सोशल मीडियावर ‘मी टू’मध्ये अनेक स्त्रिया-मुलींनी आपापले कटू अनुभव मांडले, पण त्यावर अनेक विचित्र कमेंटही आल्या की, ‘या मुली उगाच प्रसिद्धी मिळवायला हे काही तरी तिखटमीठ लावून लिहितात, यांचीच काही तरी चूक असेल..’ स्त्रीच्या उद्वेगालाही नीटपणे स्वीकारू न शकणाऱ्या समाजात आपण राहतो हे आजचं वास्तव आहे. म्हणूनच रस्त्याने जाता-येता आपल्यावर होणाऱ्या छेडछाडीचे, धक्काबुक्कीचे अनुभव घरी सांगितले तर आपलं बाहेर पडणंच बंद होईल, या भीतीपोटी अनेक महाविद्यालयीन मुली गप्प बसणंच पसंत करतात आणि हे अनुभव येणारच हे गृहीत धरून जगत राहतात.. महाविद्यालयीन तरुणींचे अनुभव..

टमारा बर्क या अमेरिकन कार्यकर्तीने सर्वप्रथम २००६ मध्ये वापरलेला ‘मी टू’ गेल्या वर्षांअखेरीस सोशल मीडियावर ट्रेंड झाला. सेलेब्रिटीजपासून सर्वसामान्य स्त्रीपर्यंत अनेकींनी ‘मी टू’ म्हणत स्वत:ला आलेले लैंगिक छळ आणि त्रासाचे कटू अनुभव समाजमाध्यमांवर खुले केले. स्वत:शीही आठवायला नको वाटाव्यात अशा व्यथा यानिमित्ताने बोलत्या झाल्या. एका अर्थाने आजच्या समाजाच्या चित्र-चरित्राचीच काळी बाजू रेखाटली गेली.

‘हे जग तर असंच राहणार. त्यापेक्षा तूच स्वत:ला लपवून, झाकून ठेवा ना!’ असा पवित्रा ‘समाजपुरुष’ पूर्वीपासूनच घेत आलाय. अगदी मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर काय होतं हे सांगणाऱ्या एका लोकगीताच्या ओळी-

‘आलं नहान पहिला ऋतू,

माईचं दूध चाललं उतू

वाहिनी म्हणते न्हाऊ घालते,

साय साखर खाऊ घालते

भाऊ म्हणे तो बहिणाबाई,

घराबाहेर जायाचं नाही..’

मुलगी ‘शहाणी’ झाली की तिला लगोलग उंबऱ्याआत कोंडून टाकायचं, असं सोपं उत्तर केवळ या लोकगीतापुरतं असत नाही. ते आजही बहुतेकदा असंच शोधलं जातं.

या विषयावर महाविद्यालयीन तरुणींशी बोलल्यावर हे वास्तव अगदीच भडकपणे समोर आलं. बी.ए.च्या पहिल्या वर्षांला शिकणारी संगीता कसबे म्हणाली, ‘‘मुलगी कितीही नजर खाली करून राहिली तरीही वस्तीतलं वातावरण असं असतं, की पालक तिच्याबाबत बिनघोर राहूच शकत नाहीत. मुलींना मासिक पाळी येणे हा खरं तर तिच्या आयुष्यातला एक आनंदाचा टप्पा असतो; पण तिच्या आयुष्यात हा टप्पा आल्यावर आईवडील काळजीत पडतात. ‘हिचं लग्न होऊन आपण जबाबदारीतून ‘मुक्त’ होईपर्यंत ही सुरक्षित राहील का?’ ही काळजी त्यांना लागून राहते. मुलींची अशी काळजी चुकीची आहेच, परंतु त्यांचं असं वागणं ही एक प्रतिक्रिया असते,हे कुणी लक्षात घेत नाही. आसपासचं दिवसेंदिवस गढूळ होत चाललेलं वातावरण हे त्यामागचं खरं कारण आणि अशा घटना किंवा त्याहून कमी तीव्रतेच्या अनेक गोष्टी सतत अनुभवायला येतच असतात; पण माझ्यासकट अनेकींमध्ये ‘जाऊ दे ना’ अशीच एक वृत्ती तयार झालेली असते. कारण लहानपणीपासूनच सांगितलं जातं की, ‘आपण नजर खाली ठेवून चालावं. कुणाच्या अध्यात-मध्यात राहू नये.’’

