२००६ पासून सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती २०१७ च्या अखेरीस. मी टू’ हा हॅशटॅग ठेवणाऱ्या  ट्वीट रिट्वीट करणाऱ्यांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा अल्पावधीत ओलांडला आणि अमेरिकेत त्याबाबत राजकीय हालचाल करावी लागली. हळूहळू या मोहिमेचे पडसाद चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, इथिओपिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही उमटले.. जगभरातल्या प्रतिसादावरचा हा खास लेख..

स्त्रि यांचा पुरुषांकडून होणारा लैंगिक छळ, मग तो बलात्काराच्या स्तरावरचा असू दे किंवा विनयभंग, अश्लील टिप्पण्या, छेडछाड असू दे. या छळाचे अनुभव उघड करायचे नाहीत हे संस्कार मुलींवर वयात येण्याच्या आधीपासूनच घरात केले जातात. अशा परिस्थितीत एखाद्या मुलीने किंवा स्त्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तोंड उघडले तर अविश्वास दाखवला जाण्यापासून चिखलफेकीपर्यंत सगळे काही तिला सहन करावे लागते, एकटीला.

समान हक्कांसाठी लढणाऱ्यांनी एकत्र येणे हे अत्यंत नैसर्गिक आणि तेवढेच आवश्यक आहे. मग आज कोटय़वधी स्त्रिया पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडत असताना, त्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच का असतात? त्यांची संघटना का उभी राहत नाही? बलात्कारासारख्या घटनांनंतर स्त्रिया मोर्चे वगैरे काढतात, पण लैंगिक छळाविरुद्ध, विशेषत: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या, लढणारी बाई एकटीच का असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणारी एक ऑनलाइन चळवळ गेल्या काही महिन्यांत जोर धरून आहे- मी टू किंवा # Me Too

सामाजिक कार्यकर्त्यां टमारा बर्क यांनी २००६ मध्ये ही संज्ञा प्रथम वापरली. लैंगिक छळाला बळी पडलेल्या स्त्रियांना सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन समानुभूतीचा (एम्पथी) आधार देण्यासाठी त्यांनी ‘मी टू’ ही संकल्पना आणली, तर १५ ऑक्टोबर २०१७ रोजी अमेरिकी अभिनेत्री अलिसा मिलानोने या संकल्पनेचा वापर करून ट्विटरमार्फत आवाहन केले की, लैंगिक छळाला बळी पडलेल्यांनी ‘मी टू’ हा हॅशटॅग स्टेटस म्हणून ठेवावा आणि आपले वैयक्तिक अनुभव मांडावेत, जेणेकरून या समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य सर्वाच्या लक्षात येईल. हॉलीवूडमधील चित्रपट निर्माता हार्वे वाइनस्टाइन याच्याविरोधात लैंगिक छळाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर अलिसाने हा हॅशटॅग तयार केला.

‘मी टू’ हॅशटॅग मोहिमेला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. मनोरंजन, क्रीडा, राजकारण, वैद्यक, आर्थिक, उद्योग यांपासून ते अगदी लष्कर आणि धार्मिक स्थळांपर्यंत सर्व ठिकाणी लैंगिक छळाचा सामना करावा लागला, असे स्त्रियांनी सोशल मीडियावरून नमूद केले. अलिसाच्या आवाहनानुसार ‘मी टू’ हा हॅशटॅग ठेवणाऱ्या तसेच तिचे ट्वीट रिट्वीट करणाऱ्यांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा अल्पावधीत ओलांडला. ‘मी टू’ हॅशटॅग वापरणाऱ्यांमध्ये सेलेब्रिटींचे प्रमाणही लक्षणीय आहे.  ‘मी टू’ ही चळवळ अमेरिकेतून सुरू झाली असली तरी खरे तर तिला भौगोलिक सीमा अशा नाहीतच, कारण ती सोशल मीडियामार्फत चालवली जाणारी ऑनलाइन चळवळ आहे. या चळवळीचे लोण अल्पावधीत जगभर पसरले. लैंगिक छळाची समस्या जगाच्या कानाकोपऱ्यात कशी सारख्याच तीव्रतेने अस्तित्वात आहे, याचे पुरावे देणाऱ्या पोस्ट्स जगभरातून पडू लागल्या. किमान ८५ देशांमध्ये हा हॅशटॅग ट्रेण्डिंग आहे. ‘मी टू’ या संज्ञेची स्थानिक भाषांतरे करून ही चळवळ पसरली. कॅनडात राहणाऱ्या फ्रेंच भाषकांनी ‘मुआऔसी’ असा हॅशटॅग तयार केला, तर चीनमध्ये ‘वोयेशी’ असा हॅशटॅग स्त्रिया वापरू लागल्या.

