18 March 2019

News Flash

एल्गार! ‘मी टू’ मोहिमेच्या निमित्ताने..

भारतात ही मोहीम सर्वदूर झिरपेल का? झिरपली तर केव्हा, कशी आणि किती?

हे कधी तरी होणारच होतं, फक्त केव्हा, कुठे आणि कसं हेच प्रश्न होते. जसं शिशुपालाचे १०० गुन्हे पूर्ण झाल्यानंतर कृष्णाकडून त्याचा विनाश अटळ होता, तसं स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचा घडा केव्हाच भरला होता.. किंबहुना भरून केव्हाच वाहूनही गेला आहे, त्यामुळे त्याविरोधात खणखणीत आवाज उठणं अपरिहार्य होतंच. त्याचंच फलित म्हणून इतक्या मोठय़ा संख्येने जगभरातील स्त्रिया एकत्रित येऊन स्वत:वरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध सहअनुभूतीने बोलायला लागल्या आहेत, हेच ‘मी टू’ या मोहिमेचं महत्त्व आणि वेगळेपणही. आता प्रश्न आहे तो भारतात ही मोहीम सर्वदूर झिरपेल का? झिरपली तर केव्हा, कशी आणि किती?

भारतातील परिस्थितीकडे वळण्याआधी जगभरात सुरू असलेल्या या मोहिमेनं नेमकं काय दिलंय किंवा देऊ पाहतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्वत:वरील लैंगिक अत्याचाराविरोधात यापूर्वी कुणी बोललंच नव्हतं असं नाही. किंबहुना आज जगभरातील अनेक न्यायालयांत याविषयीचे अनेक खटले सुरू आहेत, ते स्त्रियांनी या विरोधात आवाज उठवला म्हणूनच, मात्र त्यातले अनेक आवाज दाबायचे प्रयत्न झाले, अनेक आवाज बंद केले गेले आणि ज्यांना ‘न्याय’ मिळाला त्या स्त्रियांचं भौगोलिक अस्तित्वच लोकांच्या अदृश्य बहिष्कारामुळे शून्य झालं. लैंगिक अत्याचाराविरोधात लढणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला नेहमीच नामुष्की आणि एकांतवास आला, त्या उलट ज्याने अत्याचार केला तो मात्र अनेकदा उजळ माथ्याने वावरत राहिला. म्हणूनच ‘मी टू’ मोहिमेने दिलेला ‘तू एकटी नाहीस. मीसुद्धा तुझ्यासारखीच आणि म्हणूनच तुझ्याबरोबर आहे’ हा सहअनुभूतीचा भाव महत्त्वाचा ठरतो. जगभरातील बहुतांशी स्त्रिया बलात्कार वा विनयभंगाला केव्हा ना केव्हा तरी बळी पडल्या आहेतच, म्हणूनच या मोहिमेमुळे ‘तू भ्रष्ट झालीस, तुझीच चूक असणार’चा कलंक नाहीसा व्हायला मदत झाली आणि त्याविरोधात आवाज उठवणं शक्य झालं. जेव्हा अमेरिकेत गोल्डन ग्लोब पुरस्कार स्वीकारल्यानंतर ऑप्रा विन्फ्रे म्हणाली, ‘टाइम इज अप.. आता बस्स..  तुमची वेळ संपली आहे..’ तेव्हा टाळ्यांच्या गडगडाटात सारं ऑडिटोरियम उठून उभं राहिलं होतं.. ते पाहणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही मनापासून वाटलं असेल, खरंच पुरे झालं अत्याचार सहन करणं.. आता कृतीची वेळ आली आहे..

