20 September 2020

News Flash

जुनं ते सोनं.. नवं ते परीस..

पाच दिवसांनंतर नवीन वर्ष सुरू होईल

एक वर्ष संपतंय, पण पुढचं वर्ष आहेच आपल्या तैनातीला. कसं हवं तुम्हाला हे वर्ष, ठरवा तुम्हीच. ‘चतुरंग’ सज्ज आहेच. तुम्हीही व्हा. आजच्या अंकातला ‘फेसबुक’च्या सीओओ शेरील सँडबर्ग यांचा यंदाचा शेवटचा लेख संगणक साक्षरतेचा. तोच मंत्र आपणही आचरणात आणू आणि या नव्या तंत्रज्ञानाशी दोस्ती करत, वाढवत उंच भरारी घेऊ. नवीन वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा..

काऊंट डाऊन स्टार्ट्स.. पाच दिवसांनंतर नवीन वर्ष सुरू होईल.. २०१६. यावर्षीचे ३६५ दिवस संपणार आणि पुन्हा नवे ३६५ दिवस आपल्या तैनातीला हजर! प्रत्येकाच्या वाटय़ाला २४ तास, प्रत्येकाचा तास ६० मिनिटांचाच. निसर्गाने याबाबतीतही दुजाभाव ठेवलेला नाही. प्रत्येकाला एकच न्याय. खेळा, हसा, मस्त मजेत जगा नाही तर रडा, निराश व्हा, केविलवाणं जगा.. तुमच्या हातात! ‘चतुरंग’चा २०१५ मधला ५२ आठवडय़ांचा ‘खेळ’ मस्त रंगला. नवीन काही तरी देत, वैचारिक प्रगल्भतेचे, सहसंवेदनेचे, समाधानाचे, आनंदाचे क्षण पेरत, असं आता म्हणायला काहीच हरकत नाही. दरवर्षी नवीन आव्हान.. नवी खेळी. पण आमच्या सगळ्याच लेखकांनी आणि सदर लेखिकांनी ते आव्हान लिलया पेललं. त्यातूनच पुढच्या वर्षीची खेळी खेळायला आता सज्ज झालो आहोत.. नवीन सदरे आणि नव्या-जुन्या लेखिकांसह!
‘आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे.’ हे जरी खरं असलं, तीच माणसं, त्यांच्या त्याच त्या कमी-अधिक, चांगल्या-वाईट आयुष्याच्या कहाण्या असल्या तरी आयुष्य हे केव्हाही आपल्याला हव्या त्या रंगानं भरता येईल असा पांढराशुभ्र कॅनव्हास आहे, हेच खरं. उद्याचा दिवस नक्की उगवणारच आहे याची खात्री नसतानाही आपण अलार्म लावून झोपतोच. तो विश्वासच आपल्याला नवं आयुष्य देऊन जातो. तोच अनुभव दिला ‘मी मुक्त-विमुक्त’ या सदराने. हे सदर सुरू करताना ‘आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली’, असं म्हणत रस्त्यावरचं जगणं लाभलेल्या आपल्याच जातबांधवांचं आयुष्य मांडायचं आहे, हे पक्कं माहीत होतं. त्यांच्या आयुष्यात काही टक्क्य़ांनी तरी नक्की फरक पडेल ही खात्री होतीच आणि वर्ष संपताना ज्या ज्या जातीजमातींवर लेख प्रसिद्ध झाले त्यांचं आयुष्य काही अंशानं तरी बदललं याचा आनंद आहे. काहींना आपलीच नव्याने ओळख झाली तर काहींना या देशाचे नागरिक म्हणून! ही माणसं गेली ६८ वर्षे दिशाहीन आयुष्य जगत आलीत, त्यातल्या काहींच्या तरी आयुष्याला दिशा मिळाली. विश्वास सार्थ ठरला. सहसंवेदनेसह जगणं, ‘बीईंग ह्य़ुमन’चा अर्थ असं एखादं सदर सहज सांगून जातं.
आयुष्याचा अर्थ प्रत्येकाचा प्रत्येकानं शोधायचा असतो. तुमच्या जगण्याचा उद्देश, आयुष्यात नवीन नवीन शक्यता (पॉसिबिलीटीज्) निर्माण करणं तुमच्या हातात असतं. आपल्याबरोबर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरू शकतो, याची खात्री हवी आणि तशी कमिटमेंटही असायला हवी. मार्क्स झकरबर्गनं मुलगी झाल्यानंतर आपल्या संपत्तीतील ९९ टक्के रकमेचा विनियोग समाजकार्यासाठी करण्याचं जाहीर केलं आणि जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव झाला. पण आपल्या अगदी आजूबाजूला असे अनेक जण आहेत हे ‘सत्पात्री दान’ या सदरातून लक्षात आलं. वर्षभरात २४ जणांच्या दानाविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचली. आपल्याकडे जे आहे त्यातलाच खारीचा किंवा अगदी भरभरून वाटा हे लोक ओळखपाळख