लैंगिक छळ या संकल्पनेची व्याख्या केली जाण्यासाठी २०१६ साल उजाडावे लागले अशा अफगाणिस्तानमध्येही सुरुवातीला या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, जिवे मारण्याच्या धमक्या येऊ  लागल्यानंतर अनेकींनी हॅशटॅग्ज काढून घेतले. तरीही पत्रकार मरियम मेहेतर आणि राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार शहरझाद अकबर यांनी धैर्याने त्यांना आलेले लैंगिक छळाचे अनुभव सोशल मीडियावरून मांडले. त्यावरून त्यांना अत्यंत हीन पातळीवरचे ट्रोलिंग सहन करावे लागले, लागत आहे. चीनमध्येही इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने ही ऑनलाइन चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला.  इथिओपियातील पीडितांना विशेष पाठिंबा द्यावा, असे अलिसाने म्हटले होते. कारण या देशात ४० टक्के विद्यार्थिनींना लैंगिक छळाचा सामना करावा लागतो, असे पाहणीतून पुढे आले आहे. या देशातल्या माध्यमिक शाळेतल्या मुलींनी एकत्र येऊन असा त्रास देणाऱ्या एका शिक्षकाच्या वर्तनाविषयी चर्चा केली आणि त्याच्याविरोधात तक्रार करून त्याला बडतर्फ करण्यास प्रशासनाला भाग पाडले. याची प्रेरणा ‘मी टू’ चळवळीतून मिळाल्याचे या मुलींनी आवर्जून नमूद केले.

फ्रान्समध्ये या चळवळीने सुरुवातीला जोर धरला, पण लगेचच प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या १०० स्त्रियांनी ‘मी टू’वर टीका करणारे एक खुले पत्र प्रसिद्ध केले आणि चळवळीचा जोर कमी झाला. गर्दीत झालेल्या स्पर्शासारख्या गोष्टींना स्त्रियांनी फारसे महत्त्व देऊ नये, असे या पत्रात म्हटले होते. अशा प्रकारच्या हॅशटॅग मोहिमांमुळे स्त्रीवादी चळवळीचे गांभीर्य कमी होईल, अशी टीकाही काही स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी केली.

जर्मनीत ‘मी टू’ चळवळीला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तीन अभिनेत्रींनी एका टीव्ही दिग्दर्शकावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर ‘मी टू’ हा हॅशटॅग वापरून अनेक अनुभव पुढे आले. इटली, नॉर्वे, स्वीडन, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया, स्पेन, इस्रायल-पॅलेस्टाइन, आखाती देश आदी देशांमध्येही स्त्रियांनी ‘मी टू’ हॅशटॅग वापरून आपले अनुभव मांडले.

बलात्काराच्या केवळ चार टक्के केसेस रिपोर्ट होतात आणि त्यातल्या अर्ध्या तक्रारी नंतर मागे घेतल्या जातात, अशी भयावह परिस्थिती असलेल्या जपानमध्ये सुरुवातीला ‘मी टू’ चळवळीला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, हळूहळू स्त्रिया हा हॅशटॅग वापरून अनुभव मांडू लागल्या आहेत. जपानमधील काही प्रसिद्ध लेखिकांनी ही सोशल मीडियावरची चळवळ उचलून धरली आहे.

पाकिस्तानात ‘मी टू’ हॅशटॅग वापरण्याचे प्रमाण सुरुवातीला फारसे नव्हते. मात्र, जानेवारी २०१८ मध्ये झैनब अन्सारी नावाच्या सात वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि पाकिस्तानी स्त्रियांनी ‘मी टू’च्या धर्तीवर सोशल मीडियाद्वारे चळवळ सुरू केली. नृत्यांगना शीमा केरमानी पाकिस्तानातल्या चळवळीची उद्गाती आहे. एके काळची मॉडेल फरीहा अल्ताफ आणि डिझायनर महीम खान यांनी आपले लैंगिक छळाबद्दलचे अनुभव मांडत या चळवळीत सहभाग घेतला.

ही चळवळ जिथून सुरू झाली त्या अमेरिकेतही काँग्रेसमध्ये या चळवळीची दखल घेऊन लैंगिक छळाबद्दलच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. युरोपीय संघाच्या संसदेने या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात प्रख्यात निवेदिका-अभिनेत्री ऑपरा विन्फ्रे यांनी ‘मी टू’ चळवळीचा उल्लेख करून लैंगिक छळाबद्दल भाष्य केले.