याचा अर्थ स्त्रियांवरील अत्याचाराच्या शेवटाची ही सुरुवात आहे का, स्त्रीवरील अत्याचारांचा शेवट होऊ  शकेल का.. तर नाही, इतक्यात तर अजिबातच नाही. कारण पुरुषप्रधान संस्कृतीची जबरदस्त पकड, आर्थिक-शैक्षणिक दरी आणि जाती-धर्माचं राजकारण. याशिवाय ‘मी टू’ची चळवळ जगभरात पसरली असली तरी तिलाही मर्यादा आहेत. काही विशिष्ट वर्गापुरतं, विशिष्ट लोकांपुरती तिची व्याप्ती आहे. तरीही हे मान्य केलं पाहिजे की यानिमित्ताने या अन्यायाविरुद्ध एकत्रित बोलण्याला, आवाज उठवायला सुरुवात  झालीय. अगदी अमेरिका, इंग्लंड यांच्यापासून ते थेट चीन, जपान अगदी इथिओपिया, पाकिस्तान, आखाती देशांपर्यंत या मोहिमेत स्त्रियांनी आपल्या अत्याचाराला बोलतं केलं आहे.. स्त्रिया बोलू लागल्या आहेत..

या मोहिमेचं आणखी एक महत्त्व म्हणजे ही चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली ती हॉलीवूड दिग्दर्शक हार्वे वाईन्स्टीनच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाने. हे एक बडं प्रस्थ, अधिकार, श्रीमंती, शारीरिक ताकद सर्वार्थानं मोठं. त्याच्या विरोधात आवाज उठवणं सोपं नव्हतंच, तरीही अलिसा मिलानो हिने सगळ्यांना ‘मी टू’च्या माध्यमातून एकत्र यायचं आवाहन केलं. आणि त्याला प्रतिसाद मिळू लागला. त्याचं लोण जगभरात ट्वीटर आणि फेसबुक वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचलं. धनदांडग्यांच्या विरोधात अन्यायग्रस्त फारच अभावाने टिकतो. ही आपलीच नाही तर जगभराची शोकांतिका आहे म्हणूनच जेव्हा हॉलीवूडमधल्या नामवंतांविरुद्ध (त्यात अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सुटले नाहीत) आघाडी उघडली गेली तेव्हा नामवंत अभिनेत्रींनीही आपल्यावरचा अन्याय बोलून दाखवला. अर्थात ती ताकद अजून सर्वत्र नक्कीच पोहोचली नाही, त्यामुळे अनेकींनी ‘मी टू’ या हॅशटॅगला सहमती दाखवताना वा आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना ते कुणी केलं याबद्दल मौन पत्करणंच स्वीकारलं आहे, परंतु माझ्यावर अत्याचार झालाय, हे त्या निदान बोलू लागल्यात हेही नसे थोडके. गेले पाच महिने ही आग समाजमाध्यमातून धुमसते आहे.. ती थंडगार होऊ  न देणे आता प्रत्येकीच्या हातात आहे अन्यथा फक्त त्याची राख हाती यायची..

अर्थात याचाच एक प्रयत्न म्हणून हॉलीवूडमधल्या अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका अशा ३०० जणींनी एकत्र येऊन ‘टाइम इज अप’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी जगभरातून फंड गोळा करणं सुरू झालं आहे. त्याचा विनियोग कशा प्रकारे केला जाईल यावर पद्धतशीरपणे काम सुरू केलं आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर त्यातले १३ दशलक्ष डॉलर्स हे फक्त वंचित घटकातील स्त्रियांवरील अत्याचारांना कायद्याने न्याय मिळावा यासाठी राखीव ठेवले आहेत. अशा पद्धतीने जागतिक स्तरावर एकत्र येऊन ‘मौनापासून मुक्ती, लाज आणि भयापासून सुटका’ करण्याचं उद्दिष्ट या मोहिमेने ठरवलं आहे. ‘मी टू’पासून सुरू झालेली ही चळवळ आता पुढचा टप्पा गाठते आहे. म्हणूनच ती जगभरात झिरपणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशाचं, राज्याचं काय? जिथे ‘मी टू’सुद्धा अनेकांच्या जाणिवेत नाही तिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं तर खूपच दूरची गोष्ट.