नसलेल्या लोकांसाठी देत आहेत. आपल्या पगारातला पै न् पै समाजसेवेसाठी देणारे आणि स्वत:च्या चरितार्थासाठी पार्ट टाइम नोकरी करणारे पालम कल्याणसुंदरम् असोत की डोळ्यांच्या ६५ हजार शस्त्रक्रिया करून अनेकांना दृष्टिदान करणाऱ्या रागिणी पारेख असोत. टिकूजीनी वाडीमध्ये ५० आदिवासी मुलांना स्वत:च्या पैशाने घेऊन जाणाऱ्या सुनीता देवधरांचा आनंद तर मी स्वत: अनुभवला. आपल्याजवळचे पैसे वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भरभरून जगणंही देऊ शकतात, हे त्या दिवशी जाणवलं. आणि हात देता झाला..
सकारात्मकता हा आनंदी आयुष्याचा कणाच आहे. चांगलंच घडणार आहे, हा विश्वासच तुम्हाला अडीअडचणीतून मार्ग काढणं सुचवतो. अडचणी, नैराश्य, दु:खं, पराभव, भय हे जगण्याचेच घटक असतात. पण जो त्याच वाटेवर थांबतो तो संपतो, पण ज्याला त्या अपयशाचा अर्थ गवसतो तो जिंकतो. अपयशाचा अर्थ शोधून आयुष्याला नवं वळण देणाऱ्या नामवंतांनी या वर्षी सांगितलेल्या ‘वळणवाटा’ अनेकांसाठी मार्गदर्शक ठरल्या. भालचंद्र पेंढारकर, विक्रम गोखले, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. कुमार सप्तर्षी, मेधा पाटकर, डॉ. अरुण काकोडकर, माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर, अरविंद इनामदार, चित्रा पालेकर, डॉ. प्रभा अत्रे, डॉ. गणेश चंदनशिवे अशा अनेकांनी आपल्या आयुष्यातल्या वळणांच्या पायवाटा करून अनेकांसमोर आदर्श निर्माण केलेत. जगणं सुंदर करून टाकलं. स्वत:चं आणि वाचकांचंही!
भूतकाळ विसरून वर्तमानात जगणं. आयुष्यातल्या कटू आठवणींना खोल खोल गाडून त्याची छायाही वर्तमानावर पडू न देणं हा जगण्याचा मंत्र शिकवला आमच्या यंदाच्या ‘नवदुर्गा’नी! आमच्यासाठी ते ‘आदित्य हे तिमिरातले’ ठरले. मनोरुग्णासाठी काम करणारी मोनिका साळवी, वेश्याव्यवसायातून बाहेर पडून आता त्यात अडकलेल्यांसाठी काम करणाऱ्या संगीता शेलार आणि पूजा गायकवाड, भोपाळ वायू पीडितांसाठी काम करणाऱ्या रशिदाबी, एड्सग्रस्त नवऱ्यांमुळे रोगग्रस्त झाल्यानंतरही अशा मुलांसाठी काम करणाऱ्या रेणुका दहातोंडे, याशिवाय बबिता पठाणेकर, रेखा दावणे, भारतबाई देवकर या सगळ्यांनीच आपल्या तेजाने आजूबाजूचा आसमंत प्रकाशमान केला आणि ‘आयुष्य असंही असतं राजा’चा प्रत्यय आणून दिला.
वाईट भूतकाळ विसरला जावा हे अगदी बरोबरच, परंतु तो विसरू म्हटलं म्हणून विसरता येत नाही अनेकदा. कधी घडलं असं तर त्या सगळ्या आठवणी एकदा शांतपणे बसून आठवायच्या. त्या सगळ्या तुमच्याच तर आठवणी आहेत. त्यांच्याशी दोस्ती करायची. स्वीकारायचं, काय, का आणि कुणाचं चुकलं. दुसऱ्याचं चुकलं असेल तर त्याला माफ करायचं. स्वत:चं चुकलं असेल तर स्वत:ला माफ करायचं. आणि मग मोठय़ा मनानं त्यांना अलविदा म्हणायचं. मग निमूटपणे निघून जातात त्या आठवणी. आणि आठवल्याच अधूनमधून तरी त्रास देत नाहीत. भूतकाळ हा चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि झालेल्या चुका पुन्हा न होण्यासाठी आठवायचा फक्त. स्वत:ला किंवा दुसऱ्याला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यापेक्षा त्याचे उपकार मानायचे, नवा अनुभव, नवी शिकवण दिल्याबद्दल..