‘मी टू’ची मोहीम फारच दूरची, पण सोशल मीडियाच्या कट्टय़ावरच नाहीत तर अशा गोष्टी आपापसात -दोघीतिघींत बोलायलाही वस्तीतल्या पोरी घाबरतात. संगीताची मैत्रीण काजल सध्या बारावीला आहे. ती सांगते, ‘‘बारावीच्या अभ्यासाइतकंच पोरांकडून होणाऱ्या छेडछाडीचंही दडपण असतं. घरी काही सांगितलं तर थेट शिक्षणच बंद होण्याची भीती. कॉलेजात बोलावं तर शिक्षक म्हणणार, ‘आपणच काळजी घ्यावी. कशाला उगाच कुणाशी भांडत बसायचं?’’’ काजलला ‘मी टू’ मोहिमेबद्दल माहिती आहे आणि असे प्रयोग तिला खूप गरजेचे वाटतात; पण अजून तरी स्वत:ला आलेले अनुभव समाजमाध्यमावर मांडण्याचं बळ ती एकवटू शकलेली नाही.

एका कॉलेज कॅम्पसमध्ये मुलींशी गप्पा मारल्या. सर्व प्रकारच्या त्रासासाठी आपल्याकडे ‘इव्ह टीझिंग’ हाच शब्द बहुतेकदा वापरला जातो. या संकल्पनेअंतर्गत कुठकुठले त्रास अनुभवावे लागतात? या प्रश्नावर मुलींनी उत्तर दिलं, ‘एखाद्या मुलीकडे सतत टक लावून बघणं, गर्दीच्या ठिकाणी तिला नकोसे स्पर्श करणं, तिचं नाव घेऊन सार्वजनिक ठिकाणी हाका मारणं, तिचं नाव आणि मोबाइल नंबर सार्वजनिक ठिकाणी लिहून ठेवणं, तिचा पाठलाग करणं, तिच्याकडे सतत लैंगिक संबंधाची मागणी करणं, तिने नकार दिल्यास तिची बदनामी करणं अशा अनेक गोष्टी यात येतात.’ मला वाटून गेलं, केवळ या त्रासाचा भडकपणा शब्दातून सौम्य दाखवण्यासाठी सरसकट ‘इव्ह टीझिंग’ या एकाच लेबलखाली समाज आणि माध्यमेही याच शब्दाचा सढळ वापर करतात. लैंगिक छळ, सेक्शुअल हरॅसमेंट यावर केवळ टोकाचं काही घडलं तरच लिहिलं-बोललं जातं. अन्यथा आवाज उठवलेला दिसत नाही.

