं.’’

बदलाची चिन्हे ओळखण्याची आणि त्याचा वेग, आवाका समजून घेण्याची सवय लागणं यासाठी महत्त्वाचं आहे. बदल अचानक होत नाही. रोज थोडाथोडा होत असतो. तो जाणवत असतो पण तो विचार, आचार स्वीकारणारा समाज एका विशिष्ट संख्येपर्यंत पोहोचला की बदल दिसायला लागतो. या संख्येला ‘क्रिटिकल मास’ म्हटलं जातं. शंभर माकडांची एक गोष्ट यासंदर्भात सांगतात. एका बेटावर खूप माकडं असतात, त्यांना जमिनीखालचे बटाटे उकरून खाणं माहीत असतं. त्यांच्यापैकी काहींना बटाटे धुऊन खाण्याची सवय लावली जाते. त्यांचं पाहून आणखी काही माकडं बटाटे ‘स्वच्छ’ धुऊन खायला लागतात. सुरुवातीला या ‘स्वच्छ’ माकडांची संख्या अतिशय संथ वेगाने, पण वाढत असते. करत करत शंभर माकडं बटाटे धुऊन खायला लागतात. आणि शंभरानंतर मात्र हा स्वच्छ माकडांचा वेग विलक्षण वाढतो. त्यानंतर फारच थोडय़ा काळात जवळजवळ सगळीच माकडं बटाटे धुऊन खायला लागतात. यातला शंभर हा आकडा म्हणजे माकडांचं ‘क्रिटिकल मास’, की ज्यानंतर बदल एकदम वेगाने स्वीकारला जातो. तर मुद्दा असा, की आपण पहिल्या काही माकडांमध्ये असलो तर बदलाशी दोस्ती करून त्याला समजून घ्यायला वेळ मिळतो. शंभराव्या माकडानंतर सगळेच बटाटे धुऊन खाणार असतात.

बदलाला वेळेवर ओळखून स्वीकारणं आणि त्याच्याशी दोस्ती करून त्यातलं चांगलं वाईट समजून घेत काळासोबत राहणं हीच तर परिपक्वता. म्हणून नव्या पिढीच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत, राग आणि भीती पसरवताना आपण नोनो पेंग्विनसारखे भयभीत तर नाही ना? नव्या पिढीकडे त्यामुळे नकळतपणे अविश्वास, राग, द्वेष, भीती, नाकारलेपणाची भावना तर आपण संक्रमित करत नाही ना? हे तपासायलाच हवं. नव्या पिढीचे प्रश्नही नवे, वेगळे आहेत. त्यांची उत्तरही त्यांनाच शोधायची आहेत. या संक्रमण काळात पुढच्या पिढीशी मैत्री करणं म्हणजेच बदलाशीही ओळख करून घेणं. त्यासाठी विरोध-भीती-अविश्वासाच्या जागी हवं स्वीकार-प्रेम-विश्वास आणि खुलं मन. मग बदलाची आणि त्याच्या वेगाची दोन्हीची भीती कमी होते. भीती, असुरक्षितता संपल्यावर उरतं काय? आनंद आणि समाधान!

निसर्गचक्राचं कणाकणाने पुढे जाणं अव्याहतपणे चालूच असतं आणि तरीही रोजचा सूर्योदय नवाच असतो. १ जानेवारी किंवा गुढीपाडवा या फक्त आपल्या सोयीच्या खुणा, बदल साजरा करण्यासाठी, ‘हॅप्पी न्यू इयर’च्या शुभेच्छा परस्परांना देण्यासाठी!

नीलिमा किराणे

neelima.kirane1@gmail.com

First Published on December 30, 2017 12:35 am

Web Title: little habits that can change your life