गेल्या वर्षीच्या ‘चतुरंग’मधून अशा खूपजणी भेटल्या. ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधल्या कष्टकरी. प्रतिकूल परिस्थितीत रडत न बसता त्याला तोंड देणाऱ्या. तर ‘अजूनी चालतेची वाट’ मधून स्त्रीच्या प्रगतिपथावरल्या अनेक नामवंत, अनाम कार्यकर्त्यां भेटल्या, ज्यांनी झोकून दिलं आयुष्य समाजासाठी. त्यांच्याकडून धडा घ्यायचा तो ‘जबाबदारी’चा. समाजाप्रति माझं काही तरी कर्तव्य आहे आणि माझा मला खारीचा वाटा उचलायलाच हवा ही ती जाणीव. आणि हीच जाणीव देणारे अनेक लेखही या वर्षी प्रसिद्ध झाले. ‘दिवाळी हे निमित्त, आपापला परीघ वाढवण्याचं’, ‘बालकप्रधान समाजाची गरज’, ‘एकल मातेचा अधिकार’, ‘मा फलेषु कदाचन’, ‘ एक चळवळ सॅनिटरी नॅपकीन साठीची’, ‘राहिले रे दूर घर माझे’, ‘जंगल वसवणारा माणूस’ असे अनेक लेख वाचकांकडून उल्लेखले गेले आणि म्हणून समाधान देऊन गेले. त्यातल्या ‘विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र’, ‘गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा’, ‘कॉर्डब्लड चकवा’ आदी लेखांवर प्रतिक्रिया तर आल्याच पण चर्चा, वादही रंगले. तशीच सगळी सदरं माहितीपूर्ण ठरलीच.
असंच समाधान नुकत्याच एका लेखाच्या बाबतीत मिळालं. ‘असू एकटय़ा, पण एकाकी नव्हे’ या एकटय़ा राहाणाऱ्या स्त्रियांच्या ‘एकी’ ग्रुपमधल्या मैत्रिणींच्या अनुभवांवरचा लेख. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना ७०० फोन आणि १०० मेसेजेस मिळाले. त्यातले बहुसंख्य आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय असं सांगणारे. काही जणी खरोखरच एकटय़ा राहाणाऱ्या, एकाकी पडलेल्या होत्या तर काही जणी संसारात असूनही एकटय़ा पडलेल्या आहेत, याचं दुखं आहे पण माणुसकी अजूनही जिवंत आहे हे सांगणारे फोनही त्यांना आले. त्यात काही डॉक्टर्सही होत्या. ‘कधीही आमची गरज लागली तर फोन करा’ हे सांगणाऱ्या तर पोलीस इन्स्पेक्टरचाही फोन ‘आम्हाला केव्हाही फोन करा’ हे सांगणारा. तर एका वकील बाईंचा कायदेशीर मदत देऊ करणारा. एक फोन तर जास्त चकित करणारा होता. रत्नागिरीत राहाणाऱ्या एका बाईने फोन केला होता. सधन नव्हती ती तरीही तिने ‘एकी’च्या सगळ्या मैत्रिणींना घरी बोलावलंय. तुम्हाला रत्नागिरी दाखवीन, असं आश्वासन दिलंय.
खरंच समाज टिकतो वा टिकलाय तो अशा सुंदर मनाच्या माणसांकडून, हे माझे आवडतं निरीक्षण अशा उदाहरणाने अधिकाधिक घट्ट होत चाललंय. आनंद भरभरून राहिला आहे, तो वाटल्यानं अधिक वाढतो. एखाद्याला हसताना पाहिलं तरी आपल्याही चेहऱ्यांवर आपसूक हसू उमटावं तसं.
शेवटी, आजचा या वर्षीचा शेवटचा मुख्य लेख शेरील सँडबर्गचा. माझी अत्यंत आवडती, आदर्श व्यक्ती. तिचं कर्तृत्व वादातीत आहेच. आज ‘फेसबुक’च्या सीओओ असणाऱ्या शेरिल तत्पूर्वी ‘गुगल’मध्येही उच्च पदावरच होत्या. आज त्यांची संपत्ती १ अब्ज अमेरिकी डॉलर्स (६६५ कोटी रुपये) इतकी आहे. जे त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवलंय. त्यांनी आजच्या लेखात ‘इंटरनेट’बद्दल लिहिताना जास्तीत जास्त स्त्रियांच्या हातात ही शक्ती जावी, असं म्हटलं आहे. जगभरातल्या स्त्रियांनी इंटरनेट, अ‍ॅपचा वापर करून स्वत:ला आणि पर्यायाने देशाला कसं प्रगतिपथावर नेलंय ते सांगितलंय. आज स्त्री केवळ ती स्त्री आहे म्हणून संगणक, इंटरनेटपासून लांब आहे, इंटरनेट वापरातील ही लिंगभेदाची दुरी दूर झाली तर तिचा स्वत:चा आणि जगाचाही विकास दूर नाही, हा त्यांचा निष्कर्षच पुढील वर्षांचा आशावाद आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जगात खरी समानता तेव्हा येईल जेव्हा जगातल्या स्त्रिया अर्धा देश आणि कंपन्या चालवतील आणि पुरुष अर्ध घर चालवतील. त्यांचा हा आशावाद पूर्ण करण्यासाठी आपणही हातभार निश्चितच लावू शकतो. तेव्हा नवीन वर्षांत संगणक साक्षरतेचा मंत्र आणि शुभेच्छाही, ‘संगणक शिका आणि शिकवा.’