तन्वी निकाळजे सध्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांत शिकते आहे. शिक्षणासाठी ती नुकतीच औरंगाबादहून पुण्याला गेलीय. ती म्हणते, ‘‘सोशल मीडियावर झालेल्या ‘मी टू’सारख्या कॅम्पेनमुळे अनेक मुलींवरचं मनावरचं हे ओझं हलकं झालं असणार. शिवाय यातून वाईट प्रवृत्तींना स्वत:च्या आत डोकावून पाहायला भाग पाडलं गेलं असावं. मला व्यक्तिश: कधी टोकाच्या लैंगिक छळाचे अनुभव आले नाहीत, पण वयात आल्यावर टवाळखोर मुलांकडून होणारी छेडछाड, कॅट कॉलिंग यांना मी आणि माझ्या मैत्रिणी सामोऱ्या गेलो आहोत. आपल्या देशातल्या जवळपास सगळ्याच मुली याला सामोऱ्या जातात हे वास्तव कुणी नाकारू शकणार नाही. माझ्या नात्यातल्या काही मुली आणि मैत्रिणींना मात्र गंभीर छळाचे असे अनुभव आलेत. मला आठवतं, दिल्लीतल्या निर्भयाचं प्रकरण घडलं होतं त्यानंतर आम्हा मुलींमध्ये एरवी वर्ज्य मानल्या गेलेल्या अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा सुरू झाली. शाळेतल्या एका मैत्रिणीनं तिच्या चुलतभावाच्या पुन:पुन्हा नकोसा स्पर्श करण्याबाबत सांगितलं होतं; पण तिच्या घरातलं वातावरण अतिशय सनातनी असल्याने हा प्रकार घरात अगदी आईजवळही सांगण्याचा धीर तिला झाला नव्हता. आमच्याजवळ ती फक्त मोकळी झाली. तो मुलगा मात्र असाच राजरोस जगत-वागत राहिला असणार. मुली वयात आल्या की तिचे आई-वडील काय अगदी सगळा समाजच खूप ‘जजमेंटल’ होत असतो. तिला तिच्या शरीराबाबत कधी सहज होऊ  दिलं जात नाही. मला ती स्पेस आहे. माझे आई-वडील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वभावाने खूप मोकळे आहेत. ते स्वत:हून माझ्याशी समाजात घडणाऱ्या घटना, वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या याबाबत बोलतात. अगदी मासिक पाळी, लैंगिकता, गर्भनिरोधकं यांच्याबाबतही सांगतात. विचारलेल्या कुठल्याही प्रश्नावर ‘गप्प बस’ असं न म्हणता शास्त्रशुद्ध माहिती देतात. बऱ्याच मुलींना अशा विषयांवर व्यक्त व्हायला कुठली जागाच नसते. त्याही याबाबत बोलायला घाबरतात, कारण अशा वेळी त्यांनाच दोषी ठरवलं जातं. मी औरंगाबादहून पुण्यात नुकतीच शिकायला आले. इथलं वातावरण तुलनेनं खुलं आहे. पुण्यात एकटं फिरताना मला अधिक सुरक्षित वाटतं. ग्रामीण-निमशहरी भागांत लोकांची घराबाहेर पडलेल्या स्त्रीकडे बघण्याची मानसिकता अजूनही बदललेली नाही, असा माझा अनुभव आहे.’’

मात्र याच्याउलट निरीक्षण बीसीएच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी अलका (नाव बदलले आहे) नोंदवते, ‘‘मी जालना जिल्ह्य़ातल्या एका लहानशा खेडय़ातून औरंगाबादला शिकायला आले. आमच्या गावात जुन्या पिढीतली माणसं सतत नव्या पिढीवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे मुलांना आपसूकच एक धाक असतो. सगळं काही आलबेल असतं असं नाही, पण बरेच प्रकार रोखले जातात. इथं शहरात मात्र व्यक्तिवादी जीवनशैलीमुळे कुणीच फारसं कुणाच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. त्यामुळे स्त्रीसाठीचे धोके अजूनच वाढतात. सोशल मीडियावर झालेल्या ‘मी टू’ कॅम्पेनबद्दल मीही वाचलं, पण मला आलेल्या काही नकोशा अनुभवांबाबत लिहिण्याचं धैर्य मात्र मला झालं नाही. कारण तिथं मला वाचणारा मित्र आणि नातेवाईक यांचा गोतावळा कशा प्रतिक्रिया देईल याची खात्री नव्हती, पण अनेकींचे अनुभव वाचून मला ते माझेच असल्याची भावना दाटून आली.’’

