लहान वय म्हणजे घडण्याचं वय; पण जेव्हा लहान मुलींना या वयात लैंगिक अत्याचार सहन करावा लागतो तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल? आणि त्यातही जेव्हा त्या हे कुणाला सांगू शकत नसतील किंवा सांगितलं तरी कुणी त्यावर विश्वास ठेवणार नसेल तर या मुलींसाठी ती आयुष्यभर ठसठसणारी जखम होऊन बसते. काहींचा नात्यांवरचा, माणसांवरचा, लग्नावरचा विश्वास तर उडतोच, पण काही जण तर कायमच्या मानसिक अस्थिर होऊन जातात. यावर आता तरी उपाय शोधणं गरजेचं झालं आहे.

‘‘तुम्ही मीना नाईक ना! मला तुम्हाला एकदा भेटायचंय.’’ काही महिन्यांपूर्वी ट्रेनमधून प्रवास करताना एक पन्नाशीतली स्त्री मला म्हणाली. ‘वाटेवरती काचा गं’ हे बाल लैंगिक शोषणाविषयीचं नाटक रंगभूमीवर आणल्यापासून विविध वयोगटांतल्या, व्यवसायांतल्या अनेक मुली, स्त्रिया वेळोवेळी भेटतात, फोन करतात, ईमेल पाठवून आपले अनुभव कथन करतात. या स्त्रीचा तीनेक महिन्यांनी पुन्हा एकदा फोन आला. ‘‘मीनाताई, मला तुम्हाला एकदा भेटायचं.’’

‘‘जरूर. फोन करून या.’’ मी. असे अंतराअंतराने या बाईंचे मला चार वेळा फोन आले. बाईंना भेटायचं होतं, पण बोलायची हिंमत होत नव्हती.   शेवटी भेटीचा एक दिवस ठरला. मुद्दाम घरी न बोलावता बाईंना एका वेगळ्या ठिकाणी बोलावलं. बाईंनी मोठी हिंमत करून आपल्या लहानपणीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना मला सांगून मन रितं करण्याचा प्रयत्न केला. सांगत असताना अर्थातच अश्रुधारा वाहत होत्या. मन मोकळं झाल्यावर बाई म्हणाल्या, ‘‘माझ्या आईचा मी द्वेष करते. सगळं माहीत असून, घरातच घडत असूनसुद्धा तिनं काहीच केलं नाही. मी फक्त सहन करत राहिले. माझी मुलगी आता इंजिनीअरिंग करतेय, पण माझं मन धास्तावलेलंच असतं. खूप भीती वाटते.’’

असंख्य स्त्रियांच्या भूतकाळात आणि वर्तमानकाळात लैंगिक छळाचे असे अनेक अनुभव असतात; पण भविष्यात तरी हे अत्याचार थांबावेत, स्त्रियांनी हा छळ तोंड मिटून सहन न करता, त्याबद्दल मोठय़ाने बोलावं याकरिता जगभरात ‘मी टू’ वा ‘मी सुद्धा’चे अभियान सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. ‘मी टू’ अभियानात तुम्ही एकटेच नाही आहात; मीपण त्याच्या नौकेतून प्रवास करतेय ही कल्पना दृढ झालीये हे महत्त्वाचे. प्रत्येकाने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडायलाच हवी.

‘वाटेवरती काचा गं’च्या वसईच्या एका प्रयोगाला एक वीस वर्षांचा मुलगा, प्रयोग संपल्यानंतर मला भेटायला आला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही मला साक्षात देव भेटल्यासारख्या वाटता. आजपर्यंत माझ्यावर होणारा लैंगिक अत्याचार हा फक्त मीच दुर्दैवी असल्यामुळे माझ्या नशिबी आला, असं मला वाटायचं; पण आज प्रथमच मला तुमच्या नाटकातून कळलं की, असं अनेकांना होत असतं. लैंगिक छळ कुठेही होऊ शकतो.’’