भारतातही ‘मी टू’ चळवळीला स्त्रियांनी उदंड प्रतिसाद दिला. यात सहभागी झालेल्या भारतीय स्त्रियांचे वैशिष्टय़ म्हणजे यात मिलेनियल अर्थात २१व्या शतकामध्ये तारुण्यात पदार्पण केलेल्या मुली-स्त्रिया बहुसंख्येने आहेत. २००३ मध्ये छेडछाडीविरोधात झालेली ‘ब्लँक नॉइज’ चळवळ, २००९ मध्ये मॉरल पोलिसिंगविरोधात झालेली ‘पिंक चड्डी’ चळवळ यांच्या तुलनेत २०१५ मध्ये झालेली ‘पिंजरा तोड’ चळवळ आणि २०१७ मधील ‘बेखौफ आझादी’ चळवळ यांची व्याप्ती अधिक आहे. ‘मी टू’मध्येही खूप मोठय़ा संख्येने स्त्रिया सहभागी होत आहेत. लैंगिक छळाचे प्रकार मोठय़ा संख्येने घडतात त्या चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रीही अनुभव सांगण्यासाठी बोलत्या झाल्या. कंगना राणावत, कोंकणा सेन-शर्मा, राधिका आपटे, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर यांनी ट्विटरवरून या चळवळीला पाठिंबा दिला. ऑक्टोबर २०१७ मध्ये कॅलिफोर्नियातील भारतीय विद्यार्थिनी राया सरकार आणि कार्यकर्त्यां इंजी पेन्यू यांनी लैंगिक छळ करणाऱ्या प्राध्यापकांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. अर्थात यामुळे ‘मी टू’ चळवळ टीकेचे लक्ष्य झाली.

‘मी टू’ ही संज्ञा प्रथम वापरली गेली ती स्त्रियांच्या संदर्भातच. मात्र, या चळवळीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने बालहक्कांसाठी काम करणाऱ्यांनीही या व्यासपीठाचा उपयोग जागृतीसाठी सुरू केला. काही पुरुषांनीही त्यांना भोगाव्या लागलेल्या लैंगिक छळाचे अनुभव या चळवळीच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडले. या चळवळीवरील टीकेचा प्रमुख मुद्दा म्हणजे यामध्ये कोणत्याही पडताळणीशिवाय बेताल टीका केली जाण्याचा धोका आहे. राया सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीवरून ही टीका प्रामुख्याने केली गेली. वैयक्तिक सुडासारख्या बाबींसाठी अशा चळवळीचा गैरवापर होऊ शकेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली.

‘मी टू’ चळवळ ही सोशल मीडियाद्वारे चालवली जाणारी चळवळ असल्याने केवळ इंटरनेट अ‍ॅक्सेस असलेल्यांपुरतीच ती मर्यादित आहे. त्यामुळे यातून जे काही दिसत आहे ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे असे अनेकांनी म्हटले आहे. मात्र, मुख्य धारेतील स्त्रीवादी चळवळीने हुंडाबळी, स्त्री शिक्षण, बलात्कार यांसारख्या अधिक गंभीर वाटणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले असल्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावर तोडगा काढण्यासाठी ही मोहीम उपयुक्त आहे, अशी भूमिका मांडली गेली.

मुळात अलिसा मिलानोने हा हॅशटॅग अ‍ॅक्टिव्हिझम सुरू केला, तेव्हा त्यामागचा उद्देश हा समानुभूती अर्थात एम्पथीच्या माध्यमातून सक्षमीकरण हा होता. त्यापूर्वी टमारा बर्कने ही चळवळ सुरू केली होती, तेव्हा त्यामागे एक मोठी कृती योजना तयार होती. या वेळी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य लोकांना समजावे एवढाच उद्देश अलिसाने ठेवला होता.

भारतातल्या पत्रकार-लेखिका मेघना पंत यांनी या चळवळीचे वर्णन ‘चहा भरपूर उकळावा, पण नंतर पिण्यास विसरून जावे’ अशा शब्दांत केले आहे. हे घडण्याचा धोका नाकारता येत नाही. अमेरिकेत संबंधित कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या चळवळीमुळे इथिओपियातील शालेय विद्यार्थिनींनी ठोस पाऊल उचलले आहे. स्त्रियांची मते कायम दडपली जातात अशा देशांमधल्या स्त्रिया दडपशाही झुगारत व्यक्त झाल्याची उदाहरणे आहेत हेही नाकारून चालणार नाही.

मुळात लैंगिक छळाचे मूळ समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेत दडले आहे. (पुरुषांनीही लैंगिक छळाचे अनुभव मांडले असले तरी ते नगण्य आहेत.) स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने समाजात रुजेल, तेव्हा कोणत्याही व्यक्तीकडून विरुद्धलिंगी व्यक्तीचा असा छळ केला जाण्याची शक्यता खूप कमी होईल. यासाठी केवळ ‘मी टू’ एवढे म्हणून पुरणार नाही, तर हे का घडते आणि ते कसे थांबवता येईल याचा विचारही झाला पाहिजे. अगदी बालपणापासून आपल्याकडे रुजवले जाणारे साचे मोडून एका लिंगनिरपेक्ष समाजाच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. या प्रयत्नांत कोणीही एकटे पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी ‘मी टू’सारख्या चळवळी मदत करतीलच.

– सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com