05 March 2021

News Flash

आजची तीच तू.. तीच तू..

एकाहून एक सरस गाण्यांच्या या मैफलीने पुरस्कार सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली.

रसिका मुळ्ये rasika.mulye@expressindia.com

‘लोकसत्ता दुर्गा सन्मान’ सोहळा नुकताच भरगच्च कार्यक्रमात साजरा झाला. ‘मी टू’च्या गलबल्यात स्वत:वरच्या धडाडीने, कर्तृत्वाने पुढे जाणाऱ्या आजच्या स्त्रीचं आशावादी रूप दाखवणाऱ्या ‘तीच तू’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित होता. या वेळी निवड करण्यात आलेल्या नऊ दुर्गाचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाचा विशेष ठरला तो ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आलेला ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार.’

स्त्रीतील शक्तीची, ऊर्जेची, सर्जनाची प्रत्येकाला जाणीव करून देणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार सोहळा’ सोमवारी रंगला. सुखासीन आयुष्यात गुरफटून गेलेला समाज जिथे पोहोचूही शकत नाही अशा ठिकाणी कामाचा आदर्श उभा करणारी ती, आपले नोकरीतील कर्तव्य बजावताना अनेकींना मार्ग दाखवणारी ती, आपल्या संघर्षांतून मिळालेली शिकवण इतरांना देणारी ती, वाढते वयही आड न येता गरजूंसाठी झटणारी ती.. अशा भवतारिणी नवदुर्गेची रूपे यंदाच्या पुरस्कार विजेत्या स्त्रियांच्या रूपाने समोर उभी राहिली. समाजातील उपेक्षितांसाठी झटणाऱ्या तिच्या हातातील बळ उपस्थितांना ऊर्जा देऊन गेले. या ऊर्जेबरोबरच शांततेची, मांगल्याची अनुभूती मिळाली ती ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या उपस्थितीने.

‘लोकसत्ता’कडून नवदुर्गाचा हा शोध गेली पाच वर्षे घेतला जात आहे. दर वर्षी या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. वाचकांकडूनच सुचवल्या जाणाऱ्या या नवदुर्गाची निवड करताना कस लागत आहे. या उपक्रमामागील भूमिका, निवड प्रक्रिया, येणारे अनुभव ‘चतुरंग’च्या संपादिका आरती कदम यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘या पुरस्काराला दर वर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही चारशे प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील नऊ जणींची निवड करणे हे कसोटीचे काम होते. दर वर्षी या नवदुर्गाचा शोध घेत असताना गमतीदार अनुभवही येतात. काही दुर्गासाठी वाचक खूप आग्रही असतात. मात्र, अर्ज करणाऱ्या स्त्रियांचे सामाजिक काम, वयोगट, त्यांच्या कामाचा आवाका, परिणाम अशा अनेक निकषांचा विचार करून पुरस्कारासाठीची नावे निवडण्यात येतात. आलेल्या अर्जामध्ये प्रत्येकीच्या कामाचा आवाका कमी-जास्त असला तरीही प्रत्येकीचे काम महत्त्वाचे आहे. छोटी पणतीसुद्धा अंधार उजळण्याचे काम करते तसे या सगळ्याच जणी आपल्या छोटय़ामोठय़ा कामांनी समाजातील अंधार उजळण्याचे काम करत असतात म्हणून प्रत्येकीचे काम मोलाचे असतेच. म्हणून पुरस्कार मिळाला नसला तरी आमच्यासाठी त्या दुर्गाच आहेत. ’’

‘तीच तू’ या संकल्पनेवर यंदाचा ‘दुर्गा पुरस्कार’ सोहळा रंगला. सोहळ्यातील सादरीकरणातून स्त्रीची अनेकविध रूपे, तिच्या भावना उलगडत गेल्या. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे नव्वदीमध्ये पदार्पण आणि आशा भोसले यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांच्या हिंदी-मराठी गाण्यांचा नजराणा सादर केला सोनाली कर्णिक, श्रुती भावे, गिरिजा मराठे, कविता राम, अद्वैता लोणकर, मिताली विंचुरकर यांनी. एकाहून एक सरस गाण्यांच्या या मैफलीने पुरस्कार सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली. ‘एक प्यार का नगमा है..’ ते ‘शारद सुंदर..’ अशा गाण्यांना उपस्थितांची दाद मिळाली. प्रेक्षकांच्या फर्माईशी पूर्ण करत कार्यक्रम रंगत गेला.