लैंगिक शोषणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मी तलासरीच्या आदिवासी मुलींची एक कार्यशाळा घेतली होती. या दहावीच्या वर्गातल्या मुली होत्या. आईवडील शेतावर काम करणारे कातकरी. घरी भाऊच लैंगिक छळ करतो असा त्यांचा अनुभव होता. आजपर्यंत त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं; पण यानिमित्ताने त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फुटली. त्या बोलत्या झाल्या.

औरंगाबादच्या एका प्रयोगानंतर दहावीत शिकणाऱ्या काही मुली रडत रडत रंगमंचावर मला शोधत आल्या. म्हणाल्या, ‘‘आमचे योग शिक्षक आम्हाला त्रास देतात. आम्ही दहावीत आहोत. आमचं अभ्यासात लक्ष लागत नाही. आमच्या मुख्याध्यापक एक महिलाच आहेत. त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली, तर त्या म्हणतात, ‘‘तुम्ही मुलीच तशा आहात. टीव्ही बघून तुमच्या मनात हे घाणेरडे विचार येतात.’’ अशा वेळी या मुलींनी कुठे तक्रार नोंदवायची?

स्त्रियांवर होणाऱ्या अशा अत्याचारांची काही सुलभ कारणे पुढं करताना किंवा त्यांच्यावर त्याचे खापर फोडताना मध्यंतरी काही महाभाग राजकीय नेत्यांनी, म्हटलं होतं की, पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घातल्याने पुरुषांच्या भावना चेतावल्या जातात. त्यामुळेच बलात्कार घडतात. मुलींना पार्टीज्ना पाठवू नये – वगैरे वगैरे. लैंगिक छळ हे फक्त पार्टीजला जाणाऱ्या मुलींवरच होतात का? आणि पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घातल्यानेच होतात का!  आणि तसं असेल तर पूर्वीच्या काळी मुलींवर अत्याचार का व्हायचे? पुरुषांमधील ही विकृती फार पुरातन आहे. हा एक अधिकाराचा खेळ आहे. हा अधिकाराचा दबाव फक्त स्त्रियांवरच नाही, तर पुरुषांवर आणला जातो.

२००० मध्ये ‘वाटेवरती काचा गं’ नाटकामधून लैंगिक शोषणाचा विषय प्रथम मांडला गेला. त्यापूर्वी या विषयाला कुणीच हात घातला नव्हता. स्त्रियांनी आपले अनुभव उघडपणे बोलावेत म्हणून नाटकानंतर प्रेक्षकांबरोबर संवाद साधला जायचा आणि प्रेक्षकांमधील छोटे-मोठे, स्त्री-पुरुष आपले अनुभव सर्वासमोर निर्भीडपणे मांडायचे. आजपर्यंत नाटकाला मागणी असल्यामुळे आता त्याची डीव्हीडी दाखवण्यात येते. परिणाम तोच आहे. मुली व्यक्त होतात, हे महत्त्वाचे आहे. एकदा एका नृत्यालयात ही डीव्हीडी दाखवत असताना अनेक मुली रडत होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर २०-२२ वर्षांच्या या मुली एकएकटय़ा येऊन मला भेटल्या. लहानपणी आपल्यावर झालेले अत्याचार त्यांना विसरता येत नव्हते. आज जवळच्या मित्राचा जरी स्पर्श झाला तरी किळस वाटते. एक म्हणाली, ‘‘मी सतत तो स्पर्श पुसून टाकण्यासाठी परत परत पाण्याने धुऊन काढते, पण मनाचं समाधान होत नाही.’’ लहान मुलींवर अशा गोष्टीचा किती दीर्घ आणि गंभीर परिणाम होतो याची इतरांना कल्पनाच येणं शक्य नाही. आयुष्यभर आता त्या मुलींना या भयानक अनुभवाची साथ सोबत करावी लागेल.