अर्थात भारतात इंटरनेट असणाऱ्यांनी ट्वीटर, फेसबुकच्या माध्यमातून आवाज उठवायला सुरुवात केली आहे. पण काही निवडक चित्रपट अभिनेत्री सोडल्या तर बाकी बॉलीवूडच्या आघाडीवर शांतताच आहे. शैक्षणिक, वैद्यकीय आदी क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले पण तेही मर्यादित संख्येनं. ‘चतुरंग’मधूनच याविषयीचा स्वतंत्र लेख आपण प्रसिद्ध केलाच आहे. ‘चतुरंग’ने वेळोवेळी स्त्रियांमधील आत्मभान जागृत करतं तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. इतकंच नव्हे तर जे काही सकारात्मक होतं आहे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. स्त्रीच्या प्रगतीचा आणि एकाच वेळी तिच्या वैचारिक मागासलेपणाचाही समाचार घेतला. आजच्या ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने तयार केलेली ही पुरवणी म्हणूनच खास आहे. निमित्त जरी ‘मी टू’ या मोहिमेचं असलं तरी आपल्या सख्यांची लैंगिक अत्याचारांसंबंधांत काय भूमिका आहे, हे शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. कुठल्याच स्तरातली बाई या लैंगिक अत्याचारातून सुटलेली नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांपासून रस्त्यांवर खडी फोडणाऱ्या स्त्रियांपर्यंत आणि शाळेत जाणाऱ्या मुलींपासून घरी रहाणाऱ्या मुलींपर्यंत तिचा फायदा घ्यायला कुणी ना कुणी टपलेलं आहे, याची भीषण जाणीव या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. आपल्या घरातच मुली, स्त्रिया सुरक्षित नाही इथपासून कामाच्या ठिकाणी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बडय़ा व्यक्तीपर्यंत ही अत्याचाराची साखळी स्त्रीदेहाभोवती विनाकारण रचलेल्या नैतिकतेमध्ये तिला बांधून ठेवत असल्याचं कटू सत्य समोर आलं आहे.

स्त्रीदेहाभोवती, तिच्या योनीशुचितेभोवती, तिच्या देहाच्या पावित्र्याविषयी, भ्रष्टतेविषयी पुरुषसत्ताक व्यवस्थेने रचलेल्या कल्पनेची तीसुद्धा बळीच आहे. व्यवस्थेने ते सांगितलं, पुरुष तसे वागत गेले आणि स्त्रीने ते स्वीकारलं. आपण दुबळे आहोत, आपण प्रतिकार करू शकत नाही, पुरुषच आपला पालनकर्ता या विचारांच्या पगडय़ाने तिला ‘नाही’ म्हणायला शिकवलंच नाही. जोपर्यंत स्त्रीच्या योनीशुचितेचा संबंध तिच्या पावित्र्याशी जोडणं आणि पुरुषांची मर्दानगी त्याच्या बाईची इज्जत वाचण्याशी जोडली जाणं थांबवलं जात नाही तोपर्यंत जाती-धर्माच्या नावाखाली तिचा बळी जाणं थांबणार नाही. पुरुषार्थ, मदार्नगी, स्त्रीचं पावित्र्य, बाईची इज्जत या शब्दांना लगडलेले अपमानकारक अर्थ जोपर्यंत प्रत्येकाच्या मनातून पुसले जात नाहीत तोपर्यंत तिची सुटका नाही.. पण हीच वेळ आहे त्यातून बाहेर पडायची..

आता आता कुठे शहर पातळीवर स्त्रीच्या ‘नाही म्हणण्याचा अर्थ नाही असाच’ घ्यायचा हे तिने बजावायला सुरुवात केलेली आहे. पोलीस तक्रार करण्यापासून अत्याचाराला न्यायालयात खेचण्यापर्यंतचं धाडस दाखवते आहे. कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करत न्याय मिळवते आहे. पण हेही प्रामुख्याने शहरात आणि तेही काही वर्गापुरतचं, आज २१ शतकातही जगभरातल्या फक्त ११ टक्के स्त्रिया आपल्यावरील अत्याचाराची तक्रार करायला धजावतात ही स्त्रीवर्गाची भीषण शोकांतिका आहे. म्हणूनच हा विशेषांक.