या उत्साहाला अभिमानाची किनार मिळाली ते पुरस्कार विजेत्यांचे कार्य पाहून. पॅराप्लेजिक रुग्णांसाठी काम करणाऱ्या डॉ. सुलभा वर्दे यांची वयाच्या ८५ व्या वर्षांत असलेली उमेद. परिस्थितीशी संघर्ष करून त्यातून उभ्या राहिलेल्या आणि इतर अनेक आदिवासी महिलांना दिशा दाखवणाऱ्या कुमारीबाई जमकातन आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानसाठी लढणाऱ्या रुबिना पटेल यांचे कार्य ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून उभे राहिले. समाजसेविका प्रीती पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे, ‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आले. ‘लोकसत्ता’चे तरुणकुमार तिवारी यांनी उपस्थित मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे स्वागत केले.

स्त्रीच्या संघर्षांचे, तिच्या भावनांचे पदर उलगडले ते अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि पूर्वी भावे यांनी केलेल्या काव्यवाचनातून. ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, मल्लिका अमरशेख, शांता शेळके, नीरजा यांच्या कवितांनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला.

कवितांचे गारूड असतानाच अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातील आशेचा किरण दाखवला तो मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम करणाऱ्या डॉ. सुचेता धामणे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. स्वर्णलता भिशीकर, आपल्या आधीच्या दोन पिढय़ांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या शीतल आमटे-करजगी यांच्या कार्याने. ‘ममत्वाचं रूप, बुद्धीचं तेज, कर्तृत्वाची शक्ती .. तीच तू’ याचा प्रत्यय पुरस्कार विजेत्यांनी दिला. ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, एनकेजीएसबी को-ऑप. बँक लिमिटेडचे चिंतामणी नाडकर्णी यांच्या हस्ते या तीन दुर्गाना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकसत्ता’चे केदार वाळिंबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘तीच तू..’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ची आठवण न होती तरच नवल.

८ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या त्यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्ताने त्यांना आदरांजली म्हणून ‘ती फुलराणी’मधील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा..’ हे स्वगत सादर केले अभिनेत्री हेमांगी कवी हिने. या सदरीकरणाने या सोहळ्याचा नूर पालटून गेला.

‘फुलराणी’ची मोहिनी असतानाच स्त्रियांसाठी रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उद्योजिका मानीषा धात्रक, नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या परिणीता दांडेकर यांच्या कामाची ओळख उपस्थितांना करून देण्यात आली. त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, व्ही. एन. मुसळूणकर ज्वेलर्सच्या भक्ती मुसळूणकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ‘लोकसत्ता’च्या प्रकाशक वैदेही ठकार यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले ते पंडिता अनुराधा पाल यांचे तबलावादन. रोजच्या जगण्यातील नाद, तालाची जाणीव पाल यांनी करून दिली. रेल्वेचा आवाज, शंखध्वनी, देवळातील घंटा, आई आणि मुलातील संवाद तबल्यांच्या बोलांतून उमटले आणि रसिकांची वाहवा मिळवून गेले. स्त्रीतील शक्तीची जाणीव करून देणारी महिषासुरमर्दिनीची पारंपरिक कथा तबल्याच्या माध्यमातून श्रोत्यांपुढे सादर केली. मियाँ कादीर खाँ यांच्या रचनेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर या सोहळ्यातील सर्वाधिक उत्सुकतेचा भाग होता तो म्हणजे जीवनगौरव पुरस्कार. डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करतानाच डॉ. अत्रे यांच्याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘अनेक क्षेत्रांत स्त्रिया मोठे काम करत आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या पुरस्कारातून व्यक्त करण्याचा आमचा मानस आहे. आमची पिढी ही डॉ. प्रभा अत्रे यांच्याबद्दल कायमच कृतज्ञ राहील. प्रभाताईंच्या गायनाने आणि बंदिशींनी आमची पिढी घडवली,’ असे कुबेर म्हणाले. ‘केसरी’च्या सुनीताताई पाटील आणि संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते

डॉ. अत्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. अत्रे यांच्या गाण्याइतकीच त्यांच्या कलाभ्यासावरील मांडणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. विज्ञान, तंत्रज्ञानाइतकेच किंबहुना काकणभर सरस असलेले कलेचे महत्त्व डॉ. अत्रे यांनी विशद केले.

कार्यक्रमाची रंगत वाढवली तुषार दळवी यांच्या सहज, ओघवत्या सूत्रसंचालनाने. कार्यक्रमाच्या संहितेचे लेखन केले होते चिन्मय पाटणकर यांनी. पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची ओळख या वेळी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून करून देण्यात आली, ती ओळख आपल्या आवाजातून पोहोचवली मकरंद पाटील यांनी. या माहितीपटाचे लेखन केले होते आरती कदम आणि रेश्मा भुजबळ यांनी.

उपस्थित प्रत्येकाला ऊर्जेचे दान देणाऱ्या, प्रत्येकाची ओंजळ समाधानाने आनंदाने भरणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची भारावलेल्या वातावरणात सांगता झाली. नकळतपणे प्रत्येकाच्या मनात विचार रुंजी घालत होता.. ‘इतिहासाच्या पानातली, वर्तमानाच्या वेगातली, भविष्याच्या कंपनातली .. तीच तू .. तीच तू..’

‘लोकसत्ता’ने आमचा सन्मान केला त्याबद्दल आभारी आहे. स्त्री-मनोरुग्णांविषयीच्या आमच्या कार्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनंदन आणि कौतुकांचा वर्षांव झाला. सध्या मनगाव या उपक्रमात मी व्यग्र आहे. त्यामुळे माझ्या कार्याची ‘लोकसत्ता’कडून दखल घेतली गेल्यानंतर माझ्या नव्या उपक्रमांना लोकांकडून पािठबा आणि सहकार्य मिळेल, ही भावना या क्षणी मनात आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या आजवरच्या समाजकार्यात मला मदत केली आहे. त्यांचीही मी आभारी आहे.

– डॉ. सुचेता धामणे

‘लोकसत्ता’ने केलेल्या सन्मानामुळे आनंद झाला आहे. आजवर मिळालेल्या पुरस्कारांमध्ये महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. मोठय़ा सामाजिक स्तरावर कामाचे कौतुक झाले, याचाही आनंद आहे. आमच्या समाजकार्याबरोबरच कार्यक्रमात सादर केलेल्या कलात्मक कार्यक्रमातील कलाकारांचेही आभार मानावेसे वाटतात, आणि त्यांचे कौतुकही वाटते. कारण त्यांना कलेचा वारसा लाभला आहे. ‘लोकसत्ता’मध्ये माझ्या कार्याविषयीची माहिती प्रसिद्ध झाल्यावर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी आवर्जून संवाद साधून आमच्या कामाविषयी माहिती घेतली. शुभेच्छा दिल्या.

– कुमारीबाई जमकातन

विविध क्षेत्रांतील दुर्गाचा ‘लोकसत्ता’ने सन्मान केला. आपण आपल्या कामामध्ये मग्न असतो. आणि ‘लोकसत्ता’सारख्या समाजजाणिवेने जागरूक वृत्तपत्रातून आपली दखल घेण्यात आली, त्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. माझ्या कार्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर कृषी उद्योजकतेत इतक्या मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक स्तरावर काम करता येते, याविषयी लोकांनी आश्चर्य व्यक्त करत आम्हालाही माहिती द्या, असे सांगितले. स्त्रियांना योग्य संधी मिळाल्यास त्या इतर महिलांना सक्षम करण्यासाठी पाऊल उचलतात हे दुर्गा सन्मानाच्या निमित्ताने अधोरेखित झाले.