पुरुषांनी केलेली छेडछाड, त्यांचा पाठलाग, अशा अनेक त्रासांचे माणसाच्या मना-मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं मानसशास्त्र सांगतं. वॉशिंग्टन अ‍ॅण्ड ली विद्यापीठात २०१३ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार कुठल्याही प्रकारच्या छेडछाडीला सामोरं जावं लागलेल्या मुली-स्त्रियांबाबत नंतरच्या काळात भावनिक अस्थिरता आणि नैराश्याला बळी पडण्याची शक्यता इतर स्त्रियांहून दोन ते तीन पटीने वाढते. शिवाय आत्मविश्वास गमावणे, एकटेपण, एकाग्रता हरवणे, चिडचिड, स्मरणशक्तीवर परिणाम, आत्महत्येचे विचार मनात येणे अशी अनेक लक्षणं या व्यक्तींमध्ये दिसू लागतात. टोकाच्या लैंगिक छळालाच नाही तर साध्या छेडछाडीलाही गांभीर्याने घेण्याची, त्या संदर्भातले कायदे अधिक कडक करण्याची गरज हे संशोधन व्यक्त करतं.

मला आठवलं, कोपर्डीला शाळकरी मुलीवरच्या बलात्काराची घटना घडल्यावर मी आठवडाभराने तिकडे गेले होते. वातावरण अजूनही तंग होतं. एका जागी खूप साऱ्या बायका अस्वस्थपणे उभ्या होत्या. त्यांच्याशी बोलल्यावर त्यातली एक आजीबाई उद्वेगानं म्हणाली होती, ‘‘अशे तर लई तरास व्हतेत बायांना रोज. पण त्या घाबरून बोलत न्हाईत. इथं त्या पोरीचा खून झाला म्हणून इतका गलबला तरी झाला. न्हाई तर हेपण सगळं असंच दबून गेलं असतं.’’

सीमा अंजुम, कमर सुल्ताना, अनम फातिमा, खान सना आणि रायना शेख सध्या पदवीच्या वर्गात शिकतात. सना म्हणते, ‘‘बडे शहरोंमें भीड तो बहोत रहेती. पर कोई छेडछाड या बवाल होनेपर भीड बस देखते रह जाती. कोणी पुढे येऊन बायकांची मदत करेल याचा काही भरोसा नाही. ‘मी टू’वर समजा मोकळेपणाने मी माझ्यावरच्या अत्याचाराविषयी लिहिलं तर माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहिलं जाईल याचीच भीती वाटते.’’ कमर म्हणते, ‘‘एक लडकीके लिये उसकी मां सबसे अच्छी दोस्त होती है. माझ्याबाबतीत काही बरं वाईट झालं तर मी नक्कीच माझ्या आईला सांगू शकेन एवढा विश्वास माझ्यात नक्कीच आहे, पण माझ्या एका मैत्रिणीला एक मुलगा फारच त्रास देतोय, पण भीतीपोटी घरी काही सांगूच शकत नाहीए. नाही तर तिचं बाहेर पडणंच थांबवलं जाईल.’’ रायना म्हणते, ‘‘मै जिस रास्तेसे कॉलेज जाती हूं वहां हमेशाही लडके बैठे रहते है, पण म्हणून मी खाली मान घालून कशाला चालू? आम्ही मुली अशाच घाबरत राहिलो तर आम्हाला सतत घाबरवलं जाईल. एक हदके बाद चुप रहना भी गुनाह हो जाता है. हमारे मजहबमें औरतोंको बुरखा लेनेको कहा है तो मर्दोकोभी नजरका पर्दा बताया गया है. पर बहोत कम मर्दोकी नजर साफ होती है.’’ अनम म्हणाली, ‘‘मुलींसोबत काही नकोसं घडल्यावरच पालक बोलतात किंवा काही कृती करतात; पण हे सगळं होऊच नये म्हणून मोकळा संवाद ठेवणारे पालक कमीच.’’ सीमाच्या मते पालक काही घडल्यावर आपल्याच मुलींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. तिचं शिक्षण बंद करणं, लग्न लावून देणं असे अतिरेकी उपाय करतात. या समाजात मुलांना जरा जास्तीच सूट मिळते. ‘कुठे चाललास- कधी येणार’ अशा प्रश्नांचा सामना त्यांना करावा लागत नाही. त्यांचे मित्र कसे आहेत हे पालक सजगपणे तपासत नाहीत. ओलीव्हिया कुंजुमन मूळची केरळची. सध्या पुण्यात शिकते. केरळची महाराष्ट्राशी तुलना करताना ती म्हणते, ‘‘केरळ सर्वाधिक साक्षर राज्य आहे, पण स्त्रिया तिथं इथल्यापेक्षा कमीच मुक्तपणे वावरतात. केरळमध्ये संध्याकाळनंतर मुली बाहेरच पडत नाहीत. पुण्याचं वातावरण मला जास्त चांगलं वाटलं. आपल्याकडे मुलींचं रात्री बाहेर फिरणंसुद्धा आक्षेपार्ह मानलं जातं. उशिरा बाहेर फिरणारी मुलगी ‘तसलीच’ असा विचार बाहेरचेच काय नातेवाईकही करतात. एकटं फिरणारी, एकटी हॉटेलात राहणारी मुलगी अजूनही समाजाला पसंत नाही. माझ्या घरातलं वातावरण खुलं आहे. त्यामुळे माझ्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी मी आई-वडिलांना सांगते.’’