आजच्या विशेषांकातून व्यक्त झालेल्या अत्याचाराच्या कहाण्याही काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. लहान मुलींचा अनुभव तर भयानकच आहे, अत्याचाराची लसलसती जखम त्यांना आयुष्यभर शांतपणे जगूच देत नाही, कित्येकींना तर त्याने कायमचं मानसिक पंगुत्व दिलं आहे. तर वस्ती, झोपडपट्टीतील अनेक मुलींच्या दैनंदिन आयुष्याचा तो भाग होऊन गेलाय. आपल्या शरीराशी कोणीतरी किळसवाणं खेळतंय हे माहीत असून त्या काहीच करू शकत नाहीत. कारण बोलणार कुणाशी. इथल्या स्त्रियांच्या बाबतीत तर अगदी सासरा, दीर, भावोजी अशी नात्यातली माणसंच गळ टाकून बसतात. विधवांची अवस्था तर फारच बत्तर आहे.

आर्थिक-शारीरिक दुबळेपण, असुरक्षा आणि न्याय मागता येतो, ही जाणीवच नसल्याने अनेक जणी आयुष्यभर हा भोग भोगतात. पण ज्यांना कायद्यांची माहिती आहे, तक्रार करायची असते हेही माहीत असतं त्याही याविरोधात आवाज उठवायला घाबरतात. कारण लैंगिक अत्याचाराने खचलेली स्त्री पोलीस यंत्रणेवर ना शंभर टक्के भरोसा ठेवू शकत ना न्याय यंत्रणेवर. कारण लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीकडे बघण्याची दूषित नजर. आपल्याकडे कायदे आहेत, यंत्रणाही आहे पण तेथे असलेला माणूस स्वत:लाही या भूमिकेपासून वेगळं काढूच शकत नाही. ती भ्रष्ट झाली इथपासून कशाला तक्रार करताय, तुम्हालाच त्रास होईल इथपर्यंतचे सल्ले तिला कोलमडून टाकतात. पुढे धाडसाने तिने तक्रार पुढे नेलीच तरी न्यायालयात पडणारी ‘तारीख पे तारीख’ तिचं आत्मबल ढासळवतं. आणि यात तिला घरच्यांची साथ नसेल तर सगळंच संपतं. कारण दुर्दैवाने या बाबतील स्त्री एकटी पडते. तिच्यासोबत कुणीही ठामपणे उभं राहात नाही. निर्भयासारखी एखादीच (आणि कोपर्डीसारख्या काही घटना) घटना जिथे तिला न्याय मिळावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. कायद्यात बदल झाला. पण बाकीच्या ठिकाणी ही एकी कुठेच दिसत नाही. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की ती वेळ आता आली आहे.. खूप काही घडून गेलं आहे. स्त्री अत्याचाराच्या सगळ्या पायऱ्या गाठून संपल्या आहेत. तेव्हा आपण मुली, स्त्रियांनी एकत्रित यायला हवं. ठोस कृती आराखडा तयार करायला हवा.