 – मनीषा धात्रक

इतर  दुर्गाचे काम माझ्यापेक्षा मोठे आहे. त्यांच्या तुलनेत मी लहान आहे. त्यांचे काम बघून माझे काम छोटे वाटू लागले आहे. पण ‘लोकसत्ता’च्या एवढय़ा निकषांमधून माझी निवड होणे, याचा आनंद आहे. ‘लोकसत्ता’मध्ये मला पुरस्कार मिळाल्याचे प्रसिद्ध झाल्यापासून मला लोकांचे दूरध्वनी येणे सुरू झाले आहे. लोकांकडून खूप कौतुक झाले. त्यामुळे काम करण्याचा हुरूप वाढला आहे. स्मार्ट व्हिलेजप्रमाणेच इतर बरेच उपक्रम आनंदवनात बघायला मिळतील. तसेच अपंगांसाठीच्या कार्याला लवकरच गती मिळेल. त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

– शीतल आमटे करजगी

‘लोकसत्ता’चा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामुळे स्त्रियांना चांगले व्यासपीठ ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमातून दखल घेण्यात आलेल्या महिलांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळू शकेल. समाजाने स्त्रियांसाठी तर आता पंख दिलेलेच आहेत, पण त्या पंखांना बळकटी देण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे. त्यासाठी आभार.

– हेमांगिनी पाटील

सतत पाच वर्षे ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे सन्मानित दुर्गाकडून प्रेरणा मिळते आहे आणि शिकायलाही मिळते. हा समाजभान देणारा कार्यक्रम आहे. स्त्रियांमध्ये नैसर्गिक शक्ती असते. त्या कोणत्याही संकटाचा सामना करून स्वत:ला हव्या त्या क्षणापर्यंत नेऊन ठेवू शकतात. त्यामागे त्यांचे अमाप कष्ट असतात. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असते. हे साध्य असले तरी सहजसाध्य नाही, याची जाणीव करून देत प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. हा उपक्रम असाच पुढे सुरू राहावा. सन्मानित दुर्गाना भेटून मी अधिकच विनम्र झाले. मला असे प्रामाणिकपणे वाटते की, कलाकाराला समाजाकडून खूप प्रेम मिळते. ते प्रेम सामाजिक कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना मिळाले पाहिजे. ते खरोखरच समाजासाठी खूप काही निरपेक्ष भावनेने करत असतात. कोणाचेही प्रेम मिळावे म्हणून ते करत नाहीत. ते प्रेम त्यांना सहजपणे मिळतही नाही. कारण त्यांची त्या करत असलेल्या कामावर श्रद्धा आणि निष्ठा असते. ते कुठल्याही प्रसिद्धीसाठी करत नसतात. त्यामुळे असे कार्यक्रम तुम्हाला माणूस म्हणून अधिकाधिक नम्र बनवतात.

– मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

‘लोकसत्ता’चा हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने दुर्गाच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. सर्वाना प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वाकडून इतर स्त्रियाही प्रेरणा घेतील. सन्माननीय दुर्गाचे काम उत्तम आहे. हा कार्यक्रम मार्गदर्शनपर आहे.

– मृदुला भाटकर, न्यायमूर्ती

तुमचा आमच्या कामावरचा विश्वास महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार माझे सहकारी आणि ज्या पॅराप्लेजिक रुग्णांसाठी मी काम करते त्यांचा आहे. आमच्या संस्थेतील प्रत्येकाला आम्ही आत्मसन्मानाने जगायला शिकवतो. ‘लोकसत्ता’ने आमची दखल घेतल्यामुळे लोकांकडून आर्थिक मदत आणि जागरूकता निर्माण होईल याबद्दल मी आशावादी आहे. अजूनही पॅराप्लेजिक रुग्णांविषयी समाजात जागरूकता दिसत नाही, त्यांच्यासाठी सोयी-सुविधा सार्वजनिक ठिकाणी दिल्या जात नाहीत, ते यानिमित्ताने व्हावे असे वाटते.