अलीकडेच आदिवासी स्त्रियांसोबत गप्पा मारण्याची वेळ आली. त्यात एक स्त्री म्हणाली, ‘‘मी लहान असताना मोठय़ा बहिणीचं लग्न झालं. तिच्याबरोबर पाठराखीण म्हणून तिच्या सासरी गेले. सासरी फक्त बहीण आणि तिचा नवराच होते. सकाळी बहीण उठून घरकामाला लागली. स्वयंपाकघरात जाऊन चहा करत होती. मी झोपलेलीच होते. अचानक झालेल्या स्पर्शाने जाग आली. पाहाते तो माझे भावोजीच माझ्या शेजारी मला चिकटून झोपले होते. हे मी कुणाला सांगितलं असतं तर माझ्यावर कुणी विश्वास ठेवला असता का?’’ या मुलीने त्या वेळी न बोलणं पसंत केलं, पण आयुष्यभरासाठी त्या भावोजीबरोबरचं तिचं नातं विस्कटलं ते विस्कटलंच. शिवाय पुरुषांबद्दल किंवा अशा नात्याबद्दल तिच्या मनात घृणाच निर्माण झाली नसेल का?

आतापर्यंत आम्ही नाटकाद्वारे मुलांना शहाणं करण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करत आलो. पालकांना, शिक्षकांना सूचना देत आलो; पण आता एक नव्याने प्रकल्प होऊ घातलाय. पुण्याच्या केईएम इस्पितळाद्वारे डॉ. लैला गारडा आणि त्यांचे सहकारी या प्रकल्पावर गेले वर्ष-दीड वर्ष काम करत आहेत. हा प्रकल्प आहे लैंगिक शोषणकर्त्यांना गुन्हा घडण्यापूर्वीच शहाणं करण्याचा, त्यांचं समुपदेशन करण्याचा. या प्रकल्पाची सुरुवात झाली ‘वाटेवरती काचा गं’ हे नाटक पालकांना आणि शिक्षकांना शाळांमधून दाखवण्यातून; परंतु नाटकानंतरच्या परस्परक्रियेचा रोख मुलांकडे नसून मोठय़ांकडे होता. पालकांनाच आव्हान केलं की, ‘‘बघा तुम्ही, तुमचे स्नेही, नातेवाईक यांच्यापैकी कुणाला लैंगिक शोषण करण्याची प्रबळ इच्छा होत असेल; तर तातडीने समुपदेशकाचा सल्ला घ्या. लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या व्यक्तींवर मानसिक, शारीरिक परिणाम काय होतात याचा विचार करा.’’

अर्थातच असं आवाहन करून, कुणी पुढे येतच नाही. आपण गुन्हेगार आहोत किंवा आपल्या ‘हातून’ गुन्हा घडण्याची चिन्हे आहेत, असं कोण कबूल करेल? परंतु प्राथमिक प्रतिबंध करून गुन्हा होऊच द्यायचा नाही हा प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळे केईएमच्या प्रकल्पासंबंधित मंडळींनी मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर्सना या प्रकल्पाची माहितीही दिली. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी कुणी लैंगिक शोषणाविषयी सूचक हालचाली करत असतील तर त्यांचे समुपदेशन करायला सुरुवात झालेली आहे. स्वत:हून पुढे येणाऱ्या व्यक्ती खूपच कमी आहेत. शिवाय ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस अ‍ॅक्ट’ (ढडरउड) या कायद्यामुळेही काही अडचणी आहेत. त्यामुळे आता फक्त सूचक हालचाली निदर्शनास येतात अशा व्यक्तींचेच समुपदेशन करायला सुरुवात झालेली आहे.