प्रत्येक मुलीला शिक्षणाचा आणि तोही योग्य शिक्षणाचा अधिकार मिळायलाच हवा. थोडं धाडसाचं आहे पण सांगायला हवं की आजचं शिक्षण सर्व स्तरावरील मुलींना बाईपणाच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर काढू शकलेलं नाही. ती दुय्यम नाही, दुबळी नाही याचं आत्मभान तिच्यात जागृत करण्यात जसं कमी पडलं आहे तसं पुरुषांमध्येही तू फक्त निसर्गामुळे शारीरिकदृष्टय़ा वेगळा आहेस वरचढ नाहीस, हे सांगायला आणि पुरुष-स्त्रीमधली सर्व स्तरावरील समानता त्याच्यामध्येही बिंबवायला कमी पडलं आहे. अभ्यासक्रमात बदल होत असल्याचे संकेत मंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत. शालेय वयापासूनच सर्वच मुलांमध्ये ही जाणीवजागृती होण्यासाठी खास अभ्यासक्रम हवा. याचं कारण स्त्रीच्या दोन अवयवांभोवती नको इतकं कुतूहल लहानपणापासूनच मुलांच्या मनात पेरलं जातं आणि वयात आल्यावर निसर्गसुलभ भावनेमुळे त्याला अधिक खतपाणी मिळत राहतं. या विषयावर मोकळेपणाने बोलण्यासाठीची सशक्त जागा फारच कमी मुलांच्या आयुष्यात असते. अगदी घरातही नसते. याबाबतीतलं मागासलेपण जेव्हा सुशिक्षित स्त्रियांमध्येही दिसतं तेव्हा ग्रामीण पातळीवरचा तर विचारच करायला नको. कारण लैंगिक शिक्षणाचा नेमका अर्थच आपल्या शिक्षणव्यवस्थेने सांगितलेला नाही. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका विद्या बाळ नेमकं याच मुद्दय़ावर बोट ठेवत म्हणाल्या की, ‘‘आपल्याकडे शाळांमधून लैंगिक शिक्षण देताना नुसत्या जननेंद्रियांची माहिती न देता सेक्स म्हणजे काय. जबाबदार नात्यामधला सेक्स हा किती सुरेख अनुभव असू शकतो तो स्पेशल कसा असतो आणि म्हणूनच ‘ती’सुद्धा स्पेशल कशी आहे हे मुलग्यांना कळायला हवं. ती काही केवळ मादी नाही आणि तो काही केवळ नर नव्हे, हे मुलांना आठवी, नववी, दहावीमध्येच नीट कळलं तर नक्की फरक पडेल याची मला खात्रीच आहे. याशिवाय आज प्रत्येकाकडे मोबाइल आहे. अगदी गरीबाकडेही. सर्रास उपलब्ध होत असलेल्या इंटरनेटमुळे माहिती आणि चित्रांचा उद्युक्त करणारा वर्षांव त्यातून होत असतो. आणि शरीरसंबंधांचं जबरदस्त इिन्स्टग्ट ते करून बघायला भाग पाडतं आणि महत्त्वाचं म्हणजे याचं शहाणपण देणारं कोणीच नाही. त्यामुळे मुलांना पूर्णत: दोष देण्यात अर्थ नाही. यावर सातत्यानं त्यांच्याशी बोलत राहणं. संवाद साधणंच खूप महत्त्वाचं आहे. मुलंच कशाला बायकासुद्धा शरीरसंबंधांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत बोलत नाहीत. त्यांच्यात मोकळेपणा आणण्यासाठी बायकांना बोलतं केलं पाहिजे. नारी समता मंचच्या वतीने आम्ही पुण्यात असे खूप प्रयोग केले. काही वर्षांपूर्वी मी जवळ जवळ १०-२० महिला मंडळांना स्वत: फोन करून मला तुमचा फक्त एक तास द्या. मला बोलायचं आहे म्हणून सांगितलं, पण त्याला काहींनीच प्रतिसाद दिला. अनेक जणी अजून अवघडलेल्याच आहेत. मंजुश्री सारडा, शैला लाटकर आणि अमृता देशपांडे यांच्या हत्येनंतर पुण्यात आम्ही मुद्दाम जाहीर कार्यक्रम घेतले. तसे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत. लोकांनी बोलतं होणं गरजेचं आहे, पण आज लोक विचारही करत नाहीत.’’ समाजाचं विचारांनी थबकणं ही भयकंपित करणारी स्थिती असल्याचं मत त्यांनी आवर्जून व्यक्त केलं.

विद्याताईंचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृती अधिकाधिक घट्ट करण्यामागे हीच विचार न करण्याची किंवा त्याविरुद्ध न जाण्याची, आहे तेच स्वीकारायची वृत्ती आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की, ज्यावेळी स्त्री नोकरीसाठी घराबाहेर पडली तेव्हाच तिनं आपल्या काही जबाबदाऱ्या कुटुंबीयांवर सोपवायला हव्या होत्या किंवा हळूहळू तशी सुरुवात करायला हवी होती. मी घरही सांभाळेन आणि नोकरीही करेन ही तिची असमानतेची भूमिका आज साठ-सत्तर वर्षांनंतरही नोकरदार बाईला फरफटवते आहे. अर्थात त्यावेळी तसा पवित्रा तिनं घेतला असता तर कदाचित तिचं नोकरीसाठी म्हणून बाहेर पडलेलं पाऊल उंबरठय़ाच्या आतच अडकवून ठेवलं गेलं असतं. त्यामुळे बाई सारं स्वीकारत राहिली. तिची ‘हे असंच चालू रहाणार’ ही भूमिका स्त्रीच्या पुढच्या पिढय़ांनाही अनेक वर्षे मागे नेते आहे. लैंगिकतेच्या बाबतीतही तेच होतंय. अत्याचार मग तो नवऱ्याचा असो, ती सहन करत रहाते. आणि मग त्याची सवयच होते. या विषयावर बोलण्याइतकं मोकळं नातं नवरा-बायकोतही नसेल तर बाहेरच्या दडपशाहीला तिचं बळी जाणं सहज शक्य आहे आणि मूग गिळून गप्प बसणंही.