– सुलभा वर्दे

मला ‘लोकसत्ता’ने सन्मानित केले याबद्दल आभारी आहे. डॉ. प्रभा अत्रे या आमच्यातील ज्येष्ठ नवदुर्गा आहेत. त्यांच्या सन्मानाने या कार्यक्रमाला उंची आली. हा कार्यक्रम आणि ‘लोकसत्ता’चा उपक्रम खूप आवडला. ‘लोकसत्ता’मुळे माझे कार्य अजून मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचले. त्याबद्दल धन्यवाद.

– डॉ. स्वर्णलता भिशीकर

अचानक माझी प्रकृती बिघडली असल्याने मी नवदुर्गा पुरस्कार सोहळ्याला येऊ शकले नाही. खरं तर आमच्या कामाची दखल घेऊन ‘लोकसत्ता’सारख्या वर्तमानपत्राद्वारे पुरस्कार देऊन सत्कार केला जाणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे आणि मोठी उपलब्धी आहे. यासाठी मी ‘लोकसत्ता’ची आभारी आहे.

 – रुबिना पटेल

‘लोकसत्ता’चा हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आहे. आजच्या जगात जेव्हा आपल्या आजूबाजूला तक्रार करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्या वातावरणामध्ये काही दुर्गा अशा आहेत, ज्या कुठल्याही तक्रारीला भीक न घालता स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि आपल्या परिसरासाठी अथक काम करत आहेत. हे खूप शिकण्यासारखे आहे, प्रेरणा घेण्यासारखे आहे. या उपक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे खूप खूप आभार.

– सोनाली कुलकर्णी , अभिनेत्री

अभिनंदन ‘लोकसत्ता’चं, कारण समाजात इतकं महत्त्वाचं काम करणाऱ्या या सगळ्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. नुसतं त्यांनाच नाही तर त्या नेमकं काय काम करतात त्या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. आज स्त्रियांसाठी अशी कामं करणं सोपं नाही, तरीही प्रतिकूल परिस्थितीत ते ही कामं करीत आहेत, म्हणूनच त्यांची आणि त्यांच्या कामाची ओळख लोकांना करून दिलीत त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन.

– प्रीती पाटकर, सामाजिक कार्यकर्त्यां

‘लोकसत्ता’कडून नवदुर्गाना सन्मानित करण्यात आले. त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा समाजामध्ये निर्माण झाली आहे. डॉ. प्रभा अत्रे यांचा जीवनगौरव देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या आजूबाजूला जे घडते आहे, त्यापेक्षा वेगळे प्रेरणादायी कार्य करणाऱ्या स्त्रियांना ‘लोकसत्ता’ने सन्मानित केल्यामुळे अधिकाधिक लोकांना चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल. त्यानिमित्ताने नवदुर्गाच्या कार्याचा परिचय झाला हीसुद्धा सकारात्मक बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला पाठबळ आणि अर्थबळ मिळेल.

– आशा खाडीलकर , शास्त्रीय गायिका

उत्तुंग काम करणाऱ्या स्त्रियांसोबत मला व्यासपीठावर उभे राहता आले, हा मी माझा सन्मान समजते. सगळ्या दुर्गा पुरस्कार विजेत्या स्त्रियांचे काम खूप मोठे आहे. त्यांचे काम ‘लोकसत्ता’च्या दुर्गा उपक्रमामुळे लोकांसमोर आले ही आनंदाची बाब आहे. सन्माननीय दुर्गाच्या कामामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या समाजात आहे, हे जगणे सुंदर आहे, याची खात्री पटली. त्यांच्या कामामुळे माणसाच्या चांगुलपणावर विश्वास बसतो.

 – इला भाटे, अभिनेत्री

 

सर्व प्रतिक्रिया भक्ती परब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2018 3:00 am

Web Title: loksatta durga ceremony 2018 dr prabha atre loksatta durga lifetime achievement award
Next Stories
1 कलेचा प्रांत सर्वाना जोडणारा
2 आता पुढेच जायचे..
3 चळवळ व्हावी
Just Now!
X