सारंग पुणेकर ही माझी मैत्रीण बहुलिंगी समाजाचं प्रतिनिधित्व करते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रात ती सध्या शिकतेय. सारंग आपले अनुभव अगदी थेटपणे मांडते, ‘‘मला विद्यापीठाच्या आत सुरक्षित वाटतं. मात्र शहरात फिरताना, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना लोक टक लावून पाहतात. त्यांच्या नजरेत वखवख दिसते. याचा कळत-नकळत मनस्थितीवर परिणाम होतो. मला रिक्षा, बस नकोच वाटते. तेवढय़ासाठी मी पैसे वाचवून स्वत:ची बाइक घेतली. सोशल मीडियावर ‘मी टू’मध्ये अनेक स्त्रिया-मुलींनी आपापले कटू अनुभव मांडले; पण त्यावर अनेक विचित्र कमेंटही आल्या की, ‘या मुली उगाच प्रसिद्धी मिळवायला हे काही तरी तिखट-मीठ लावून लिहितात, यांचीच काही तरी चूक असेल..’ असं बोललं गेलं.’’ स्त्रीच्या उद्वेगालाही नीटपणे स्वीकारू न शकणाऱ्या समाजात आपण राहतो हे आजचं वास्तव आहे.

आता काही दिवसांपूर्वी मी हरयाणातल्या सोनीपत जिल्ह्य़ात गेले होते. तिथल्या एका लहान गावात ‘प्रिया’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं गावातल्या सार्वजनिक ठिकाणांचं सेफ्टी ऑडिट तिथल्याच तरुणींना करायला लावलं. हे करतानाचे अनुभव सांगताना मुली म्हणाल्या, ‘‘आमच्याच गावातल्या अनेक जागा आजवर अगदी अनोळखी होत्या. तिथं जाऊन तास-दोन तास घालवणं आणि आलेले अनुभव मनाशी नोंदवत या जागांना सुरक्षिततेबाबत गुण देणं आम्ही केलं. वाटलं, आपण गावात राहतो म्हणजे केवळ एका विशिष्ट भागातच राहतो. आपल्याला मुलगी म्हणून किती मजेमजेच्या जागी जाण्यापासून वंचित राहायला लागतं. हे कधी बदलणार?’’

गोष्ट एका गावाची असेल किंवा अख्ख्या जगाची. काळ-वेळ आणि प्रदेश यांची बंधनं झुगारत, सगळ्या धारणा-पूर्वग्रह बाजूला सारत स्त्री मुक्तपणे वावरू शकेल असा काळ कधी येईल? तो लवकर यावा यासाठीच आपण ‘मी टू’सारख्या धाडसी मनोगतांचा तितक्याच धाडसीपणे स्वीकार करत राहायला हवा.

– शर्मिष्ठा भोसले

sharmishtha.2011@gmail.com