असं कुठलंही क्षेत्र नाही जिथे स्त्रीला बाई असल्याचं मोल द्यावं लागलेलं नाही. जिथे जबरदस्तीच केली जाते. बेसावधपणे हल्ला केला जातो तेथे अपरिहार्यता असते. काही वेळा पैशांची गरज, परिस्थतीची प्रतिकूलता याचा उच्च पदस्थांनी, गब्बर लोकांनी घेतलेला फायदा यातून बाई पिचली जातेच. मात्र असंही काही ठिकाणी दिसतं की पैशांचा, ग्लॅमरचा, प्रसिद्धीचा मोह तिलासुद्धा आवरता आलेला नाही. चित्रपट क्षेत्रातील ‘कास्टिंग काऊच’ नवीन नाहीच. अनेकांना त्याची व्यवस्थित माहिती असते, तरीही ते स्वीकारलं जातंच. यावर स्पष्टपणे बोलताना, ज्येष्ठ साहित्यिका शांता गोखले म्हणाल्या की, ‘‘वर जाणाऱ्या शिडीची तीच पहिली पायरी असेल तर ती त्यांना स्वीकारावी लागते, इथे प्रचंड पुरुषी वर्चस्व आहे, अन्यथा तुमच्या पोटावर पाय येऊ शकतो याशिवाय तिलाही वरच्या पदावर पोचायची महत्त्वाकांक्षा असतेच. मग अशी स्त्री  पुढे जातेच. अशा वेळी मात्र ती मला ‘एक्स्प्लाईट’ केलं गेलय, असं म्हणूच शकत नाही. अर्थात तेही नक्की बदलेलच, पण याचा अर्थ इतरांनीही त्याविरुद्ध आवाज काढायचा नाही, असं नाही. अर्थात आज हॉलीवूडमधल्या स्त्रियांनी आवाज उठवला आहे तोही २०-३० वर्षांनंतर. बोलायची ताकद गोळा केल्यानंतर. आपल्याकडे ते बळ आलंय असं वाटत नाही. ते येईल तेव्हा आपल्या बायकाही बोलायला लागतीलच. लांब कशाला आजही एखाद्या कोळणीची खोडी काढून दाखवा. ती विळाच उगारते. मी अशा अनेक जणींना पाहिलंय त्यांनी अशा लोकांना थोबडावलं आहे, चपलेनं हाणलं आहे. ते करायलाच हवं. याची सुरुवात नक्कीच झालेली आहे, ती वाढायला हवी..’’

याच मुद्दय़ावर विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘आपण जे सांगू त्याची वाच्यता कुठे होणार नाही, हा विश्वास त्या बाईला मिळाला तर ती हळूहळू बोलू लागेल. कुणाशी आणि कशी बोलू हेच अनेकींना कळत नाही. कारण लैंगिक अत्याचाराभोवती असणारं कलंकाचं भय. एखादी बलात्कारिता जेव्हा माझ्या बाबतीत जे झालं तो फक्त अपघात होता. मी फक्त जखमी झाले आहे. भ्रष्ट नाही, हे म्हणायची ताकद स्वत:मध्ये आणेल तेव्हा समाजही बोलायचा बंद होईल. मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातल्या तरुणीनं असं धाडस दाखवलं होतं. असं धाडस प्रत्येकीमध्ये आलं पाहिजे..’’