तूर्तास गुन्हा घडण्यापूर्वीच काळजी घेतली जाईल आणि लैंगिक शोषणाला आळा बसेल अशी आशा करू या आणि ही मुलं मोठी होतील तेव्हा ‘मी टू’ असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत ते थांबवावेत म्हणून मुलांना आम्ही ‘नाही’ असं म्हणायला शिकवतो. पण या बाबतीत युवा मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. अत्याचार सहन न करता वेळीच आवाज उठवला पाहिजे. भले अत्याचार करणारा जवळचा नातेवाईक असेल, कुटुंबाचा मित्र असेल किंवा इतरत्र कुठे भेटला असेल. मोठय़ाने आरडाओरडा केला तर छळणारा घाबरून पळून जाण्याची शक्यता जास्त असते.

मला अनेक तरुण मुली विचारतात, आमच्यासमोर काही जण अश्लील चाळे करतात. एकदा सेंट कोलंबा शाळेतील मुलींनी त्यांचा अनुभव सांगितला होता. म्हणाल्या, एक म्हातारा शाळेसमोरच्या झाडाखाली अर्धी चड्डी घालून बसायचा. पण तो असा बसायचा की त्याचं लिंग सर्वाना दिसायचं. मधल्या सुट्टीत आम्ही शाळेबाहेर पडलो की आम्हाला हमखास त्याचं दर्शन व्हायचं. लहान वयात ते पाहून खूप भीती वाटायची. घाबरायला व्हायचं. पुढे या मुलींनी शिक्षकांकडे तक्रार केली आणि त्याला हाकलून लावलं. हासुद्धा लैंगिक शोषणाचाच भाग आहे. असे प्रसंग आल्यानंतर भीतीने धडधड वाढते. घाबरायला होतं. तर आम्ही मुलींना सांगतो, दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे तुमच्यात बळ येईल. अंधूकशी जरी शंका आली, की समोरची व्यक्ती आपल्याशी अयोग्य वागणूक करतेय, तर तात्काळ हालचाल करा. जवळच्या मैत्रिणीला सांगा, आईला सांगा किंवा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीला पडताळून पाहायला सांगा. पोलीस ठाण्यावर जाऊन तक्रार नोंदवा. एकटे न जाता बरोबर कुणा ज्येष्ठ व्यक्तीला घेऊन जा. पण सहन करू नका.

अमेरिकेत या प्रकारचं संशोधन झालं तेव्हा अत्याचारींनी सांगितलं की, जोपर्यंत शोषित व्यक्ती विरोध करीत नव्हत्या, आम्हाला अडवत नव्हत्या, तोपर्यंत आम्ही करीत राहिलो. तेव्हा युवा पिढीला मी हेच सांगेन की, आवाज उठवा, सहन करू नका. वेळीच त्यावर हालचाल करा. या बाबतीत अलीकडेच चिन्मयी सुमित या अभिनेत्रीने एका वाहनचालकाने अश्लील चाळे केल्यामुळे पोलिसांत तक्रार करून त्या चालकाला चांगलाच धडा शिकवला. आणि या गोष्टीला तिने सोशल मीडियावरूनसुद्धा भरपूर प्रसिद्धी दिली. वास्तविक मी, माझं कुटुंब यांची समाजात अब्रू जाईल तेव्हा जाऊ दे ना, एवढं काय! असं ती म्हणू शकली असती. त्यामुळे म्हातारी मेली, पण काळ सोकावतो’ त्याप्रमाणे शोषणकर्त्यांचीच हिंमत वाढते. शिवाय लैंगिक छळ म्हणजे फक्त बलात्कार असा समज आपल्या समाजात आहे; परंतु अश्लील चाळे करणं, अश्लील छायाचित्रं-चित्रफीत, चित्रपट दाखवणं, स्वतच्या इंद्रियांचं प्रदर्शन करणं, अश्लील बोलणं, विनोद करणं या सर्व क्रिया लैंगिक अत्याचारांचाच भाग आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मुलींना या गोष्टीविषयी जागृत करणं त्यांच्या पालकाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मुलींवरचे अत्याचार कमी व्हायला मदत होईल.

– मीना नाईक

meenanaik.51@gmail.com