हे करुन पाहू या..
० प्रत्येकाच्या वाटय़ाला २४ तास, प्रत्येकाचा तास ६० मिनिटांचाच. निसर्गाचा एकच न्याय. खेळा, हसा, मस्त मजेत जगा नाही तर रडा, निराश व्हा, केविलवाणं जगा.. तुमच्या हातात!
० आयुष्य हे केव्हाही आपल्याला हव्या त्या रंगानं भरता येईल असा पांढराशुभ्र कॅनव्हास असतो. भूतकाळातल्या कटू आठवणींना खोल गाडून त्याची छाया वर्तमानातल्या कॅनव्हासवर पडू दिली नाही तरच त्यावर रोज नवे, ताजे, हवेहवेसे रंग भरता येतील.
० आयुष्याचा अर्थ प्रत्येकाचा प्रत्येकानं शोधायचा असतो. जगण्याचा उद्देश, आयुष्यात नवीन नवीन शक्यता निर्माण करणं तुमच्या हातात असतं. आपल्याबरोबर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरू शकतो याची खात्री हवी आणि तशी कमिटमेंटही!
० सकारात्मकता हा आनंदी आयुष्याचा कणाच आहे. चांगलंच घडणार आहे, हा विश्वासच अडीअडचणीतून मार्ग काढणं सुचवतो. अडचणी, नैराश्य, दु:खं, पराभव, भय हे जगण्याचाच एक भाग असतो. जो त्याच वाटेवर थांबतो तो संपतो, पण ज्याला त्या अपयशाचा अर्थ गवसतो तो जिंकतो.

arati.kadam@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:48 am

Web Title: loksatta chaturang journey in this year and upcoming articles in new year
Next Stories
1 होय, मी बंडखोरी केली
2 पुदिना
3 खेडी स्मार्ट कधी होणार?
Just Now!
X