असं धाडस नक्कीच मुलींमध्ये, तरुणींमध्ये येऊ लागलं आहे. ‘मी टू’ची मोहीम हे त्याचंच एक छोटं प्रतीक. आज एका विशिष्ट वर्गापुरती सुरू झालेली मोहीम हळूहळू का होईना पण झिरपत झिरपत सर्वदूर पसरेलच. शांता गोखलेच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित अजून २०-३० वर्षांनी का होईना आमच्या बायापण हे धाडस गोळा करतील आणि आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडतील. मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन की पुरुषप्रधान संस्कृतीला केव्हाच धडका बसू लागल्या. मुक्तीचे दरवाजे किलकिले होत उघडू लागले आहेत. सर्वच क्षेत्रात स्त्री वेगाने पुढे जाऊ लागली आहे. शिक्षण आणि आर्थिकदृष्टय़ा सशक्त झालेल्या स्त्रिया वचस्र्व पदावर आल्यावर स्वत:वरच्या लैंगिक अत्याचाराच्या वाटा नक्कीच बंद करतील. शिवाय इतर स्त्रियांमध्येही आत्मभान आणतील, आणि ‘मी टू’ची ही चळवळ ‘वी टू’- आपण सगळ्या एक आहोत, एकत्र लढूमध्ये बदलेल. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा घडा भरून केव्हाच वाहून गेला आहे.. आता बस्स.. आता कृतीची वेळ आली आहे.. पुरुष अत्याचाऱ्यांनो, वेळ मोजायला सुरुवात करा.. टाइम इज अप!

मीसुद्धा.. आहेच तुमच्याबरोबर

‘मी टू’ मोहिमेने स्त्रियांना स्वत:वरील लैंगिक अत्याचाराविषयी बोलायला उद्युक्त केलं आणि स्त्रिया लिहित्या झाल्या, व्यक्त झाल्या. पण आजही स्त्रियांचा असा मोठा वर्ग आहे ज्यांच्या मनात भीती, घृणा, दडपण, अविश्वास आहे, ज्यामुळे त्यांनी गप्प राहणं स्वीकारलं आहे. किंवा त्यांना गप्प बसवलं गेलंय. मैत्रिणींनो, ‘चतुरंग’ तुम्हाला देतंय व्यासपीठ. लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही सामोऱ्या गेलेल्या, विनयभंगापासून लैंगिक अत्याचारांपर्यंत कोणत्याही गोष्टीचा अनुभव तुम्ही इथे मांडू शकता. काय अनुभव होता तो? त्याला प्रतिकार करू शकलात का? तुम्ही त्याबद्दल कुणाशी बोललात का? त्यांची प्रतिक्रिया काय होती? या विरोधात आपण काय करू शकतो? सांगा आम्हाला.  हा अनुभव तुमच्या नावासह ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध करायचा नसेल तर तसंही कळवा. आयुष्यातल्या त्या काळ्याकुट्ट अनुभवाला कागदावर उतरवून मोकळ्या व्हा. हे व्यक्त होणं तुम्हाला त्या किळसवाण्या अनुभवापासून दूर व्हायला मदत करेल. कारण असंख्य जणी तुमच्याबरोबर आहेत. त्याही म्हणताहेत, मी टू..

पत्ता – प्लॉट नं. इएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई – ४००७१०  chaturang@expressindia.com

पुरुष त्यांच्या हातातली सत्ता कशी वापरतात याबद्दल सत्य बोलून दाखवण्याचं धाडस स्त्रीने केलं तर तिचं ऐकलंच जात नव्हतं किंवा तिच्यावर विश्वास ठेवला जात नव्हता. पण या पुरुषांचे दिवस आता भरले आहेत. टाइम इज अप आता कोणतीही स्त्री ‘मी टू’ असं म्हणेल, तेव्हा पुरुषाला ऐकून घ्यावंच लागेल. क्षितिजावर एक नवीन दिवस उगवला आहे. आज सर्वत्र आढळणाऱ्या कर्तृत्ववान, धैर्यवान स्त्रिया आणि काही वेगळ्या पुरुषांच्या हातात या जगाचं नेतृत्व गेलं, तर एक असा काळ नक्की येईल, ज्यात आपल्याला मी टू ही संज्ञा वापरावीच लागणार नाही.    – ऑप्रा विन्फ्रे, प्रख्यात मीडिया पर्सन

– आरती कदम

arati.kadam@expressindia.com

First Published on March 3, 2018 4:08 am

Web Title: loksatta chaturang articles in marathi on women empowerment and me too sexual assault campaign